गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केरळमधील वायनाड येथील भूस्खलनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर आज लोकसभा आणि राज्यसभेत झालेल्या चर्चेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा सहभाग


या संकट काळात मोदी सरकार केरळच्या जनतेच्या आणि सरकारच्या पाठीशी पहाडासारखे उभे

केरळमधील वायनाडमध्ये सुरू असलेल्या मदत आणि बचाव कार्याचा पंतप्रधान स्वतः घेत आहेत सातत्यपूर्ण आढावा

23 जुलैपासून केरळ सरकारला दिली होती पूर्वसूचना

भूस्खलनाची शक्यता लक्षात घेऊन 23 जुलै रोजीच एनडीआरएफ च्या 9 तुकड्या केरळला पाठवण्यात आल्या

26 जुलै रोजीही मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे जीवितहानीच्या शक्यतेबाबत केरळ सरकारला केले होते अवगत

Posted On: 31 JUL 2024 7:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 जुलै 2024

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज केरळमधील वायनाड येथे भूस्खलनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर लोकसभा आणि राज्यसभेत झालेल्या चर्चेत भाग घेतला.

लोकसभेतील चर्चेत भाग घेताना, अमित शाह यांनी या घटनेतल्या मृतांप्रती तीव्र शोक व्यक्त केला आणि जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी सदिच्छा व्यक्त केली. या संकट काळात नरेंद्र मोदी सरकार केरळची जनता आणि राज्य सरकारच्या पाठीशी पहाडाप्रमाणे उभे आहे असा विश्वास त्यांनी दिला. मोदी सरकारकडून बचाव, मदत आणि पुनर्वसनासाठी सर्वतोपरी मदत आणि प्रयत्न सुरू असल्याची माहिती शाह यांनी दिली. 

केंद्राने पाठवलेल्या माहितीनुसार लोकांना वेळेवर सुरक्षित ठिकाणी पोहोचवणे ही राज्य सरकारांची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. केंद्र सरकारने या आपत्तीच्या काळात बचाव कार्यात कोणतीही कसर सोडलेली नसून स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी नियंत्रण कक्षाकडून याबाबत सातत्याने आढावा घेत असल्याचे शाह यांनी सांगितले.

तत्पूर्वी, राज्यसभेत याच विषयावरील चर्चेत भाग घेताना, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी निदर्शनास आणले की, आपत्तीच्या 7 दिवस आधी 23 जुलै रोजी केंद्र सरकारकडून केरळ सरकारला पूर्वसूचना देण्यात आली होती. आणि त्यानंतर, 24 आणि 25 जुलैलाही पूर्वसूचना देण्यात आली होती. ते म्हणाले की 26 जुलै रोजी केरळ सरकारला सूचित करण्यात आले होते की 20 सेंटीमीटरपेक्षा जास्त पावसाची शक्यता असून भूस्खलन होण्याचीही शक्यता आहे ज्यामुळे जीवितहानी होऊ शकते. आरोप करणाऱ्यांनी पूर्वसूचना वाचली असती तर ही परिस्थिती उद्भवली नसती, अशी टिप्पणी त्यांनी केली. 

देशात अनेक राज्य सरकारे अशी आहेत ज्यांनी अशा प्रकारच्या पूर्वसूचनेचे पालन करून जीवितहानी टाळत आपत्ती व्यवस्थापन केले असल्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांनी नमूद केले. ते म्हणाले की, 7 दिवसांपूर्वी ओदिशामध्ये चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला होता आणि तिथे  एका व्यक्तीला जीव गमवावा लागला होता. गुजरातमध्ये 3 दिवसांपूर्वी पूर्वसूचना देण्यात आली ज्यामुळे तिथे एकाही प्राणिमात्राला जीव गमवावा लागला नाही. 

2014 पासून, केंद्र सरकारने अर्ली वॉर्निंग सिस्टम अर्थात पूर्वसूचना प्रणालीवर 2,323  कोटी रुपये खर्च केले असून याद्वारे पूर्वसूचना सामायिक केली जाते असे शाह यांनी उद्धृत केले. ते म्हणाले की सर्व राज्यांना 7 दिवस अगोदर माहिती पाठविली जाते आणि ती माहिती संकेतस्थळावर प्रत्येकासाठी उपलब्ध असते.

पाऊस, उष्णतेची लाट, वादळ, चक्रीवादळ आणि वीज पडण्याबाबतचा इशारा देण्यासाठी पूर्वसूचना प्रणाली कार्यरत असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले की, जर विरोधी पक्षांना या पूर्वसूचना प्रणालीची माहिती नसेल तर ते चुकीचे आहे, मात्र त्यांच्याकडे माहिती असून ते राजकारण करत असतील तर ते खेदजनक आहे. अनेक राज्यांनी त्याचा वापर केला असून त्याचे परिणामही दिसून आले आहेत असे त्यांनी निदर्शनास आणले. 

केरळमध्ये भूस्खलनाची शक्यता लक्षात घेऊन  23 जुलै रोजी केंद्र सरकारकडून एनडीआरएफ च्या 9 तुकड्या विमानाने केरळला पाठवण्यात आल्या होत्या हे अवगत करून केरळ सरकारने तेथे राहणाऱ्या असुरक्षित लोकांना का स्थलांतरित केले नाही, कारण जर ते स्थलांतरित झाले असते तर इतक्या लोकांना जीव का गमवावा लागला असता, असा सवाल अमित शाह यांनी केला.

2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर, भारतात जगातील सर्वात आधुनिक पूर्वसूचना प्रणाली स्थापित करण्याचे काम केले गेले असे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांनी लक्षात आणून दिले. या प्रकारच्या आपत्तीचा 7 दिवस अगोदर अंदाज वर्तवणाऱ्या सर्वोच्च चार – पाच देशांपैकी भारत एक आहे असे त्यांनी आवर्जून सांगितले.

7 दिवसांपूर्वी पूर्वसूचना देण्यात आली होती आणि 23 जुलै रोजी एनडीआरएफच्या 9 तुकड्या रवाना करण्यात आल्या होत्या आणि काल 3 तुकड्या रवाना करण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिली. केरळ सरकार आणि तेथील जनतेच्या पाठीशी उभे राहण्याची ही वेळ असल्याचे ते म्हणाले.

 

* * *

N.Chitale/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2039850) Visitor Counter : 81