रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय महामार्गांलगत विविध सोयी-सुविधा पुरवण्यासाठी ऑनबोर्डींग सेवा प्रदात्यांकारिता तयार केलेल्या ‘हमसफर धोरणा’ चा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रारंभ


राष्ट्रीय महामार्गांच्या वापरकर्त्यांना सुरक्षित तसेच आनंददायी प्रवासाचा अनुभव देण्याच्या उद्देशाने ‘हमसफर धोरणा’ची आखणी करण्यात आली असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

हमसफर धोरणाचा समाजातील दुर्लक्षित घटकांना लाभ मिळण्याबरोबरच महामार्गांलगत पर्यावरण-स्नेही सोयीसुविधांना चालना मिळणार - नितीन गडकरी

Posted On: 08 OCT 2024 6:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर 2024

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास आणखी सुखकर होण्यासाठी तसेच या मार्गांलगत सोयीसुविधांचा विकास जलदगतीने करण्याच्या उद्देशाने आखण्यात आलेल्या ‘हमसफर धोरणा’चा प्रारंभ केला. नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री अजय टमटा देखील उपस्थित होते.

 

उद्घाटन समारंभात उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की स्थानिक समाजातील दुर्लक्षित घटकांना या उपक्रमामुळे लाभ होणार आहे. ही योजना प्रवाशांसाठी सुरळीत, सुरक्षित आणि आनंददायी प्रवासाचा अनुभव मिळवून देईल ही बाब त्यांनी अधोरेखित केली. या उपक्रमातून उभारल्या जाणाऱ्या सुविधा पर्यावरण-स्नेही असतील आणि त्या उभारताना पर्यावरणशास्त्र आणि स्वच्छता यांच्याबाबतच्या दृष्टीकोनाची काळजी घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले. हे धोरण तयार करताना जल संवर्धन, मृदा संधारण, पाण्याचा पुनर्वापर, सौर उर्जा इत्यादी घटक लक्षात घेण्यात आले आहेत असे देखील त्यांनी आवर्जून सांगितले.
 

या धोरणाच्या माध्यमातून प्रवाशांना दर्जेदार सेवेचा पुरवठा सुनिश्चित करण्याच्या सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. ते पुढे म्हणाले की विविध सोयीसुविधांच्या दृष्टीकोनातून विचार करून  भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अनेक हरित महामार्गांचे नियोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रीय महामार्गांच्या बाजूला असणाऱ्या पेट्रोल पंपांच्या मालकांनी त्यांच्या पेट्रोल पंपाच्या ठिकाणी नियमानुसार सर्व मुलभूत सुविधा उपलब्ध असतील याची सुनिश्चिती केली पाहिजे अशी सूचना त्यांनी मांडली. राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी या नव्या धोरणाच्या अंतर्गत फूड कोर्ट, चहापाण्याची सोय, इंधन भरणा केंद्र, विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन, पार्किंगची सुविधा, शौचालयाची सोय, लहान मुलांची काळजी घेण्यासाठी खोली , एटीएम, वाहन दुरुस्तीचे दुकान, औषधांचे दुकान इत्यादींची सुविधा निर्माण करून प्रवासाचा अधिक उत्तम अनुभव मिळवून देण्याची सुनिश्चिती करण्यात आली आहे असे देखील नितीन गडकरी यांनीं यावेळी सांगितले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी याच्या मार्गदर्शनाखाली 1.5 लाख कि मी लांबीचे राष्ट्रीय महामार्ग पूर्ण झाल्याचे रस्ते वाहतूक व महामार्ग राज्यमंत्री अजय टमटा यांनी यावेळी सांगितले. पंतप्रधानांची दूरदृष्टी  आणि  केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्र्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक अडचणींवर मात करत देशातील पायाभूत सुविधांचा कायापालट होत आहे असे ते पुढे म्हणाले.

राष्ट्रीय महामार्ग व द्रुतगती महामार्गांच्या आजूबाजूला प्रवाशांसाठी स्वच्छ व प्रमाणित दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सध्या कार्यरत असलेल्या आणि नवीन सेवा प्रदात्यांच्या सहकार्याने एक सर्वसमावेशक चौकट पुरवण्याचे  या धोरणाचे उद्दिष्ट आहे. या हमसफर धोरणांतर्गत खाद्यपदार्थ , इंधन उपलब्ध करून देणारे तसेच तातडीच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या सेवा प्रदात्यांना नोंदणी करता येईल. या धोरणामुळे प्रवाशांसह संबंधित सर्व भागधारकांना फायदा होईल. नोंदणीकृत सेवा प्रदात्यांना त्यांच्याकडे सध्या असलेल्या परवानग्यांची नूतनीकरण करताना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही, तसेच महामार्गांवर प्रवाशांना त्यांच्या सुविधा सहज दिसून येण्यासाठी त्यांना फलक लावण्यासाठी जागा देखील दिली जाईल. याशिवाय राजमार्ग यात्रा या मोबाईल ऍप वर या सेवाप्रदात्यांचा उल्लेख केला जाईल.

या हमसफर धोरणामुळे प्रवाशांना स्वच्छ व प्रमाणित दर्जाच्या सुविधा मिळण्यास मदत होईल. राजमार्ग यात्रा या मोबाईल ऍपवर या सेवाप्रदात्यांची अचूक ठिकाणे त्यांना तात्काळ शोधता येतील.या सेवाप्रदात्यांना अथवा या सुविधांना गुणांकन देण्यासाठी अथवा तक्रारी करण्यासाठीही या  ऍपचा उपयोग प्रवाशांना करता येईल. 3 अथवा त्याच्या वरती गुणांकन राखणाऱ्या सेवाप्रदात्यांना त्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण करताना लागू असलेले शुल्क माफ होईल.

नोंदणीकृत सेवाप्रदात्यांच्या सुविधांचा दर्जा कायम राखत प्रवाशांना उत्तम सेवा मिळाव्यात यासाठी त्यांचे नियमित  निरीक्षण व मूल्यमापन केले जाईल. त्यासाठी तटस्थ एजन्सी नेमल्या जातील.ज्या सेवाप्रदात्यांचे गुणांकन 3 ताऱ्यांच्या खाली जाईल त्यांना तसे सूचित करणारे  ई-मेल अथवा एस एम एस पाठवले जातील व त्यांचे निरीक्षण अधिक जास्त वेळा केले जाईल.

राष्ट्रीय महामार्गांच्या लागत  उच्च व जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणे व प्रवाशांना अधिक आनंददायी प्रवासाचा अनुभव देण्यासाठी या हमसफर धोरणाचा खूप उपयोग होईल.

संपूर्ण धोरण या लिंक वर वाचता येईल :

https://static.pib.gov.in/WriteReadData/specificdocs/documents/2024/oct/doc2024108411501.pdf
 

 

N.Chitnis/S.Chitnis/U.Raikar/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 



(Release ID: 2063255) Visitor Counter : 52