माहिती आणि प्रसारण मंत्रालय
उद्यापासून सुरु होणाऱ्या 55 व्या इफ्फी च्या चित्रपट तारे तारकांनी लखलखणाऱ्या भव्य उद्घाटन सोहळ्यासाठी गोवा सज्ज
ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्माता मायकेल ग्रेसी यांच्या 'बेटर मॅन' या चित्रपटाने होणार इफ्फी 2024 चां प्रारंभ
55 व्या इफ्फीच्या उद्घाटन सोहळ्यात साजरा केला जाणार भारताचा सांस्कृतिक आणि सिनेमॅटिक वारशाचा उत्सव
इफ्फीच्या उद्घाटन समारंभाचे भारतीय सांकेतिक भाषेतील समालोचनासह केले जाणार थेट प्रक्षेपण
#IFFIWood, 19 नोव्हेंबर 2024
गोव्यातील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमवर 20 नोव्हेंबर 2024 रोजी संध्याकाळी 5:00 वाजता, एका शानदार उद्घाटन सोहळ्यात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (IFFI) 55 व्या आवृत्तीचा श्रीगणेशा होणार आहे. पंजीममधील आयनॉक्स येथे दुपारी 2:00 वाजता, ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्माते मायकेल ग्रेसी दिग्दर्शित 'बेटर मॅन' या चित्रपटाच्या रेड-कार्पेट प्रदर्शनाने उत्सवाची सुरुवात होईल.
उद्घाटन सोहळ्यात दाखवला जाणारा चित्रपट
उद्घाटन सोहळ्यात दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटच्या प्रीमियरला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव तसेच माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत गोवा या सुंदर किनारपट्टी लाभलेल्या राज्यात पाहुण्यांचे स्वागत करतील. गोव्यात 2004 पासून इफ्फीचे आयोजन केले जात आहे. 'बेटर मॅन' चित्रपटाच्या निर्मिती चमूसह या नेत्यांची उपस्थिती जागतिक स्तरावर महत्त्वाचा ठरणारा सांस्कृतिक आणि सिनेमॅटिक उत्सव, म्हणून या उत्सवाचे महत्त्व अधोरेखित करते.
तारे तारकांच्या उपस्थितीने वलयांकित उद्घाटन सोहळा
चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत होणारा दिमाखदार उद्घाटन सोहळा, चित्रपट प्रेमींच्या हृदयात दीर्घकाळ वास करून राहील अशी सांस्कृतिक कार्यक्रमांची एक अविस्मरणीय संध्याकाळ अनुभवण्याचे वचन देतो.
उद्घाटन सोहळ्याचे यजमानपद ( अॅंकरींग) प्रसिद्ध चित्रपट व्यक्तिमत्व अभिषेक बॅनर्जी आणि भूमी पेडणेकर यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. 20 ते 28 नोव्हेंबर 2024 या कालावधीत संपन्न होणाऱ्या 55 व्या इफ्फीचा चित्रपटसृष्टीतील उत्कृष्टतेचा आठवडाभराचा प्रवास सुरू होत असताना ही मनोरंजक संध्याकाळ भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट गोष्टींना एकत्र आणणार आहे. या समारंभात चित्रपटसृष्टीतील अशा अनेक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांचा सहभाग पाहायला मिळणार आहे ज्यांची केवळ उपस्थिती देखील या चित्रपट महोत्सवाला एक वेगळी रंगत प्रदान करते.
या महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला सुभाष घई, दिनेश विजन, अमर कौशिक, एनएम सुरेश, आरके सेल्वामणी, ईशारी गणेशन, रवी कोतारकारा यांसारखे प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि गीतकार प्रसून जोशी उपस्थित राहणार आहेत. प्रसिद्ध अभिनेते नागार्जुन, नित्या मेनन, मला, विक्रांत मेसी, रकुल प्रीत, मानुषी छिल्लर, बोमन इराणी, राजकुमार राव, अभिषेक बॅनर्जी, जयदीप अहलावत, रणदीप हुडा, सानया मल्होत्रा, जयम रवी, जॅकी भगनानी, आर. सरथ कुमार, मुक्ता बर्वे, सोनाली कुलकर्णी, राधाकृष्णन पार्थिबन यांच्यासह इतर मान्यवर देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत. चित्रपटसृष्टीतील तारे तारकांचे हे दिमाखदार संमेलन, भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटातील सर्वोत्कृष्ट कलागुणांना एकत्र आणण्याच्या या महोत्सवाच्या क्षमतेचे दर्शन घडवतो.
