माहिती आणि प्रसारण मंत्रालय
वेव्स (WAVES) अंतर्गत 'क्रिएट इन इंडिया चॅलेंज - सीझन 1' च्या अंतिम फेरीतील स्पर्धकांना जागतिक व्यासपीठावर आपली प्रतिभा प्रदर्शित करण्यासाठी भारत सरकारचे पाठबळ मिळणार
ॲनिमेशन, चित्रपट निर्मिती, गेमिंग, संगीत आणि व्हिज्युअल आर्ट यामधल्या आघाडीच्या उद्योग संघटना आणि संस्थांद्वारे चॅलेंजचे आयोजन
एआय आर्ट इन्स्टॉलेशन चॅलेंज आणि कम्युनिटी रेडिओ स्पर्धा भारतीय कलाकारांना नवोन्मेशी व्यासपीठ देणार
भारताच्या कॉमिक उद्योगाला चालना देण्यासाठी कॉमिक्स क्रिएटर चॅम्पियनशिप स्पर्धा
Posted On:
23 AUG 2024 9:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 ऑगस्ट 2024
(WAVES) या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषदेच्या 'क्रिएट इन इंडिया चॅलेंज - सीझन 1' चा भाग म्हणून, आघाडीच्या उद्योग संघटना आणि संस्थांद्वारे 25 चॅलेंजेस (आव्हाने) आयोजित केली जाणार आहेत, ज्यामध्ये ॲनिमेशन, फिल्ममेकिंग, गेमिंग, संगीत आणि व्हिज्युअल आर्ट्स, यासह विविध अभिव्यक्तींचा समावेश आहे.
‘वेव्स’ (WAVES) च्या अंतिम फेरीतील स्पर्धकांना जागतिक व्यासपीठावर संधी
माहिती आणि प्रसारण मंत्रालय सर्व 25 इव्हेंट (स्पर्धा) मधील अंतिम फेरीतील स्पर्धकांना वेव्स (WAVES) च्या प्रमुख व्यासपीठावर एकत्र येण्याची आणि आपले सर्वोत्तम प्रदर्शन करण्याची संधी देईल. विविध चॅलेंजेस (आव्हाने) मधील अंतिम फेरीतील स्पर्धकांना जगभरातील संबंधित सर्वात मोठ्या व्यासपीठांवर सहभागी होण्याची संधी दिली जाईल. उदा., ॲनिमेशन फिल्म मेकिंगमधील विजेत्याला काही मोठ्या प्रोडक्शन हाऊसशी करार करून त्यांचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सहाय्य केले जाईल. नंतर, त्यांच्या अंतिम प्रकल्पाला सूचना आणि प्रसारण मंत्रालयाकडून पाठबळ दिले जाईल आणि ॲनेसी ॲनिमेशन फिल्म फेस्टिव्हल इत्यादी सारख्या प्रसिद्ध महोत्सवांमध्ये नेले ते प्रदर्शित केले जाईल. ॲनिम स्पर्धेतील विजेत्यांना जपानमधील सर्वात मोठ्या ॲनिम इव्हेंटमध्ये (कार्यक्रम) सहभागी होण्यासाठी पाठबळ दिले जाईल.
ही चॅलेंजेस मुख्य कार्यक्रमापूर्वी आयोजित करण्यात येत असून, पुढील काही महिन्यांत देशभरातील सर्व अभिव्यक्ती प्रकारातील निर्मात्यांना यामध्ये सहभागी करून घेण्याचे उद्दिष्ट आहे.
प्रसार भारती, भारताची सार्वजनिक प्रसारण संस्था, द बॅटल ऑफ द बँड्स आणि द सिम्फनी ऑफ इंडिया चॅलेंजचे आयोजन करत आहे. द बॅटल ऑफ द बँड्स: आधुनिक संगीत आणि पारंपारिक लोककलांचा मेळ साधून प्रयोग करण्यासाठी बँड्सना एक व्यासपीठ प्रदान करते. तर दुसरीकडे, सिम्फनी ऑफ इंडिया स्पर्धा, पारंपरिक भारतीय शास्त्रीय संगीत, विशेषत: एकल कलाकारांच्या गुणांना वाव देण्यासाठी समर्पित आहे. या प्रतिभावान कलाकारांना त्यांचे कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून, भारतातील शास्त्रीय संगीत परंपरेची स्तुती आणि जतन करण्याला प्रोत्साहन देणे, हे प्रसारभारतीचे उद्दिष्ट आहे.
ॲनिमेशन फिल्ममेकर्स स्पर्धा: भारताच्या ॲनिमेशन क्षेत्रातील निर्मात्यांना त्यांची प्रतिभा प्रदर्शित करण्यासाठी, उद्योगातील धुरीणांशी संपर्क साधण्यासाठी आणि त्यांची कौशल्ये विकसित करण्यासाठी आवश्यक व्यासपीठ उपलब्ध करून, या उद्योगात क्रांती घडवून आणणे हे या स्पर्धेचे उद्दिष्ट आहे. उदयोन्मुख प्रतिभेला प्रोत्साहन आणि पाठबळ देऊन, भारतीय ॲनिमेशनची गुणवत्ता आणि विविधता वाढवण्याची आणि देशाला या क्षेत्रात जगाचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम बनवण्याची क्षमता या स्पर्धेत आहे.
या स्पर्धेच्या माध्यमातून, सहभागींना त्यांचे काम जगभरातील प्रेक्षकांसमोर प्रदर्शित करण्याची, प्रमुख भागधारकांशी संपर्क साधण्याची, प्रतिष्ठा मिळवण्याची, सहयोग आणि वितरणाच्या संधी मिळवण्याची आणि त्यांच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळवण्याची संधी मिळेल. याव्यतिरिक्त, विजेत्यांना प्रसिद्ध स्टुडिओ, निर्माते, वितरक आणि दूरदर्शन (DD) सारख्या प्रसारकांबरोबर सहयोग करण्याची संधी मिळेल.
ॲनिमे चॅलेंजचे उद्दिष्ट भारतीय ॲनिमे आणि मंगा उद्योगात क्रांती घडवून आणण्याच्या उद्देशाने निर्मात्यांना त्यांची प्रतिभा प्रदर्शित करण्यासाठी, ओळख मिळवण्यासाठी आणि उद्योग व्यावसायिकांशी संपर्क साधण्यासाठी अत्यंत आवश्यक असणारे एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे आहे. मार्गदर्शन, दर्शक संख्या वृद्धी आणि नेटवर्किंग संधींद्वारे ॲनिम उद्योग वाढीस चालना देणे आणि एक चैतन्यपूर्ण चाहतावर्ग तयार करणे हे 'ॲनिमे चॅलेंज'चे उद्दिष्ट आहे.
इंडिया गेम डेव्हलपर कॉन्फरन्स (IGDC) द्वारे आयोजित गेम जॅम ही एक राष्ट्रीय-स्तरीय स्पर्धा आहे, ज्याचा उद्देश भारताच्या वाढत्या गेम विकसन उद्योगात सर्जनशीलता आणि नवोन्मेष प्रज्वलित करणे हा आहे.
इंटरनेट आणि मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया द्वारे कृत्रिम बुद्धिमत्ता आर्ट इन्स्टॉलेशन चॅलेंज ही एक महत्त्वाची स्पर्धा आहे जी कला आणि तंत्रज्ञान यांना जोडण्याचा क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यासाठी सज्ज आहे. कलाकार, डिझायनर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणाऱ्या उत्साहींना कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून इमर्सिव्ह आणि इंटरएक्टिव्ह इंस्टॉलेशन्स तयार करण्यासाठी आमंत्रित करून ही स्पर्धा प्रयोग, नवोन्मेष आणि नवीन कलात्मक सीमांचा शोध घेण्यास प्रोत्साहन देते.
WAVES हॅकाथॉन : एडवर्टाइजिंग एजन्सी असोसिएशन ऑफ इंडिया द्वारे आयोजित Adspend Optimizer स्पर्धेचे उद्दिष्ट गुंतवणुकीवर मिळणारा परतावा (ROI) सुधारणे, कार्यक्षमता सुधारणे, डेटा-चालित निर्णय घेणे, नवोन्मेषाला प्रोत्साहन देणे आणि ग्राहक अनुभव वाढवणे हे आहे.
कम्युनिटी रेडिओ असोसिएशन द्वारे कम्युनिटी रेडिओ कंटेंट चॅलेंज, भारताच्या सामुदायिक रेडिओ परिक्षेत्रात सर्जनशीलता आणि उत्कृष्टता वाढवण्यासाठी तयार करण्यात आलेले एक महत्त्वाचे आव्हान आहे.
नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडिया (एनएफडीसी) द्वारे आयोजित फिल्म पोस्टर मेकिंग स्पर्धा, हा एक अनोखा उपक्रम आहे जो कला आणि सिनेमाचा परस्परसंबंध साजरा करतो. सहभागींना उल्लेखनीय चित्रपटांसाठी चित्ताकर्षक, हाताने तयार केलेले पोस्टर डिझाइन करण्यासाठी आव्हान देऊन, ही स्पर्धा सर्जनशीलता, नावीन्य आणि चित्रपटाच्या पोस्टर डिझाइनच्या कलेचे कौतुक करण्यास प्रोत्साहन देते.
इंडियन डिजिटल गेमिंग सोसायटी (IDGS) द्वारे हातात धरता येण्याजोग्या शैक्षणिक व्हिडिओ गेम तयार करण्याची स्पर्धा- ही स्पर्धा नाविन्यपूर्ण, हातात धरता येण्याजोग्या शैक्षणिक व्हिडिओ गेमच्या विकासाला प्रोत्साहन देते. वापरकर्त्यांना, विशेषत: मुलांना, गणित शिकण्यास, कोडी सोडवण्यास आणि त्यांची संज्ञानात्मक कौशल्ये वाढविण्यात मदत करणारी आकर्षक उपकरणे तयार करणे हा यामागचा उद्देश आहे. ही स्पर्धा हार्डवेअर निवडीमध्ये किफायतशीर दर आणि सर्जनशीलता यावर भर देते.
इंडियन कॉमिक्स असोसिएशनची कॉमिक्स क्रिएटर चॅम्पियनशिप ही भारतातील कॉमिक बुक निर्मिती आणि संस्कृतीला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली एक स्पर्धा आहे. हौशी आणि व्यावसायिक दोन्ही प्रकारचे कलाकार त्यांच्या पसंतीच्या कला शैलींचा वापर करून दिलेल्या संकल्पनेवर कॉमिक्स तयार करून स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. हा उपक्रम कॉमिक्स उद्योगासाठी महत्त्वाचा आहे कारण तो निर्मात्यांना त्यांची प्रतिभा प्रदर्शित करण्यासाठी, प्रकाशकांसह संबंध प्रस्थापित करण्यासाठी आणि भारतातील कॉमिक्स परिसंस्थेच्या विकासात योगदान देण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करतो.
या स्पर्धा केवळ निर्मात्यांना ओळख मिळवून देण्याची संधी देत नाहीत तर चैतन्यपूर्ण आणि वाढत्या सर्जक अर्थव्यवस्थेत योगदान देण्याची मौल्यवान संधी देखील उपलब्ध करून देतात. भारतीय कलाकारांना त्यांची अनोखी दूरदृष्टी जगाला दाखवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देऊन, या स्पर्धा जागतिक ॲनिमेशन उद्योगातील एक आघाडीचा खेळाडू म्हणून भारताचे स्थान मजबूत करण्यात मदत करतील. एकूणच, विविध श्रेणींमधील स्पर्धक प्रस्तावित नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि गेमिंग, कॉमिक्स - आणि विस्तारित वास्तवासाठी डेटा बेस बनतील.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि गेमिंग, कॉमिक्स - आणि विस्तारित वास्तवासाठी (AVGC-XR) च्या विविध संबंधित वर्टिकलमध्ये विकासक सुविधा आणि विविध प्रवेगक कार्यक्रम प्रदान करण्यास उत्सुक आहे.
N.Chitale/R.Agashe/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2048374)
Visitor Counter : 59