युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताला क्रीडाक्षेत्रातील महासत्ता बनवण्यासाठी प्रतिभेचा विकास करण्यावर केंद्रीय मंत्री डॉ.मनसुख मांडवीय यांनी दिला भर


केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते कीर्ती कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात

Posted On: 19 JUL 2024 6:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 जुलै 2024


केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा तसेच श्रम आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या हस्ते आज नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडीयम येथे आयोजित कार्यक्रमात कीर्ती अर्थात खेलो इंडिया उदयोन्मुख प्रतिभा ओळख उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात करण्यात आली.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री डॉ. मांडवीय म्हणाले, “विविधतेने नटलेल्या भारतात अपर क्षमता आहे. भारतात बुद्धीमत्ता, मनुष्यबळ किंवा प्रतिभेची उणीव कधीच नव्हती.केवळ मोठी शहरेच नव्हे तर आमच्या देशाच्या ईशान्य, किनारपट्टी, हिमालयातील किंवा आदिवासी भागासारख्या दूरदूरच्या प्रदेशात देखील गुणवान क्रीडापटू असू शकतील. कीर्ती  हा उपक्रम अशा प्रतिभावंत खेळाडूंना शोधून काढून त्यांची कौशल्ये विकसित करण्याच्या उद्देशाने हाती घेण्यात आला आहे.

“आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या जीवनात खेळांच्या महत्त्वावर पुनःपुन्हा भर दिला आहे. भारताला जागतिक पातळीवर क्रीडा क्षेत्रातील महासत्ता बनवण्याच्या स्वप्नासह सरकारने प्रतिभावान खेळाडूंना मनापासून मदत करण्याच्या उद्देशाने अनेक सक्रीय पावले उचलली आहेत.सरकारचा हा लक्ष्यित दृष्टीकोन अलीकडच्या काळात ऑलिम्पिकसह जागतिक पातळीवरील अनेक अजिंक्यपद स्पर्धांमध्ये देशाच्या पदक तालिकेतल्या पदकांच्या वाढत्या संख्येने प्रतिबिंबित होतो आहे.”

आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या हजारो लहान शाळकरी मुलामुलींशी बोलतना डॉ. मांडवीय म्हणाले, “तुमच्यातीलच एक कोणीतरी भविष्यात ऑलिम्पिक पदकविजेता असेल. तुमचे पालक तुमच्यासोबत आहेत आणि खेळण्यासाठी ते तुम्हाला पाठींबा  देत आहेत याचे मला कौतुक वाटते.”

डॉ.मांडवीय पुढे म्हणाले की, सरकारने कीर्ती  कार्यक्रमाअंतर्गत 100 दिवसांत 1 लाख होतकरु युवा खेळाडू निश्चित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.ते पुढे म्हणाले की या  कार्यक्रमाअंतर्गत प्रत्येकालाच त्यांची क्रीडाविषयक कौशल्ये विकसित करण्याची संधी देण्यात येईल, मग ती व्यक्ती गावात राहत असो किंवा शहरात, आणि ते अत्यंत हलाखीच्या पार्श्वभूमीतून आलेले असोत किंवा नसोत, त्यांना समान संधी देण्यात येईल.

आजच्या या कार्यक्रमासह देशव्यापी क्रीडा प्रतिभांच्या शोधाची सुरुवात झाली असून वर्ष 2047 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडास्पर्धांच्या वेळी क्रीडा जगतातील पहिल्या पाच सर्वोत्कृष्ट देशांमध्ये स्थान मिळवण्याच्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे. यावर्षी पॅरिस मध्ये होणाऱ्या  ऑलिम्पिक क्रीडास्पर्धेत भाग घेत असलेल्या 117 क्रीडापटूंपैकी 28 जण खेलो इंडिया परिसंस्थेतून पुढे आले आहेत.

प्रकल्प कीर्ती  विकेंद्रीकृत तसेच पॉकेट आधारित प्रतिभा निश्चिती दृष्टीकोनासह पुढील दोन उद्दिष्ट्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो- मोठ्या  प्रमाणात सहभाग आणि क्रीडा क्षेत्रात उत्कृष्टता. याद्वारे  येत्या 100 दिवसांत देशातील 100 ठिकाणी सुमारे 1 लाखाहून अधिक जणांचे मूल्यमापन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हे मूल्यमापन करताना प्रतिभा निश्चिती आणि विकासाला वेग देण्याच्या वचनबद्धतेवर भर दिला जाणार असून नंतर या कार्यक्रमाचा आवाका वाढवून प्रत्येक वर्षी 20 लाख उमेदवारांचे मूल्यमापन करण्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न असेल.

या  कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यात,खेलो इंडिया योजनेतील सर्व 20 शाखा कीर्ती  छत्राखाली समाविष्ट करण्यात येतील.

कीर्तीच्या दुसऱ्या टप्प्याचे अनावरण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.

कीर्ती  कार्यक्रमाशी संबंधित तपशीलवार स्पष्टीकरण वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.
 

 

N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2034446) Visitor Counter : 66