युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी सेवानिवृत्त खेळाडूंना रिसेट कार्यक्रमासाठी अर्ज करण्याचे केले आवाहन
रिसेट कार्यक्रम हे देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या आपल्या सेवानिवृत्त खेळाडूंची दखल घेण्याच्या आणि त्यांना सक्षम बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे : केंद्रीय मंत्री
Posted On:
13 SEP 2024 3:55PM by PIB Mumbai
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी देशभरातील निवृत्त खेळाडूंना नव्याने सुरू झालेल्या "सेवानिवृत्त खेळाडू सक्षमीकरण प्रशिक्षण" (RESET) कार्यक्रमासाठी अर्ज करण्याचे आणि देशाच्या क्रीडा विषयक परिसंस्थेमध्ये सक्रियपणे योगदान देण्याचे आवाहन केले आहे. डॉ. मांडविया यांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
सरकारची वचनबद्धता अधोरेखित करत डॉ. मांडविया म्हणाले, "रीसेट कार्यक्रम हे देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या आपल्या सेवानिवृत्त खेळाडूंची दखल घेण्याच्या आणि त्यांना सक्षम बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे आम्ही सर्व निवृत्त खेळाडूंना नवीन कौशल्ये विकसित करण्यासाठी, क्रीडा समुदायासह जोडलेले राहण्यासाठी आणि देशाच्या क्रीडा वारशात यापुढेही योगदान देण्यासाठी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करतो."
सेवानिवृत्त खेळाडूंना त्यांच्या करिअरच्या विकासात मदत करण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेल्या या रिसेट कार्यक्रमाचे उद्दिष्ट पिढ्यांमधील अंतर दूर करणे, निवृत्त खेळाडूंच्या कौशल्य आणि अनुभवाचा लाभ युवा उदयोन्मुख प्रतिभावान खेळाडूंना करून देणे हे आहे. सेवानिवृत्त खेळाडूंना शक्य ते सर्व सहकार्य करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार डॉ. मांडविया यांनी केला आणि यासाठी खास तयार करण्यात आलेल्या पोर्टलद्वारे अर्ज करून कार्यक्रमाचा उपयोग करून घेण्याचे आवाहन केले.
20-50 वर्षे वयोगटातील निवृत्त खेळाडू, ज्यांनी आंतरराष्ट्रीय पदके जिंकली आहेत, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे किंवा राष्ट्रीय किंवा राज्य स्तरावर मान्यता मिळवली आहे , त्यांच्यासाठी हा कार्यक्र्म खुला आहे. रिसेट कार्यक्रम लक्ष्मीबाई राष्ट्रीय शारीरिक शिक्षण संस्थेच्या सहकार्याने राबवण्यात येईल. यात स्वतःच्या गतीने ऑनलाइन शिकणे , ऑन-ग्राउंड मैदानी प्रशिक्षण आणि इंटर्नशिपचा समावेश असेल. अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर प्लेसमेंट सहाय्य आणि उद्योजकतेशी संबंधित मार्गदर्शन प्रदान केले जाईल.
रिसेट कार्यक्रमासाठी अर्ज https://lnipe.edu.in/resetprogram/ या पोर्टलवर करता येतील आणि योग्य मूल्यमापनानंतर अभ्यासक्रम सुरू होईल.
निवृत्त खेळाडूंच्या बहुमूल्य अनुभवाचा उपयोग करणे, भविष्यातील चॅम्पियन्स घडवणे आणि भारतातील खेळांच्या वाढीमध्ये हातभार लावणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
अधिक माहितीसाठी: येथे क्लिक करा.
***
S.Kakade/S.Kane/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2054633)
Visitor Counter : 46