पंतप्रधान कार्यालय
गुजरात मध्ये गांधीनगर इथे रि-इन्व्हेस्ट 2024 या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर
Posted On:
16 SEP 2024 10:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 सप्टेंबर 2024
गुजरातचे राज्यपाल श्री आचार्य देवव्रतजी, गुजरातचे मुख्यमंत्री श्री भूपेंद्रभाई पटेल, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री श्री चंद्राबाबू नायडूजी, राजस्थानचे मुख्यमंत्री श्री भजन लाल शर्माजी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री श्री मोहन यादवजी…. छत्तीसगडचे मुख्यमंत्रीजी सुद्धा इथे दिसत आहेत, गोव्याचे मुख्यमंत्रीही आहेत आणि अनेक राज्यांचे ऊर्जामंत्रीही मला दिसत आहेत.त्याचप्रमाणे, परदेशी पाहुणे, जर्मनीच्या आर्थिक सहकार्य मंत्री, डेन्मार्कचे उद्योग व्यवसाय मंत्री, माझे मंत्रिमंडळातील सहकारी प्रल्हाद जोशी, श्रीपाद नाईकजी आणि जगातील अनेक देशांमधून आलेले सर्व प्रतिनिधी, स्त्री-पुरुष सज्जनहो!
जगातील अनेक देशांमधून आलेल्या सर्व मित्रांचे मी स्वागत आणि अभिनंदन करतो. पुनर्गुंतवणूक परिषदेची (RE-Invest Conference) ही चौथी खेप आहे. मला पूर्ण विश्वास आहे की येत्या तीन दिवसांत ऊर्जा क्षेत्रातील भविष्य, तंत्रज्ञान आणि धोरणे यावर गंभीर-महत्वपूर्ण चर्चा होईल.आमचे सर्व ज्येष्ठ मुख्यमंत्रीही येथे आहेत. त्यांनाही या क्षेत्रातील खूप अनुभव आहे, इथे घडणाऱ्या चर्चांमध्ये त्यांचे मोलाचे मार्गदर्शन आम्हाला मिळणार आहे. या परिषदेतून आपण एकमेकांकडून जे शिकलो ते संपूर्ण मानवजातीच्या भल्यासाठी उपयुक्त ठरेल. माझ्या शुभेच्छा तुम्हा सर्वांसोबत आहेत.
मित्रांनो,
आपण सर्व हे जाणताच की भारतीय जनतेने 60 वर्षांनंतर एखाद्या सरकारला तिसऱ्यांदा निवडून दिले आहे.आमच्या सरकारला तिसरा कार्यकाळ मिळण्यामागे भारताच्या मोठ्या आकांक्षा आहेत.आज 140 कोटी भारतीयांना खात्री आहे, भारतातील युवावर्गाला खात्री आहे, भारतातील महिलांना खात्री आहे, की गेल्या 10 वर्षांत त्यांच्या आकांक्षांना जे पंख फुटले आहेत, त्यामुळे त्यांना या तिसऱ्या कार्यकाळात मोठी झेप घेता येईल. देशातील गरीब, दलित, शोषित, पिडीत आणि वंचित जनतेला विश्वास आहे की आमचा तिसरा कार्यकाळ त्यांना सन्मानाने जगण्याची हमी देईल.140 कोटी भारतीय, भारताला वेगाने पहिल्या तीन अर्थव्यवस्थांपैकी एक बनवण्याच्या संकल्पाने काम करत आहेत. त्यामुळे आजची ही परिषद काही सर्वसाधारण घटना नाही. हा एका मोठ्या संकल्पाचा, मोठ्या मोहिमेचा भाग आहे. 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या आमच्या कृती योजनेचा हा एक भाग आहे आणि आम्ही हे कसे करत आहोत याची झलक, आमच्या तिसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या शंभर दिवसांच्या निर्णयांमध्ये दिसून येते.
मित्रांनो,
पहिल्या शंभर दिवसांत आमचे प्राधान्यक्रमही दिसून येतात, आमचा कामाचा वेग आणि प्रमाण यांचे प्रतिबिंब देखील दिसून येते. या कालावधीत, भारताच्या जलद विकासासाठी महत्त्वाच्या असलेल्या प्रत्येक क्षेत्र आणि प्रत्येक घटकाकडे आम्ही लक्ष पुरवले आहे. या 100 दिवसांत भौतिक आणि सामाजिक पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. आपल्या परदेशी पाहुण्यांना हे जाणून आश्चर्य वाटेल की भारतात आपण 70 दशलक्ष म्हणजे 7 कोटी घरे बांधत आहोत, जी जगातील अनेक देशांच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त आहेत. सरकारच्या या आधीच्या दोन कार्यकाळांमध्ये आम्ही यापैकी 40 दशलक्ष म्हणजे 4 कोटी घरे बांधून पूर्ण केली आहेत. आणि तिसऱ्या कार्यकाळामध्ये आमच्या सरकारने उर्वरित 30 दशलक्ष म्हणजेच 3 कोटी नवीन घरे बांधण्याचे कामही सुरू केले आहे. गेल्या 100 दिवसांत भारतात 12 नवीन औद्योगिक शहरे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या 100 दिवसांत 8 जलदगती रस्ते (हायस्पीड रोड कॉरिडॉर) प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. गेल्या 100 दिवसांत, 15 हून अधिक नवीन भारत निर्मित (मेड इन इंडिया), नीमजलद (सेमी हायस्पीड) वंदे भारत रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. संशोधनाला चालना देण्यासाठी आम्ही एक लाख कोटी (1 ट्रिलियन) रुपयांचा संशोधन निधीही तयार केला आहे. विद्युतचलित परिवहनाला (इलेक्ट्रिक मोबिलिटी) प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही अनेक उपक्रमांची घोषणाही केली आहे. आमचे उद्दिष्ट उच्च कार्यक्षम जैवउत्पादनाला (हाय परफॉर्मेंस बायोमैन्युफेक्चरिंग) प्रोत्साहन देणे आहे आणि उद्याचे भविष्य याच्याशी निगडीतच असणार आहे. यासाठी जैव-ई-तीन धोरणालाही (बायो-ई-थ्री पॉलिसी) मान्यता देण्यात आली आहे.
मित्रांनो
गेल्या शंभर दिवसांत हरित ऊर्जेसाठी अनेक मोठे निर्णयही घेण्यात आले आहेत. आम्ही किनाऱ्यापासून दूर पाण्यात (ऑफ-शोअर) पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी व्हायेबिलिटी गॅप फंडींग स्कीम (आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या मात्र व्यावसायिक दृष्ट्या व्यवहार्य नसणाऱ्या प्रकल्पांसाठी निधी पुरवठा योजना) सुरू केली आहे.यावर आम्ही सात हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च करणार आहोत.भारत आगामी काळात 31 हजार मेगावॅट जलविद्युत निर्मितीच्या दृष्टीने काम करत आहे. यासाठी बारा हजार कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर झाला आहे.
मित्रांनो
भारताची विविधता, भारताचे दर्जात्मक प्रमाण, भारताची क्षमता, भारताचे सामर्थ्य, भारताची कामगिरी… हे सर्व अनोखे आहे. म्हणूनच मी म्हणतो- जागतिक अनुप्रयोगासाठी भारतीय उपाय (Indian solutions for global application). जगालाही हे चांगलेच माहीत आहे. आज केवळ भारतीयांनाच नाही तर संपूर्ण जगाला भारत हा 21 व्या शतकातील सर्वोत्तम पर्याय असल्याचे वाटत आहे. आपण पहा…या महिन्याच्या सुरुवातीलाच ग्लोबल फिनटेक फेस्ट या जागतिक वित्त-तंत्रज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर जगभरातील लोकांनी पहिल्या सोलर इंटरनॅशनल फेस्टिव्हल या सौर आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्ये सहभाग घेतला. मग ग्लोबल सेमीकंडक्टर समिट या जागतिक सेमीकंडक्टर शिखर परिषदेसाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक भारतात आले. याच दरम्यान भारताने नागरी विमान वाहतूक विषयक आशिया-हिंदमहासागर मंत्रीस्तरीय परिषदेचे आयोजन करण्याची जबाबदारी निभावली आणि आज आपण हरित ऊर्जेच्या भविष्यावर चर्चा करण्यासाठी एकत्र आलो आहोत.
मित्रांनो,
माझ्यासाठी हा अतिशय आनंददायी योग आहे की ज्या गुजरातच्या भूमीवर श्वेतक्रांती…दुग्धक्रांती (मिल्क रिव्होल्यूशन) झाली,ज्या भूमीवर मध क्रांती झाली… मधूर क्रांती, मधाचे काम सुरु झाले,ज्या भूमीवर सौर क्रांती (सोलर रिव्होल्यूशन) झाली...हा भव्य कार्यक्रम देखील तिथेच होत आहे.गुजरात हे भारतातील पहिले राज्य आहे ज्याने भारतात सर्वात आधी स्वतःचे सौर ऊर्जा धोरण तयार केले.आधी गुजरातमध्ये धोरण बनवले गेले… त्यानंतर आम्ही राष्ट्रीय स्तरावर पुढे गेलो. भूपेंद्रभाईंनी आत्ताच सांगितल्याप्रमाणे, हवामानासाठी स्वतंत्र मंत्रालय तयार करण्यात गुजरात जगात खूप पुढे आहे. ज्या काळात भारतात सौरऊर्जेबाबत फारसे बोलले देखील जात नव्हते…..तेव्हा गुजरातमध्ये शेकडो मेगावॅटचे सौरऊर्जा प्रकल्प उभारले जात होते.
मित्रांनो
तुम्ही पण बघितलेच असेल... या ठिकाणाचे नाव महात्मा गांधी यांच्या नावावरुन - महात्मा मंदिर असे आहे. जेव्हा जगात हवामानबदल विषयक आव्हानाचा विषय उपस्थित देखील झाला नव्हता, तेव्हा महात्मा गांधींनी याबाबत जगाला सावध केले होते.
आणि आपण महात्मा गांधींचे जीवन लक्षात घेतले तर ते किमान कार्बन उत्सर्जन असलेले जीवन होते, त्यांचे निसर्गावर प्रेम होते आणि ते म्हणाले होते - पृथ्वीकडे आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसे स्रोत आहेत, परंतु हाव मात्र पूर्ण होऊ शकत नाही. महात्मा गांधींच्या या दृष्टीकोनाचा उदय भारताच्या महान परंपरेतून झाला आहे. आपल्यासाठी, ग्रीन फ्युचर, नेट झिरो, हे शब्द नवे नाहीत. ही भारताची गरज आहे, ही भारताची वचनबद्धता आहे, ही भारताच्या प्रत्येक राज्य सरकारची बांधिलकी आहे. एक विकसनशील अर्थव्यवस्था म्हणून आमच्याकडे या वचनबद्धतेपासून मुक्त राहण्याचे एक वैध निमित्त देखील होते. जगाला उद्ध्वस्त करण्यात आमचा हात नाही असे आम्ही जगाला सांगू शकलो असतो, पण असे सांगून आम्ही हात वर केले नाहीत. आम्ही मानवजातीच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असणारे लोक होतो आणि म्हणूनच आम्ही जगाला मार्ग दाखवण्यासाठी आपली जबाबदारी ओळखून अनेक पावले उचलली.
आजचा भारत केवळ आजसाठी नाही तर येत्या हजार वर्षांसाठी पायाभरणी करत आहे. केवळ शिखरावर पोहोचणे हे आमचे उद्दिष्ट नाही. आघाडीवर टिकून राहण्याची आमची तयारी आहे. आपल्या ऊर्जेच्या गरजा काय आहेत, हे भारताला चांगलेच माहीत आहे... 2047 सालापर्यंत विकसित राष्ट्र होण्यासाठी आपल्या गरजा काय आहेत, हे भारताला माहीत आहे. आणि आमच्याकडे स्वतःचे तेल आणि वायूचे साठे नाहीत हे देखील आम्हाला माहित आहे. ऊर्जेच्या बाबतीत आम्ही स्वयंपूर्ण नाही. आणि म्हणूनच आम्ही सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, अणुऊर्जा आणि जलविद्युत यांच्या आधारे आमचे भविष्य घडवण्याचा निर्णय घेतला आहे.
मित्रहो,
G-20 समूहात भारत हा पहिला देश आहे ज्याने पॅरिसमध्ये निर्धारित केलेल्या हवामान वचनबद्धतेची पूर्तता 9 वर्षे आधी केली आहे. आणि G-20 देशांच्या समूहात हे करून दाखवणारे आपण एकमेव आहोत. विकसित राष्ट्रे जे करू शकली नाहीत, ते एका विकसनशील राष्ट्राने जगाला करून दाखवले आहे. आता 2030 सालापर्यंत 500 गीगावॅट नवीकरणीय ऊर्जेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आम्ही एकाच वेळी अनेक स्तरांवर काम करत आहोत. आम्ही हरित संक्रमण ही लोकचळवळ बनवत आहोत. आपण सर्वांनी आताच जो व्हिडिओ पाहिला, त्यानंतर आपण आपल्या पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेचा अभ्यास केला पाहिजे. रुफटॉप सौरउर्जेची ही अनोखी योजना आहे. या योजने अंतर्गत, आम्ही प्रत्येक कुटुंबाला रुफटॉप सोलर सेटअपसाठी निधी देत आहोत आणि हा सेटअप उभारण्यासाठी मदत करत आहोत. या एका योजनेमुळे भारतातील प्रत्येक घर वीज उत्पादक होणार आहे. आत्तापर्यंत 13 दशलक्ष अर्थात 1 कोटी 30 लाख पेक्षा जास्त कुटुंबांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत सव्वा तीन लाख घरांमध्ये उभारणीचे काम सुद्धा पूर्ण झाले आहे.
मित्रहो,
पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेचे निकाल येऊ लागले आहेत...हे निकाल अगदी आश्चर्यकारक आहेत. एक लहान कुटुंब जे महिन्याला 250 युनिट वीज वापरते आणि जे 100 युनिट वीज निर्माण करून ग्रीडला विकते, त्यांची वर्षभरात सुमारे 25 हजार रुपयांची बचत होईल. याचा अर्थ असा आहे की लोकांना, त्यांनी वाचवलेल्या वीज बिलातून आणि उरलेल्या वीजेच्या विक्रीतून सुमारे 25,000 रुपयांचा फायदा होईल. जर त्यांनी हे पैसे पीपीएफमध्ये ठेवले, आणि समजा, घरात मुलगी जन्माला आली, एक वर्षाची मुलगी असेल, तर 20 वर्षानंतर त्यांच्याकडे 10-12 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम असेल. तुम्ही कल्पना करू शकता... मुलांच्या शिक्षणापासून लग्नापर्यंत हे पैसे खूप उपयोगी पडतील.
मित्रहो,
या योजनेचे आणखी दोन मोठे फायदे आहेत. ही योजना वीज निर्मितीबरोबरच रोजगार निर्मिती आणि पर्यावरण संरक्षणाचेही माध्यम ठरत आहे. ग्रीन जॉब्स खूप वेगाने वाढणार आहेत, हजारो विक्रेत्यांची गरज भासेल, हे सेटअप स्थापित करण्यासाठी लाखो लोकांची गरज भासेल. या योजनेमुळे सुमारे 20 लाख नोकऱ्या निर्माण होणार आहेत. पीएम सूर्यघर योजनेंतर्गत तीन लाख युवक-युवतींना कुशल मनुष्यबळ म्हणून तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या युवक-युवतींपैकी एक लाख सोलर पीव्ही तंत्रज्ञही असतील. याशिवाय, दर 3 किलोवॅट सौरऊर्जेमागे 50-60 टन कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन रोखले जाईल. म्हणजेच पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेत सामील होणारे प्रत्येक कुटुंब हवामान बदलाचा प्रतिकार करण्यातही मोठे योगदान देईल.
मित्रहो,
एकविसाव्या शतकाचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा भारताच्या सौर क्रांतीचा अध्याय सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल.
मित्रहो,
परदेशातून जे पाहुणे आले आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की येथून 100 किलोमीटर अंतरावर एक खास गाव आहे - मोढेरा.तेथे शेकडो वर्षे जुने सूर्यमंदिर आहे. आणि हे गाव भारतातील पहिले सौर गाव आहे...म्हणजे या गावाच्या सर्व गरजा सौर ऊर्जेने पूर्ण केल्या जातात. आज देशभरात अशा अनेक गावांना सौर ग्राम म्हणून विकसित करण्याची मोहीम सुरू आहे.
मित्रहो,
मी नुकतेच येथे आयोजित केलेले प्रदर्शन पाहण्यासाठी गेलो होतो आणि आपण सर्वांनी हे प्रदर्शन नक्की पहावे ही विनंती.तुम्हा सर्वांना अयोध्येबद्दल चांगली माहिती आहे. अयोध्या नगर हे प्रभू रामाचे जन्मस्थान आहे. आणि प्रभू राम हे सूर्यवंशी होते. आणि मी आता हे प्रदर्शन पाहत होतो तेव्हा मला तिथे उत्तर प्रदेशचा स्टॉल दिसला. मी काशीचा खासदार आहे आणि उत्तर प्रदेशचा रहिवासीही झालो आहे, त्यामुळे मी उत्तर प्रदेशचा स्टॉल बघायला गेलो होतो. आणि माझी जी काही इच्छा होती, ती पूर्ण झाल्याचे त्यांनी मला सांगितले.
प्रभू रामाचे भव्य मंदिर बांधले गेले आहे पण मी जगाला सांगू इच्छितो की आता अयोध्या जी सूर्यवंशी प्रभू रामाची जन्मभूमी आहे, ते संपूर्ण अयोध्या शहर आदर्श सौर शहर म्हणून विकसित करण्याचे आमचे ध्येय आहे. काम जवळपास पूर्ण होत आले आहे. अयोध्येतील प्रत्येक घर, प्रत्येक कार्यालय, प्रत्येक सेवा सौरऊर्जेवर चालली पाहिजे, असा आमचा प्रयत्न आहे.
आणि मला आनंद आहे की आतापर्यंत आम्ही अयोध्येतील अनेक सुविधा आणि घरे सौर ऊर्जेने जोडली आहेत.
अयोध्येत मोठ्या संख्येने सौर पथदिवे, सौर चौक , सौर बोटी , सोलर वॉटर एटीएम आणि सौर इमारती पहायला मिळतात.
आम्ही भारतातील अशी 17 शहरे निवडली आहेत जी आम्हाला अशाच प्रकारे सौर शहरे म्हणून विकसित करायची आहेत.आम्ही आमची शेतजमीन , आमची शेतं आणि आमच्या शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी सौर ऊर्जा निर्मितीचे एक माध्यम बनवत आहोत.आज शेतकऱ्यांना सिंचनासाठी सौर पंप आणि छोटे सौर संयंत्र बसवण्यासाठी मदत दिली जात आहे. आज भारत नवीकरणीय ऊर्जेशी संबंधित प्रत्येक क्षेत्रात जलद गतीने आणि व्यापक प्रमाणावर काम करत आहे. गेल्या दशकात आम्ही अणुऊर्जेपासून पूर्वीच्या तुलनेत 35 टक्के जास्त वीज निर्मिती केली आहे. हरित हायड्रोजनच्या क्षेत्रात भारत जागतिक नेतृत्व बनण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी आम्ही सुमारे वीस हजार कोटी रुपयांचे हरित हायड्रोजन अभियान सुरू केले आहे. आज भारतातही कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीची मोठी मोहीम सुरू आहे. आम्ही महत्वपूर्ण खनिजांशी संबंधित आव्हानांना सामोरे जाण्यासाठी एका चक्रीय दृष्टिकोनाला प्रोत्साहन देत आहोत. पुनर्वापर आणि पुनर्प्रक्रियेशी संबंधित अधिक चांगले तंत्रज्ञान विकसित व्हावे यासाठी स्टार्टअप्सना देखील सहाय्य पुरवले जात आहे.
मित्रांनो,
पर्यावरण -स्नेही लोकांचे तत्त्व ही आमची बांधिलकी आहे. म्हणूनच भारताने जगाला मिशन लाइफ, मिशन लाइफ म्हणजे पर्यावरणासाठी जीवनशैलीचा दृष्टीकोन दिला आहे. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीसाठी पुढाकार घेऊन भारताने जगातील शेकडो देशांना जोडले आहे. भारताच्या जी -20 अध्यक्षपदाच्या काळातही आम्ही हरित संक्रमणावर खूप लक्ष केंद्रित केले आहे. जी -20 शिखर परिषदेदरम्यान जागतिक जैवइंधन आघाडीची देखील सुरुवात झाली. भारताने या दशकाच्या अखेरीस आपल्या रेल्वेसाठी निव्वळ शून्य उत्सर्जनाचे लक्ष्य ठेवले आहे. काही लोकांना प्रश्न पडेल की भारतीय रेल्वेचे नेट झिरो म्हणजे काय?
मी त्यांना त्याबद्दल सांगतो. आमचे रेल्वेचे जाळे इतके मोठे आहे की दररोज रेल्वेच्या डब्यात सुमारे दीड कोटी लोक असतात, इतके मोठे रेल्वेचे जाळे आहे . आणि आम्ही ते निव्वळ शून्य उत्सर्जन बनवणार आहोत. 2025 पर्यंत आम्ही पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्याचे लक्ष्य साध्य करू असेही आम्ही ठरवले आहे. भारतातील लोकांनीही गावागावांमध्ये हजारो अमृत सरोवर तयार केले आहेत, जे जलसंधारणासाठी उपयुक्त ठरत आहेत. आजकाल तुम्ही बघतच असाल... भारतात लोक त्यांच्या आईच्या नावाने 'एक पेड माँ के नाम' झाड लावत आहेत. मी तुम्हालाही या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करतो, मी जगातील प्रत्येक नागरिकाला आवाहन करतो.
मित्रांनो,
भारतात नवीकरणीय ऊर्जेची मागणी वेगाने वाढत आहे.ही मागणी पूर्ण करण्यासाठी सरकार नवीन धोरणेही आखत आहे आणि सर्वतोपरी सहकार्य करत आहे. त्यामुळे तुमच्यासमोर केवळ ऊर्जानिर्मितीतच संधी नाहीत. तर, निर्मिती क्षेत्रातही असंख्य संधी आहेत. भारताचा प्रयत्न पूर्णपणे मेड इन इंडिया सोल्यूशन्सचा आहे. यातूनही तुमच्यासाठी येथे अनेक संधी निर्माण होत आहेत. भारत खऱ्या अर्थाने तुमच्यासाठी विस्ताराची आणि उत्तम परताव्याची हमी आहे. आणि मी आशा करतो की तुम्ही त्यात सहभागी व्हाल. या क्षेत्रात गुंतवणुकीसाठी यापेक्षा चांगली अन्य जागा असू शकत नाही, नवोन्मेषासाठी यापेक्षा चांगली जागा दुसरी असू शकत नाही. आणि मला कधी कधी वाटतं, आपल्या माध्यमांमध्येही कधी कधी गॉसिप कॉलम्स दिसतात, ते खूप मसालेदार असतात तर कधी मजेदार असतात. मात्र त्यांचे एका गोष्टीकडे लक्ष गेले नाही आणि आज नंतर नक्कीच लक्ष जाईल. आता इथे जे भाषण करत होते ना प्रल्हाद जोशी ,ते आमचे नवीकरणीय ऊर्जा मंत्री आहेत, परंतु माझ्या मागील सरकारमध्ये ते कोळसा मंत्री होते. तर बघा, माझे मंत्रीही कोळशाकडून नवीकरणीय ऊर्जेकडे गेले.
मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना भारताच्या हरित संक्रमणामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित करतो. आणि तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने इथे आलात , मी पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतो, या भूमीत मी जन्मलो, गुजरातने मला खूप काही शिकवले, त्यामुळे गुजरातच्या मुख्यमंत्र्यासोबतच, तुम्हा सर्वांचे स्वागत करताना माझ्या भावना व्यक्त करताना, तुम्हा सर्वांचे आभार मानताना, सर्व राज्य सरकारांच्या सहभागाबद्दल मी सर्व राज्य सरकारांचे देखील आभार मानतो. येथे आलेल्या मुख्यमंत्र्यांचेही मी विशेष आभार मानतो. आणि मी पूर्ण विश्वासाने सांगतो की आपली ही शिखर परिषद, या शिखर परिषदेत होणारा संवाद आपणा सर्वांना जोडेल आणि आपल्या भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी जोडेल.
मला आठवते की एकदा अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा भारत दौऱ्यासाठी आले असताना द्विपक्षीय दौऱ्यासाठी इथे आले होते . तर आमची पत्रकार परिषद होती , दिल्लीमध्ये तर एका पत्रकाराने विचारले कारण त्यावेळी लोक अनेक प्रकारचे सर्व आकडे जाहीर करायचे, हे करू, ते करू, तेव्हा त्यांनी मला विचारले की, जगातील विविध देश मोठ-मोठी उद्दिष्टे ठेवत आहेत, त्याचे तुमच्या मनावर काही दडपण आहे का? आणि त्यादिवशी मी माध्यमांना उत्तर दिले होते की मोदी आहे … येथे कोणाचाही दबाव बीबाव चालत नाही. मग मी म्हणालो होतो की हो, माझ्यावर दबाव आहे आणि तो दबाव आपल्या भावी पिढीतील मुलांचा आहे, जे जन्मालाही आलेले नाहीत पण त्यांच्या उज्ज्वल भविष्याची मला चिंता सतावत आहे. आणि म्हणूनच मी भावी पिढ्यांच्या कल्याणासाठी काम करत आहे आणि आजही ही शिखर परिषद आपल्या नंतरच्या दुसऱ्या, तिसऱ्या - चौथ्या पिढीच्या उज्ज्वल भविष्याची हमी बनणार आहे. त्यांचे एवढे मोठे काम करण्यासाठी तुम्ही इथे आला आहात, महात्मा गांधींच्या नावाने बांधलेल्या या महात्मा मंदिरात आला आहात . पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप-खूप आभार मानतो.
नमस्कार.
JPS/ST/Ashutosh/Madhuri/Sushma/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2055534)
Visitor Counter : 55
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam