राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा फिजी दौरा, फिजीचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यासोबत द्विपक्षीय बैठका
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा कंपॅनिअन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी या फिजीच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान
Posted On:
06 AUG 2024 5:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 ऑगस्ट 2024
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, फिजी, न्यूझीलंड आणि तिमोर-लेस्टे दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात आज सकाळी (6 ऑगस्ट, 2024) नाडी इथून फिजीची राजधानी सुवा येथे पोहोचल्या.फिजीचे पंतप्रधान सितिवेनी राबुका यांनी विमानतळावर त्यांचे पारंपारिक पद्धतीने स्वागत केले. फिजीला भारतीय राष्ट्रपतींची ही पहिलीच भेट आहे.
फिजीच्या पंतप्रधानांच्या उपस्थितीत राष्ट्रपती मुर्मू यांच्यासाठी पारंपरिक स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर, राष्ट्रपतींनी फिजीच्या स्टेट हाऊस ला भेट दिली जिथे फिजीचे राष्ट्रपती रातु विलियम मैवालिली काटोनिवेरे यांनी त्यांचे स्वागत केले. भारत-फिजी संबंध अधिक दृढ करण्याच्या मार्गांवर उभय नेत्यांनी चर्चा केली.
स्टेट हाऊस मध्ये फिजीच्या राष्ट्रपतींनी कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी हा फिजीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना प्रदान केला.
दौऱ्यात नंतर राष्ट्रपतींनी फिजीच्या संसदेला संबोधित केले.दोन्ही देशांच्या आकारमानात मोठा फरक असूनही,भारत आणि फिजी या दोन्ही देशांत आपल्या महत्वपूर्ण लोकशाहीसह बरेच साम्य असून लोकशाहीला प्रोत्साहन देण्यासाठी समृद्ध अनुभव असलेला जवळचा मित्र आणि भागीदार या नात्याने भारत सदैव फिजी समवेत भागीदारीसाठी तयार असल्याचे त्या म्हणाल्या.
ग्लोबल साउथचा एक शक्तिशाली आवाज म्हणून, भारत हवामान न्यायासाठी फिजी आणि इतर महासागरातील देशांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहील असे राष्ट्रपतींनी सांगितले.
त्यानंतरच्या कार्यक्रमात फिजीचे पंतप्रधान सितिवेनी राबुका यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. उभय नेत्यांनी व्यापक विचारविनिमय केली आणि ऐतिहासिक संबंध वाढवण्यावर आणि दोन्ही देशांमधील भागीदारी मजबूत करण्यावर सहमती दर्शवली.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान सितिवेनी राबुका यांनी (i) भारतीय उच्चायुक्तालय आणि भारतीय सांस्कृतिक केंद्र संकुल, सुवा आणि (ii) सुवा येथील 100 खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय, यासाठी प्रकल्प स्थळांच्या निवडीबाबतची कागदपत्रे सुपूर्द करण्याच्या समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवले.
राष्ट्रपतींनी भारतीय समुदायाच्या उत्साही मेळाव्यालाही संबोधित केले. आमच्या स्वप्नातील भारत घडवण्याच्या प्रवासात आम्ही जगभरातील आमच्या परदेशी भारतीय समुदायाला महत्त्वाचे भागीदार आणि हितधारक म्हणून पाहतो असे राष्ट्रपतींनी नमूद केले.
राष्ट्रपतींनी सुवा येथील राष्ट्रीय युद्ध स्मारकालाही भेट दिली आणि शहीद सैनिकांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले. त्यांनी महात्मा गांधी मेमोरियल हायस्कूललाही भेट दिली आणि तिथे महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.
सुवा येथील अधिकृत कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर राष्ट्रपती नाडीला रवाना झाल्या तेथून त्या उद्या न्यूझीलंड मधील ऑकलंड येथे विमानाने रवाना होतील.
राष्ट्रपतींच्या हिंदी भाषणासाठी येथे क्लिक करा.
राष्ट्रपतींच्या इंग्रजी भाषणासाठी येथे क्लिक करा.
N.Chitale/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2042239)
Visitor Counter : 107
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Hindi_MP
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada