पंतप्रधान कार्यालय
एससीओ राष्ट्र प्रमुख शिखर परिषदेच्या बैठकीमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन
बैठकीची संकल्पना: 'बहुपक्षीय संवाद मजबूत करणे - शाश्वत शांतता आणि विकासासाठी प्रयत्न करणे'
Posted On:
04 JUL 2024 8:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जुलै 2024
शांघाय सहकारी संघटना (एससीओ) शिखर परिषदेमध्ये प्रत्यक्ष उपस्थित असलेले परराष्ट्र मंत्री डॉ.एस जयशंकर यांनी पंतप्रधानांचे भाषण वाचून दाखवले.
जग सध्या भू-राजकीय तणाव, भू-आर्थिक शक्ती आणि भू-तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे होत असलेले मोठे बदल अनुभवत आहे. त्या सर्वांचे व्यापक परिणाम आहेत. भविष्यात त्यापासून तात्काळ आणि संरचनात्मक आव्हाने आणि संधी दोन्ही निर्माण होणार आहेत. जरी आपण त्यावर तोडगा काढला तरी आपण हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, जग खऱ्याखुऱ्या बहुध्रुवीयतेकडे वेगाने वाटचाल करत आहे. अशा परिस्थितीत एससीओ ला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. परंतु आपण सर्वजण किती चांगले परस्पर सहकार्य करतो, यावर त्याचे खरे मूल्य अवलंबून असेल. एससीओ मध्ये आपण या मुद्द्यावर यापूर्वीच चर्चा केली आहे. आपल्या विस्तारित कुटुंबासाठीही हेच लागू आहे.
आव्हानांबद्दल बोलायचे तर, आपल्यापैकी अनेकांसाठी दहशतवाद हा निश्चितपणे अग्रस्थानी असेल. सत्य हे आहे, की काही देश, त्याचा वापर अस्थिरता निर्माण करणारे साधन म्हणून करत आहेत. आपण सर्वांनी सीमेपलीकडचा दहशतवाद अनुभवला आहे. आपण हे स्पष्ट करूया, की कोणत्याही प्रकारच्या आणि स्वरूपातील दहशतवादाचे समर्थन करता येणार नाही, आणि त्याला माफही करता येणार नाही. दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांचा तीव्र निषेध करायला हवा.. सीमापार दहशतवादाला निर्णायक प्रतिसाद आवश्यक आहे आणि दहशतवादाला वित्तपुरवठा आणि दहशतवाद्यांच्या भरतीचा प्रभावीपणे सामना करणे आवश्यक आहे. एससीओ ने कधीही आपल्या वचनबद्धतेपासून फारकत घेता कामा नाही. याबाबत आपण दुटप्पी मापदंड बाळगू शकत नाही.
भौगोलिक अर्थशास्त्राचा विचार केला तर, विविध विश्वासार्ह आणि लवचिक पुरवठा साखळ्या निर्माण करणे, ही काळाची गरज आहे. कोविडच्या अनुभवाने ही मोठी शिकवण दिली आहे. ‘मेक इन इंडिया’ जागतिक विकासाच्या इंजिनाला बळ देईल, आणि जागतिक अर्थव्यवस्थेचे लोकशाहीकरण करायला सहाय्य करेल. भारत क्षमता विकासामध्ये इतरांबरोबर, विशेषत: ग्लोबल साउथच्या देशांबरोबर भागीदारी करण्यासाठी उत्सुक आहे.
तंत्रज्ञान हे आजच्या काळात केवळ आश्वासक नाही, तर ते विकास आणि सुरक्षितता या दोन्ही बाबतीत गेम चेंजर ठरणार आहे. डिजिटल युगात अधिक विश्वास आणि पारदर्शकता आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि सायबर सुरक्षा स्वतःच काही महत्वाच्या समस्या निर्माण करतात. त्याच वेळी, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि डिजिटल आर्थिक समावेशन केवढा मोठा फरक घडवू शकतात, हे भारताने दाखवून दिले आहे. आमच्या एससीओ अध्यक्षपदाच्या काळात या दोन्ही मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. ते एससीओ सदस्य आणि भागीदारांचा समावेश असलेल्या आंतरराष्ट्रीय सहकार्याची व्याप्ती देखील वाढवतात.
आव्हानांचा सामना करण्याच्या निश्चयाबरोबरच सक्रीय राहून एकत्र येत प्रगतीचे मार्ग शोधणे महत्त्वाचे आहे. जगात संतुलन साधण्यासाठी संपर्काच्या नव्या जोडण्या प्रस्थापित करण्याचा मुद्दा सध्या जागतिक चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. त्याला खऱ्या अर्थाने गती देण्यासाठी अनेकांच्या एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे. शेजारी राष्ट्रांमध्ये भेदभाव न करणारे व्यापार व दळणवळणाचे अधिकार निर्माण करण्यासाठी असा पाया रचणे हे राष्ट्रांचे सार्वभौमत्व आणि क्षेत्रीय अखंडतेचा आदर राखणारे ठरेल. एससीओच्या विस्तारित कुटुंबासाठी चाबहार बंदराच्या विकासाबाबत भारत व इराण यांच्यात आम्ही अलीकडे दीर्घकालीन करारामार्फत प्रगती केली आहे. समुद्रकिनारे नसलेल्या मध्य आशियाई देशांसाठी ही अत्यंत महत्त्वपूर्ण बाब असून त्यामुळे भारत आणि युरेशिया यांच्यातील वाणिज्याचा मार्ग बिनधोक करणे शक्य होणार आहे.
या प्रदेशाविषयी बोलताना अफगाणिस्तानचा मुद्दा मी मांडत आहे. अफगाणिस्तानातील जनतेसह आमचे ऐतिहासिक नातेसंबंध आहेत. आमच्या सहकार्याची व्याप्ती विकास प्रकल्प, मानवतावादी सहाय्य, क्षमता बांधणी आणि क्रीडा क्षेत्रात आहे. अफगाणी जनतेच्या गरजा आणि आकांक्षांप्रती भारत संवेदनशील आहे.
सद्यस्थितीतील आंतरराष्ट्रीय अनुक्रमात सुधारणा घडवून आणण्याबाबत एससीओच्या विस्तारित परिवारात सहमत आहे. प्रयत्नांची व्याप्ती संयुक्त राष्ट्रसंघ आणि त्याच्या सुरक्षा परिषदेपर्यंत विस्तारली तरच हे शक्य आहे. त्या दृष्टीने नजीकच्या भविष्यात सर्वानुमते मार्गक्रमणा करणे शक्य होईल, अशी आम्ही आशा करतो.
एससीओच्या आर्थिक विषयपत्रिकेवरील बाबी पुढे नेण्याकरता भारताने महत्त्वाचे योगदान दिले आहे. एससीओ स्टार्टअप मंच आणि स्टार्टअप व नवोन्मेषासाठी विशेष कार्य गट अशा संस्थात्मक व्यवस्था आम्ही निर्माण केल्या आहेत. भारतात 100 युनिकॉर्नसह 130,000 स्टार्टअप आहेत; आमचा हा अनुभव इतरांना उपयुक्त ठरेल.
वैद्यकीय आणि निरामयता पर्यटनाच्या क्षेत्रात, ‘जागतिक आरोग्य संघटने’ने गुजरातमध्ये पारंपरिक औषधांच्या जागतिक केंद्राची स्थापना केली आहे. एससीओमध्ये पारंपरिक औषधांसाठी नवा कार्य गट स्थापन करण्यासाठी भारताने पुढाकार घेतला आहे.
शिक्षण, प्रशिक्षण आणि क्षमता बांधणीला चालना देणे हे भारताच्या आंतरराष्ट्रीय सहयोगाचे आधारस्तंभ आहेत. त्यावर पुढे बांधणी करत राहण्यासाठी, मग ती सी5 भागीदारांसह असो किंवा शेजाऱ्यांना प्राधान्य देणारी असो किंवा विस्तारित शेजाऱ्यांसाठी असो, आम्ही वचनबद्ध आहोत.
निरीक्षक किंवा संवादातील भागीदार म्हणून एससीओशी जोडून घेण्यासाठी उत्सुक देशांमध्ये वाढ होत असल्यामुळे आपल्यातील संवाद आणि सहमती दृढ करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे. इंग्रजी भाषेला कामकाजाची तिसरी भाषा असा दर्जा देणे महत्त्वाचे ठरेल.
एस.सी.ओ. शिखर परिषदेच्या यशस्वी आयोजनाबद्दल आम्ही कझाकस्तानचे अभिनंदन करतो. विश्वबंधू किंवा जगन्मित्र म्हणून भारत सर्व भागीदारांमधील सहयोग दृढ करण्यासाठी कायम प्रयत्नशील राहील. एससीओच्या चीनच्या आगामी अध्यक्षपदाचा कार्यकाळ यशस्वी व्हावा यासाठी आमच्या उत्तमोत्तम शुभेच्छा आहेत.
* * *
S.Kane/Rajshree/Reshma/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2030840)
Visitor Counter : 115
Read this release in:
Tamil
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Hindi_MP
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam