आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

महाराष्ट्रातील झिका विषाणूची प्रकरणे विचारात घेऊन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केली राज्यांसाठी मार्गदर्शक नियमावली


राज्यांना अशी सूचना करण्यात येत आहे की गरोदर मातांची झिका विषाणूच्या संसर्गाच्या दृष्टीने तपासणी करून सातत्याने दक्ष रहावे आणि ज्या गरोदर मातांना झिका विषाणू संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे त्यांच्या गर्भाच्या वाढीवर लक्ष ठेवावे

आरोग्य सुविधा/ रुग्णालये यांनी देखरेख करण्यासाठी आणि आपले संकुल एडीस डासापासून मुक्त ठेवण्यासाठी एका नोडल अधिकाऱ्याला तैनात करावे

राज्यांनी निवासी भाग, कामाची ठिकाणे, शाळा, बांधकाम सुरू असलेल्या जागा, संस्था आणि आरोग्य सुविधांमध्ये कीटकशास्त्रीय देखरेख बळकट करावी आणि रोगवाहक सूक्ष्मजीव प्रतिबंधक उपक्रम अधिक जास्त प्रमाणात राबवावेत

Posted On: 03 JUL 2024 4:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 जुलै 2024

 

महाराष्ट्रात झिका विषाणू संसर्ग झालेले काही रुग्ण आढळल्याचे वृत्त विचारात घेऊन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे आरोग्य सेवा महासंचालक डॉ. अतुल गोयल यांनी देशातील झिका विषाणूच्या स्थितीवर सातत्याने दक्षता बाळगण्याची स्थिती कायम राखण्याची गरज अधोरेखित करणारी मार्गदर्शक नियमावली राज्यांना जारी केली आहे.  

झिकाचा संबंध लागण झालेल्या गरोदर स्त्रीच्या उदरातील गर्भामध्ये  मेंदूची वाढीतील आणि मज्जासंस्थेतील दोष यांच्याशी असल्याने राज्यांना असा सल्ला दिला जात आहे की याबाबत सातत्याने देखरेख करण्यासाठी डॉक्टरांना सावध करावे. राज्यांना असे आवाहन करण्यात येत आहे की विषाणूसंसर्गाने प्रभावित भागातील आरोग्य सुविधा केंद्रांना किंवा बाधित भागातील रुग्णांवर उपचार करणाऱ्या आरोग्य केंद्रांना  झिका विषाणू संसर्गासाठी गर्भवती महिलांची तपासणी करावी, झिका विषाणूची लागण झालेल्या गर्भवती मातांच्या गर्भाच्या वाढीवर लक्ष ठेवावे आणि केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार काम करावे, असे निर्देश द्यावेत. आरोग्य सुविधा/ रुग्णालये यांनी देखरेख करण्यासाठी आणि आपले संकुल एडीस डासापासून मुक्त ठेवण्यासाठी एका नोडल अधिकाऱ्याला तैनात करावे, असे निर्देश देखील राज्यांना देण्यात आले होते.  

राज्यांनी निवासी भाग, कामाची ठिकाणे, शाळा, बांधकाम सुरू असलेल्या जागा, संस्था आणि आरोग्य सुविधांमध्ये कीटकशास्त्रीय देखरेख बळकट करावी आणि रोगवाहक सूक्ष्मजीव प्रतिबंधक उपक्रम अधिक जास्त प्रमाणात राबवावेत यावर भर दिला जात आहे. झिका हा इतर कोणत्याही विषाणूजन्य संसर्गासारखा असून बहुतेक प्रकरणे लक्षणे नसलेली आणि सौम्य असल्याने समाजामध्ये भीती कमी करण्यासाठी समाज माध्यमे आणि इतर मंचांवर सावधगिरीच्या आयईसी संदेशांद्वारे जागरूकता वाढवण्याचे आवाहन देखील राज्यांना करण्यात येत आहे. मात्र,  या विषाणूचा संबंध गर्भाच्या वाढीशी असल्याचे सांगितले जात असले तरी देखील 2016 पासून देशात झिका विषाणू संबंधित मेंदूवाढदोषाची प्रकरणे आढळलेली नाहीत. कोणत्याही प्रकारचा उद्रेक/फैलाव वेळेवर शोधण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी, राज्यस्तरीय अधिकाऱ्यांना दक्ष, सज्ज राहण्याचा आणि सर्व स्तरांवर योग्य लॉजिस्टिक उपलब्धता सुनिश्चित करण्याची सूचना करण्यात आली आहे.  राज्यांना देखील असे आवाहन करण्यात आले आहे की असे प्रकरण आढळल्यास तातडीने त्याची माहिती एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रम(IDSP) आणि नॅशनल सेंटर फॉर व्हेक्टर बोर्न डिसिजेस कंट्रोल (NCVBDC) यांना कळवावी.

झिका चाचणी करण्याची सुविधा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV), पुणे,   राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC), दिल्ली आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या  काही निवडक विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळांमध्ये  उपलब्ध आहे.त्यांचा उच्च स्तरावर आढावा घेतला जात आहे.

आरोग्य सेवा महासंचालनालयाने  या वर्षाच्या सुरुवातीला 26 एप्रिल रोजी एक मार्गदर्शक सूचना जारी केली होती आणि संचालक, राष्ट्रीय व्हेक्टर प्रणित रोग नियंत्रण कार्यक्रम (NCVBDC) यांनी फेब्रुवारी आणि एप्रिल 2024 मध्ये राज्यांना एकाच वेक्टर डासाद्वारे पसरणाऱ्या झिका, डेंग्यू आणि चिकुनगुनियाबद्दल पूर्वसूचना देण्यासाठी दोन मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या.

केंद्रीय आरोग्य मंत्रालय परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

 

पार्श्वभूमी:

झिका हा डेंग्यू आणि चिकुनगुनिया सारखा  एडिस डासांमुळे पसरणारा विषाणूजन्य आजार आहे. हा  आजार विशेष घातक नाही.तथापि, झिका प्रभावित गर्भवती महिलांमध्ये जन्मलेल्या बाळांच्या मायक्रोसेफली (मेंदूचा आकार लहान असणे) या स्थितीशी संबंधित आहे; ही एक प्रमुख चिंता आहे.  

भारतामध्ये 2016 मध्ये गुजरात राज्यात प्रथम झिका विषाणूच्या संसर्गाची नोंद झाली होती. तेव्हापासून, तमिळनाडू, मध्य प्रदेश, राजस्थान, केरळ, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि कर्नाटक या इतर अनेक राज्यांतून अनेक रुग्णांना संसर्ग झाल्याची नोंद आहे.

2024 मध्ये (2 जुलैपर्यंत), महाराष्ट्रात पुणे (6), कोल्हापूर (1) आणि संगमनेर (1) येथे आठ  रुग्णांची नोंद झाली आहे.

 

* * *

S.Kane/ShaileshP/Sampada/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2030407) Visitor Counter : 62