पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

बुद्धिबळ ऑलिम्पियाड विजेत्यांसोबत पंतप्रधानांनी साधलेल्या संवादाचा मजकूर

Posted On: 26 SEP 2024 11:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 सप्‍टेंबर 2024

 

बुद्धिबळ स्पर्धक: सर, भारताने दोन्ही सुवर्णपदके जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि संघाने ज्या प्रकारे कामगिरी केली ती खूपच चांगली होती, म्हणजे मुलांचे 22 पैकी 21 गुण आणि मुलींचे 22 पैकी 19 गुण, एकूण 44 पैकी 40 इतके गुण आम्ही मिळवले. इतकं मोठं, अद्भूत प्रात्यक्षिक यापूर्वी कधीच घडलं नव्हतं.

पंतप्रधान: तिथे काय वातावरण होते?

बुद्धिबळ स्पर्धक: आम्ही प्रथमच जिंकलो आणि प्रत्येकजण आमच्यासाठी खूप आनंदी आहे आणि आम्ही सर्वांनीच तो आनंद साजरा देखील केला, खरं तर प्रत्येक विरोधकाने देखील येऊन आमचे अभिनंदन केले आणि आमच्यासाठी खरोखर आनंद व्यक्त केला.

बुद्धिबळ स्पर्धक: सर, गेल्या काही वर्षांमध्ये आपण पाहिले आहे की, या सामन्यासाठी बरेच प्रेक्षक येऊन गेले परंतु फक्त हा सामना पाहण्यासाठी खास दूरदूरवरून प्रेक्षक आले होते, जे माझ्या मते पूर्वी इतके कधीच नव्हते. त्यामुळे मला वाटतं बुद्धिबळाची लोकप्रियताही खूप वाढली त्यामुळे आम्हाला ते पाहून खूप बरं वाटलं, थोडं दडपण होतं पण प्रेक्षक आम्हाला खूप पाठिंबा देत होते, ही खूपच चांगली भावना होती आणि जेव्हा आम्ही जिंकलो तेव्हा सर्वजण "भारत, भारत!" असा नारा देखील देत होते.

बुद्धिबळ स्पर्धक: यावेळी या स्पर्धेत एकूण 180 देश सहभागी झाले होते, चेन्नई येथे ऑलिम्पियाड झाले तेव्हा दोन्ही भारतीय संघांनी (पुरुष आणि महिला) कांस्यपदक जिंकले. महिला संघाच्या शेवटच्या सामन्यात, आम्ही अमेरिकेविरुद्ध खेळलो, आणि आम्ही हरलो, सुवर्णपदकाची संधी गमावली. पण यावेळी, आम्ही पुन्हा त्यांच्याविरुद्ध खेळलो आणि भारतासाठी सुवर्णपदक जिंकण्यासाठी अधिक प्रेरित झालो. यावेळी आम्हाला त्यांना पराभूत करायचेच होते. 

पंतप्रधान: त्यांना पराभूत करायचेच आहे.

बुद्धिबळ स्पर्धक: तो सामना अगदी जवळ आला आणि अनिर्णित राहिला, पण आम्ही सुवर्ण जिंकले सर, कारण यावेळी आम्ही आमच्या देशासाठी जिंकून परत येणार होतो आणि यापलीकडे दुसरा मार्गदेखील नव्हता.

पंतप्रधान: तुमची जिद्द असेल तेव्हाच तुम्हाला विजय मिळतो. पण जेव्हा तुम्ही 22 पैकी 21 आणि 22 पैकी 19 गुण मिळवले तेव्हा इतर खेळाडूंची किंवा कार्यक्रमाच्या आयोजकांची प्रतिक्रिया काय होती?

बुद्धिबळ स्पर्धक: सर, मला वाटते की गुकेशला या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे, मला फक्त एक गोष्ट सांगायची आहे की आम्ही खात्रीने जिंकलो, (विशेषत: खुल्या संघात असे वाटत होते की कोणीही जवळ येऊ शकत नाही आणि आमच्या महिला संघात आम्ही पहिले विजेतेपद पटकावले. )सात सामने आम्ही सालग जिंकलो, आणि नंतर एक छोटासा धक्का बसला, परंतु आम्ही लवचिकता दाखवली आणि पुनरागमन केले. पण खुल्या संघाबद्दल, सर, आम्ही किती वरचढ होतो हे मी व्यक्त करू शकत नाही. मला वाटतं, बोर्डात असलेला गुकेशच ते अधिक चांगल्या प्रकारे समजावून सांगू शकेल. 

बुद्धिबळ स्पर्धक: हा अनुभव खरोखरच एक उत्तम सांघिक प्रयत्न होता. आमच्यापैकी प्रत्येकजण उत्कृष्ट फॉर्ममध्ये आणि खूप प्रेरित होतो. 2022 च्या ऑलिम्पियाडमध्ये, आम्ही सुवर्णपदक जिंकण्याच्या अगदी जवळ आलो होतो, परंतु मी एक गेम खेळला जिथे मी जिंकू शकलो असतो आणि सुवर्ण जिंकू शकलो असतो, परंतु दुर्दैवाने, मी तो खेळ गमावला. प्रत्येकासाठी ते हृदयद्रावक होते. त्यामुळे, यावेळी आम्ही खूप प्रेरित होतो आणि सुरुवातीपासूनच आम्ही जिंकण्याचा निर्धार केला होता. मला खरोखर आनंद झाला आहे!

पंतप्रधान: तुम्ही कधी विचार केला आहे का की एआय वापरून तुम्ही तुमचा खेळ सुधारू शकता किंवा इतरांचा खेळ समजू शकता?

बुद्धिबळ स्पर्धक: होय, सर.....एआय सह, बुद्धिबळ विकसित झाले आहे. कारण नवीन तंत्रज्ञान आहेत, आणि संगणक आता बरेच शक्तिशाली झाले आहेत, आणि बुद्धिबळात देखील अनेक नवीन कल्पना दर्शवित आहेत. त्यातून आपण अजूनही शिकत आहोत, आणि मला वाटते की शिकण्यासारखे बरेच काही आहे.

बुद्धिबळ स्पर्धक: सर मला वाटते, आता असे घडले आहे की एआय साधने प्रत्येकासाठी उपलब्ध झाले आहेत कारण त्याचे लोकशाहीकरण केले गेले आहे आणि आता आम्ही ते निश्चितपणे आमच्या तयारीसाठी वापरतो.

पंतप्रधान: मला अजून सांगा.

बुद्धिबळ स्पर्धक: फार काही नाही सर, हा एक अनुभव आहे.

पंतप्रधान: फार काही नाही? तू नुकताच जिंकलास... सुवर्ण (पदक) सहज आले?

बुद्धिबळ स्पर्धक: नाही सर, हे सोपे नव्हते. आम्ही खरोखर कठोर परिश्रम केले. मला वाटते की माझ्या सर्व सहकाऱ्यांनी या टप्प्यावर पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली.

पंतप्रधान: मी असे ऐकलें आहे की तुमच्यापैकी अनेकांचे वडील आणि आई डॉक्टर आहेत? 

बुद्धिबळ स्पर्धक: माझे आई-वडील दोघेही डॉक्टर आहेत आणि माझी बहीण देखील डॉक्टर आहे, मी लहान असताना त्यांना पहाटे 2 वाजता रुग्णांचे फोन येत असे आणि त्यांना त्यांच्याकडे उपचारासाठी जावे लागे. म्हणून मला वाटले की मी अधिक स्थिर करिअर निवडायला हवे, पण नंतर मला समजले की खेळांडूनांही खूप धावपळ करावी लागते!

बुद्धिबळ स्पर्धक: सर, मी नेहमी पाहिले आहे की, तुम्ही प्रत्येक खेळाला आणि प्रत्येक स्पर्धकाला खूप प्रोत्साहन आणि समर्थन नेहमीच देत असता आणि मला वाटते की, तुम्हाला खेळाबद्दल खूप प्रेम आहे. प्रत्येक खेळाबद्दल हे प्रेम दिसून येतं मला याचं कारण जाणून घ्यायचं  आहे.

पंतप्रधान: मी तुम्हाला सांगतो, मला समजते की एखादा देश केवळ पैशांमुळेविकसित होत नाही, कुठल्याही  देशाचे विकसित असणे केवळ त्याच्याकडे किती पैसा आहे, किती उद्योग आहे, त्याचा जीडीपी किती आहे यावर अवलंबून नाही. तर प्रत्येक क्षेत्रात जागतिक प्रभुत्व असायला हवे. जर चित्रपटसृष्टी असेल तर जास्तीत जास्त ऑस्कर कसे मिळवावे, शास्त्रज्ञ किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात तर जास्तीत जास्त नोबेल कसे मिळवावे. त्याचप्रमाणे आपल्या मुलांनी खेळातही जास्तीत जास्त सुवर्ण कसे मिळवावे? असा सर्व बाबतीत जेव्हा चढता आलेख असतो तेव्हा देश महान होतो. मी गुजरातमध्ये असतानाही खेळांच्या  महाकुंभाचे आयोजन करत होतो.

लाखो मुले खेळत असत, त्यापैकी मी तर मोठ्या वयाच्या लोकांनाही खेळण्याची प्रेरणा देत असे.  मग त्यातून चांगल्या क्षमतेची मुले पुढे येत गेली. माझा असा विश्वास आहे की, आपल्या देशातील तरुणांमध्ये क्षमता आहे. दुसरे माझे असे मत आहे की, देशात समाजिक जीवनाचे जे चांगले वातावरण घडवायचे आहे, त्यासाठी ज्याला खिलाडूवृत्ती म्हणतात, ती केवळ क्रीडापटूंसाठीच नाही, तर ती एक संस्कृती व्हायला हवी, सामाजिक आयुष्यातली संस्कृती व्हायला हवी.

बुद्धिबळ स्पर्धक: तुम्ही रोज इतके मोठे - मोठे निर्णय घेत असता, तर अशावेळी तुम्ही काय सल्ला द्याल आम्हाला, की या तणावाच्या परिस्थितीला कसे हाताळले जाऊ शकते?

पंतप्रधान: बघा शारीरिक तंदुरुस्ती खूप महत्त्वाची भूमिका बजावते. आपल्यापैकी अनेकजण असतील ज्यांनी शारीरिक तंदुरुस्तीवर काम केले असेल. त्यासाठी तुम्हाला प्रशिक्षण दिले जात असेल,  तुम्हाला खाण्यापिण्याविषयी माहिती दिली जात असेल. असं सांगितलं जात असेल की, अमूक एक गोष्टी खाव्यात. खेळाच्या आधी अमूक प्रमाणात खा, खाऊ नका, सगळे सांगितले जात असेल तुम्हाला. मला असं वाटतं की जरआपण या गोष्टींची सवय, जर विकसित करत गेलो तर आपण सगळ्या समस्या पचवू शकतो. बघा, निर्णय घेण्यासाठी तुमच्याकडे भरपूर माहिती असायला हवी, भरपूर माहिती आणि सकारात्मक, नकारात्मक सर्व काही असायला हवं. तुम्हाला हे ऐकायला आवडू लागेल असं ऐकणं, जर तुम्हाला सवय लागेल तरच. मनुष्य जातीचा एक स्वभाव असतो, जे चांगलं वाटतं तेच ऐकतात. तर मग निर्णयात चूक होते. पण जर तुम्ही सर्व प्रकारच्या गोष्टी ऐकत असाल, सर्व प्रकारच्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असाल आणि स्वतःचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करत असाल, आणि जर काहीच समजत नसेल तर विना संकोच एखाद्या जाणकार व्यक्तीला त्याबद्दल विचारत असाल, तर तुम्हाला कमी त्रास होतो. आणि मी असे मानतो की काही गोष्टी तर अनुभवाने समजतात, आणि जसे मी म्हटले आहे त्याप्रमाणे, योग मेडिटेशन याची खरोखरच खूप ताकद आहे.

बुद्धिबळ स्पर्धक: सर, आम्ही आता फक्त दोन आठवडे खेळलो, तर पूर्ण थकून गेलो, पण तुम्ही वर्षानुवर्षे दिवसभर इतके काम करता, म्हणजे विश्रांती पण घेत नाही, तर मला म्हणायचे आहे की, what is secret of your energy (तुमच्या ऊर्जेचे रहस्य काय आहे.) तुमच्याकडे इतकी माहिती आहे, आणि तरी सुद्धा तुम्ही शिकण्यासाठी आतुर आहात, आणि सर्व जगासाठी उपलब्ध आहात, आणि तुम्ही नेहमीच प्रत्येक खेळाडूला कामगिरी करण्यासाठी खूप उत्साहाने भरून टाकता, आणि मला तुम्हाला विचारावेसे वाटते की, जर तुम्हाला आम्हा सगळ्यांना एक सल्ला द्यायचा असेल, त्याबद्दल जसे तुम्ही चेस कडे,  बुद्धिबळ या खेळाकडे पाहता.

पंतप्रधान: बघा असे असते की, आयुष्यात कधीच समाधानी झाल्यासारखे राहू नका. समाधानी नाही झाले पाहिजे कोणत्याही गोष्टीबाबत. नाहीतर मग पुन्हा झोप यायला सुरू होते.

बुद्धिबळ स्पर्धक: त्यामुळेच आपण तीन तासच झोपता ना सर.

पंतप्रधान: थोडक्यात आपल्यात एक भूख कायम राहायला हवी. काही तरी नवे करण्याची, काही तरी जास्तीचे करण्याची 

बुद्धिबळ स्पर्धक: तेव्हा आम्ही सर्व स्पर्धा जिंकल्या होत्या आणि आम्ही सगळे बसमधून येत होतो, आणि तुमचे भाषण आम्ही लाइव्ह पाहत होतो आणि तिथे आपण जगासमोर घोषणा केली की, भारताने ही दोन ऐतिहासिक सुवर्णपदके जिंकली आहेत, आणि आम्ही सगळे जण त्यावेळी एकत्र बसमध्ये होतो. आम्हाला इतका आनंद झाला की, आपण भाषणातून जाहीर केले, संपूर्ण जगासमोर. मी 1998 साली  पहिल्यांदा ऑलिम्पियाडमध्ये सहभागी झालो. त्या वेळी गॅरी कास्पारोव्ह, कार्पोव्ह हे सगळे लोक खेळत असत आणि आम्ही त्यांची सही घेण्यासाठी धावत जायचो,  ऑटोग्राफ. भारताची रँकिंग तर खूपच खालावलेली होती. आणि या वेळी जेव्हा मी प्रशिक्षक म्हणून गेलो होतो, आणि मी पाहत होतो की गुकेश सहभागी झाला आहे,  ब्रह्मानंद सहभागी झाला आहे, अर्जुन सहभागी झाला आहे, दिव्याई येत आहे, हरिका येत आहे आणि लोक आता त्यांची सही मिळवण्यासाठी धावत आहेत. तर हा जो बदल आहे, आणि हा जो या आत्मविश्वास या खेळात आला आहे, नव्या मुलांमध्ये आला आहे. मला वाटते तुमचे जे स्वप्न आहे, भारताला पहिल्या क्रमांकावर असायला हवे. मला वाटते त्या दिशेन बदल घडत आहेत सर.

बुद्धिबळ स्पर्धक: खूप खूप धन्यवाद, तुम्ही हाताशी अगदी थोडाच वेळ असतना, आपण अमेरिकेत होता, आपण इतका मौल्यवान वेळ दिलात, आम्हाला भेटण्यासाठी, आम्ही खूप प्रेरित झालो आहोत.

पंतप्रधान: तुम्हीच माझ्यासाठी मौल्यवान आहात.

बुद्धिबळ स्पर्धक: मला वाटते केवळ आम्हालाच नाही, तर हे इतके महत्त्वाचे आहे की, बाकी जे कोणी बुद्धिबळ खेळत आहेत, आता त्यांच्यासाठी ही खूप मोठी प्रेरणा असेल, की त्यांनी चांगली कामगिरी करावी आणि तुम्हाला येऊन भेटावे, तर ही त्यांच्यासाठीही खूपच मोठी प्रेरणा असेल. 

पंतप्रधान: नाही, हे खरं आहे हो, कधी कधी हे पाहूनच कळतं आपल्याला की, हो यार लोकं हे करू शकतात, आपणही करू शकतो. मी एकदा गुजरातमध्ये एक मोठी बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केली होती, ज्यावेळी मी मुख्यमंत्री होतो तेव्हा.

बुद्धिबळ स्पर्धक: वीस हजार लोक त्यात एकत्र बुद्धिबळ खेळले होते, आणि सर त्यावेळी यांपैकी बरेचसे लोक बुद्धिबळ खेळत नव्हते.

पंतप्रधान: नाही हो, तेव्हा तर यांपैकी अनेकांचा जन्मही झाला नव्हता... तेव्हा तर लोकांना आश्चर्यच वाटले असेल की मोदी काय करत आहेत. अच्छा तर वीस हजार जणांची सोय करण्यासाठी जागेचीही गरज असते, मग त्यासाठी मोठा मंडप बांधून घेतला होता मी. ते पाहून आमेचे अधिकारीही म्हणत होते, की साहेब या सगळ्यासाठी एवढा खर्च कशाला. मी म्हटले यासाठीच पैसे खर्च करेन मी. 

बुद्धिबळ स्पर्धक: सर, जेव्हा तुम्ही मला एवढं प्रोत्साहन दिलंत, त्यामुळे मला इतका आनंद झाला की, मी म्हणाले आत्ता तर मला पूर्णतः झोकून द्यायचं आहे. आता तर मला भारतासाठी दर वेळेला पदक जिंकायचे आहे आणि त्यावेळी तर मला खूपच आनंद झाला होता.

पंतप्रधान: त्यात सहभागी झाला होतात तुम्ही.

चेस पार्टिसिपेंट: होय. तेव्हा तुम्ही आय़ोजित केले होते. खूप सार्‍या मुली सहभागी झाल्या होत्या तेव्हा.

पंतप्रधान: व्वाह. मग त्या वेळी तुम्ही तिथे कसे पोहोचला होतात.

बुद्धिबळ स्पर्धक: तेव्हा मी आशियाई अंडर - 9 स्पर्धा जिंकली होती, तेव्हा कोणीतरी माझ्या आईला सांगितले की, मोठी स्पर्धा आयोजित केली आहे गुजरातमध्ये, गांधीनगरमध्ये, तर तेव्हा मला बोलावले गेले होते.

पंतप्रधान: तर हे मी स्वतःसोबत ठेऊ शकतो ना.

बुद्धिबळ स्पर्धक: हो सर. ते फ्रेम करून द्यायचे होते. फ्रेम करून तुम्हाला द्यायचे होते सर.. पण....

पंतप्रधान: नाही मुली, कसलंच वाईट वाटून घेऊ नकोस, ही माझ्यासाठी खूपच चांगली आठवण आहे. तर मग ही शाल ठेवली आहे की नाही.

बुद्धिबळ स्पर्धक: हो सर ठेवली आहे.

पंतप्रधान: चला तर मग, मला खूप बरं वाटलं. तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आहे. तुम्ही प्रगती करत राहा.

 

* * *

S.Tupe/Gajendra/Tushar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2059700) Visitor Counter : 38