आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी घेतला औषधे, सौंदर्यप्रसाधने आणि वैद्यकीय उपकरणांच्या नियमनांचा आढावा

Posted On: 17 JUL 2024 4:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 जुलै 2024

 

'जगाची औषध निर्माण शाळा' या नावलौकिकानुरूप औषध नियमनात जागतिक अग्रणी होण्यासाठी आपल्याला आपली उलाढाल आणि आंतरराष्ट्रीय अपेक्षांनुरूप, जागतिक दर्जाच्या नियामक आराखड्याची गरज आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी म्हटले आहे. त्यांनी आज औषधे, सौंदर्यप्रसाधने आणि वैद्यकीय उपकरणे याविषयीच्या नियमनांचा आढावा घेतला.

औषधांचा अग्रगण्य उत्पादक आणि निर्यातदार म्हणून भारताचे जागतिक स्थान नड्डा यांनी अधोरेखित केले. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने आपल्या क्रियाकलापांमध्ये जागतिक मानके साध्य करण्याच्या कालमर्यादेसह मार्गदर्शक आराखडा  तयार करावा, यावर त्यांनी भर दिला.  भविष्यवेधी  दृष्टिकोन, तांत्रिक अद्ययावतीकरण आणि एकजिनसीपणा यांच्या सर्वोच्च मानकांवर लक्ष केंद्रित करून प्रणाली आधारित उन्नतीकरणाची  गरज त्यांनी व्यक्त केली. औषधे आणि फार्मास्युटिकल्सच्या निर्यातीसाठी, निर्यात होणाऱ्या औषधांचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी योग्य हस्तक्षेपासाठी यंत्रणा तयार केली जावी, यावर त्यांनी भर दिला.

सीडीएससीओच्या (केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था) कामकाजात पारदर्शकतेचे महत्त्व नड्डा यांनी अधोरेखित केले. "जागतिक मानके साध्य करण्यासाठी, आपले  लक्ष सीडीएससीओ आणि औषधे व  वैद्यकीय उपकरण उद्योगातील प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर असणे आवश्यक आहे", असे नड्डा यांनी सांगितले. औषध नियामक संस्था आणि उद्योग या दोघांनीही भारताने उत्पादित केलेल्या आणि विकलेल्या उत्पादनांच्या जागतिक गुणवत्ता मानकांच्या सर्वोच्च निर्देशांकांच्या  पूर्ततेच्या सुनिश्चितीसाठी   पारदर्शकतेच्या सर्वोच्च तत्त्वांवर काम केले पाहिजे, असे ते म्हणाले.

औषध उत्पादनातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्र आणि गुणवत्ता मानके पूर्ण करण्यासाठी लघु उद्योगांना भेडसावणाऱ्या समस्या यांची केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दखल घेतली.  “एमएसएमई क्षेत्राला भेडसावणाऱ्या समस्या समजून घेऊया. एकीकडे त्यांच्या क्षमता व  उत्पादनांची गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी त्यांना पाठबळ पुरवूया  तर दुसरीकडे त्यांच्या नियामक आवश्यकतांची त्यांना पूर्तता करता यावी यासाठी प्रोत्साहन देऊया,'' असे केंद्रीय आरोग्य मंत्री नड्डा यांनी सांगितले.   

 

* * *

S.Kane/S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2033836) Visitor Counter : 12