पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 22 JUL 2024 2:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 जुलै 2024

आज श्रावणातील पहिला सोमवार आहे.आजच्या पवित्र दिवशी एका महत्त्वपूर्ण सत्राचा प्रारंभ होत आहे आणि श्रावणातील या पहिल्या सोमवारच्या देशवासियांना मी खूप खूप शुभेच्छा देतो.

आज संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. संसदेचे हे सत्र सकारात्मक होवो,सृजनात्मक होवो आणि देशवासियांची स्वप्ने साकार करण्यासाठी एक मजबूत पायाभरणी करणारे होवो, याकडे देश अगदी बारकाईने लक्ष ठेवून पाहत आहे.

मित्रांनो,

भारताच्या लोकशाहीची जी गौरव यात्रा आहे त्यातील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे मला दिसत आहे. वैयक्तिकरित्या माझ्यासाठी आणि माझ्या सर्व साथीदारांसाठी देखील हा एक अत्यंत अभिमानाची बाब आहे की सुमारे 60 वर्षांनंतर कोणतेही सरकार तिसऱ्या वेळी सत्तेत आले आहे, आणि तिसऱ्या कार्यकाळाचा पहिला अर्थसंकल्प सादर करण्याचे सौभाग्य प्राप्त होणे, या भारताच्या लोकशाहीच्या गौरवयात्रेच्या अत्यंत अभिमानास्पद घटनेच्या रूपात संपूर्ण देश याकडे पाहत आहे. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. मी देशवासीयांना जी गॅरंटी देत आलो आहे, त्या सर्व गॅरंटी आता क्रमशः सत्यात साकार करण्याचे उद्दिष्ट ठेवून आम्ही मार्गक्रमण करत आहोत. हा अर्थसंकल्प स्वातंत्र्याच्या अमृत काळातील एक महत्त्वपूर्ण अर्थसंकल्प आहे. आम्हाला पाच वर्षांची ही जी संधी मिळाली आहे, आजचा अर्थसंकल्प आमच्या त्या पाच वर्षांच्या काळाची कार्य दिशा निश्चित करेल, आणि हा अर्थसंकल्प 2047, जेव्हा स्वातंत्र्याची शंभर वर्षे पूर्ण होतील तेव्हा विकसित भारताचे जे आमचे स्वप्न आहे, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मजबूत पायाभरणी करणारा अर्थसंकल्प उद्या आम्ही देशासमोर सादर करू.  मोठी अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांमध्ये भारत सर्वात जास्त गतीने पुढे जाणारा देश आहे, ही प्रत्येक देशवासीयासाठी अभिमान करण्याजोगी गोष्ट आहे. मागील तीन वर्षापासून सातत्याने 8% विकास दराने आपण पुढे जात आहोत, प्रगती करत आहोत. आज भारतात सकारात्मक दृष्टीकोन, गुंतवणूक आणि कामगिरी हे पैलू एका प्रकारे संधीच्या उच्च स्थानी आहेत. हा भारताच्या विकास यात्रेतील सर्वात महत्त्वपूर्ण टप्पा आहे.

मित्रांनो,

मी देशातील सर्व संसद सदस्यांना, भले, मग ते कोणत्याही पक्षाचे का असेनात ! आज मी त्यांना आग्रहपूर्वक सांगू इच्छितो की, आपण मागच्या जानेवारीपासून आपल्याकडे जितके सामर्थ्य होते, त्या सामर्थ्यानिशी, जितकी लढाई करायची होती ती केली, जनतेला ज्या गोष्टी सांगायच्या होत्या त्या सांगितल्या. कोणी मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला, कोणी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण आता तो काळ संपला आहे, देशवासीयांनी आपला निर्णय जाहीर केला आहे. आता निवडून आलेल्या प्रत्येक संसद सदस्याचे हे कर्तव्य आहे, प्रत्येक राजकीय पक्षांची ही विशेष जबाबदारी आहे की आपण पक्षासाठी जितकी लढाई लढाईची होती ती लढली,  आता आगामी पाच वर्षांत आपल्याला देशाकरिता लढायचे आहे, देशासाठी झुंजायचे आहे, एक आणि नेक बनून झुंजायचे आहे. मी सर्व राजकीय पक्षांना सांगू इच्छितो की ही येणारी चार साडेचार वर्षे आपण पक्षीय राजकारण बाजूला ठेवून, केवळ आणि केवळ देशासाठी समर्पित होऊन संसदेच्या या गौरवपूर्ण मंचाचा उपयोग करू.

जानेवारी 2029 मध्ये जेव्हा पुन्हा निवडणुकीचे वर्ष असेल तेव्हा पुन्हा मैदानात उतरा, सदनाचा वापर करायचा असेल तर तोही करा. ते सहा महिने जे खेळ खेळायचे आहेत, ते खेळून घ्या. पण तोवर, केवळ आणि केवळ देश, देशातील गरीब, देशातील शेतकरी, देशातील युवक, देशातील महिला यांच्या सामर्थ्यासाठी, त्यांना सक्षम बनवण्यासाठी लोकभागीदारीतील एक जन आंदोलन सुरू करून 2047 चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण संपूर्ण ताकद लावू. मला आज अत्यंत खेदपूर्वक हे सांगायचे आहे की, 2014 नंतर काही संसद सदस्य 5 वर्षांसाठी आले, काही संसद सदस्यांना 10 वर्षांची संधी मिळाली. मात्र बहुतेक संसद सदस्य असे होते ज्यांना आपल्या मतदारसंघाबाबत बोलण्याची संधीच मिळाली नाही,  आपल्या विचारांनी संसदेला समृद्ध करण्याची संधी त्यांना मिळाली नाही, कारण काही पक्षांच्या नकारात्मक राजकारणामुळे देशातील संसदेच्या महत्त्वपूर्ण वेळेचा एका प्रकारे आपले राजकीय अपयश झाकण्यासाठी दुरुपयोग केला गेला. मी सर्व पक्षांना आग्रहपूर्वक सांगू इच्छितो की, कमीत कमी जे पहिल्यांदाच सदनात आले आहेत, आणि सदनात तसेच सर्व पक्षातही पहिल्यांदाच आलेले माननीय संसद सदस्य मोठ्या संख्येने आहेत, त्यांना संधी द्या, चर्चेमध्ये आपले मत मांडण्याची संधी त्यांना द्या. जास्तीत जास्त लोकांना पुढे येण्याची संधी द्या. आणि तुम्ही पाहिलेच असेल की सदनाच्या नव्या मंत्रिमंडळाची नेमणूक झाल्यानंतर जे पहिले अधिवेशन झाले, त्यात 140 कोटी देशवासीयांच्या बहुमताने ज्या सरकारला सेवा करण्याच्या आदेश देशवासीयांनी दिला होता, त्यांचा आवाज रोखण्याचा, त्यांचा आवाज दाबून टाकण्याचा लोकशाही विरोधी प्रयत्न झाला. सुमारे अडीच तासांपर्यंत देशाच्या पंतप्रधानाचा गळा दाबण्याचा त्यांचा आवाज थोपवण्याचा, त्यांचा आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न झाला, त्याला लोकशाही परंपरेत कोणतेही स्थान असू शकत नाही. आणि त्यांना या सर्वाचा पश्चातापही वाटत नाही किंवा त्यांच्या मनाला कसल्या वेदना देखील होत नाहीत.

मी आज आग्रहपूर्वक सांगू इच्छितो की देशवासीयांनी आम्हाला इथे देशाकरिता पाठवले आहे, कोणत्याही राजकीय पक्षासाठी पाठवलेले नाही. हे सदन राजकीय पक्षांसाठी नाही, हे सदन देशासाठी आहे. हे सदन संसद सदस्यांपुरते मर्यादित नाही, 140 कोटी देशवासीयांच्या एका विराट समूहासाठी आहे. आपले सर्व माननीय संसद सदस्य संपूर्ण तयारीनिशी मत मांडून चर्चा समृद्ध करतील असा माझा विश्वास आहे. अनेक जणांचे विचार विरुद्ध असतील, विरुद्ध विचार वाईट नसतात तर नकारात्मक विचार वाईट असतात. जिथे विचार करण्याची सीमा समाप्त होते, देशाला नकारात्मकतेची गरज नाही, देशाला एक विचार प्रणाली, प्रगतीची विचारप्रणाली, विकासाची विचारप्रणाली, देशाला नव्या उंचीवर स्थापित करण्यासाठी आवश्यक असलेली विचार प्रणाली सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे. भारतातील सामान्य मनुष्याच्या आशा, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपण लोकशाहीच्या या मंदिराचा सकारात्मक रूपाने उपयोग करू अशी मी अपेक्षा करतो.

मित्रांनो, खूप खूप धन्यवाद.


H.Akude/S.Mukhedkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2034936) Visitor Counter : 82