पंतप्रधान कार्यालय
जर्मनीच्या चॅन्सेलर सोबत संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य
Posted On:
25 OCT 2024 9:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर 2024
महामहिम, चॅन्सेलर शोल्झ,
दोन्ही देशांचे प्रतिनिधी,
माध्यमातील मित्रपरिवार,
नमस्कार!
गुटन टाग!
सर्वप्रथम, मी चॅन्सेलर शोल्झ आणि त्यांच्या प्रतिनिधी मंडळाचे भारतात हार्दिक स्वागत करतो. गेल्या दोन वर्षांत तिसऱ्यांदा भारतात आपले स्वागत करण्याची संधी आम्हाला मिळाली याचा मला आनंद आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांतील घडामोडींवरून भारत आणि जर्मनी यांच्यातील धोरणात्मक भागीदारीच्या व्यापकतेचा अंदाज तुम्ही लावू शकता. आज सकाळी, आम्हाला जर्मनीच्या आशिया पॅसिफिक उद्योग जगताच्या परिषदेला संबोधित करण्याची संधी मिळाली.
माझ्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिली आयजीसी बैठक आत्ताच काही वेळापूर्वी संपन्न झाली. सध्या, आम्ही नुकतेच सीईओ मंचाच्या बैठकीतून आलो आहोत. त्याच वेळी, जर्मन नौदल जहाजे गोवा बंदरात दाखल होत आहेत. आणि क्रीडा जगतही मागे नाही - आमच्या हॉकी संघांमध्ये मैत्रीपूर्ण सामनेही खेळले जात आहेत.
मित्रहो,
चॅन्सेलर शुल्झ यांच्या नेतृत्वाखाली आमच्या भागीदारीला नवीन गती आणि दिशा मिळाली आहे. मी जर्मनीच्या "फोकस ऑन इंडिया " धोरणासाठी चॅन्सेलर शुल्झ यांचे अभिनंदन करतो, जे जगातील दोन मोठ्या लोकशाही देशांमधील भागीदारीचे सर्वसमावेशक पद्धतीने आधुनिकीकरण आणि ती उन्नत करण्यासाठी ब्लूप्रिंट प्रदान करते.
आज आमचा नवोन्मेष आणि तंत्रज्ञान आराखडाही जारी करण्यात आला आहे. महत्वपूर्ण आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान, कौशल्य विकास आणि नाविन्यपूर्णतेसाठी समावेशक सरकारी दृष्टिकोनावरही सहमती झाली आहे. यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर्स आणि स्वच्छ ऊर्जेसारख्या क्षेत्रात सहकार्य मजबूत होईल. हे सुरक्षित, विश्वासार्ह आणि लवचिक जागतिक पुरवठा मूल्य साखळी तयार करण्यात देखील मदत करेल.
मित्रहो,
संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रातील वाढत्या सहकार्यामुळे आमचा परस्पर दृढ विश्वास प्रतीत होतो. संवेदनशील माहितीच्या देवाणघेवाणीचा करार या दिशेने एक नवीन पाऊल आहे. आज स्वाक्षरी करण्यात आलेल्या परस्पर कायदाविषयक सहाय्य करारामुळे दहशतवाद आणि फुटीरतावादी तत्वांचा सामना करण्यासाठी आमच्या संयुक्त प्रयत्नांना आणखी बळ मिळेल.
हरित आणि शाश्वत विकासाप्रती सहयोगाची वचनबद्धता राखण्यासाठी दोन्ही देश सातत्याने कार्यरत आहेत. आज, आपली हरित आणि शाश्वत विकासाची भागीदारी पुढे घेऊन जात, हरित नागरी मोबिलिटी भागीदाराच्या दुसऱ्या टप्प्यावर आमची सहमती झाली आहे. तसेच, हरित हायड्रोजन आराखडाही जाहीर केला आहे.
मित्रहो,
युक्रेन आणि पश्चिम आशियामध्ये सुरू असलेले संघर्ष दोन्ही देशांसाठी चिंतेचा विषय आहे. युद्धातून कोणत्याही समस्या सोडवता येत नाहीत, ही भारताची कायमच भूमिका राहिली आहे आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वतोपरी योगदान देण्यास भारत तयार आहे.
हिंद- प्रशांत क्षेत्रात सागरी वाहतूक स्वातंत्र्य राखणे आणि आंतरराष्ट्रीय कायदेपालनाबाबत आम्ही दोघेही सहमत आहोत.
विसाव्या शतकात निर्माण करण्यात आलेली जागतिक व्यासपीठे एकविसाव्या शतकातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सक्षम नाहीत, यावरही आमचे एकमत झाले आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसह विविध बहुआयामी संस्थांमध्ये सुधारणांची गरज आहे.
भारत आणि जर्मनी त्या दिशेने सक्रीय सहकार्यातून वाटचाल करत राहतील.
मित्रहो,
लोका- लोकांमधील संपर्क हा आपल्या नातेसंबंधाचा महत्त्वपूर्ण स्तंभ आहे. कौशल्य विकास आणि व्यवसाय शिक्षणासाठी एकत्र येऊन काम करण्याचा निर्णय आज आपण घेतला आहे. आपल्या विद्यार्थ्यांना दुहेरी पदवीचा लाभ घेता यावा या हेतूने आयआयटी चेन्नई आणि ड्रेस्डेन विद्यापीठ यांच्यातील करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत.
भारताची युवा प्रतिभा जर्मनीच्या प्रगती आणि समृद्धीत योगदान देत आहे. जर्मनीने भारतासाठी जाहीर केलेल्या ‘कौशल्याधारित श्रम धोरणा’चे आम्ही स्वागत करतो. मला विश्वास आहे की आपल्या युवा प्रतिभेला जर्मनीच्या विकासात योगदान देण्याच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील.भारतीय प्रतिभेची क्षमता आणि कर्तृत्व यांबाबत विश्वास बाळगल्याबद्दल चॅन्सेलर शोल्झ यांचे मी अभिनंदन करतो.
महोदय,
तुमच्या भारत दौऱ्याने आपल्या भागीदारीला नवी गती, ऊर्जा आणि उत्साह मिळाला आहे. मी विश्वासाने सांगू शकतो की आपली भागीदारी सुस्पष्ट आहे आणि भवितव्य उज्ज्वल आहे.
जर्मन भाषेत, आल्लेस क्लार, आल्लेस गुट!
खूप खूप आभार
डांके शोन
N.Chitale/V.Joshi/R.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2068286)
Visitor Counter : 51
Read this release in:
Odia
,
Telugu
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam