पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिस पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धांमधल्या चॅम्पियन्सशी साधलेला संवाद
Posted On:
13 SEP 2024 3:15PM by PIB Mumbai
पंतप्रधान – आज मला आपणाकडून ऐकायचे आहे.आपणा सर्वांचे काय अनुभव होते,तिथे सर्वाना भेटले असाल,काही चांगल्या गोष्टी घडल्या असतील हे सर्व मला ऐकायचे आहे.
कपिल परमार – सर नमस्ते, हर- हर महादेव सर.
पंतप्रधान – हर हर महादेव.
कपिल परमार – सर, मी ब्लाइंड ज्युडो मधून कपिल परमार, 60 किलो वजनी गटात खेळतो, सर, माझा अनुभव असा आहे की 2021 पासून मी खूप जास्त स्पर्धा खेळलो आहे.मी 16 स्पर्धा खेळलो सर,ज्यामध्ये माझी 14 पदके होती, त्यात माझी आठ सुवर्ण पदके होती, आशियाई क्रीडा स्पर्धांमध्येही मला रौप्य पदक होते, जागतिक स्पर्धांमध्ये कांस्यपदक आणि वर्ल्ड चॅम्पियन्सशिप मध्ये कांस्य पदक होते, तर सर,माझी भीती नाहीशी झाली होती.ऑलिम्पिक स्पर्धांची मला जास्त काळजी नव्हती कारण मी खूप जास्त स्पर्धा खेळलो होतो सर. सर, माझा अनुभव असा आहे की थोडेसे दडपण होते तर आपले देवेंद्र भाई साहेब झांझरिया, जी भाई साहेब यांनी मला एक गोष्ट सांगितली की आपली सर्वोत्तम कामगिरी करायची. रोज जो सराव करता तेच आपल्याला करायचे आहे आणि सर माझे प्रशिक्षक आहेत मनोरंजार जी, त्यांचे अनेक आशीर्वाद आहेत, कारण आम्हा लोकांना सांभाळणे कठीणच नव्हे तर अशक्य आहे. कारण सर आम्ही प्रत्येक ठिकाणी ठोकर देतो आणि कोणी आम्हाला येऊन धडकतो, तर मी विचारतो आपण अंध आहात की मी अंध आहे. सर खुप वेळा असे होते तर सरांचा हात पकडून चालतो, हात पकडून येतो, थोडे फार दिसते त्यातून आपले काम करतो सर, आणि सर आपले खूप आशीर्वाद राहिले सर.
पंतप्रधान – अच्छा, कपिल त्या दिवशी तुम्ही मला सांगितले की स्टेडीयम मध्ये कपिल कपिल कपिलचा इतका जयघोष सुरु होता की माझ्या प्रशिक्षकांच्या सूचना मी ऐकू शकत नव्हतो.ते मी जरा प्रत्यक्ष ऐकू इच्छितो,आपले प्रशिक्षक कुठे आहेत? सर काय अडचणी येतात जरा सांगा.
प्रशिक्षक – अंध ज्युडोमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या सूचना आम्ही बाहेरून देतो, जे त्यांना शिकवले जाते त्यातून आम्ही कोडींग करतो की आपण जेव्हा जाऊ तेव्हा असे असे बोलल्यानंतर तुम्हाला हे करायचे आहे कारण तिथे काही दिसत नसते. तर त्या दिवशी आमच्या तिथे 2 मॅट विभाग होते. एका मॅटवर आमची लढत चालू होती आणि दुसऱ्या मॅटवर फ्रान्सची लढत सुरु होती आणि फ्रान्सच्या लढतीत इतका आवाज, आरडाओरडा सुरु होता सुमारे 15 हजार ते 18000 प्रेक्षक तिथे होते. त्यामुळे जेव्हा हा उपांत्य सामना खेळायला गेला तेव्हा मी ज्या सूचना करत होतो त्या त्याला समजत नव्हत्या आणि उपांत्य फेरीचे एक दडपण नक्कीच होते कारण समोर इराणचा जो खेळाडू होता त्याच्याकडून आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये हा उपांत्य सामन्यात पराभूत झाला होता, त्यामुळे त्याचेही दडपण नक्कीच असणार. या कारणामुळे त्या दिवशी आम्ही भारतासाठी सुवर्ण पदक आणू शकलो नाही.
पंतप्रधान – तर समोरचा जो प्रशिक्षक होता तो सुद्धा आपल्या खेळाडूला अशाच प्रकारच्या सूचना करत असेल.
प्रशिक्षक- हो, हो, हे प्रत्येक प्रशिक्षकानुसार अवलंबून असते. प्रत्येक प्रशिक्षक आणि खेळाडू यांच्यात जो बंध असतो, आम्ही हे पाहतो की कोण कशा प्रकारे शिकवत आहे, तर आम्ही त्यापेक्षा वेगळे ठेवतो.
पंतप्रधान – म्हणजे प्रशिक्षकांनाही दुसऱ्यापेक्षा स्वतःला वेगळे गुपित ठेवावे लागते.
प्रशिक्षक- नक्कीच ठेवावे लागते,कारण तीच गोष्ट आम्ही सांगितली, त्याने सांगितली तर खेळाडूंच्या लक्षात येणार नाही.
पंतप्रधान – बरं, आपल्याला कपिलला सांगायचे आहे की कपिल भाई, ठोका, तर आपण काय सांगाल ?
प्रशिक्षक- आमचे असे सांगणे असते सर.
पंतप्रधान – कपिल, असेच असते ना ?
कपिल परमार- सरांनी सांगितल्यावर मी आक्रमण तर करतो मात्र ते कधी निष्फळ ठरले तर पुन्हा सज्ज होतो.
प्रशिक्षक- मात्र तंत्राचे नाव सांगतो. पायाची मागे-पुढे हालचाल दिसते तर ते तंत्राचे नाव असते, जे त्यांना शिकवलेले असते. ते सांगतात आणि मग खेळाडू तसे करतात. कारण कुठे तोल कमी-जास्त होत आहे, पुढे जात आहे, मागे जात आहे, तर ते तंत्र सांगतो.
पंतप्रधान- मग आपण समोरच्याचा पवित्राही सांगत असाल?
प्रशिक्षक- हो, हो सर,नक्कीच, समोरच्या खेळाडूच्या हालचाली. तो पुढे झुकला तर त्याचे वजन पुढे जात आहे तर आम्ही पुढे झुकल्यासाठीच्या तंत्राने त्याला नामोहरम करू शकतो.तो जर मागे झुकला, तोंड मागे फिरवले तर त्यासाठीचे तंत्र त्याला सांगतो ज्यातून आपण गुण मिळवतो.
पंतप्रधान – आपण जेव्हा तिथे असलेले असता तेव्हा आपलेही हात-पाय शिवशिवत असतील ?
प्रशिक्षक- खूपच, आम्हीही प्रशिक्षक म्हणून मॅटवर जावे असे मनात येते.
कपिल परमार – सर, असे झाले होते की, उपांत्य सामन्याचे जे पंच होते, जे माझा हात धरून नेत होते, त्यांचे स्वतःचे हात थरथरत होते. कारण मोठ्या सामन्यात त्यांनीही चुकीचा निर्णय दिला. तिसरा पंच असतो,त्यानंतरच सांगितले जाते, मात्र माझा निर्णय अतिशय लवकर दिला गेला, रोल करून, माझीही चूक होती उपांत्य फेरीत मी दबलो.पण पुढच्या वेळी मी सर आपल्याला वचन देतो.
पंतप्रधान- नाही, नाही आपण चांगली कामगिरी करत आहात, खूप खूप अभिनंदन.
कपिल परमार – धन्यवाद सर, खूप-खूप आभार.
प्रशिक्षक- जय हिंद, सर, मी एक सैनिक आहे आणि माझी पत्नी सिमरन शर्मा आणि माझ्याकडे आणखी एक खेळाडू आहे, प्रीती, मी अॅथलीटचा प्रशिक्षक आहे, पॅरा अॅथलीटचा प्रशिक्षक. माझे दोन खेळाडू आहेत.दोन्ही 100-200 मीटर मध्ये सहभागी होतात आणि पहिल्यांदा अॅथलीटक्स मध्ये ट्रॅक मध्ये जे पदक आले ते माझ्याच खेळाडूंनी आणले आहे. आणखी तीन पदके आणली आहेत आम्ही, तिथे खूप काही शिकायला मिळाले सर. तिथे 100 मीटरमध्ये एका प्रकारात आमची दोन पदके आली. दोन पदके एकाच खोलीत. एका खोलीत दोन खेळाडू आहेत, 100 मीटरमध्ये दोन्हीही प्रथमच खेळत आहेत. देशासाठी प्रथमच पदक आणण्यासाठी ट्रॅकवर उतरत आहेत. तर जेव्हा दोन पदके एकाच खोलीत ठेवलेली आहेत आणि खेळाडूचा अजून क्रीडा प्रकार दुसऱ्या सुरूच झालेला नाही तेव्हा येणारे दडपण, त्यांच्या भावना काय असतील हे मी एक प्रशिक्षक म्हणून,पती म्हणून जाणतो. दुसरा खेळाडू आहे,त्याच्या स्पर्धा अजून झाल्या नाहीत आणि दोन पदके ठेवलेली दिसत आहेत तेव्हा त्याच्या भावना मी समजू शकतो. प्रचंड दडपण येते, माझे पदक अजून आले नाही त्याची दोन पदके आली. यातून तिला बाहेर काढण्यासाठी मला वारंवार तिला संपूर्ण दिवस व्यस्त ठेवावे लागत होते, गुंतवून ठेवावे लागत होते. तिथे आम्हाला खुप शिकायला मिळाले सर, 100 मीटरमध्ये आम्ही पराजित झालो सर.
पंतप्रधान – बरं, तिथे तर काढली वेळ, आता घरी काय होईल तुमचे, सिमरन,
सिमरन- सर, हा जितका चांगला आहे असे दाखवत आहे तितका नाही. आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा इथून निघण्यापूर्वी बोलणे झाले होते. खरं तर आमच्या दोघांमध्ये बोलणे होत असे की ट्रॅकवर पहिले पदक कोण मिळवेल.त्यानंतर जेव्हा क्रीडा प्रकारची सूची आली तेव्हा समजले की प्रीतीच्या स्पर्धा आधी आहेत तेव्हा आम्ही निर्धास्त झालो की पहिले पदक तर हीच आणेल. तर आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा त्याआधी हा गज्जू म्हणजे हा प्रशिक्षक सांगत होता की तुम्हाला एक महिना विश्रांती दिली जाईल. त्यानंतर जेव्हा आम्ही इथे आलो तेव्हा सकाळी सांगत होता की एका आठवड्याची विश्रांती मिळेल त्यापेक्षा जास्त नाही मिळणार. तर मी विचारले का नाही मिळणार तर म्हणाला कांस्य पदकासाठी इतकेच मिळते.
पंतप्रधान- आता तुला जेवण मिळणार नाही.
प्रशिक्षक- धन्यवाद सर.
खेळाडू- या माझ्या तिसऱ्या पॅरालिम्पिक स्पर्धा होत्या.मागच्या वेळीही मी आपल्याला भेटलो होतो, आपण मला खूप प्रोत्साहित केले मात्र यावेळीही माझ्याकडून कसर राहिली.मी रियो पॅरालिम्पिक
मध्ये चौथ्या स्थानावर होतो, टोकियो मधेही चौथ्या स्थानावर आणि यावेळी पॅरीसमधेही चौथ्या स्थानावर राहिलो सर.
तर सर, हे चार क्रमांक मला जास्त आवडतात, त्यामुळे कदाचित मी हे चार क्रमांक प्रोत्साहन म्हणून घेतो, म्हणून मला वाटतं की पुढचं माझं चौथं पॅरालिम्पिक असेल, त्यामुळे कदाचित मी चौथ्यामध्ये काहीतरी करेन आणि सर, मी स्वत:ला अपयशी मानणार नाही. पॅरालिंपिकच्या इतिहासात भारतातील नव्हे, तर जगभराच्या इतिहासातील मी एकमेव खेळाडू आहे, ज्याने एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये इतक्या वेळा सहभाग घेतला आहे! मग कुठेतरी मला असे वाटते की ऑलिम्पिकमध्ये असे अनेक इतिहास आहेत. जशी, 5 व्या ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणारी फ्रान्सची एक थाळीफेकपटू देखील आहे. तिहेरी उडी मारणारा देखील आहे, बहुधा तो अमेरिकेचा का कुठला आहे, आणि त्यानेही त्याच्या पाचव्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले आहे. त्यामुळे कदाचित मी स्वतःला पुन्हा प्रेरित करेन की तू पॅरा जगातील पहिला खेळाडू बनशील जो सर्वांना प्रेरित करेल की तो जर चौथ्यात जिंकला होता, तर तुम्ही लोक पहिल्याच पराभवात का खचून जात आहात. इथले काही खेळाडू असे आहेत की ही गुडिया आहे, ही चौथी आहे, अनेक जण चौथ्या क्रमांकावर आहेत, त्यामुळे त्यांची निराशा होत आहे. त्यामुळे मला यातही थोडं बरं वाटतंय की त्यांचे प्रशिक्षक असं म्हणत आहेत, त्याच्याकडे बघ.
पंतप्रधान - असं बघा, मला वाटते की तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन कदाचित तुमची सर्वात मोठी ताकद आहे. तुम्ही विचाराची नवी पद्धत घेऊन आला आहात की मी जगाला इतकं दिलंय की मी इथे असताना चौथ्या क्रमांकावर राहून नऊ जणांना पुढे जाऊ दिले आहे.
खेळाडू - सर, काही हरकत नाही, याचा अर्थ आता आमची वेळ नाही, पण यावेळी जी आहे ती शिष्यांची वेळ आहे. आम्ही तीन खेळाडू आहोत जे आमच्या शिष्यांना साथ देत आहोत. देवेंद्रभाई साहेब आहेत, त्यांच्या शिष्याला सुवर्णपदक मिळाले आहे आणि दुसरे सोमनराणा आहेत, त्यांच्या शिष्याला कांस्य मिळाले आहे आणि मी नवदीपचा प्रशिक्षक नाही पण मी नवदीपचा गुरू आहे. याचा अर्थ असा की भालाफेकीत सुरुवातीपासून आजपर्यंत मोठा भाऊ आणि गुरू म्हणून त्याच्या सोबत प्रवासात आहे. त्यामुळे यावेळेस मी नवदीपला देऊन टाकलं की यावेळी तू घेऊन जा. पण पुढच्या वेळी सर, मी निश्चितपणे वचन देतो की ते माझेच असेल आणि सर, गेल्या तीन ऑलिम्पिकमधील सर्व पॅरालिम्पिक मी पाहिले आहेत. मला असे वाटते आहे की हा देश खूप मोठा आहे असे सर्वजण बोलतात, खूप कठीण खेळ होतील अशी त्यांची आधीच अपेक्षा असते, खेळ खूप आव्हानात्मक होतील. पण सर, मला पूर्ण विश्वास आहे. जर भारताने 2036 ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकचे आयोजन केले, तर मला वाटत नाही की त्यापेक्षा मोठे आयोजन या पृथ्वीतलावर कधी कुठे झालेले असेल. सर, त्यातही आपण सर्वतोपरी प्रयत्न करू जेणेकरून म्हातारपणीही देवेंद्रभाऊ साहेबांना आदर्श मानून आपण आपली प्रयत्नांची पराकाष्ठा करु आणि त्यातही खेळण्याचा प्रयत्न करू.
पंतप्रधान - ही तुमची जीवनाकडे पाहण्याची पद्धत आहे, ती खूप प्रेरणादायी आहे की बाबा, मी भविष्यातही काहीतरी करेन आणि करत राहीन. मी तुमचे अभिनंदन करतो.
खेळाडू- धन्यवाद सर!
प्रशिक्षक- नमस्कार सर!
पंतप्रधान- नमस्कार जी!
राधिका सिंह- नेमबाजीच्या संघासोबत मी मानसिक प्रशिक्षक राधिका सिंह आहे आणि तुम्ही म्हणालात की तुमचा अनुभव सांगा….तर सगळ्यात आवश्यक गोष्ट आहे ती म्हणजे… संघात असलेले एकमेकांबद्दलचे प्रेम..घट्ट बंद! त्यामुळे नेमबाजीच्या संघामध्ये कुणीही एकमेकांशी स्पर्धा करत नाही, प्रत्येकजण स्वत:शीच स्पर्धा करत असतो, त्यामुळे ते पुढे जात असतात आणि त्यांची जेवढी क्षमता असते, जेवढी तयारी असते त्यापुढे ते त्यांच्यातील कमतरतेचा बाऊ करत नाहीत, त्यांची ताकद किती आहे याचा विचार करत बसत नाहीत, तर खेळावरील त्यांचं प्रेम या सर्वांवर मात करते. त्यामुळे ही खूप मोठी गोष्ट आहे की आमचा संघ एकमेकांशी खूप घट्ट एकजीव राहिला आणि मी एकाच स्पर्धेसाठी दोन मुलांना तयार करत होते. त्यांच्यात स्पर्धा नव्हती, तर ही एक मोठी ताकद होती की आम्ही एकमेकांवरील प्रेमातून आगेकूच केली आणि ते प्रेम खेळात दिसून येते सर.
पंतप्रधान - बरं, तुम्ही हे जे मानसिक आरोग्य जपता म्हणजे नेमकं काय काय करता?
राधिका सिंह- सर, आपले जे सुप्त मन असते, मनाचा 90% भाग असतो, त्यात काही कमतरता असतील तर त्या बदला आणि तुमची ताकद पुढे आणा, त्यांना तुमच्या व्यक्तिमत्त्वाशी जोडून घ्या आणि स्वतःला पुढे न्या.
पंतप्रधान - अच्छा, या लोकांना योग किंवा ध्यानधारणेशी संबंधीत असे काही विशेष प्रशिक्षण आपण देता का?
राधिका सिंह - सर, आमच्या पथकामध्ये एक योग शिक्षक होते. त्यामुळे रोज सकाळी ध्यानधारणा होत असे आणि मुले रोज संध्याकाळी जे काही शिकायचे त्याची उजळणी करायचे. म्हणजे रोज मानसिक प्रशिक्षण होत असे. तर त्या वेळी, तेव्हा त्यांचा रेंजवरचा सराव, योगासनांचा सराव होत असे… म्हणजे संघात खूप सुव्यवस्था होती सर.
पंतप्रधान - तर जगातील अनेक देशांतील विद्यार्थी खेळाडू असतील ज्यांना योग ध्यानाची माहिती नाही. मग त्यामुळे त्यांच्या तुलनेत आपल्या लोकांच्या गुणवत्तेत काय फरक दिसून येतो?
राधिका सिंह - होय, खूप फरक पडतो कारण जेव्हा तुम्ही तुमच्या मनावर नियंत्रण ठेवता तेव्हा तुम्ही तुमच्या खेळाला खूप पुढे नेऊ शकता. तर तुम्ही देखील एक चांगली गोष्ट केली आहे की आपल्या देशात योग खूप वाढवला आहे आणि मला वाटते सर, तुम्ही शाळांमध्ये हा विषय म्हणून ठेवला पाहिजे. कारण यामधील विज्ञानात जी शक्ती आहे ती इतर कशातही नाही सर.
पंतप्रधान- तुमचे अभिनंदन!
राधिका सिंह – धन्यवाद सर!
प्रशिक्षक- सर्वप्रथम याचा आनंद झाला की, कपिलने केवळ पॅरा ज्युदोमध्येच नाही तर सक्षम ज्युदोमध्येही भारताला पहिले पदक मिळवून दिलं आहे. आतापर्यंत सक्षम (एबल)किंवा पॅरा ज्युदोमध्ये एकही पदक नव्हते आणि कपिलच्या नावावर आणखी एक इतिहास आहे, तो म्हणजे कपिलने भारताला कोणत्याही खेळात दृष्टिबाधितांसाठी पहिले पदक मिळवून दिले. त्यामुळे आपल्या सर्व भारतीयांचेच अभिनंदन आहे. जगातील जे सर्व अग्रणी ज्युदोपटू आहेत ते व्यासपीठावरून खाली आले आणि त्यांनी वैयक्तिकरित्या आमचे अभिनंदन केले. ते म्हणाले-पॅरा ज्युदोमध्ये एवढ्या लवकर तुम्ही मोठं यश मिळवाल अशी आम्हाला अपेक्षा नव्हती. त्यामुळे तुम्हाला सलाम! आणि सर, हे जे यश मिळाले ते फक्त आमचे नाही. भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI), ऑलिंपिक गोल्ड क्वेस्ट (OGQ) यांच्या कडून जे असाधारण असे प्रत्ययकारक पाठबळ मिळाले आहे आणि अर्थातच सांगायची गरजच नाही की भारत सरकारचा जो पाठिंबा मिळाला….तर सर, त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत! शिवाय, अमेरिका, इंग्लंड, कोरीयाचे प्रशिक्षक….जे आमचे चांगले मित्र आहेत….ते सर्व आले आणि म्हणाले की-आम्हाला माहित होते की तुम्ही पुढे जात आहात पण तुम्ही इतक्या लवकर सरशी साधाल याची आम्हाला कल्पना नव्हती. त्यामुळे या कौतुकाचा साहजिकच आम्हाला खूप अभिमान वाटला आणि आमच्या पाठीशी असलेल्या संपूर्ण चमुचे आभार! धन्यवाद सर!
पंतप्रधान- खूप खूप अभिनंदन!
प्रशिक्षक- मी संदीप चौधरीजींसाठी एक सांगू इच्छितो - रणांगणात फक्त शूरच पडतात, जे गुडघे टेकतात ते काय पडतील! तर तुम्ही सर्वांना सांगितले की जो घोड्यावर बसतो तो पडू शकतो, मुले कधीच पडत नाहीत. तर हा माझा तुमच्यासाठी मोठा संदेश आहे, आणि सर मी हरविंदर, शीतल हरविंदर यांना सांगेन, मी तिरंदाजीतून आहे….तर जसे मॅडमने सांगितले की हरविंदर हा पहिला ज्युदोमध्ये तिरंदाजी सक्षम आहे आणि पॅरालिम्पिकमध्ये पहिला पदक जिंकणारा आहे, टोकियोमध्ये कांस्यपदक जिंकणारा आहे आणि आता इतिहासातील पहिला खेळाडू आहे, ज्याने 28, 28, 29 असे सक्षम तिरंदाजाच्या तुल्यबळ गुण मिळवले आहेत. तुम्ही शेवटचा बाण पाहिला असेल सर…. एकदम जवळच लागला होता….. जर तो 10 वर लागला असता तर आम्ही किम्बुजिन आणि आपला तो ब्रॅडेलियरशन (नाव स्पष्ट नाही) यांच्या बरोबरीने गुण मिळवले असते.
अमिषा - नमस्कार सर, माझे नाव अमिषा आहे आणि मी उत्तराखंडची आहे. हे माझे पहिले पॅरालिम्पिक होते आणि 2 वर्षातच मला खेळायची संधी मिळाल्याबद्दल मी खूप आभारी आहे. फक्त 2 वर्ष झाली आहेत आणि या 2 वर्षात मला आयुष्यात इतका मोठा अनुभव आला आहे, मला खूप काही शिकायला मिळाले आणि माझ्या प्रशिक्षकांचे आभार ज्यांनी मला आत्मविश्वास दिला की मी हे करू शकते… कारण मी खूप घाबरले होते म्हणून ते म्हणाले की मी इथे लोकांचे निरीक्षण करावे.
पंतप्रधान – आता लोक घाबरत असतील…आधी तुम्ही घाबरला होता, आता लोक घाबरत असतील!
अमिषा - तुम्ही म्हणाला होता की लोकांचे निरीक्षण करायचे आहे, ते तर मी सुद्धा खूप केले आणि बरेच काही शिकायला मिळाले.
पंतप्रधान - आता कुटुंबाकडून काय प्रतिसाद आहे? तुमच्या कुटुंबातील सदस्य काय म्हणतात?
अमिषा - आता कुटुंब खूप आनंदी आहे आणि ते आधीपासूनच पाठींबा देत होते, पण आता त्यांचा पाठींबा आणखी वाढला आहे.
पंतप्रधान – आणखी पाठींबा देत आहेत.
सुमित अंतिल- नमस्कार सर, माझे नाव सुमित अंतिल आहे आणि मला लागोपाठ सुवर्ण पदके मिळाली आहेत. मला अजूनही आठवते सर, मी टोकियोहून सुवर्ण पदक जिंकून आणले होते, तेव्हा तुम्ही माझ्याकडून वचन घेतले होते की मला अशी आणखी दोन सुवर्णपदके हवी आहेत, तर सर, हे दुसरे तुमच्यासाठी आहे. कारण नंतर, पॅरालिम्पिकच्या आधी, आम्ही खूप घाबरलो होतो कारण मी लेख वाचत होतो की आपले सुवर्ण पदक राखेल तो प्रत्येकाचा सर्वात आवडता खेळाडू असेल आणि त्यात माझे नाव देखील होते. पण 20 ऑगस्टला जेव्हा मी तुमच्याशी बोललो तेव्हा मला तोच क्षण आठवला, सर टोकियोमधला, आणि वाटले की यावेळी आम्हाला पुन्हा चांगली कामगिरी करायची आहे आणि माझी संपूर्ण टीम माझ्यासोबत आहे, सर. माझे फिजिओ, माझे प्रशिक्षक, आम्हा सर्वांच्या वतीने तुमचे खूप खूप धन्यवाद सर. कारण आम्हांला वाटते की सर, आम्ही मेडल जिंकून आणले तर आम्ही तुम्हाला भेटू शकू, तुमच्याशी वैयक्तिकरित्या बोलू शकू आणि सर तुमचे खूप खूप आभार.
पंतप्रधान – तुमचे अभिनंदन.
ॲथलीट- आम्ही सर्वजण बहुतेक करून सरकारच्या विविध संस्थांचे प्रायोजित खेळाडू आहोत. त्यामुळे तिथून कधी-कधी दबाव येत राहतो की तुम्हाला चांगली कामगिरी करावीच लागेल, या सगळ्या गोष्टी होत असतात. एकीकडे तुम्ही म्हणता की तुम्ही खेळायला जा आणि खेळा, हार-जीत होत असते. तर हे सगळे खालचे लोक विचार करतात की अरे, बघून घेऊ, त्यांचे काय करता येईल ते आम्ही बघू. पण जेव्हा आपल्या देशाचे पंतप्रधान आपल्याला प्रेरीत करत असतात तेव्हा अशा गोष्टी अगदीच किरकोळ वाटू लागतात. सर, मागच्या वेळी मी तुमच्याशी बोललो होतो, टोकियोमध्ये माझी कामगिरी फारशी चांगली नव्हती. त्यात माझा आठवा क्रमांक होता. मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की परदेशात जाता तेव्हा तुमचा अनुभव कसा असतो? जेव्हा तुम्हाला काळजी वाटते तेव्हा तुम्ही काय करता? तेव्हा तुम्ही दिलेले उत्तर असे होते की तुम्ही तुमच्यासोबत संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करता, असे बरेच काही तुम्ही सांगितले होते. तर याच गोष्टी, विचार सोबत घेऊन मी यावेळी गेलो होतो, या गोष्टी आम्हाला पूर्ण आत्मविश्वास देत होत्या. मागच्या वेळेसारखे कोणतेही दडपण नव्हते, मला आत्मविश्वास वाटत होता आणि आमच्या टीमने, सरकारने, आमच्या प्रशिक्षकांनी, , सर्वांनी आम्हाला खूप चांगला पाठिंबा दिला आणि सर ही स्पर्धा खेळताना खूप मजा आली. धन्यवाद सर!
पंतप्रधान – तुमचे अभिनंदन.
प्रशिक्षक आणि खेळाडू - सर नमस्कार, मी 16 वर्षे तपश्चर्या केली होती आणि माझा विद्यार्थी धरमवीर आहे, ज्याला सुवर्णपदक मिळाले आहे. आम्ही दोघेही एकमेकांचे स्पर्धक सुद्धा आहोत आणि मी स्वत: प्रशिक्षण देऊन त्याला खेळात आणले आहे. तर 20 तारखेला मी तुमच्याशी बोललो होतो आणि मला खूप सकारात्मक वाटले होते, असे वाटले की आपल्याला आपली सर्वोत्तम कामगिरी करावीच लागेल आणि प्रशिक्षकासाठी यापेक्षा मोठी गोष्ट असू शकत नाही. मी कदाचित असा एकमेव खेळाडू असेन जो आपल्या विद्यार्थ्यासोबत मैदानात स्पर्धेसाठी उतरला. आणि धरमवीरच्या पदकाने सर, कुठेतरी माझी तपश्चर्या सफल झाली आणि त्यात खूप मोठा वाटा होता, सर आमच्या टीमचा कारण आमचे सर्वांचे अपंगत्व गंभीर स्वरूपाचे आहे. त्यामुळे SAI आणि मंत्रालयाने आमच्या सहाय्यक कर्मचाऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला. खरेतर 33% असे प्रमाण होते, ज्यामुळे केवळ 33% लोकच सपोर्टिंग स्टाफमध्ये राहू शकतात. तेव्हा देवेंद्रभाईंनी खूप चांगला निर्णय घेतला आणि आमच्या स्पर्धा झाल्या तेव्हा त्यांनी आमच्या लोकांना आत आणले आणि इतर लोकांना बाहेर काढले. हे खूप चांगले कॉम्बिनेशन होते, त्याचा फायदा असा झाला की सर आम्हाला इतकी पदके मिळाली. पदके आमच्या जेवणाच्या बाबतीत सुद्धा SAI ने मदत केली. तिथे भारतीय खाद्यपदार्थांची वानवा होती आणि शाकाहारी लोकांसाठी ही एक मोठी समस्या होती, त्यामुळे SAI ने शिबिर असलेल्या गावातच आहाराची जी व्यवस्था केली, तो इतका चांगला आरोग्यदायी आहार होता की कोणालाही जेवणाची समस्या जाणवली नाही सर. या संपूर्ण टीमचे खूप खूप आभार आणि आम्हाला खूप प्रोत्साहन दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद सर.
पंतप्रधान – तुमचे अभिनंदन.
खेळाडू - मी आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी झाले होते आणि पदक जिंकू शकले नव्हते. तुम्ही सर्वाना भेटत होता. पदक विजेत्यांना तुम्ही पुढे भेटलात. तुम्ही आलात आणि सर्वत्र समोरासमोर रांगा लागल्या होत्या. तुम्ही काही लोकांना भेटलात आणि मग दुसऱ्या दिशेला वळलात. मी तुम्हाला खूप जवळून पाहिले पण मी तुमची भेट घेऊ शकले नाही, तुमच्याशी बोलू शकले नाही, त्यामुळे मनाला रूखरूख लागून राहिली होती. तुम्हाला भेटायचेच होते आणि त्यासाठी मी आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर माझ्या पुरेपूर प्रयत्न केले. काहीही झाले तरी मला तुम्हाला वैयक्तिकरित्या भेटायचेच होते. कदाचित त्यामुळेच मला प्रेरणा मिळाली आणि मला करून दाखवता आले. सहा महिने झाले, मी माझ्या मुलांना भेटले नाही, मी घरीही गेले नाही. माझा मुलगा लहान आहे. मी जेव्हा त्याला फिरायला घेऊन जायचे, तेव्हा मी माझ्या मोबाईलमध्ये GPS वापरत असे आणि त्यामुळे मोबाईलमध्ये रस्ता कसा शोधायचा, हे त्याला ते माहिती आहे. तर ते मला म्हणू लागला, आई तू घरचा रस्ता विसरलीस, निदान फोनवर जीपीएस लावून तरी घरी ये. त्यामुळे सर तुमचे खूप खूप आभार. तुम्ही सर्वांनी खूप पाठिंबा दिला आणि आशीर्वाद दिला, त्यामुळेच आम्ही हे करू शकलो, आमच्या प्रशिक्षकांचा पूर्ण पाठिंबा मिळाला आहे, त्यामुळे तुमचे खूप खूप आभार सर!
पंतप्रधान – मनापासून अभिनंदन.
शरद कुमार- सर, मी शरद कुमार आहे आणि हे माझे दुसरे पदक आहे, मी तिसऱ्यांदा पॅरालिम्पिकमध्ये खेळलो आहे.
पंतप्रधान - मी शरद आणि संदीप या दोघांनाही भाषण करायला सांगितले तर सर्वोत्तम कोण करेल?
शरद कुमार- सर संदीप खूप छान बोलतात, कदाचित म्हणूनच चौथ्या स्थानावर राहिला. सर, पण एक खेळाडू म्हणून मला सांगावेसे वाटते की जेव्हापासून पॅरा चळवळ सुरू झाली तेव्हापासून मी त्याच्यासोबत आहे आणि आज सर्व खेळाडू या स्तरावर आहेत, याचा मला स्वतःला अभिमान वाटतो. जेव्हा हे सर्व लोक बाहेर जातात, प्रशिक्षक, फिजिओथेरपिस्ट सर्व एकच संघ आहे. जेव्हा आम्ही सगळे बाहेर जातो तेव्हा लोक आता अशा प्रकारे भारताकडे बघतात. पूर्वी त्यांना वाटायचे की हे लोक पुढे येतील का? पण आता पॅरा स्पर्धेत त्यांनी असे वर्गीकरण केले आहे की भारत हे एक क्रीडाप्रधान राष्ट्र आहे आणि सर, हे अर्थातच SAI च्या आधीच्या प्रतिमेमुळे होऊ शकले आहे. आणि मग आमच्यासाठी सपोर्ट स्टाफ येऊ लागला आणि खेळाडूंमध्येही ज्या प्रकारे सकारात्मकता वाढीला लागली आणि सर, मुख्य म्हणजे तुम्हाला भेटल्यावर आणि स्पर्धेसाठी रवाना होण्यापूर्वी तुम्ही सर्वांशी बोलता आणि आल्यानंतर सुद्धा सर्वांना भेटता. मला वाटते की ही संधी आपल्याला मिळायला हवी, असे सर्व पदक विजेते आणि खेळाडूंना वाटत असते. सर, तुम्ही ज्याप्रमाणे पॅरा-खेळाडूंना आपलेसे केले आहे, तसे आजवर लोकांनी केलेले नाही.
पलक कोहली- नमस्कार सर, मी पलक कोहली आहे आणि हे माझे सलग दुसरे पॅरालिम्पिक होते. टोकियोमध्ये मी चौथ्या स्थानी होते आणि इथे पाचव्या स्थानावर आहे. पण या दोन्ही पॅरालिम्पिक स्पर्धांमधला माझा प्रवास पूर्णपणे वेगळा होता. टोकियो पॅरालिम्पिक 2022 नंतर मला बोन ट्युमर झाला होता, स्टेज 1 कॅन्सर झाला होता. जवळपास दीड वर्ष मी काहीही केले नाही, कोणत्याही स्पर्धेत सहभागी होता आले नाही, आणि गेल्या वर्षी 2023 मध्ये मी पुनरागमन केले आणि मला खूप आनंद आहे आणि मला खूप वाटतो आहे की माझे सपोर्टिंग स्टाफ, प्रशिक्षक गौरव सर, यांच्या आश्वासक मार्गदर्शनामुळे मी पॅरिससाठी पात्र ठरू शकले. टोकियोनंतर मला अनेक स्पर्धांना मुकावे लागले, मोठ्या जागतिक स्पर्धांनाही मुकावे लागले. आशियाई स्पर्धेच्या वेळी मला कोविडचा संसर्ग झाला.
या वर्षी मी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र ठरले आणि कांस्यपदक जिंकले आणि त्यानंतर मी पॅरिससाठी देखील पात्र ठरले. माझे जागतिक मानांकन 38 पर्यंत सर्वात खाली घसरले होते कारण मी स्पर्धा खेळले नव्हते. आणि पुन्हा मी स्वत:ला जागतिक क्रमवारीत पहिल्या 4 मध्ये आणले आणि मी पॅरिससाठी पात्र ठरले. मात्र निराशाजनक बाब म्हणजे मी पदक जिंकू शकले नाही. मात्र तुमचे आशीर्वाद आणि सगळ्यांची साथ यामुळे माझे लक्ष्य आता लॉस एंजेलिस 2028 आहे आणि तेव्हा मला नक्कीच पोडियमवर तुमच्यासोबत फोटो काढायला आवडेल. धन्यवाद सर.
पंतप्रधान - पलक, गेल्यावेळी तर तुझे लखनौ इथे प्रशिक्षण झाले होते.
पलक कोहली – हो सर.
पंतप्रधान - तुझ्या आई बाबांशी देखील मी बोललो.
पलक कोहली - हो सर, हो सर. टोकियोला जाण्यापूर्वी.
पंतप्रधान - यावेळी काय मूड आहे?
पलक कोहली - सर, आता मी लखनौमध्येच गौरव सरांकडे प्रशिक्षण घेत आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला पॅरा बॅडमिंटन बद्दल कळले होते. आणि घरी , जेव्हा मला हाडांमध्ये गाठ असल्याचे निदान झाले तेव्हा बरेच लोक म्हणत होते की तुम्हाला माहित आहे का पलकचे तर खेळातील करिअर संपले. आणि डॉक्टरांनी देखील सांगितले होते की आम्ही कशाचीही हमी देऊ शकत नाही. तुम्ही साधारण जीवन जगू शकाल की नाही आणि त्यानंतर सर, खूपच गुंतागुंत होती. माझ्या हृदयात एक व्यंग होते. आणि मला ट्युमर नंतर पायात देखील व्यंग निर्माण झाले. त्यामुळे माझ्या दोन्ही पायांच्या लांबीत फरक पडला आणि आणखी गुंतागुंत निर्माण झाली . मात्र माझ्या कुटुंबियांना मला आनंदी पहायचे आहे आणि त्यांचे आशीर्वाद माझ्याबरोबर आहेत. आणि त्यांना मी आनंदी हवी आहे आणि मी हिंमत हरू नये एवढीच काळजी त्यांना वाटत आहे.
