मंत्रिमंडळ

उच्च कार्यक्षमता जैवउत्पादनाला चालना देण्यासाठी BioE3 (अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि रोजगारासाठी जैवतंत्रज्ञान) धोरणाला मंत्रीमंडळाने दिली मंजुरी

Posted On: 24 AUG 2024 8:42PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 ऑगस्ट 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज, उच्च कार्यक्षमतेच्या जैवउत्पादनाला चालना देण्यासाठी जैवतंत्रज्ञान विभागाच्या BioE3 (अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि रोजगारासाठी जैवतंत्रज्ञान) धोरणाला मंजुरी दिली.

BioE3 धोरणाच्या ठळक वैशिष्ट्यांमध्ये संशोधन आणि विकास तसेच संकल्पनात्मक क्षेत्रांमधील नवउद्योजकतेसाठी नवोन्मेषी पाठींब्याचा समावेश आहे. यामुळे जैवउत्पादन आणि जैव-कृत्रिम बुद्धिमत्ता हब आणि बायोफाउंड्री स्थापन करून तंत्रज्ञान विकास आणि व्यापारीकरणाला गती मिळेल. हे धोरण हरित वाढीच्या पुनरुत्पादक जैव अर्थव्यवस्था प्रारुपाला प्राधान्य देण्याबरोबरच, भारताच्या कुशल कामगारांचा विस्तार सुलभ करेल आणि रोजगार निर्मितीमध्ये वृद्धी करेल.

एकूणच, हे धोरण ‘निव्वळ शुन्य’ कार्बन अर्थव्यवस्था आणि ‘पर्यावरणपूरक जीवनशैली’ यांसारख्या सरकारच्या उपक्रमांना अधिक बळकट करेल आणि ‘चक्राकार जैव अर्थव्यवस्थेला’ चालना देऊन भारताला वेगवान ‘हरित वाढीच्या’ मार्गावर अग्रेसर करेल. BioE3 धोरण अधिक शाश्वत, नवोन्मेषी आणि जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यास सक्षम भविष्य निर्माण करेल आणि विकसित भारतासाठी जैव-दृष्टीकोन प्रदान करेल.

हवामान बदल कमी करणे, अन्न सुरक्षा आणि मानवी आरोग्य यासारख्या काही गंभीर सामाजिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी शाश्वत आणि चक्राकार पद्धतींना चालना देणाऱ्या जीवशास्त्राच्या औद्योगिकीकरणामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपले सध्याचे युग हा योग्य काळ आहे. जैव-आधारित उत्पादने विकसित करण्याच्या उद्देशाने अत्याधुनिक नवकल्पनांना गती देण्यासाठी आपल्या देशात एक लवचिक जैवनिर्मिती परिसंस्था तयार करणे गरजेचे आहे.

उच्च कार्यक्षमता जैव उत्पादन म्हणजे औषधापासून सामग्रीपर्यंत उत्पादनांची निर्मिती करण्याची क्षमता, शेतीतील आणि अन्नाच्या संदर्भातील आव्हानांना तोंड देणे तसेच प्रगत जैवतंत्रज्ञान प्रक्रियेच्या एकत्रीकरणाद्वारे जैव-आधारित उत्पादनांच्या उत्पादनास प्रोत्साहन देणे होय.  राष्ट्रीय प्राधान्यक्रमांना अधोरेखित करण्यासाठी, BioE3 धोरण व्यापकपणे खालील धोरणात्मक किंवा संकल्पनात्मक क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करेल: 

उच्च मूल्याची जैव-आधारित रसायने, बायोपॉलिमर आणि विकर (एन्झाइम्स); स्मार्ट प्रथिने आणि कार्यात्मक अन्न; अचूक जैवऔषध उपाययोजना (बायोथेरप्यूटिक्स); हवामान अनुरूप शेती; कार्बन कॅप्चर आणि त्याचा वापर; सागरी आणि अवकाश संशोधन.

 

* * *

S.Nilkanth/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2048617) Visitor Counter : 40