पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी ऑस्ट्रिया येथील भारतीय समुदायाला संबोधित केले

Posted On: 10 JUL 2024 11:59PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ व्हिएन्ना येथे भारतीय समुदायाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित केले.व्हिएन्ना येथे आगमन झाल्यानंतर तेथील समुदायाने विशेष स्नेहाने आणि आपुलकीने  पंतप्रधानांचे स्वागत केले.ऑस्ट्रियाचे श्रम आणि अर्थव्यवस्था विभागाचे मंत्री मार्टिन कोचर देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. संपूर्ण ऑस्ट्रियातील विविध ठिकाणचे भारतीय  या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी भारत आणि ऑस्ट्रिया यांच्यातील द्विपक्षीय संबंध बळकट करण्यासाठी तेथील भारतीय समुदायाने दिलेल्या योगदानाबद्दल स्वतःचे विचार मांडले. ते म्हणाले की, आपले दोन्ही देश त्यांच्यातील राजनैतिक संबंधांची 75 वर्षे साजरी करत असताना घडलेली ही ऑस्ट्रिया भेट खरोखरीच वैशिष्ट्यपूर्ण आहे. दोन्ही देशांची सामायिक लोकशाही तत्वे आणि बहुलतावादी नैतिक मूल्ये यांची उपस्थितांना आठवण करून देत त्यांनी भारतात नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीचा विस्तार, आवाका आणि यश यांचा ठळक उल्लेख केला. या निवडणुकीत भारतीय जनतेने सातत्य राखण्यासाठी मतदान करून आपल्याला ऐतिहासिक अशा तिसऱ्या कार्यकाळासाठी जनादेश दिला असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी गेल्या 10 वर्षांत भारताने साध्य केलेल्या परिवर्तनशील प्रगतीबाबत भाष्य केले. वर्ष 2047 पर्यंत विकसित भारत म्हणजेच संपूर्णपणे विकसित राष्ट्र घडवण्याच्या मार्गावर वाटचाल करत भारत नजीकच्या भविष्यकाळात जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारताच्या वेगवान वाढीच्या मार्गाचा आणि जागतिक पातळीवर सन्मान्य स्टार्ट-अप परिसंस्थेचा लाभ घेत ऑस्ट्रियाचे हरित वृद्धी आणि नवोन्मेष क्षेत्रातील तज्ञ भारताला कशा प्रकारे भागीदार करून घेऊ शकतील याबद्दल देखील त्यांनी त्यांची मते मांडली. भारत हा “विश्वबंधु” देश आहे आणि तो जागतिक प्रगती आणि कल्याणासाठी योगदान देत आहे याकडे देखील त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. तेथील भारतीय समुदाय त्यांच्या नव्या कर्मभूमीमध्ये समृद्ध होत असले तरीही त्यांनी त्यांच्या मातृभूमीशी असलेले सांस्कृतिक आणि भावनिक बंध जोपासणे सुरु ठेवावे असे आवाहन पंतप्रधानांनी उपस्थित भारतीय समुदायाला केले. या संदर्भात त्यांनी भारतीय तत्वज्ञान, भाषा आणि विचारांबाबत ऑस्ट्रियामध्ये असलेल्या गहन बौद्धिक रुचीचा उल्लेख केला.
ऑस्ट्रियामध्ये सुमारे 31000 भारतीय स्थायिक झालेले आहेत. तेथील भारतीय समुदायामध्ये मुख्यतः आरोग्य-सेवा आणि इतर क्षेत्रांमध्ये तसेच बहुपक्षीय संयुक्त राष्ट्र संस्थांमध्ये कार्यरत व्यावसायिकांचा समावेश आहे. ऑस्ट्रिया येथे उच्च शिक्षण घेण्यासाठी गेलेले सुमारे 500 भारतीय विद्यार्थी देखील सध्या तेथे राहत आहेत.


***

JPS/SC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2032376) Visitor Counter : 19