अर्थ मंत्रालय

भारताच्या प्रगतीत सेवा क्षेत्र सातत्याने लक्षणीय योगदान देत आहे, आर्थिक वर्ष 24 मध्ये अर्थव्यवस्थेच्या एकूण अर्थ व्यवस्थेच्या सुमारे 55 टक्के भाग सेवा क्षेत्राचा


अंतरिम अंदाजानुसार, आर्थिक वर्ष 24 मध्ये सेवा क्षेत्रात 7.6% ने वाढ : आर्थिक सर्वेक्षण 2024

मार्च 2024 मध्ये सेवा क्षेत्राचा पीएमआय 61.2 पर्यंत वाढला, गेल्या 14 वर्षांतील सर्वात उल्लेखनीय विक्री आणि व्यापार उपक्रम विस्तारांमध्ये याचा समावेश

Posted On: 22 JUL 2024 5:56PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 जुलै 2024


“गेल्या तीन दशकांमध्ये सेवा क्षेत्र हे भारताच्या आर्थिक वृद्धीचा भक्कम आधार बनून राहिले आहे. धोरणात्मक तसेच पद्धतविषयक सुधारणांवर केंद्रित लक्ष, भौतिक पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक्स यांच्या मदतीने देशातील सर्व महत्त्वाच्या  व्यापारी, वैयक्तिक,आर्थिक तसेच पायाभूत सुविधांवर आधारित सेवा महामारीच्या संकटातून समर्थपणे सावरून नव्याने उदयाला आल्या आहेत. मात्र हे परिवर्तन ऑनलाइन भरणा, ई-वाणिज्य तसेच मनोरंजन मंचांसारख्या डिजिटल सेवांकडे वेगाने स्थलांतरित होण्यासोबतच इतर उत्पादक उपक्रमांमध्ये उच्च-तंत्रज्ञानसंबंधी सेवांच्या मागणीत वाढ झाल्यामुळे देखील घडून आले आहे.” केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल 2023-2024 मांडला तेव्हा त्यांनी हा मुद्दा ठळकपणे मांडला.   
 

 

सेवा क्षेत्र भारताच्या वृद्धीत सातत्याने लक्षणीय योगदान देत असून आर्थिक वर्ष 24 मध्ये अर्थव्यवस्थेच्या एकूण आकारापैकी सुमारे 55 टक्के भाग सेवा क्षेत्राचा होता.
 
सेवा क्षेत्रातील सकल मूल्य वर्धन (जीव्हीए)

जागतिक पातळीवर विचार करता, भारताच्या सेवा क्षेत्राने 6 टक्क्याहून अधिक प्रत्यक्ष वाढ नोंदवली असून वर्ष 2022 मध्ये जगातील एकूण व्यावसायिक सेवा निर्यातीमध्ये सेवा क्षेत्राचा 4.4टक्के वाटा होता.


कोविड-पश्चात काळात, विना-संपर्क गहन सेवा, प्रामुख्याने आर्थिक, माहिती तंत्रज्ञानविषयक तसेच व्यावसायिक सेवांमुळे सेवा क्षेत्राच्या वाढीला अधिक चालना मिळाली.
 
या सर्वेक्षण अहवालात पुढे असे म्हटले आहे की तात्पुरत्या अंदाजानुसार, आर्थिक वर्ष 24 मध्ये सेवा क्षेत्र 7.6% नी वाढले. एकंदर वस्तू आणि सेवा कर संकलन वर्ष 2024 मध्ये 29.18 लाखांवर पोहोचले. म्हणजेच देशांतर्गत सशक्त व्यवसायसंबंधी व्यवहार अधोरेखित करत गेल्या वर्षीपेक्षा यावर्षीच्या जीएसटी संकलनात 11.7 टक्के वाढ झाली आहे.   
                                                                                                                                 
पीएमआय म्हणजेच खरेदी व्यवस्थापन निर्देशांक – सेवा क्षेत्र

मार्च 2024 मध्ये सेवा क्षेत्राचा पीएमआय 61.2 पर्यंत वाढला, गेल्या 14 वर्षांतील सर्वात उल्लेखनीय विक्री आणि व्यापार उपक्रम विस्तारांमध्ये याचा समावेश होतो. तक्ता XI.6 मध्ये दर्शवल्यानुसार, ऑगस्ट 2021 पासून सेवा क्षेत्राचा पीएमआय सातत्याने 50 हून जास्त राहिला असून त्यातून या क्षेत्राचा गेल्या 35 महिन्यांतील सातत्यपूर्ण विस्तार दिसून येतो.
 

 

सेवा क्षेत्रातील व्यापार
 
महामारी-पश्चात काळात सेवा क्षेत्रातील निर्यातीने एक निश्चित गती घेतली आहे आर्थिक वर्ष 2024 मधील एकूण निर्यातीमध्ये सेवा क्षेत्राचे योगदान तब्बल 44 टक्के आहे.


वर्ष 2019 मध्ये डिजिटल पद्धतीने वितरीत होणाऱ्या सेवांच्या निर्यातीत भारताचा 4.4 टक्के असलेला वाटा वर्ष 2023 मध्ये वाढून 6.0 टक्के झाला आहे. सेवांच्या निर्यातीतील ही वाढ सेवांच्या आयातीमधील घसरणीची जोडली गेली असून त्यातून दर वर्षातील आकडेवारीच्या आधारावर आर्थिक वर्ष 2024 मध्ये निव्वळ सेवा मिळण्यात वाढ झालेली दिसून येते. आणि त्यामुळे भारताच्या विद्यमान खात्यातील तूट भरून काढण्यास मदत झाली आहे.
 
सेवा क्षेत्रातील कार्यात निधीपुरवठ्याचे स्त्रोत
 
सेवा क्षेत्र देशांतर्गत आर्थिक गरजा खालील मार्गांने पूर्ण करते:

  1. देशांतर्गत बँका तसेच निधी बाजारातून घेतलेले कर्ज : आर्थिक वर्ष 2024 मध्ये सेवा क्षेत्रात चढत्या भाजणीने कर्जाचा ओघ दिसून आला. एप्रिल 2023 पासून दर महिन्यात दर वर्षामागील वृद्धी दर 20 टक्क्याहून अधिक राहिला.
  2. आंतरराष्ट्रीय पातळीवर थेट परदेशी गुंतवणूक (एफडीआय) आणि बाह्य व्यावसायिक कर्ज (ईसीबीएस) : आर्थिक वर्ष 2024 मध्ये देशात आलेल्या बाह्य व्यावसायिक कर्ज(ईसीबीएस) रूपातील वित्तीय निधीत सेवा क्षेत्राचा वाटा 53 टक्के होता. सेवा क्षेत्राला आर्थिक वर्ष 2024 मध्ये14.9 अब्ज डॉलर्सचा निधी प्राप्त झाला आणि दर वर्षागणिक 58.3 टक्क्याची वाढ झाल्याचे यातून दिसून येते.

 

M.Iyengar/S.Chitnis/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai
 

 



(Release ID: 2035236) Visitor Counter : 27