पंतप्रधान कार्यालय
केरळमधील वायनाड येथील भूस्खलनग्रस्त भागांना भेट दिल्यानंतर पंतप्रधानांनी व्यक्त केलेल्या भावना
Posted On:
10 AUG 2024 8:23PM by PIB Mumbai
आदरणीय मुख्यमंत्री महोदय, राज्यपाल महोदय, केंद्र सरकारमधील माझे सहकारी मंत्री आणि या भूमीचे पुत्र सुरेश गोपी जी! जेव्हापासून मी या आपत्तीबद्दल ऐकले आहे, तेव्हापासून मी भागासोबत सातत्याने संपर्कात आहे. मी प्रत्येक क्षणा-क्षणाची माहिती घेत आहे आणि या परिस्थितीत मदत करू शकणारे केंद्र सरकारचे जे काही घटक आहेत ते सर्व या स्थितीत मदतगार बनू शकतील त्या सर्वांनी ताबडतोब एकत्र यावे आणि या भीषण आपत्तीत या समस्येने वेढलेल्या आपल्या कुटुंबातील सदस्यांना आपण सर्वांनी त्वरित तातडीने मदत करावी.
ही साधीसुधी आपत्ती नाही, शेकडो कुटुंबांची स्वप्ने उद्ध्वस्त झाली आहेत. आणि निसर्गाने त्याचे जे रौद्र रूप दाखवले आहे, मी तिथे जाऊन तिथली परिस्थिती पाहिली आहे. मी मदत शिबिरांमध्ये अनेक पीडित कुटुंबांना भेटलो आहे, ज्यांनी प्रत्यक्ष त्या वेळी काय पाहिले आणि काय भोगले याची तपशीलवार माहिती त्यांच्याकडून मी ऐकली आहे. या आपत्तीमुळे विविध प्रकारच्या दुखापतींमुळे अत्यंत कठीण काळातून जात असलेल्या रूग्णालयातील सर्व रुग्णांनाही मी भेटलो आहे.
अशा संकटसमयी, जेव्हा आपण एकत्र काम करतो, तेव्हा आपल्याला किती चांगले परिणाम मिळतात. त्याच दिवशी सकाळी मी माननीय मुख्यमंत्र्यांशी बोललो होतो आणि मी म्हणालो होतो की आम्ही सर्व प्रकारची व्यवस्था एकत्र करत आहोत आणि जितके शक्य असेल तितक्या लवकरात लवकर पोहोचू. मी आमच्या एका MoS ला लगेच इथे पाठवले. एसडीआरएफचे लोक असोत, एनडीआरएफचे लोक असोत, लष्कराचे लोक असोत, पोलीस कर्मचारी असोत, स्थानिक वैद्यकीय क्षेत्रातील लोक असोत किंवा स्थानिक सामाजिक संस्था असोत, सेवाभावी संस्था असोत, प्रत्येकाने न थांबता आपत्तीग्रस्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. ज्या कुटुंबांनी आपले नातेवाईक गमावले आहेत त्यांची भरपाई करणे आपल्यासारख्या मानवाला शक्य नाही, परंतु त्यांच्या भावी आयुष्याचा आणि त्यांच्या स्वप्नांचा भंग होऊ नये, ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे आणि संकटाच्या काळात भारत सरकार आणि देश येथील पीडितांसोबत आहे.
कालच मी आमच्या अंतर्गत मंत्र्यांचे जे समन्वय पथक होते त्यांना देखील येथे पाठवले होते. काल त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, येथील अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि सर्व काही पाहून ते इथून निघाले. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी मला सांगितल्याप्रमाणे ते संपूर्ण तपशीलासह memorandum पाठवतील. आणि मी या कुटुंबातील सदस्यांना ही हमी देतो की ते एकटे नाहीत. या दु:खाच्या काळात राज्य सरकार असो, केंद्र सरकार असो किंवा देशातील सर्वसामान्य नागरिक असो, या संकटाच्या काळात आपण सर्व त्यांच्यासोबत आहोत.
सरकारने धोरणे आणि नियमांनुसार आपत्ती व्यवस्थापनासा जो निधी पाठवला जातो,त्याचा बराच मोठा भाग यापूर्वीच देण्यात आला असून, त्याचा आणखी काही भाग आम्ही तातडीने जारी केला आहे. आणि ज्या वेळी हे memorandum येईल तेव्हा या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी भारत सरकार केरळ सरकारच्या पाठीशी उदारपणे उभे राहील आणि इथले कोणतेही काम निधीअभावी थांबेल असे मला वाटत नाही.
जीवितहानीचा विचार केला तर आपल्याला पुन्हा एकदा त्यांच्या नातेवाईकांना, कारण लहान बालके आहेत, कुटुंबातील सर्व काही गमावलेले आहेत. त्यांच्यासाठी एक दीर्घकालीन योजना आपल्याला तयार करावी लागेल. मला आशा आहे की राज्य सरकार त्यावर देखील अतिशय विस्ताराने काम करेल आणि त्यामध्येही भारत सरकार जो काही हातभार लावू शकेल, तो लावेल.
पण आताच मुख्यमंत्री जसे सांगत होते, मी अशी आपत्ती अगदी जवळून पाहिली आणि अनुभवली आहे. 1979 मध्ये, 40-45 वर्षांपूर्वी. गुजरातमध्ये मोरबी येथे एक धरण होते आणि जोरदार पाऊस झाला आणि धरण पूर्णपणे नष्ट झाले. आणि तुम्ही कल्पना करू शकता, ते धरण खूप मोठे होते. त्यामुळे पूर्ण पाणी मोरबी या शहरात घुसले आणि संपूर्ण शहरात 10-10, 12-12 फूट पाणी साचले. तेथे अडीच हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. आणि हे धरण देखील मातीचे होते, त्यामुळे प्रत्येक घरात पूर्ण माती होती, म्हणजे जवळपास सहा महिने मी तिथे राहिलो, त्यावेळी मी स्वयंसेवक म्हणून काम करायचो. आणि चिखलामुळे निर्माण होणाऱ्या समस्या आणि त्यांना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते हे मला माहीत आहे, कारण मी स्वयंसेवक म्हणून काम केले आहे. त्यामुळे ही कुटुंबे चिखलात वाहून जात असतील त्यावेळी किती कठीण परिस्थिती निर्माण झाली असेल याचीही कल्पना मला आहे. आणि त्यातही जेव्हा काही लोक आपला जीव वाचवून बाहेर पडतात तेव्हा त्यांना बघून असे वाटते की देवाने त्यांच्यावर कशा प्रकारे कृपा केली आणि त्यांचा जीव वाचवला.
त्यामुळे मी या परिस्थितीचा चांगला अंदाज लावू शकतो आणि मी तुम्हाला हमी देतो की देश आणि भारत सरकार कोणतीही कसर बाकी ठेवणार नाही. घरांची बांधणी असो, शाळा बांधण्याबाबत असो, रस्त्यांच्या पायाभूत सुविधांच्या कामांबाबत असो, या मुलांच्या भविष्यासाठी काही व्यवस्था करण्याबाबत असो, ज्यावेळी तुमच्याकडून सर्व तपशील तयार होऊन येतील, त्यावेळी आमच्याकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य केले जाईल, याची हमी मी तुम्हाला देतो. आणि मी स्वतः, माझे अंतःकरण अतिशय जड झाले होते, कारण माझ्या येण्यामुळे येथे बचाव कार्यात आणि मदत कार्यात कोणताही अडथळा येऊ नये असे मला वाटत होते.
पण आज मी अतिशय विस्ताराने सर्व गोष्टी पाहिल्या आहेत आणि ज्यावेळी पहिल्या वेळची माहिती मिळते तेव्हा निर्णय घेणे देखील सोयीचे होते आणि मी पुन्हा एकदा तुम्हाला ही हमी देतो की मुख्यमंत्री महोदयांनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत, त्या सर्व अपेक्षांची पूर्तता करण्याचा भारत सरकार पुरेपूर प्रयत्न करेल.
धन्यवाद!
***
M.Iyengar/S.Patil/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2044270)
Visitor Counter : 65
Read this release in:
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Hindi_MP
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam