पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये अहमदाबाद येथे 8,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचे केले उद्घाटन आणि पायाभरणी


अहमदाबाद आणि भूज दरम्यान नमो भारत रॅपिड रेल्वेचे केले उद्घाटन

अनेक वंदे भारत ट्रेनना हिरवा झेंडा दाखवून केले रवाना

पीएम आवास योजना-ग्रामीण अंतर्गत 30,000 हून अधिक घरांना दिली मंजुरी

आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणाची एक खिडकी आयटी प्रणाली(SWITS)चा केला शुभारंभ

"आमच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिले 100 दिवस सर्वांसाठी प्रभावी विकास घेऊन आले आहेत"

“70 वर्षांवरील सर्व ज्येष्ठांना 5 लाख रुपयांचे मोफत उपचार देऊन गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या आरोग्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे”

“नमो भारत रॅपिड रेल मध्यमवर्गीय कुटुंबांना खूप जास्त सोयीची आहे”

“वंदे भारत नेटवर्कचा या 100 दिवसांत झालेला विस्तार अभूतपूर्व आहे”

"ही भारताची वेळ आहे, हा भारताचा सुवर्णकाळ आहे, हा भारताचा अमृत काळ आहे"

"भारताकडे आता गमावण्यासाठी वेळ नाही,आम्हाला भारताची विश्वासार्हता वाढवायची आहे आणि प्रत्येक भारतीयाला सन्मानाचे जीवन प्रदान करायचे आहे"

Posted On: 16 SEP 2024 9:21PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 सप्टेंबर 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये अहमदाबाद येथे 8,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या रेल्वे, रस्ते, वीज, गृहनिर्माण आणि वित्त क्षेत्रातील अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. त्यापूर्वी आज मोदी यांनी अहमदाबाद आणि भूज दरम्यान भारतातील पहिल्या नमो भारत रॅपिड रेल्वेचे उद्घाटन केले. त्यांनी अनेक वंदे भारत ट्रेन्सना रवाना केले. यामध्ये नागपूर ते सिकंदराबाद, कोल्हापूर ते पुणे, आग्रा कँट ते बनारस, दुर्ग ते विशाखापट्टणम, पुणे ते हुबळी या रेल्वेगाड्या आणि वाराणसी ते दिल्ली या पहिल्या 20 डब्यांच्या वंदे भारत ट्रेन चा समावेश होता. त्याबरोबरच त्यांनी आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणाच्या एक खिडकी आयटी प्रणालीचा (SWITS) शुभारंभ केला.

या कार्यक्रमाला संबोधित करताना, पंतप्रधानांनी गणपती महोत्सव आणि मिलाद-उन-नबी आणि देशभरात साजरे होत असलेल्या विविध सणांच्या शुभ वातावरणाची दखल घेत केली. सणांच्या या काळात, भारताचा विकासाचा उत्सव देखील सुरू आहे ज्यामध्ये रेल्वे, रस्ते आणि मेट्रो या क्षेत्रातील सुमारे 8,500 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली आहे, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. नमो भारत रॅपिड रेलच्या उद्घाटनाला गुजरातच्या सन्मानार्थ जडवलेला नवा तारा असल्याचे सांगत पंतप्रधान म्हणाले की, भारताच्या शहरी संपर्कव्यवस्थेमध्ये हा एक नवीन मैलाचा दगड ठरेल. आज हजारो कुटुंबे त्यांच्या नवीन घरांमध्ये प्रवेश करत आहेत तर इतर हजारो कुटुंबांसाठी पहिला हप्ता देखील जारी करण्यात आला आहे, असे मोदी यांनी नमूद केले. नवरात्र, दसरा, दुर्गापूजा, धनत्रयोदशी, दिवाळी या सणांचा काळ ही कुटुंबे आपल्या नवीन घरात त्याच उत्साहात घालवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “मी तुम्हाला गृहप्रवेशाच्या शुभेच्छा देतो”, पंतप्रधान मोदी म्हणाले. आजच्या विकास प्रकल्पांसाठी त्यांनी गुजरात आणि भारतातील लोकांचे, विशेषत: ज्या महिला आता घरांच्या मालक झाल्या आहेत, त्यांचे अभिनंदन केले.

सणासुदीच्या काळात गुजरातच्या विविध भागांमध्ये पूर आल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. गुजरातच्या कानाकोपऱ्यात अल्पावधीत एवढा संततधार पाऊस प्रथमच झाल्याचेही त्यांनी सांगितले. पुरामुळे प्राण गमावलेल्या नागरिकांच्या मृत्यूबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला. केंद्र आणि राज्य सरकार बाधितांना पाठबळ देऊन त्यांच्या पुनर्वसनाची खात्री करण्यात कोणतीही कसर सोडत नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. जखमींच्या तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.

गुजरात हे आपले जन्मस्थान असून तिथेच त्यांनी जीवनाचे सर्व धडे गिरवले यावर प्रकाश टाकताना “पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा पदभार स्वीकारल्यानंतरचा हा माझा पहिलाच गुजरात दौरा आहे” असे पंतप्रधान मोदींनी उद्धृत केले. ते म्हणाले की गुजरातच्या जनतेने त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे आणि नवीन उर्जा आणि उत्साहाने प्रफुल्लित होण्यासाठी घरी परतणाऱ्या मुलासारखीच भावना आहे. एवढ्या मोठ्या संख्येने लोक त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आले हे आपले भाग्य असल्याचे त्यांनी नमूद केले.

तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर त्यांनी लवकरात लवकर राज्याला भेट द्यावी, अशी गुजरातमधील नागरिकांची इच्छा होती हे पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले. "हे स्वाभाविक आहे" असा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले की "भारतातील जनतेने साठ वर्षांनंतर एकाच सरकारला तिसऱ्यांदा विक्रमी सेवा करण्याची संधी देऊन इतिहास रचला आहे." भारतीय लोकशाहीतील ही महत्वपूर्ण घटना आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, “राष्ट्र प्रथम च्या भावनेने गुजरातच्या लोकांनीच मला दिल्लीत पाठवले”. सरकारच्या पहिल्या 100 दिवसांत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याबाबत लोकसभा निवडणुकीदरम्यान भारतातील जनतेला दिलेल्या हमीचे स्मरण करून देत पंतप्रधान म्हणाले की, भारत असो किंवा परदेशात त्यांनी कोणतीही कसर सोडली नाही. त्यांनी पहिले 100 दिवस धोरण आखण्यासाठी आणि सार्वजनिक कल्याण आणि राष्ट्रहिताचे निर्णय घेण्यासाठी समर्पित केले असे त्यांनी नमूद केले.

गेल्या 100 दिवसांत 15 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या  प्रकल्पांवर काम सुरू करण्यात आले आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. निवडणुकीदरम्यान 3 कोटी नवीन घरे बांधण्याचे आश्वासन देशवासियांना देण्यात आले होते याचे स्मरण करून या दिशेने झपाट्याने काम सुरू असल्याचे मोदींनी नमूद केले. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या गुजरातमधील हजारो कुटुंबांना पक्की घरे मिळाल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. तसेच झारखंडमधील हजारो कुटुंबेही नवीन पक्क्या घरांचे लाभार्थी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचे सरकार खेडी असो वा शहर सर्वांना चांगले वातावरण प्रदान करण्यात अविरत कार्यरत असल्याचे मोदींनी निदर्शनास आणून दिले. शहरी मध्यमवर्गीयांच्या घरांकरिता आर्थिक मदतीसाठी असो, कामगारांना वाजवी भाड्याने घरे उपलब्ध करून देण्याच्या मोहिमेसाठी असो किंवा कारखान्यात काम करणाऱ्यांसाठी विशेष घरे बांधण्यासाठी असो अथवा नोकरदार महिलांसाठी देशात नवीन वसतिगृहे बांधण्यासाठी सरकार हजारो कोटी रुपये खर्च करत आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

काही दिवसांपूर्वी गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या आरोग्याबाबत घेतलेल्या मोठ्या निर्णयाचा पुनरुच्चार करताना पंतप्रधानांनी 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व वृद्धांना 5 लाख रुपयांचे मोफत उपचार देण्याच्या आश्वासनाची आठवण करून दिली. ते म्हणाले की, मध्यमवर्गीय मुला-मुलींना आई-वडिलांच्या उपचाराची चिंता करावी लागणार नाही.

