ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड 19 लॉकडाऊन मुळे नुकसान झालेल्या ग्राहकांना यात्रा या ऑनलाईन पर्यटन मंचानं त्यांच्या आरक्षणाच्या रकमेची परतफेड करावी असे निर्देश केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (सी सी पी ए) दिले आहेत


यात्राकडून अद्याप 2.5 कोटी रुपयांहून अधिक रकमेचे परतावे अद्याप प्रलंबित, ग्राहकांना सुमारे 23 कोटी रुपये परत केले

ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन संस्थेने पाच व्यावसायिकांची केली नियुक्ती

Posted On: 09 JUL 2024 3:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 जुलै 2024

 

राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन (1915-टोल फ्री क्रमांक) वरून केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या असे निदर्शनास आले आहे की कोविड 19 लॉकडाऊन च्या काळात रद्द केलेल्या विमान तिकिटांच्या रकमेचा परतावा अद्याप न मिळाल्याच्या अनेक तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. विमान कंपन्यांनी परतफेड न केल्याने ही रक्कम देऊ शकत नसल्याचे कारण अनेक पर्यटन कंपन्यांनी दिल्याचे ग्राहकांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने प्रवासी लीगल सेल विरुद्ध युनियन ऑफ इंडिया (W.P.(C)D.No.10966 of 2020) मध्ये दिनांक 01.10.2020 रोजी दिलेल्या निर्णयात पुढील निर्देश दिले होते: 

"जर कोविड 19 लॉकडाऊनच्या काळात पर्यटन संस्थेमार्फत प्रवासासाठी तिकिटांचे आरक्षण केले असेल, तर अशा सर्व प्रकरणांमध्ये विमान कंपन्यांनी ताबडतोब पूर्ण रकमेची परतफेड करावी. अशी परतफेड झाल्यानंतर एजंटद्वारे प्रवाशांना ही रक्कम ताबडतोब पाठवली जावी."

या निर्देशानुसार सी सी पी ए ने कोविड 19 लॉकडाऊन मुळे रद्द कराव्या लागलेल्या विमान तिकिटांच्या रकमेची परतफेड अद्याप न झाल्याचे निदर्शनास येताच या प्रकारची स्वतः दखल घेत यात्रा या ऑनलाईन पर्यटन मंचावर   कारवाई केली आहे.

या पर्यटन कंपनीला 09.03.2021 रोजी कोविड-19 मुळे प्रभावित आरक्षणाच्या परताव्याबाबत झालेल्या विलंबाबद्दल कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली होती. याचा पाठपुरावा करून सी सी पी ए ने यासंदर्भात कंपनीच्या अनेक सुनावणी घेऊन ग्राहकांना केलेल्या परताव्याच्या प्रक्रियेतल्या प्रगतीचे बारकाईने निरीक्षण केले.

यावर उपाययोजना करण्यासाठी सी सी पी ए ने 8 जुलै 2021 ते 25 जून 2024 या काळात अनेक सुनावण्या आयोजित केल्या होत्या. याचा परिणाम म्हणून यात्रा ऑनलाईन लिमिटेडने आरक्षणाच्या एकूण प्रलंबित परताव्याचे प्रमाण कमी करण्यात उल्लेखनीय प्रगती केली आहे.

वर्ष 2021 मध्ये, 36,276 तिकीट आरक्षणांचे  26,25,82,484 रुपयांचे परतावे प्रलंबित होते. दिनांक  21 जून 2024 पर्यंत, ही संख्या लक्षणीयरीत्या कमी होऊन 4,837 आरक्षणासाठी  2,52,87,098 प्रलंबित परताव्यावर  आली आहे. यात्रा कंपनीने ग्राहकांना सुमारे  87% रक्कम परत केली आहे आणि उर्वरित सुमारे 13% रक्कम ग्राहकांना परत करण्यासाठी आणखी प्रयत्न सुरु आहेत, जेणेकरून सर्व प्रलंबित परताव्यांवर विमानकंपन्यांद्वारे त्वरित आणि कार्यक्षमतेने कार्यवाही केली जाईल. 

वर्ष 2021 मध्ये, विमानकंपन्यांशी संबंधित एकूण 5,771 आरक्षणांसाठी  9,60,14,463 रुपयांचे परतावे प्रलंबित होते.  वर्ष 2024 पर्यंत,यात घट होऊन  यात्रा कंपनीने ही संख्या विमानकंपन्यांशी संबंधित 98 आरक्षणांपोटी 31,79,069 रुपयांवर आणली आहे.  केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने  दिनांक 27.06.2024 च्या आदेशाद्वारे  यात्रा कंपनीशी निगडित  उर्वरित 22 विमान कंपन्यांना  ग्राहकांना 31,79,069 रुपयांची  रक्कम त्वरित परत करण्याचे निर्देश दिले आहेत.

प्राधिकरणासमोर झालेल्या सुनावणीत मेक माय ट्रिप, इझ माय ट्रिप, क्लिअर ट्रिप, इक्सिगो आणि थॉमस कुक यांसारख्या इतर अनेक प्रवासी मंचांनी, कोविड-19 लॉकडाउनमुळे ज्या ग्राहकांची तिकिटे प्रभावित झाली त्या ग्राहकांना संपूर्ण रक्कम परत केली. 

ग्राहकांना वेळेवर आणि सुलभरित्या परतावा मिळावा यासाठी प्राधिकरणाने 27.06.2024 रोजी आदेश जारी केला आहे. त्यानुसार यात्रा कंपनीला राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन इथे समर्पित व्यवस्था उभारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोविड-19 लॉकडाउनशी संबंधित कारणांमुळे रद्द झालेल्या विमानांसाठी त्यांची  प्रलंबित परताव्याची रक्कम दिली जाईल,  ही माहिती उर्वरित 4,837 ग्राहकांना कळवण्यासाठी त्यांना फोन करण्याकरिता राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन येथे पाच विशेष जागांची तरतूद करणे यात्रा कंपनीसाठी आवश्यक आहे. या कामासाठी समर्पित या पाच कर्मचाऱ्यांचा पूर्ण खर्च यात्राने करणे आवश्यक असून हेल्पलाइनचे व्यवस्थापन करणाऱ्या संस्थेकडे  थेट भरणा करणे आवश्यक आहे. 

प्राधिकरणाच्या आदेशामुळे वेळेवर परतावा करण्याचे महत्त्व अधिक ठसवले गेले आहे आणि या सूचनांचे पालन करून सर्व प्रलंबित परताव्यांचे पूर्ण निराकरण सुनिश्चित करण्याचे निर्देश यात्रा कंपनीला देण्यात आले आहेत. 

 

* * *

JPS/Bhakti/SonaliK/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2031710) Visitor Counter : 99