पंतप्रधान - हे बघ पलक, तुझे प्रकरण असे आहे की तू अनेकांना प्रेरणा देऊ शकतेस. कारण इतक्या अडचणींनंतर गाडी पुन्हा रुळावर आली, आयुष्यात मध्येच अडथळे आले, नवीन समस्या आल्या. मात्र तरीही तू तुझे ध्येय सोडले नाहीस ही खूप मोठी गोष्ट आहे, खूप खूप अभिनंदन तुझे.
पलक कोहली - खूप खूप धन्यवाद सर.
श्याम सुंदर स्वामी - नमस्कार सर. मी राजस्थान बीकानेर इथून आलो आहे , श्याम सुंदर स्वामी नाव आहे, पैरा आर्चर आहे. सर , आमच्या बीकानेर मध्ये करणी सिंह राजा पाच वेळा ऑलिम्पिक खेळून आले होते. देवेंद्र भैय्याबद्दल आम्हाला खूप कौतुक आहे कारण 40 वर्षांनंतर मी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला होता. भैय्यांना पाहिले होते, तेव्हा समजलं खेळ असा असतो. तेव्हा मी देखील मग पैरा मध्ये आधी able खेळत होतो. 2016 मध्ये मला समजले की दिव्यांगांसाठी देखील काही तरी आहे, कारण भैयाचा वर्तमानपत्रात मोठा फोटो छापून आला होता. त्यामुळे भैयाकडून शिकलो आणि मग मी 40 वर्षांनंतर टोक्यो ओलिंपिकमध्ये भाग घेतला होता सर.
खेळाडू - सर, यावेळी मला खूप काही शिकायला मिळाले, विशेषतः माझ्याच श्रेणीतले सुवर्णपदक विजेते आहेत नितेश कुमार जी, त्यांच्याकडून शिकायला मिळालं. सर, संपूर्ण कारकीर्दीत त्यांच्याविरूद्ध ते जिंकले, एकदाही त्यांच्याबरोबर सामना याआधी जिंकला नव्हता. आणि त्यांच्यामुळेच मी त्यांना हरवू शकलो. आणि मला त्यांच्याकडून शिकायला मिळाले की जर ते करू शकतात तर मी नक्कीच त्यांना पुन्हा हरवू शकतो, मी संपूर्ण जगात कुणालाही हरवू शकतो.
पंतप्रधान – खूप शुभेच्छा.
खेळाडू – धन्यवाद, सर.
प्रशिक्षक - माझे नाव डॉक्टर सत्यपाल आहे आणि मी पैरा एथलेटिक्सचा कोच आहे. क्वचितच इथे असा कुणी कोच असेल, ज्याने माझ्याआधी पैरा एथलीटना प्रशिक्षण दिले असेल. मी 2005 -06 मध्ये पैरा एथलीटना प्रशिक्षण द्यायला सुरूवात केली.
पंतप्रधान - तुमच्या मनात हा विचार कसा आला ?
प्रशिक्षक- सर, मी नेहरू स्टेडियममध्ये प्रशिक्षण द्यायला जायचो. होतो, तेव्हा लिम्फ डिफिशिएंसी असलेले एक दोन एथलीट्स तिथे यायचे. तेव्हा मी त्यांना पाहिले, वाचले, नंतर देवेंद्र जी यांच्याबद्दल ऐकले की त्यांनी 2004 अथेन्स ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. तेव्हा मी याबाबत अभ्यास केला आणि मी थोडे-थोडे करायला सुरुवात केली, तेव्हा नेहरू स्टेडियम मधील सर्व प्रशिक्षक माझ्याकडे विचित्र नजरेने पहायचे , की मी दीपा मलिक जी यांची चेअर ढकलत जातो, एखाद्या पॅरा ऍथलिटला शिकवायला जातो, अंकुर धामा याचा हात धरून त्याला नेहरू स्टेडियम मध्ये फिरवायचो तेव्हा त्यांना वाटायचे, मी माझा वेळ वाया घालवत आहे. आज तेच पॅरा ऍथलिट, तेच प्रशिक्षक जे माझ्यावर टीका करायचे, आज त्या सर्वांची पॅरा एथलीट्सना प्रशिक्षण देण्याची इच्छा आहे. हे मी मनापासून बोलत आहे कारण मी या क्षेत्रात काम केले आहे. मी खूप खुश आहे आणि आगामी काळात मी तुम्हाला आश्वासन देतो की 29 नाही तर 50 पदके जिंकून आणू असं आश्वासन देऊन जातो, आम्ही सगळे इतकी मेहनत घेऊ आणि 50 पदके जिंकून येऊ.
पंतप्रधान – शाब्बास!
प्रशिक्षक - धन्यवाद, सर .
पंतप्रधान - हे बघा मित्रांनो, प्रत्येक खेळात सपोर्ट स्टाफ किंवा कोचिंग करणारे लोक असतात , प्रत्येक क्षेत्रात खूप मेहनत करावी लागते हे खरे आहे. मात्र दिव्यांगांबरोबर काम करणे, त्यांना शिकवण्यापूर्वी , स्वतःला तसे जीवन जगण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार करावे लागते. स्वतःला त्या भूमिकेत ठेवावे लागते. त्याला त्याच्या आयुष्यात कोणत्या अडचणी आहेत ते जाणून घ्यावे लागते, तेव्हा कुठे सांगू शकतो, नाहीतर एरवी मी सांगेन जा पळा, अरे तो म्हणेल, मी नाही धावू शकत, तो कोच समजू शकतो, हा धावू शकत नाही. त्यासाठी वेगळी पद्धत असायला हवी. आणि म्हणूनच मला वाटते की जे पॅरा एथलीट्सना प्रशिक्षित करतात, ते प्रशिक्षक असाधारण असतात. त्यांच्यामध्ये विशेष ताकद असते आणि हे खूप कमी लोक समजू शकतील, हे मला चांगले माहित आहे, आणि जेव्हा जेव्हा मला फोनवर सर्वांशी बोलायची संधी मिळते तेव्हा मी या गोष्टीचा उल्लेख करतो. कारण जे सामान्य आहेत, त्यांना केवळ तंत्र शिकवायचे असते.यांना तर जगायला देखील शिकवायचे असते. आणि म्हणूनच ही खूप मोठी साधना आहे आणि म्हणूनच मला वाटते की तुम्ही सर्वजण हे काम करत आहात ते सर्वात जास्त अभिनंदनास पात्र आहेत.
प्रशिक्षक - सर, मी ॲथलीट प्रशासक म्हणून आंतरराष्ट्रीय स्पर्धांना जायला सुरुवात करून 30 वर्षे झाली आहेत. एकेकाळी एक ध्वजही दिसत नव्हता. आता भारताचा ध्वज दिसू लागला आहे. आपले खेळाडूही पॅरा स्पोर्ट्समुळे आम्ही पदक जिंकू शकतो असे सांगत आले आहेत. जेव्हा आम्ही भाग घ्यायचो, त्यावेळी आम्हाला वाटायचे की सहभागी व्हायचे आहे. आता ती संकल्पना बदलली आहे. पण सर, मला तुमचे खूप आभार मानायचे आहेत. मी अनेकांना सांगतो, आपले ब्रँड ॲम्बेसेडर कोण आहेत? आपले मोदीजी आपले ब्रँड ॲम्बेसेडर आहेत. आणि आणखी एक सर, भारत सक्षम गटात देखील चांगली पदके जिंकून आणू शकतो. मी पूर्व जर्मनीत होतो आणि चेन्नईतही होतो. भारतात आजकाल खूप उत्तम सुविधा आहेत . त्याचा योग्य वापर करावा लागेल, जर आपण शारीरिक शिक्षण देणारे शिक्षक नेमले तर 100% आपण चांगली कामगिरी करून दाखवू, सर. धन्यवाद सर.
