विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली अमेरिका - भारत नागरी आण्विक वाणिज्य विषयक महत्त्वाची द्विपक्षीय बैठक संपन्न


भारत आणि अमेरिकामधील अंतराळविषयक परस्पर सहकार्याचा भाग म्हणून एक भारतीय अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात सहभागी होणार - डॉ. जितेंद्र सिंह

हरित हायड्रोजन अभियान आणि एसएमआर सहकार्याद्वारे भारत जागतिक हवामान उद्दिष्टे वाढवेल: डॉ. जितेंद्र सिंह

Posted On: 25 AUG 2024 4:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 ऑगस्ट 2024

 

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत पृथ्वी भवन इथे अमेरिका - भारत नागरी आण्विक वाणिज्य विषयक महत्त्वाची द्विपक्षीय बैठक झाली. विज्ञान, तंत्रज्ञान आणि स्वच्छ ऊर्जा या महत्त्वाच्या क्षेत्रांच्या बाबतीत भारत आणि अमेरिकेमधील दृढ होत असलेल्या परस्पर सहकार्याच्या मुद्यांवर या बैठकीत चर्चा  झाली.

गगनयान मोहिमेतील एक भारतीय अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात सामील होणार असल्याची मोठी घोषणा डॉ. जितेंद्र सिंह यांनी यावेळी केली. ही घटना  भारत आणि अमेरिकामधील अंतराळविषयक परस्पर सहकार्यातील महत्वाचा मैलाचा दगड असेल असे सिंह यांनी म्हटले आहे. जागतिक पुरवठा साखळी सुरक्षित करण्याच्या प्रयत्नांमध्ये, विशेषत: आज परस्परांसोबत जोडलेल्या जगात सेमीकंडक्टर्स, औषधविषयक उत्पादने  आणि स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञान यांसारख्या अत्यावश्यक झालेल्या क्षेत्रांच्या दृष्टीने दोन्ही देशांमधली ही भागीदारी महत्त्वाची असल्याची बाब त्यांनी यावेळी अधोरेखित केली. 

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय, अणुऊर्जा विभाग, अंतराळ, कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी, हरित हायड्रोजन अभियान हे अवजड उद्योग, वाहतूक आणि वीज निर्मिती क्षेत्र कार्बन उत्सर्जन मुक्त करण्याच्या भारताच्या धोरणाचा महत्वाचा पाया असल्याची बाबही यावेळी अधोरेखित केली. स्वच्छ उर्जाविषयक तंत्रज्ञानात नवोन्मेष आणण्यासाठी तसेच हवामानविषयक जागतिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची असल्याचेही त्यांनी या बैठकीत ठळकपणे मांडले. भक्कम धोरणात्मक आराखडा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या माध्यमातून भारत शाश्वत आणि कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेऊ शकणारे उर्जा क्षेत्र निर्माण करण्याच्या भवितव्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी भारत सज्ज असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

छोट्या स्वरुपातल्या मॉड्युलर अणुभट्ट्या  (Small Modular Reactors  - SMRs) स्थापन करण्याच्या प्रक्रियेला पाठबळ देण्यासाठी भारताचे विद्यमान सरकार आंतरराष्ट्रीय भागीदारीचे पर्याय चाचपडून पाहत आहे, संशोधन आणि विकासात गुंतवणूक करत आहे तसेच समांतरपणे नियामक आराखड्याचीही तयारी करत असल्याची माहिती जितेंद्र सिंह यांनी यावेळी दिली. अशा प्रकारच्या छोट्या स्वरुपातल्या मॉड्युलर अणुभट्ट्या भारताच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमणात महत्त्वाची भूमिका बजावतील, भारताला ऊर्जेच्या बाबतीत आत्म निर्भर बनवण्याच्या प्रक्रियेत महत्वाचे  योगदान देतील तसेच हवामान विषयक वचनबद्धतेची पूर्तता करण्यात कामी येतील असा विश्वासही जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केला.

यावेळी  सिंह यांनी भारताची 'अनुसंधान' अर्थात राष्ट्रीय संशोधन संस्था (National Research Foundation - NRF) आणि अमेरिकेच्या राष्ट्रीय विज्ञान संस्था (National Science Foundation - NSF) या दोन्ही संस्थांमधले साम्यही अधोरेखीत केले. विज्ञानाधिष्ठीत संशोधन आणि नवोन्मेषाच्या बाबतीत या दोन्ही संस्था महत्त्वाची भूमिका बजावत असल्याची बाब त्यांनी यावेळी अधोरेखित केली. यावेळी सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या 'पंचामृत' या हवामानविषयक कृती आराखड्याचेही उपस्थितांना स्मरण करून दिले. या आराखड्याअंतर्गत भारताने बिगर जीवाश्म ऊर्जा क्षमता 500 गिगावॅटपर्यंत वाढवण्याचे, कार्बन उत्सर्जन 1 अब्ज टनांनी कमी करण्याचे आणि अखेरीला 2070 पर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट साध्य करण्याचे ध्येय समोर ठेवले आहे, आणि ते पूर्ण करण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचा  पुनरुच्चारही सिंह यांनी यावेळी केला.

भारत सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार डॉ. ए. के. सूद यांनीही आपल्या निवेदनातून भारत आणि अमेरिकेच्या परस्पर भागीदारीचे महत्त्व अधोरेखित केले. ही  भागिदारी केवळ ज्ञानाची देवाणघेवाण करण्यापुरती मर्यादित नसून, भविष्याला आकार देणाऱ्या उपाययोजना आखण्यासाठीची ही भागिदारी असल्याचे सूद यांनी सांगितले. यावेळी सूद यांनी शाश्वत विकास आणि आर्थिक समृद्धीचे नवे मार्ग प्रशस्त करण्याच्या प्रक्रियेत दोन्ही देशांना परस्पर सहकार्यासाठी उपलब्ध असलेल्या संधींवर भर दिला.

पृथ्वी विज्ञान विभागाचे सचिव डॉ. रवी चंद्रन यांनीही आपल्या निवेदनातून सागरी ऊर्जा आणि कार्बन संकलन, वापर आणि साठवण (Carbon Capture, Utilisation, and Storage - CCUS) तंत्रज्ञानाशी संबंधीत दोन्ही देशांच्या भागीदारीच्या प्रगतीविषयी माहिती दिली,  तर जैवतंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. राजेश गोखले यांनी जैव वस्तुभाराचे (biomass) ऊर्जेत रूपांतर आणि पहिल्या आणि दुसऱ्या स्वरुपातील जैवइंधन वापराच्या यशस्वी अंमलबजावणीवर भारताचे लक्ष केंद्रीत केले असल्याची बाब ठळकपणे अधोरेखित केली.

प्रा. अभय करंदीकर यांनी माहितीसाठी विश्लेषण, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग यांसह उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रात भारताने आजवर केलेल्या प्रगतीची माहिती दिली, तसेच या क्षेत्राच्या बाबतीत आवश्यक नवोन्मेषाचे धोरणात्मक महत्त्वही अधोरेखित केले. भारताच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या महासंचालक डॉ. एन. कलाईसेल्वी यांनी लिथियम - आयन बॅटरी विकसित करणे, स्वदेशी बॅटरी उत्पादनाच्या बाबतीत भारताने आजवर केलेल्या प्रगतीशी संबंधित मुद्दे या बैठकीत मांडले. आपल्या निवेदनात त्यांनी शाश्वत आणि उर्जा साठवणुकीच्या चक्रीय उपाययोजना आखण्यावर भर दिला.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे आंतरराष्ट्रीय हवामान धोरणविषयक वरिष्ठ सल्लागार जॉन पोडेस्टा आणि अमेरिकेच्या ऊर्जा विभागाचे उपमंत्री डेव्हिड टर्क यांनी या बैठकीत सहभागी झालेल्या अमेरिकेच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले.

या बैठकीत दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी आर्थिक विकास, राष्ट्रीय सुरक्षा आणि तंत्रज्ञान क्षेत्राच्या प्रगतीच्या बाबतीत जगाचे नेतृत्व करण्याची संधी साधता यावी या दृष्टीने परस्पर हितसंबंधांसह उदयोन्मुख तंत्रज्ञानामधले परस्पर सहकार्य अधिक बळकट करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

 

* * *

NM/T.Pawar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2048737) Visitor Counter : 87