पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रियात  व्हिएन्ना इथे भारतीय समुदायाला केलेले संबोधन

Posted On: 10 JUL 2024 11:59PM by PIB Mumbai

 

भारत माता की जय!

भारत माता की जय!

भारत माता की जय!

सुरवात करू मी ? ऑस्ट्रियाचे सन्माननीय अर्थव्यवस्था विभाग आणि श्रम मंत्री, भारतीय समुदायाचा माझा सर्व मित्रवर्ग,शुभचिंतक आपणा सर्वाना नमस्कार. 

गुटिन्टाग !

मित्रहो,

ऑस्ट्रियाचा माझा हा पहिलाच दौरा आहे. जो उत्साह, जो उल्हास मी इथे अनुभवत आहे तो खरोखरच अवर्णनीय  आहे. 41 वर्षानंतर भारताचे पंतप्रधान इथे आले आहेत. आपणापैकी अनेक लोक असे असतील ज्यांच्या जन्मापूर्वी इथे भारताचे पंतप्रधान आले असतील. ही प्रतीक्षा थोडी जास्तच दीर्घ झाली असे आपल्याला वाटते ना ? आता ही प्रतीक्षा संपली आहे.आता तर आपण खुश आहात ना मला केवळ सांगण्यासाठी म्हणत आहात की खरोखरच खुश आहात? नक्की ?

आणि मित्रहो,

ही प्रतीक्षाही एका ऐतिहासिक वेळी समाप्त झाली आहे. भारत आणि ऑस्ट्रिया आपल्या मैत्रीची 75 वर्षे साजरी करत आहेत हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना कदाचित माहित नसेल. या शानदार स्वागताबद्दल

चॅन्सेलर कार्ल नेहमर यांचे खूप-खूप आभार. अर्थव्यवस्था विभाग आणि श्रम  मंत्री मार्टिन कोकर यांचेही मी आभार मानतो.ऑस्ट्रियावासी झालेले  भारतीय  ऑस्ट्रियासाठी किती महत्वाचे आहेत,किती खास आहेत  हे त्यांची  इथली उपस्थिती दर्शवते.

मित्रहो,

भौगोलिकदृष्ट्या पाहता भारत आणि ऑस्ट्रिया दोन वेगवेगळ्या टोकावर आहेत. मात्र आपल्यामध्ये अनेक बाबी समान आहेत.लोकशाही दोन्ही देशांना जोडते. स्वातंत्र्य,समानता, बहुलवाद, कायद्याच्या राज्याचा सन्मान ही आपली सामायिक मुल्ये आहेत. दोन्ही देशामधला समाज बहु सांस्कृतिक आणि बहुभाषक आहे.  दोन्ही देश,आपल्या समाजांमध्ये, दोन्ही देशांना विविधता साजरी करण्याची परंपरा आहे आणि आपली ही मुल्ये  प्रतिबिंबित करणारे मोठे माध्यम निवडणूक आहे, ऑस्ट्रियामध्ये काही महिन्यांनी निवडणूक होणार आहे.तर भारतात लोकशाहीच्या उत्सवाचे पर्व आपण नुकतेच अतिशय उत्साहाने, मोठ्या दिमाखाने साजरे केले. भारतात जगातली सर्वात मोठी निवडणूक संपन्न झाली आहे.

मित्रहो,

आज जगभरातले लोक भारतातल्या निवडणुकीविषयी ऐकून आश्चर्यचकित होतात.नुकत्याच झालेल्या निवडणुकीत 650 दशलक्ष पेक्षा जास्त लोकांनी मतदान केले आहे. म्हणजेच कदाचित 65 ऑस्ट्रिया, विचार करा, इतकी मोठी निवडणूक आणि काही तासातच निवडणुकीचे निकालही स्पष्ट होतात.हे भारताची निवडणूक यंत्रणा आणि आपल्या लोकशाहीचे सामर्थ्य आहे. 