या कार्यक्रमाला चित्रपटसृष्टीतील तारकामंडळासह श्री श्री रविशंकर हे देखील उपस्थित राहणार असून ते उपस्थितांना विशेष भाषणाने प्रेरित करतील.
ऑस्ट्रेलिया : इफ्फीत विशेष आकर्षण
यावर्षी ऑस्ट्रेलिया हा इफ्फीत विशेष आकर्षणाचा देश असेल. जानावी डान्स क्लॅन हा ऑस्ट्रेलियन मूलनिवासी जनांचा फर्स्ट नेशन्स डान्स ग्रुप प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक देवाणघेवाणीला प्रोत्साहन देईल.
सांस्कृतिक दर्शन आणि सादरीकरण
भारताची विविधता आणि धार्मिक परंपरा यांचे दर्शन घडवणाऱ्या श्वास रोखून धरायला लावणाऱ्या कलाविष्कारांच्या सादरीकरणाने उद्घाटन सोहळ्याचा प्रारंभ होईल. प्रेक्षकांना यामधून भारताच्या संस्कृतीच्या आध्यात्मिक आनंदाची अनुभूती मिळेल.
एक विशेष नाईन्टीज रिवाईंडः थरारक नृत्याविष्कारांचा समावेश असलेला ‘डान्स एक्स्प्लोजन’ हा कार्यक्रम बॉलिवुडमध्ये एकेकाळी गाजलेल्या चित्रपटांमधील जुन्या आठवणी जाग्या करेल. तर ‘टाईमलेस सोल्स’ या कार्यक्रमातून राज कपूर, एएनआर आणि मोहम्मद रफी यांच्यासारख्या सिनेमॅटिक लिजंड्सना दृश्ये, संगीत आणि कविता यांच्या माध्यमातून काव्यात्मक अभिवादन करण्यात येईल.
या समारंभात भारतीय चित्रपटाच्या उत्क्रांतीवर देखील प्रकाश टाकला जाईल, ज्यामुळे प्रेक्षकांना मूक चित्रपटांच्या कालखंडापासून ते आधुनिक सिनेमॅटिक मास्टरपिसेस पर्यंतची वाटचाल पाहायला मिळेल आणि सनी कौशल आणि सान्या मल्होत्रा यांचा सहभाग असलेला ऊर्जेने ओतप्रोत भरलेला सिनेमॅटिक सिंफनीचा समावेश असलेल्या अतिभव्य सोहळ्याने समारोप होईल.
सर्वांसाठी सुविधाजनक उद्घाटन समारंभ
इफ्फीच्या इतिहासात पहिल्यांदाच उद्घाटन सोहळ्यामध्ये लाईव्ह भारतीय सांकेतिक भाषा अनुवादाचा समावेश असेल, ज्यामुळे ज्यांना श्रवण विकलांगतेची समस्या आहे त्यांच्यासह सर्वच उपस्थितांना या सोहळ्यात पुरेपूर सहभाग घेऊन त्याचा मनसोक्त आनंद घेता येईल.
55 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, म्हणजे सिनेमॅटिक कला आणि सर्जनशीलता यांचा सन्मान करणाऱा एक भव्य सोहळा असेल. 55 व्या इफ्फीचा प्रारंभाची उत्सुकता लागून राहिलेला उलटगणतीचा काळ आता सुरू झालेला असल्याने भारतातील आणि जगभरातील सिनेरसिक गोव्यामधील इफ्फी 2024 या एक आठवडाभर चालणाऱ्या असामान्य सिनेमॅटिक प्रतिभेच्या गौरव सोहळ्याचा आनंद घेण्याची प्रतीक्षा करत आहेत.
* * *
PIB IFFI CAST AND CREW | G.Chippalkatti/Shailesh/Shraddha/D.Rane | IFFI 55
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji /PIBPanaji /pib_goa pibgoa[at]gmail[dot]com /PIBGoa
(Release ID: 2074803)
Visitor Counter : 24