युवकांच्या रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी तसेच त्यांच्या कौशल्य विकासासाठी गेल्या 100 दिवसांत घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांकडे लक्ष वेधून पंतप्रधानांनी 2 लाख कोटी रुपयांच्या विशेष पीएम पॅकेजच्या घोषणेचा उल्लेख केला ज्याचा 4 कोटी पेक्षा जास्त तरुणांना फायदा होईल.तरुणांना कामावर घेतल्यास कंपन्यांमध्ये पहिल्या नोकरीचा पहिला पगारही सरकार देईल, असे त्यांनी नमूद केले. मुद्रा कर्ज मर्यादा 10 लाख रुपयांवरून 20 लाख रुपये करण्यात आल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

महिला सक्षमीकरणाच्या उपक्रमांविषयी बोलताना, पंतप्रधानांनी 3 कोटी लखपती दीदी तयार करण्याच्या हमीची आठवण केली. गेल्या काही वर्षांत त्यांची संख्या 1 कोटींवर पोहोचली आहे, तर सरकारच्या पहिल्या शंभर दिवसांत देशात 11 लाख नवीन लखपती दिदी तयार झाल्याची माहिती देताना त्यांनी समाधान व्यक्त केले. तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना वाढीव एमएसपी पेक्षा अधिक भाव मिळण्यासाठी सरकारने त्यांच्या हितासाठी नुकत्याच घेतलेल्या निर्णयांचाही त्यांनी उल्लेख केला. सोयाबीन आणि सूर्यफूल यासारखी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे आणि खाद्यतेलाच्या उत्पादनात ‘आत्मनिर्भर’ होण्यास चालना मिळण्यासाठी विदेशी तेलावरील आयात शुल्कात वाढ करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. सरकारने बासमती तांदूळ आणि कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवली आहे ज्यामुळे भारतीय तांदूळ आणि कांद्याची परदेशात मागणी वाढली असल्याचेही त्यांनी सांगितले.

गेल्या 100 दिवसांत रेल्वे, रस्ते, बंदर, विमानतळ आणि मेट्रोशी संबंधित डझनभर प्रकल्पांना मंजुरी देण्यात आल्याचे मोदींनी आवर्जून सांगितले. त्याचीच झलक आजच्या कार्यक्रमातही पाहायला मिळाली, असेही ते म्हणाले. गुजरातमध्ये आज अनेक कनेक्टिव्हिटीशी संबंधित प्रकल्पांची पायाभरणी झाली आहे, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. या कार्यक्रमापूर्वी गिफ्ट सिटी स्टेशनपर्यंत मेट्रोने प्रवास केल्याचेही  त्यांनी सांगितले. मेट्रोच्या प्रवासादरम्यान अनेकांनी आपले अनुभव सामायिक केले आणि अहमदाबाद मेट्रोच्या विस्तारामुळे सर्वांना आनंद झाला, अशी टिप्पणी त्यांनी केली. गेल्या 100 दिवसांत देशभरातील अनेक शहरांमध्ये मेट्रोच्या विस्ताराशी संबंधित निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

आजचा दिवस गुजरातसाठी खास असल्याचे सांगून मोदींनी नमो भारत रॅपिड रेल्वे अहमदाबाद ते भुज दरम्यान कार्यान्वित  झाल्याचे अधोरेखित केले. नमो भारत जलदगती रेल्वे देशातील एका शहरातून दुसऱ्या शहरात दररोज प्रवास करणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी अतिशय सोयीस्कर ठरेल आणि नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणाशी संबंधित असलेल्यांना त्याचा मोठा फायदा होईल असेही त्यांनी नमूद केले. आगामी काळात नमो भारत रॅपिड रेल देशातील अनेक शहरांना जोडून अनेकांना लाभ देईल, अशी आशा मोदींनी व्यक्त केली.

“वंदे भारत नेटवर्कचा या 100 दिवसांत झालेला विस्तार हा अभूतपूर्व आहे” अशी टिप्पणी पंतप्रधानांनी 15 हून अधिक नवीन वंदे भारत रेल्वे मार्गांवर प्रकाश टाकताना केली. झारखंड आणि नागपूर-सिकंदराबाद, कोल्हापूर-पुणे, आग्रा कँट-बनारस, दुर्ग-विशाखापट्टणम, पुणे-हुबळी वंदे भारत अशा अनेक वंदे भारत ट्रेनला आज हिरवा झेंडा दाखविल्याचा त्यांनी उल्लेख केला. आता 20 डबे असलेल्या दिल्ली-वाराणसी वंदे भारत ट्रेन बाबतही त्यांनी सांगितले. देशातील 125 हून अधिक वंदे भारत गाड्या दररोज हजारो लोकांचा  उत्तम प्रवास शक्य  करत असल्याची माहिती त्यांनी दिली.

गुजरातमधील लोकांना वेळेचे मूल्य समजते, असे अधोरेखित करून पंतप्रधानांनी सध्याचा काळ हा सुवर्णकाळ किंवा भारताचा अमृतकाळ असल्याचा उल्लेख केला. येत्या 25 वर्षात भारताला  विकसित  देश म्हणून घडवण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले आणि यामध्ये गुजरातला मोठी  भूमिका बजावायची असल्याचे  त्यांनी सांगितले. गुजरात आज उत्पादनाचे खूप मोठे केंद्र बनत आहे आणि भारतातील सर्वाधिक संपर्क व्यवस्था असलेले राज्य आहे याबद्दल मोदींनी आनंद व्यक्त केला. तो दिवस दूर नाही जेव्हा गुजरात भारताला पहिले भारतीय बनावटीचे वाहतूक विमान सी-295 देईल अशी अपेक्षा मोदींनी व्यक्त केली. सेमीकंडक्टर मिशनमध्ये गुजरातची आघाडी अभूतपूर्व असल्याचे त्यांनी कौतुक केले. आज गुजरातमध्ये पेट्रोलियम, न्यायवैद्यक विज्ञान ते वेलनेस अशी अनेक विद्यापीठे आहेत आणि प्रत्येक आधुनिक विषयाचा अभ्यास करण्यासाठी गुजरातमध्ये उत्तम संधी असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. परदेशी विद्यापीठे गुजरातमध्ये त्यांची संकुले उघडत असल्याची माहितीही त्यांनी दिली. संस्कृती ते कृषी या सर्व क्षेत्रांत गुजरात संपूर्ण जगात नाव कमावत असल्याबद्दल पंतप्रधानांनी अभिमान व्यक्त केला.  गुजरात आता शेती उत्पादने आणि धान्य परदेशात निर्यात करत आहे, ज्याचा कधी कोणी विचारही करू शकले नव्हते  आणि हे सर्व गुजरातमधील लोकांच्या जिद्द आणि मेहनती स्वभावामुळे शक्य झाले आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.

केवळ राज्याच्या विकासासाठी स्वत:ला झोकून देणारी एक पिढी झाली असून इथून राज्याला नव्या उंचीवर नेण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारतात उत्पादित होणाऱ्या उत्पादनांच्या गुणवत्तेबाबत लाल किल्ल्यावरून केलेल्या आपल्या भाषणाची आठवण करून देत पंतप्रधानांनी निर्यात न होणारी उत्पादने ही निकृष्ट दर्जाची असतात या मानसिकतेपासून दूर राहण्याचे आवाहन केले.गुजरात हे राज्य देशात आणि विदेशात उच्च दर्जाच्या उत्पादित उत्पादनांचा दीपस्तंभ बनावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

देश ज्या प्रकारे नवीन संकल्पनाच्या आधारावर काम करत आहे, त्यामुळे भारत जगात आपला वेगळा ठसा उमटवत आहे, असेही ते म्हणाले. अनेक देशांतील अनेक मोठ्या व्यासपीठांवर भारताचे प्रतिनिधित्व करताना भारताला अतिशय आदर मिळत असल्याचे दिसून येते, असे पंतप्रधानांनी सांगितले.  “जगातील प्रत्येकजण भारताचे आणि भारतीयांचे खुले स्वागत करतो.  भारताशी चांगले संबंध असावेत अशी प्रत्येकाची इच्छा आहे.  जगातील लोक संकटकाळात उपाय शोधण्यासाठी भारताकडे पाहतात”, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. भारतातील जनतेने सलग तिसऱ्यांदा स्थिर सरकार स्थापन केल्याने जगाच्या भारताकडून असलेल्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत, हे त्यांनी नमूद केले.  कुशल तरुणांची मागणी वाढल्याने शेतकरी आणि तरुणांना या विश्वासाचा थेट फायदा होत असल्याचे त्यांनी सांगितले. जगाचा भारतावरील विश्वास वाढल्याने निर्यात वाढते आणि परदेशी गुंतवणूकदारांसाठी नव्या संधी निर्माण होतात, असे ते म्हणाले.

एकीकडे देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या देशाच्या ताकदीचा प्रचार करण्यात गुंतुन संपूर्ण जगात भारताचा ब्रँड ॲम्बेसेडर बनवायचा आहे तर दुसरीकडे देशात नकारात्मक विचारांचे काही लोक आहेत जे नेमके याच्या उलटे वर्तन करत आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले. असे लोक देशाच्या एकात्मतेवर घाला घालत आहेत, असेही ते म्हणाले.सरदार पटेल यांनी 500 हून अधिक संस्थानांचे विलीनीकरण करून कशा प्रकारे भारताचे एकीकरण केले, याचे स्मरणही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. काही सत्ता पिपासु लोकांना भारताचे तुकडे करायचे आहेत. अशा फुटीर घटकांपासून आणि अशा लोकांपासून सावध राहावे, असा इशारा पंतप्रधानांनी गुजरातच्या जनतेला दिला.

भारत विकासाच्या मार्गावर अग्रेसर आहे आणि अशा नकारात्मक शक्तींचा धैर्याने सामना करण्यास सक्षम आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला.“भारताकडे आता वाया घालवण्यासाठी  वेळ नाही. आपल्याला भारताची विश्वासार्हता वाढवायची आहे आणि प्रत्येक भारतीयाला सन्मानाचे जीवन प्रदान करायचे आहे,” असे पंतप्रधान म्हणाले. गुजरात या कामामध्ये देखील एक नेतृत्व  म्हणून उदयास येईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.आपला प्रत्येक संकल्प आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने पूर्ण होईल, असे ते म्हणाले. "सबका प्रयास या मार्गाचा अवलंब करून आपले आमचे सर्व संकल्प सिद्ध होतील",असे सांगत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

यावेळी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

पार्श्वभूमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समखियाली-गांधीधाम आणि गांधीधाम-आदिपूर रेल्वे मार्गाचे चौपदरीकरण; अहमदाबाद महानगरपालिका क्षेत्रातील महत्वपूर्ण  रस्त्यांचा विकास आणि बाकरोल, हाथीजन, रामोल आणि पांजरपोळ जंक्शन येथे उड्डाण पूल बांधणे यासह अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची पायाभरणी केली.

पंतप्रधानांनी कच्छमधील कच्छ लिग्नाइट थर्मल पॉवर स्टेशन येथे 30 मेगावॅट सौर यंत्रणा आणि 35 मेगावॅटच्या BESS सोलर पीव्ही प्रकल्पाचे तसेच मोरबी आणि राजकोट येथे 220 किलोवोल्ट उपकेंद्राचे उद्घाटन केले.

पंतप्रधानांनी वित्तीय सेवा सुव्यवस्थित करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणाची एकल खिडकी माहिती तंत्रज्ञान प्रणाली (SWITS) चा प्रारंभ केला.

पंतप्रधानांनी प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण अंतर्गत 30,000 हून अधिक घरे मंजूर केली आणि या योजनेतील घरांसाठी पहिला हप्ता जारी केला.  त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत नवीन घरांच्या बांधकामाचा प्रारंभ केला तसेच प्रधानमंत्री आवास योजनेच्या शहरी आणि ग्रामीण या दोन्ही विभागांतर्गत पूर्ण झालेली घरे राज्यातील लाभार्थ्यांना सुपूर्द केली.

पंतप्रधानांनी याशिवाय, अहमदाबाद ते भुज दरम्यान धावणाऱ्या भारतातील पहिली नमो भारत जलद रेल्वे गाडीला तसेच नागपूर ते सिकंदराबाद, कोल्हापूर ते पुणे, आग्रा कँट ते बनारस, दुर्ग ते विशाखापट्टणम, पुणे ते हुबळी यांच्यासह वाराणसी ते दिल्ली दरम्यान धावणाऱ्या 20 डबे असणाऱ्या पहिल्या वंदे भारत रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवला.  

 

NC/Shailesh/Vasanti/Shraddha/PM

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 

 

 

 


(Release ID: 2055486) Visitor Counter : 71