मित्रहो,

भारताच्या या निवडणुकीत शेकडो राजकीय पक्षांचे आठ हजाराहून जास्त उमेदवार निवडणूक लढले. या स्तरावरची निवडणूक,इतकी वैविध्यपूर्ण  निवडणूक,तेव्हा देशातल्या जनतेने आपला जनादेश दिला.देशाने काय जनादेश दिला ? साठ वर्षांनतर  एका सरकारला सलग तिसऱ्याऱ्यांदा सेवा करण्याची संधी भारतात मिळाली आहे. आम्ही तर कोविडनंतरच्या काळात जगात चहूकडे राजकीय अस्थैर्य पाहिले आहे.अनेक देशांमध्ये सरकारांना तग धरणे कठीण झाले होते. दुसऱ्यांदा निवडून येणे हे एक प्रकारचे मोठेच आव्हान राहिले आहे.अशा परिस्थितीत भारताच्या जनतेने माझ्यावर, माझ्या पक्षावर,एनडीएवर विश्वास दर्शवला. भारताला स्थैर्य हवे आहे, भारताला सातत्य हवे आहे याचेही हे द्योतक आहे. हे सातत्य मागच्या 10 वर्षांच्या धोरण आणि कार्यक्रमाचे आहे.हे सातत्य सुप्रशासनाचे आहे.हे सातत्य मोठ्या संकल्पांसाठी समर्पित होऊन काम करण्याचे आहे.

मित्रहो,

दोन देशांमधले संबंध हे केवळ  सरकारांमुळे निर्माण होत नाहीत असे माझे नेहमीच मत राहिले आहे. संबंध दृढ करण्यासाठी जन भागीदारी अतिशय आवश्यक असते.म्हणूनच आपणा सर्वांची भूमिका या  संबंधांसाठी मी अतिशय महत्वाची मानतो. दशकांपूर्वी आपण मोसार्ट आणि श्त्रूदल्सची धरती आपलीशी केली.मात्र मातृभूमीचे संगीत आणि स्वाद आजही आपल्या हृदयात कायम आहे. आपण व्हिएन्नाच्या पदपथावर ग्राथ्स, लिंत्स, इंसब्रुक, साल्सबर्ग  आणि दुसऱ्या शहरांमध्ये भारताचे रंग भरले. आपण दिवाळी आणि नाताळ सारख्याच उत्साहाने साजरा करता. तोर्ते आणि लाडू आपण आवडीने करता, खाता आणि दुसऱ्यांनाही खाऊ घालता. ऑस्ट्रियाचा फुटबॉल संघ आणि भारताचा क्रिकेट संघ दोन्हींना आपण तितक्याच उत्साहाने प्रोत्साहन देता.इथल्या कॉफीचा आनंद घेत असतानाच भारतातल्या आपल्या शहरातल्या चहाच्या दुकानाचीही आठवण काढता.

मित्रहो,

भारताप्रमाणेच ऑस्ट्रियाचा  इतिहास आणि संस्कृतीही प्राचीन आहे,झळाळती राहिली आहे. परस्परांशी आपले संबंधही ऐतिहासिक राहिले आहेत आणि त्याचा लाभ दोन्ही देशांना झाला आहे. हा लाभ सांस्कृतिकही आहे आणि वाणिज्यिकही आहे.सुमारे 200 वर्षांपूर्वीच व्हिएन्नाच्या विद्यापीठांमध्ये संस्कृत अध्यापनाची सुरवात झाली होती.1880 मध्ये इंडोलॉजी साठी एका स्वतंत्र अध्यासनाची स्थापना झाल्याने अधिक महत्व आले. आज इथल्या नामवंत इंडोलॉजीस्टना भेटण्याची संधी मला प्राप्त झाली. भारताबाबत त्यांना खूपच रुची असल्याचे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट प्रतीत झाले होते. भारतातल्या अनेक थोर व्यक्तीनाही ऑस्ट्रियामध्ये मोठा स्नेह  प्राप्त झाला.रबिंद्रनाथ टागोर आणि नेताजी सुभाषचंद्र यांच्यासारख्या आपल्या अनेक महान नेत्यांचे व्हिएन्नाने आदरतिथ्य केले आहे आणि गांधीजींच्या शिष्या मीराबेन  यांचा अखेरचा काळ  व्हिएन्नातच गेला आहे.

मित्रहो,

आपले संबंध केवळ संस्कृती आणि वाणिज्य या क्षेत्रापुरतेच नाहीत तर विज्ञानही आपल्याला जोडते. अनेक वर्षांपूर्वी व्हिएन्ना विद्यापीठात आपले नोबेल पुरस्कार विजेते सर व्ही व्ही रमण यांचे व्याख्यान झाले होते.आज नोबेल पुरस्कार विजेते अ‍ॅटोंन झेलिंगर यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली.  क्वांटमने हे दोन्ही थोर शास्त्रज्ञ जोडले गेले आहेत. क्वांटम कॉम्प्युटिंग बाबतचे अ‍ॅटोंन झेलिंगर यांचे काम जगाला प्रेरित आणि प्रोत्साहित करते.

मित्रांनो,

आज भारताविषयी संपूर्ण जगात खूप चर्चा होत आहे, होत आहे की नाही? प्रत्येकाला भारताविषयी जाणून घ्यायचे आहे. तुमचाही अनुभव हाच आहे का? लोक बरेचसे प्रश्न विचारत असतील ना, तुम्हाला? अशा परिस्थितीत भारत आज काय विचार करत आहे? भारत काय करत आहे? याबद्दल अधिक माहितीपूर्ण जग निर्माण करणे महत्वाचे आहे. भारत मानवतेच्या एक षष्ठांश भागाचे प्रतिनिधित्व करतो आणि जागतिक विकासात जवळजवळ तेवढेच योगदान देत आहे. हजारो वर्षांपासून आम्ही जगासोबत ज्ञान आणि कौशल्याची देवाणघेवाण करत आहोत. आम्ही कधीच युद्धं दिलेली नाहीत आणि आम्ही अभिमानाने छाती फुगवून जगाला सांगू शकतो की भारताने जगाला युद्धं दिलेली नाहीत तर बुद्ध दिले आहेत. जेव्हा मी बुद्धांबद्दल बोलतो, तेव्हा याचा अर्थ असा होतो की भारताने नेहमीच शांतता आणि समृद्धी दिली आहे. त्यामुळे 21 व्या शतकातील जगातही भारत ही भूमिका सशक्त करणार आहे. आज जेव्हा जग भारताकडे विश्वबंधू म्हणून पाहते, तेव्हा ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. तुम्हाला देखील प्रत्येक ठिकाणी अभिमानास्पद वाटते की नाही?

मित्रांनो,

जेव्हा तुम्ही भारतात होत असलेल्या वेगवान बदलांबद्दल वाचता आणि ऐकता तेव्हा काय होते? काय वाटते? काय वाटते? मला खात्री आहे मित्रांनो, तुमची छाती देखील 56 इंच झाली असेल. भारत आज पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. 2014 मध्ये जेव्हा मी आलो तेव्हा या सेवा कार्यात, आम्ही दहाव्या क्रमांकावर होतो, मी दस नंबरीम्हणत नाही आहे. आज आपण पाचव्या क्रमांकावर पोहोचलो आहोत. जेव्हा तुम्ही हे सर्व ऐकता तेव्हा तुम्हाला काय वाटते? तुम्हाला अभिमान वाटत नाही का मित्रांनो? आज भारत एक टक्क्याच्या दराने विकास करत आहे. या वेगाने काय होईल ते मी सांगू का? सांगू का? आज आपण 5 व्या क्रमांकावर आहोत, आपण आघाडीच्या तीन जणांमध्ये पोहोचू आणि मित्रांनो, मी देशवासियांना सांगितले होते की, माझ्या तिसऱ्या कार्यकाळात मी देशाला जगातील पहिल्या 3 अर्थव्यवस्थांमध्ये घेऊन जाईन आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की, आपण केवळ सर्वोच्च स्थानी पोहोचण्यासाठीच हे कठोर परिश्रमच करत नाही आहोत, तर आपले ध्येय 2047 आहे. 1947 मध्ये देश स्वतंत्र झाला, 2047 मध्ये देश शताब्दी साजरी करणार आहे. पण ते शतक विकसित भारताचे शतक असेल. भारताचा सर्व प्रकारे विकास होईल. आज आपण आगामी 1000 वर्षांच्या भारताचा भक्कम पाया रचत आहोत.

मित्रांनो,

भारत आज शिक्षण, कौशल्य, संशोधन आणि नवोन्मेष यामध्ये अभूतपूर्व प्रमाणात काम करत आहे. 10 वर्षांत, हा आकडा लक्षात ठेवा... 10 वर्षांत दर दिवशी भारतात दोन नवीन महाविद्यालये उघडली गेली आहेत. पुढे सांगू? दर आठवड्याला एक नवीन विद्यापीठ उघडले गेले आहे. गेल्या वर्षात दररोज 250 हून अधिक पेटंट मंजूर करण्यात आली आहेत. भारत आज जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था आहे. आज जगातील प्रत्येक दहावा युनिकॉर्न भारतात आहे. आज उर्वरित जग जेवढे रिअल-टाइम डिजिटल व्यवहार करते, तेवढे एकट्या भारतात होतात. आमची पेमेंट्स डिजिटल आहेत, आमच्या प्रक्रिया देखील डिजिटल आहेत. भारत कमी कागद, कमी रोकडपरंतु सीमलेस अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहे.

मित्रांनो,

आज भारत सर्वोत्तम, तेजस्वी, सर्वात मोठे आणि सर्वोच्च टप्पे गाठण्यासाठी काम करत आहे. आम्ही आज भारताला Industry 4.O  आणि green future (हरित भविष्य) साठी तयार करत आहोत. 2070 पर्यंत निव्वळ शून्य उत्सर्जनाचे उद्दिष्ट साध्य करण्याचे हरित हायड्रोजन अभियानाचे उद्दिष्ट आहे. आम्ही हरित दळणवळणावर भर देत आहोत. आणि भारताच्या या अभूतपूर्व विकासगाथेचा ऑस्ट्रियालाही फायदा होत आहे. आज भारतात विविध क्षेत्रांमध्ये 150 हून अधिक ऑस्ट्रियन कंपन्या कार्यरत आहेत. यामुळे भारताच्या पायाभूत सुविधांच्या आकांक्षा पूर्ण होण्यास मदत होत आहे. ऑस्ट्रियाच्या कंपन्या भारतात मेट्रो, धरणे, बोगदे यासारख्या अनेक पायाभूत प्रकल्पांमध्ये काम करत आहेत आणि मला आशा आहे की येणाऱ्या काळात येथील कंपन्या आणि येथील गुंतवणूकदार भारतात आपला जास्तीत जास्त  विस्तार करतील.

मित्रांनो,

ऑस्ट्रियामध्ये राहणाऱ्या भारतीयांची संख्या फारशी जास्त नाही. पण ऑस्ट्रियन समाजासाठी तुमचे योगदान प्रशंसनीय आहे. विशेषतः येथील आरोग्य सेवा क्षेत्रात तुमच्या भूमिकेची खूपच प्रशंसा केली जाते. आपण भारतीय care आणि compassion या गुणांसाठी ओळखले जातो. मला आनंद आहे की तुम्ही हे संस्कार आपल्या व्यवसायात इथेही सोबत घेऊन चालत आहात. तुम्ही सर्वजण अशाच प्रकारे ऑस्ट्रियाच्या विकासात भागीदार राहू शकता. इतक्या मोठ्या संख्येने येथे आल्याबद्दल मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आभार मानतो.

मित्रहो,

ऑस्ट्रियाचा हा पहिला दौरा खूपच फलदायी राहिला आहे. पुन्हा एकदा येथील सरकार आणि येथील जनतेचे मी आभार मानतो. तुम्हा सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. मला खात्री आहे, यावेळी 15 ऑगस्ट, पूर्वीचे सर्व जुने विक्रम मोडणारा असला पाहिजे, होईल ना? नक्की होईल ना? माझ्या सोबत बोला

भारत माता कीजय!

भारत माता कीजय!

भारत माता कीजय!

वंदे मातरम!

वंदे मातरम!

वंदे मातरम!

वंदे मातरम!

वंदे मातरम!

वंदे मातरम!

वंदे मातरम!

वंदे मातरम!

वंदे मातरम!

वंदे मातरम!

खूप-खूप आभार!

***

JPS/ST/NC/SP/PK

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2032902) Visitor Counter : 14