आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
मिथक विरुद्ध तथ्ये
एकही लस न घेतलेल्या मुलांची संख्या (शून्य लसमात्रा मुले) भारतात इतर देशांच्या तुलनेत अधिक असल्याचे माध्यमांचे वृत्त हे भारताच्या लसीकरणाबद्दल रंगवलेले अपूर्ण चित्र
एकूण लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार भारतात एकही लसमात्रा न घेतलेली फक्त 0.11% मुले
Posted On:
18 JUL 2024 9:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,18 जुलै 2024
भारतात इतर देशांच्या तुलनेत शून्य लसमात्रा मुले अधिक असल्याचे वृत्त काही माध्यमांनी प्रसारित केले आहे. शून्य लसमात्रा मुले म्हणजे युनिसेफच्या ताज्या अहवालानुसार एकही लस न मिळालेली मुले. या बातम्यात देशाच्या लसीकरणाबद्दल अपूर्ण चित्र रंगवले आहे कारण लोकसंख्या आणि इतर देशांतील लसीकरणाची व्याप्ती हे घटक त्यात विचारात घेतलेले नाहीत.
सापेक्ष माहिती आणि उपक्रमांविषयक सर्वसमावेशक आकलनाद्वारे सरकारच्या लसीकरणाच्या प्रयत्नांचे अचूक आणि संपूर्ण वर्णन करता येणे शक्य आहे.
आलेख 1 भारतातील सर्व प्रतिजनांची (अँटीजेन) टक्केवारी निळ्या रेषेद्वारे दाखवली आहे. ती जागतिक सरासरीपेक्षा अधिक आहे. भारतात बहुतेक प्रतिजनांसाठी लसिकरणाची व्याप्ती 90% पेक्षा जास्त आहे. ती टक्केवारी इतर उच्च-उत्पन्न देशांच्या आसपास आहे. उदा., न्यूझीलंड (DTP-1 ..93%), जर्मनी आणि फिनलंड (DPT-3 ..91%), स्वीडन (MCV-1 ..93%). न्युमोकोकल कॉन्ज्युगेट व्हॅक्सीन (PCV) साठी 83% ही भारतातील सगळ्यात कमी लसिकरण टक्केवारी आहे. तुलना केली तर 65% या जागतिक आकडेवारीपेक्षा ती खूप जास्त आहे.
आलेख 1: भारत आणि जागतिक व्याप्ती (%) मधील प्रतिजनानुसार तुलना
(WUENIC 2023)
आलेख 2 ज्या इतर देशांत भारताच्या तुलनेत DTP-1 (पेंटा-1) आणि DTP-3 (पेंटा-3) ची एकही लस न घेतलेली आणि कमी लसी घेतलेल्या मुलांची संख्या अधिक आहे त्याचे वर्णन या आलेखात आहे. भारताची लोकसंख्या मोठी असून लसीकरण झालेल्या मुलांची संख्या सर्वाधिक आहे. भारताचे लक्ष्य समूह इतर नऊ देशांपेक्षा तिपटीहून अधिक आहेत. भारत DTP-1 (पेंटा-1) चे लसीकरण 90% पेक्षा जास्त आहे आणि ज्यांना DTP (पेंटा) चा पहिला डोस मिळालेला आहे परंतु तिसरा डोस मिळालेला नाही त्यांची संख्या 2% आहे.
आलेख 2: DTP युक्त लस (%) (WUENIC 2023) साठी लसीची एकही मात्रा न घेतलेल्या मुलांची संख्या याबाबतीत भारत आणि इतर देशांची तुलना
आलेख 3 वरून लक्षात येते की भारतातील शून्य डोस मुलांची संख्या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या 0.11% आहे.
आलेख 3: एकूण लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार शून्य डोस मुले
ही आकडेवारी राष्ट्राच्या लसीकरण कार्यक्रमाची व्याप्ती आणि पोहोच सतत वाढवण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचे द्योतक आहे. सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम हा देशातील सर्वात मोठा सार्वजनिक आरोग्य उपक्रम आहे. 1.2 कोटी लसीकरण सत्रांद्वारे दरवर्षी 2.6 कोटी मुले आणि 2.9 कोटी गर्भवती महिला यांच्या लसिकरणाचे उद्दिष्ट ठेवले जाते.
आर्थिक वर्ष 2023-24 साठी संपूर्ण लसीकरण व्याप्ती राष्ट्रीय स्तरावर 93.23% आहे.
एकही लस न घेतलेल्या मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी, भारताने राज्यांच्या सहकार्याने मिशन इंद्रधनुष आणि अधिक प्रभावी मिशन इंद्रधनुष अंतर्गत उपक्रम राबवले आहेत. यामुळे 2014-2023 दरम्यान शून्य डोस असलेल्या मुलांची संख्या 34% ने कमी झाली आहे. 2014 पासून मिशन इंद्रधनुषचे 12 टप्पे सर्व जिल्ह्यांमध्ये पार पडले. या सर्व टप्प्यांमध्ये 5.46 कोटी मुले आणि 1.32 कोटी गर्भवती महिलांचे लसीकरण झाले आहे.
इतर देशांच्या तुलनेत सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत भारत जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केलेल्या जास्तीत जास्त लसी उपलब्ध करतो.
N.Chitale/P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2034178)
Visitor Counter : 100