कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय कौशल्य संस्था (आयआयएस) मुंबईचे केले उद्घाटन
ही संस्था दरवर्षी 5000 विद्यार्थ्यांना उद्योग 4.0 कौशल्यांमध्ये प्रशिक्षण देईल
प्रविष्टि तिथि:
09 OCT 2024 9:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 ऑक्टोबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे महाराष्ट्रातील 7600 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी केली.
राष्ट्रीय आणि जागतिक संधींसाठी भारतीय तरुणांची रोजगारक्षमता वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, पंतप्रधानांनी यापैकी एक प्रकल्प असलेल्या मुंबईतील भारतीय कौशल्य संस्थेचे उद्घाटन केले. याचा उद्देश उद्योग 4.0 साठी फॅक्टरी ऑटोमेशन, डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग, मेकॅट्रॉनिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा ॲनालिटिक्स आणि ॲडिटीव्ह मॅन्युफॅक्चरिंग सह विविध व्यवसायांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रत्यक्ष प्रशिक्षणाने सुसज्ज मनुष्यबळ विकसित करणे हा आहे. ही संस्था सेवा आणि उत्पादन क्षेत्रे तसेच इतर उदयोन्मुख व्यवसायांनाही चालना देईल. सार्वजनिक-खाजगी भागीदारी मॉडेलद्वारे स्थापित ही संस्था कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय, भारत सरकार आणि टाटा आयआयएस (टाटा ट्रस्ट अंतर्गत सेक्शन 8 कंपनी) यांच्यातील सहयोग आहे.

जेव्हा देशाच्या तरुणात आत्मविश्वास ठासून भरलेला असतो तेव्हाच जग त्या देशावर विश्वास ठेवते यावर पंतप्रधानांनी भर दिला. भारतातील तरुणांना या संधींसाठी तयार करण्यासाठी, त्यांची कौशल्ये जागतिक मापदंडांना अनुसरून असतील याकडे सरकार लक्ष पुरवत आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला.
मुंबईतील चुनाभट्टी येथील राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थे (NSTI) मधील 4 एकरच्या विस्तीर्ण संकुलात उभारलेल्या आयआयएस ची रचना अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि व्यावहारिक प्रशिक्षणाद्वारे उद्योगांसाठी सज्ज असे मनुष्यबळ विकसित करण्यासाठी केली आहे. आयआयएस मुंबई फॅक्टरी ऑटोमेशन, डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग, मेकॅट्रॉनिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा ॲनालिटिक्स आणि ॲडिटीव्ह मॅन्युफॅक्चरिंग यासारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये विशेष प्रशिक्षण पुरवेल.
ही संस्था सुरुवातीला ऍडव्हान्स्ड इंडस्ट्रियल ऑटोमेशन आणि रोबोटिक्स, इंडस्ट्रियल ऑटोमेशन फंडामेंटल्स, ऍडव्हान्स्ड एआरसी वेल्डिंग तंत्र, ॲडिटीव्ह मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिक व्हेईकल बॅटरी स्पेशालिस्ट आणि 2 आणि 3 व्हीलर ईव्ही तंत्रज्ञ हे सहा विशेष अभ्यासक्रम सुरू करेल. नजीकच्या काळात शिकण्याचा अनुभव वाढवण्यासाठी संस्था उमेदवारांसाठी वसतिगृह सुविधांचा देखील विस्तार करेल.
महाराष्ट्र सरकारचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोन्मेष मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, "आज सुरू केलेले आयआयएस केंद्र जगभरातील लोकांना आकर्षित करणारी अत्याधुनिक सुविधा बनणार आहे. पंतप्रधानांनी वारंवार उच्च कौशल्याला प्राधान्य देण्यावर भर दिला आहे आणि विद्यमान तसेच आगामी कौशल्य उपक्रमांसाठी आवश्यक निधीची तरतूद देखील केली आहे."
संस्थेकडे सुरुवातीला जागतिक तसेच भारतीय मूळ उपकरणे उत्पादक (OEM) यांच्या भागीदारीत विकसित केलेल्या 15 हून अधिक प्रगत प्रयोगशाळा असतील.

मुख्य अभ्यासक्रमांव्यतिरिक्त आयआयएस उद्योग भागीदारांच्या सहकार्याने अल्प-मुदतीचे अभ्यासक्रम देखील सुरु करेल. टाटा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्सचे अध्यक्ष वेणू श्रीनिवासन म्हणाले की भारतीय कौशल्य संस्था, मुंबई तिच्या जागतिक दर्जाच्या सुविधांसह, देशाच्या आव्हानांवर तोडगा काढण्यासाठी तसेच तरुणांना रोजगार आणि उद्योगाकडे जाण्यासाठी मदत करण्यासाठी धाडसी आणि त्वरित पावले उचलण्याच्या टाटा समूहाच्या दृष्टिकोनाचे प्रतीक आहे.
कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे सचिव अतुल कुमार तिवारी (दुरदृश्य प्रणालीद्वारे) आणि मंत्रालयाचे वरिष्ठ आर्थिक सल्लागार निलंबूज शरण, यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. टाटा आयआयएसचे अध्यक्ष वेणू श्रीनिवासन, टाटा ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ शर्मा, टाटा आयआयएस चे मुख्य कार्यकारी अधिकारी सब्यसाची दास आणि टाटा एमडीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश कृष्णमूर्ती यांच्यासह टाटा ट्रस्ट आणि टाटा कंपन्यांमधील प्रमुख व्यक्ती देखील उपस्थित होत्या.
* * *
JPS/N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2063679)
आगंतुक पटल : 98