निषाद कुमार - सर, माझे नाव निषाद कुमार आहे आणि T-47 उंच उडी प्रकारातील खेळाडू आहे. आणि मी सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये रौप्य पदके जिंकली आहेत. सर, मला माझा अनुभव सामायिक करायचा आहे. जेव्हा टोक्यो ऑलिम्पिक साठी आमचा चमू तिथे पोहचला होता, तेव्हा तिथे कोविडचे संकट होते. त्यामुळे त्यावेळी आम्ही प्रेक्षकांशिवाय स्पर्धेत खेळलो होतो. आता जेव्हा आम्ही पॅरिसमध्ये पॅरालिम्पिकमध्ये खेळलो तेव्हा संपूर्ण स्टेडियम तिथे भरले होते. त्यामुळे ज्या दिवशी माझी स्पर्धा होती, तेव्हा सगळे भारताच्या नावाने जयघोष करत होते. त्यामुळे त्यांनी आम्हाला खूप प्रोत्साहन दिले. आम्हाला आमची कामगिरी सुधारण्यासाठी आणि पदक जिंकण्यासाठी त्यांच्याकडून खूप प्रोत्साहन मिळाले आणि दुसऱ्या दिवशी मला पदक प्रदान केले जाणार होते आणि पदक मिळाल्यानंतर मी माझ्या संघातील इतर सदस्यांना उंच उडीत पाठिंबा देण्यासाठी पोहचलो, तेव्हा पदक माझ्या गळ्यात होते, त्यावेळी फ्रेंच कुटुंब माझ्याकडे पाहत होते की काल आपण या खेळाडूला पाठिंबा देत होतो.
आज तोच खेळाडू आपल्या सोबत बसला आहे. ते कुटुंब बराच वेळा पासून माझ्याकडे पहात होते की या खेळाडू सोबत फोटो काढण्याची संधी आपल्याला कधी मिळेल. जशी ती स्पर्धा संपली तसा मी माझा फोटो काढण्यासाठी खाली गेलो, तेव्हा त्यांनी माझ्यासोबत फोटो काढण्याची त्यांची इच्छा असल्याचे सांगितले. मग मी त्यांच्या छोट्या छोट्या मुलांसोबत फोटो काढला आणि त्या मुलांच्या हातात माझे पदक दिले. मला वाटते ती मुले सहा ते सात वर्षांची असतील. ती मुले पदक पाहून खूपच आनंदित झाली. काल आपण ज्या खेळाडूला प्रोत्साहन देत होतो आज तोच खेळाडू आपल्या सोबत उभा राहून फोटो काढत आहे, ही त्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट होती. त्या मुलांची आई मला म्हणाली की ही स्पर्धा पाहण्यासाठी पॅरिसमध्ये येणे सफल झाले. कारण तुम्ही आमच्या सोबत आहात, आमच्या मुलांसोबत फोटो काढून त्यांना ऑटोग्राफ देत आहात. त्या संपूर्ण कुटुंबाला खूपच आनंद झाला होता. तर या स्पर्धेतला माझा अनुभव असा खूपच चांगला होता, सर!
पंतप्रधान - खूपच छान.
विशाल कुमार - धन्यवाद सर!
योगेश कथुनिया - नमस्कार सर! माझे नाव योगेश कथुनिया. मी दोन वेळा रजत पदक जिंकले आहे. तर मी आपला एक अनुभव, एक गोष्ट सामायिक करू इच्छितो. खरे तर त्याला अनुभव म्हणता येणार नाही कारण ती एक सुसंगती आहे. ही सुसंगती तुमच्यामुळे आली आहे, सर! कारण तुम्ही देशात ज्या विविध योजना सुरू केल्या आहेत जसे की टॉप्स योजना किंवा खेलो इंडिया योजना असो किंवा एनएसयू असो, सर! आम्ही तुमच्यामुळेच आज 29 पदके जिंकून येऊ शकलो आहोत. सर! मी आणखीन एक गोष्ट सांगू इच्छितो, इतरांसाठी पीएम या शब्दाचा अर्थ पंतप्रधान असला तरी आम्हा सर्वांसाठी मात्र याचा अर्थ ‘परम मित्र’ असा आहे.
पंतप्रधान - वा, तुम्ही मला हे पद दिलं याचा मला खूप आनंद झाला. माझी पण अशी इच्छा आहे की मी खऱ्या अर्थाने एका मित्राच्या रूपात तुम्हा सर्वांसोबत काम करत रहावे.
नवदीप - सर! माझे नाव नवदीप आहे.
पंतप्रधान - यावेळी ज्यांचे रिल्स सर्वात जास्त लोकप्रिय झाले त्यापैकी एक आहात तुम्ही आणि दुसरा आहे शितल.
नवदीप- सर मी F41 या श्रेणीत भालाफेक करतो. मी दुसऱ्यांदा पॅरालिंपिक स्पर्धेत सहभागी झालो आहे. सर, माझी स्पर्धा सर्वात शेवटच्या दिवशी होती. आणि मी तिथे जवळपास 21 तारखेला पोहोचलो होतो. तिथे एकामागे एक खेळाडू जसजसे पदक जिंकू लागले तशी माझ्या मनातही थोडी भीती निर्माण होऊ लागली की सर्वजण तर पदक जिंकत आहेत मग मी पण पदक जिंकू शकेन का? पण मग तिथे जे काही वरिष्ठ खेळाडू होते जसे की सुमित भाई, अजित भाई, संदीप भाई, देवेंद्र सर या सर्वांसोबत एक एक दिवस भेटून मी त्यांचे अनुभव ऐकत होतो की त्यांनी कशी तयारी केली, मला काय करायला हवे आणि सर! माझी पाळी येईपर्यंत मी अगदी मोकळ्या मनाने, कोणतेही दडपण न घेता खेळू लागलो होतो.
पंतप्रधान - एकदम छान!
नवदीप - धन्यवाद सर!
रक्षिता राजू - नमस्कार सर, मी रक्षिता राजू दृष्टिहीन क्रीडापटू आहे. ही माझी पहिलीच पॅरालिंपिक स्पर्धा होती. मी खूपच आनंदात आहे. मला खूप वेगवेगळे अनुभव घेता आले. मी पॅरा एशियन क्रीडा स्पर्धेत दोन वेळा सुवर्णपदक जिंकलेले आहे. मी माझे गाईड रनर आणि माझे प्रशिक्षक राहुल बालकृष्णन सर यांची खूप खूप आभारी आहे. ते इथे माझ्यासोबतच आहेत, मी गाईड रनरशिवाय धावूच शकले नसते. मी खूप आनंदात आहे आणि 2028 मध्ये होणाऱ्या पॅरालिंपिक स्पर्धेत मी सुवर्णपदक जिंकेन याची मला खात्री आहे.
पंतप्रधान - वा, अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
रक्षिता राजू - माझे गाईड रनर आणि माझे प्रशिक्षक यांनी मला खूप जास्त प्रोत्साहित केले. कोणतीही अपेक्षा न ठेवता त्यांनी सकाळ, संध्याकाळ माझ्याबरोबर धावण्याचा सराव केला यासाठी मी त्यांची खूप आभारी आहे. खूप खूप धन्यवाद सर!
पंतप्रधान - चला, मित्रांनो, तुम्हा सर्वांसोबत संवाद साधण्याची संधी मिळाली याचा मला खूप आनंद झाला. यावेळी जेव्हा तुम्ही स्पर्धेसाठी गेलात तेव्हा मी तुम्हाला प्रत्यक्ष भेटू शकलो नाही, कारण अनेक खेळाडू वेगवेगळ्या ठिकाणी प्रशिक्षण घेत होते आणि सवड मिळणे देखील कठीण होते. म्हणून मग मी दूरदृश्य प्रणालीमार्फत तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होता, आणि त्या दिवशी मी एक गोष्ट सांगितली होती, कदाचित तुम्हाला आठवत असेल. मी म्हणालो होतो की आज तुम्हा लोकांना मी सर्व देशवासीयांचा एक संदेश देण्यासाठी आलो आहे. आणि मी म्हणालो होतो की संपूर्ण हिंदुस्तान म्हणत आहे, ‘विजयी भव’! तुम्ही सर्वांनी आपल्या देशवासीयांची जी इच्छा होती ती बरोबर जाणली आणि काहीतरी करून दाखवण्याचा निर्धार केला. ही गोष्ट खरोखरच खूप मोठी आहे असे मला वाटते. मी तुमच्याशी जरा जास्तच जोडला गेलेला आहे त्यामुळे मी आणखीन एक गोष्ट पाहू शकत आहे. ती म्हणजे, परमात्म्याने तुम्हाला काहीतरी एक अतिरिक्त आणि खास गुणवत्ता प्रदान केली आहे असे मला वाटते. शरीरात काहीतरी कमतरता जरूर असेल मात्र तुमच्या व्यक्तिमत्त्वात परमात्म्याने तुम्हाला काहीतरी वाढीव दिलेले आहे. तुम्ही कदाचित तुमच्या व्यक्तिगत जीवनात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दिवस काढले आहेत, त्यासाठी संघर्ष केला आहे, हे मी पाहू शकतो. तुमचे ते प्रशिक्षण देखील पूर्ण झाले आहे जिथे कधीतरी तुम्ही उपहास सहन केला असेल, चेष्टा करत असताना देखील तुमच्या कानावर तुमच्याबद्दल इतर काय बोलतात हे पडले असेल. तुम्ही प्रत्येक प्रकारच्या संकटाला तोंड देणारे लोक आहात. याच कारणाने खेळामध्ये होणाऱ्या जय पराजयाचा कोणताही प्रभाव तुमच्या मनावर झालेला दिसत नाही, ही खूप मोठी गोष्ट आहे, आणि हे मला दिसत आहे. नाही तर पराजित व्यक्ती, समजा पदक मिळालेच नाही तर त्याचे एक दडपण त्यांच्या मनावर असते की अरे! माझा काही उपयोग झाला नाही. तुमच्यापैकी कोणाच्याही मनावर ते दडपण दिसले नाही. ही जीवनातील खूप मोठी सिद्धी आहे आणि हीच सिद्धी जीवनात पुढे वाटचाल करण्याची ताकद देते. आणि म्हणूनच मी असे मानतो की, मला असे वाटते की या प्रकारे खेळात अनेक लोकांनी सहभागी व्हावे आणि अधिकाधिक पदके जिंकावीत, ही खूप चांगली गोष्ट आहे आणि असे झाले पाहिजे. मी तुम्हा सर्वांच्या माध्यमातून देशामध्ये एक अशी संस्कृती निर्माण करी करू इच्छितो, ती अशी की देशातील प्रत्येक नागरिकाचा, समाजाचा, ज्यांच्या आयुष्यात या प्रकारच्या अडचणी आहेत, हे जे आपले दिव्यांगजन आहेत त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. प्रत्येक नागरिकाने, समाजाने त्यांच्याकडे दयेच्या नजरेने न पाहता सन्मानाच्या दृष्टीने पहावे. हे आम्हाला मंजूर नाही, दयाभाव नको आहे, सन्मान हवा आहे की मी तुमच्यापेक्षा कुठेही कमी नाही. हा दृष्टिकोन मला देशात निर्माण करायचा आहे. आणि मला माझ्या दिव्यांग बंधू भगिनींमध्ये देखील हा दृष्टिकोन निर्माण करायचा आहे. ते खेळत असतील किंवा नसतील ही वेगळी गोष्ट आहे, त्यांनी निराश होण्याचे कारण नाही. तर, बाकी ऑलम्पिक स्पर्धक आणि इतर विजेत्यांपेक्षाही जास्त माझ्यासाठी तुमचे खेळणे, तुमचे देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तिथे जाणे, तिथे जाण्यासाठी अनेक वर्षे पहाटे चार ते पाच वाजेपर्यंत उठून घाम गाळणे, ही मेहनत कधीच बेकार जाणार नाही याची खात्री मी तुम्हाला देतो.
कारण, आता तुम्हा सर्वांसाठी, सर्व दिव्यांग जनांसाठी समाजात एका नव्या वातावरणाची निर्मिती होण्यास प्रारंभ झाला आहे. विविध प्रणाली विकसित होत आहेत. आपणही मदत केली पाहिजे, आपणही सोबत केली पाहिजे असे प्रत्येकाला वाटत आहे. मी बसलो आहे आणि ते उभे आहेत, मी उभा राहीन आणि त्यांना बसू देईन. म्हणजेच जेव्हा परिवर्तन होते तेव्हा तुम्ही हे जे योगदान देत आहात ते संपूर्ण एका समाजाच्या मनामध्ये बदल घडवण्यासाठी दिलेले योगदान आहे. फक्त एक पदक नाही तर त्या पदकाहून जास्त तुम्ही वातावरण, विचार पद्धती बदलण्याला मदत करत आहात. प्रत्येक दिव्यांग व्यक्तीच्या मनात तुम्ही हा विश्वास निर्माण करत आहात की, हो ! आम्ही देखील कोणापेक्षा कमी नाहीत. आणि मी असे मानतो की आपल्याला ही गोष्ट त्याच रूपात करायची आहे कारण शेवटी पदक, पदकांची संख्या, आजकाल तर जगच असे आहे की अशा गोष्टींना विचारात घेतले जाते. मात्र 140 कोटी लोकांचा देश आज या भावनेने उभा आहे की आम्ही फक्त खेळायला नाही तर जिंकण्यासाठी जात आहोत. मी एक सहभागी आहे, मी केवळ सादरकर्ता नाही, ही जी भावना आहे ना ती या देशाची ताकद बनत आहे. आणि तुम्ही सर्वजण देशाच्या याच ताकदीत नवी ऊर्जा जोडत आहात. तेव्हा माझ्याकडून तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन. सर्वांचा उत्साह बघून मला खूप आनंद झाला. नाहीतर मी काही असे लोक देखील पाहिले आहेत की जे दुसऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत जाईपर्यंत त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटतच नाही. कारण ते या ऑलम्पिक स्पर्धेत जिंकू शकलेले नसतात. ते दृश्य मला इथे दिसत नाही, म्हणजे मला असे वाटते की तुम्ही पुढचे ऑलिम्पिक देखील आत्ताच जिंकले आहे. हे मी तुमच्या डोळ्यात वाचू शकत आहे. तुमच्या मधील जो विश्वास आहे मी तो देखील पाहू शकत आहे. तर, मित्रांनो माझ्याकडून पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद!
***
H.Akude/N.Chitale/A.Save/M.Pange//S.Kane/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2054879)
Visitor Counter : 112
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam