पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले पोलंडमधील भारतीय समुदायाला संबोधित

Posted On: 22 AUG 2024 12:49AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पोलंडमधल्या वॉर्सा इथे झालेल्या कार्यक्रमात तिथल्या भारतीय समुदायाला संबोधित केले. पोलंडस्थित भारतीय समुदायाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ य कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

त्याआधी पोलंडमधल्या भारतीय समुदायाने पंतप्रधानांचे मोठ्या जल्लोष आणि उत्साहात स्वागत केले.  सुमारे 45 वर्षांनंतर भारताचे पंतप्रधान पोलंडच्या भेटीवर आल्याची बाब पंतप्रधानांनी आपल्या संबोधनात नमूद केली. या भेटीत आपण पोलंडचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेज डुडा आणि पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांची भेट घेण्यासाठी, तसेच भारत आणि पोलंडमधली संबंध अधिक दृढ करण्यासाठी आतुर असल्याचे त्यांनी सांगितले. भारत ही लोकशाहीची जननी आहे, या नात्याने तसेच भारत आणि पोलंडमधली एकसामाईक मूल्ये दोन्ही देशांना परस्परांच्या जवळ आणत असल्याची बाबही पंतप्रधानांनी आपल्या संबोधनात नमूद केली.

भारत आणि पोलंडमधील द्विपक्षीय संबंध बळकट करण्यात इथल्या भारतीय समुदायाने महत्वाचे योगदान दिल्याचे सांगत, त्याबद्दलच्या आपल्या भावनाही पंतप्रधानांनी आपल्या संबोधनातून व्यक्त केल्या. ऑपरेशन गंगा यशस्वी होण्यामध्ये इथल्या भारतीय समुदायाने बजावलेल्या भूमिकेचीही पंतप्रधानांनी यावेळी प्रशंसा केली. इथे वसलेल्या भारतीय समुदायाने, पोलंडमधील भारताच्या पर्यटनाचे सदिच्छा दूत व्हावे, आणि या माध्यमातून भारतीय पर्यटन क्षेत्राच्या विकासगाथेचा भाग व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. डोब्री महाराजा कोल्हापूर, आणि बॅटल ऑफ मॉन्टे कॅसिनो स्मारक ही भारत आणि पोलंडच्या नागरिकांमध्ये असलेल्या परस्पर चेतनादायी संबंधांची ज्वलंत उदाहरणे असल्याची बाबही त्यांनी आपल्या संबोधनात नमूद केली. दोन्ही देशांमधले हे विशेष नाते अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने पंतप्रधानांनी जामसाहेब मेमोरियल यूथ एक्स्चेंज प्रोग्राम या नव्या उपक्रमाचीही घोषणा केली. या उपक्रमा अंतर्गत दरवर्षी पोलंडच्या 20 तरुणांना भारतात आमंत्रित केले जाणार आहे. यावेळी पंतप्रधानांनी गुजरातमध्ये झालेल्या भूकंपाच्या वेळी पोलंडने केलेल्या मदतीची आठवणही आपल्या संबोधतनातून सांगितली.

भारताने गेल्या 10 वर्षांत केलेल्या परिवर्तनकारी प्रगतीबद्दलही यावेळी पंतप्रधानांनी उपस्थितांना सांगितले. येत्या काही वर्षांत भारत जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र - विकसित बनविण्याचा आपला संकल्प आणि त्याबद्दलच्या दृष्टीकोनाबद्दलची माहितीही त्यांनी उपस्थितांना दिली. नव तंत्रज्ञान आणि स्वच्छ ऊर्जेच्या क्षेत्रात पोलंड आणि भारत परस्पर भागीदारी वाढवत आहेत आणि या माध्यमातून हरित विकासाच्या संकल्पनेला चालना देत असल्याचे त्यांनी आपल्या संबोधनातून सांगितले.

जागतिक कल्याणाकरता स्वतःचे योगदान देण्यासाठी आणि मानवजातीवर आलेल्या संकटात मदतीकरता सर्वात आधी धाव घेण्यासाठी प्रेरीत करणाऱ्या 'वसुधैव कुटुंबकम' या तत्वावर भारताचा ठाम विश्वास असल्याची बाब पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केली.

***

SonalT/TusharP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2047544) Visitor Counter : 40