आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
जागतिक लोकसंख्या दिवस 2024
कुटुंब नियोजन आणि लोकसंख्या नियंत्रण यासंदर्भात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या प्रतिनिधींशी दूरदृष्य प्रणालीद्वारे साधला संवाद, राज्यमंत्री अनुप्रिया पटेलही उपस्थित
Posted On:
11 JUL 2024 6:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जुलै 2024
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी आज नवी दिल्लीत जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या प्रतिनिधींशी दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला.केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यावेळी उपस्थित होत्या. माता आणि मुलाच्या आरोग्या करिता गर्भधारणेसाठी स्वास्थ्यदायी वेळ आणि योग्य अंतर, या संकल्पनेवर यावेळी चर्चा झाली.
जागतिक लोकसंख्येत भारताची लोकसंख्या एक पंचमांश (1/5) आहे. लोकसंख्यावाढीचे प्रमाण स्थिर करण्याच्या दिशेने काम करण्यासाठी वचनबद्धता म्हणून जागतिक लोकसंख्या दिन पाळण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला."लहान कुटुंबे असतील तरच भारतातील कुटुंबांचे आरोग्य चांगले राखता येऊ शकेल आणि तेव्हाच विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य होऊ शकेल ",असे ते म्हणाले.
कुटुंब नियोजनासाठी निवडीचा अधिकार स्त्रियांना वापरता यावा तसेच नको असलेल्या गर्भधारणेचा भार त्यांच्यावर पडू नये या दृष्टीने केंद्र आणि राज्यांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. विशेषतः ज्या राज्यांमध्ये,जिल्ह्यांमध्ये आणि तालुक्यामध्ये गर्भनिरोधक साधने अपुरी पडत आहेत तिथल्या गरजा भागवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.
"भारतातील 65% पेक्षा जास्त लोकसंख्या प्रजनन वयोगटात येते. त्यांना गर्भनिरोधक साधनांचा पर्याय देणे आणि अनियोजित कौटुंबिक वाढीचा भार पडू नये याची हमी देणे उचित ठरते."असे अनुप्रिया पटेल यांनी सांगितले.
एमपीव्ही अर्थात मिशन परिवार विकास या योजनेची व्याप्ती सुरवातीच्या 146 जिल्ह्यांवरुन वाढवून 340 पेक्षा जास्त जिल्ह्यांवर वाढवण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. जागतिक लोकसंख्या दिन 2024 च्या संकल्पनेवर आधारित हिंदी, इंग्रजी आणि प्रादेशिक भाषांमधील नाविन्यपूर्ण कुटुंब नियोजन मॉडेल “सुगम” आणि कुटुंब नियोजन पोस्टर्सचे अनावरण करण्यात आले.
'सुगम'चा उद्देश सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करणे आणि कुटुंब नियोजनाबाबत आवश्यक जागरूकता निर्माण करणे हा आहे. कुटुंब नियोजनात स्त्री-पुरुषांच्या समान सहभागाबाबत आवश्यक चर्चा करणे, नियोजित पालकत्वाला प्रोत्साहन देणे, स्वास्थ्यपूर्ण वेळ आणि जन्मांमधील अंतर यावर भर आणि उपलब्ध गर्भनिरोधक पर्याय या गोष्टींचा विचार या उपक्रमात केला आहे. कौटुंबिक नियोजनाबाबत जागरूकता निर्माण करणे आणि कुटुंब नियोजनाच्या साधनांचा वापर वाढवणे या उद्देशाने नवीन विकसित रेडिओ स्पॉट्स आणि जिंगल्सही तयार केले असून त्यांचे अनावरणही आज झाले.
आजच्या चर्चेत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील मुख्य आरोग्य सचिव आणि मिशन संचालक दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
कुटुंब नियोजन सेवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची आणि त्यांना आलेल्या अनुभवांची माहिती त्यांनी यावेळी दिली.
N.Chitale/P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2032513)
Visitor Counter : 127