गृह मंत्रालय

दुसरी  गिर्यारोहण मोहिम 'विजय' यशस्वी करून परतलेल्या एनडीआरएफचे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी नवी दिल्लीत केले स्वागत

Posted On: 29 JUN 2024 4:07PM by PIB Mumbai

 

दुसरी  गिर्यारोहण मोहिम 'विजय' यशस्वी करून परतलेल्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल-एनडीआरएफचे, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज नवी दिल्ली येथे स्वागत केले.  एनडीआरएफच्या पथकाने  'विजयया दुसऱ्या गिर्यारोहण मोहिमेत 21,625 फूट उंचीच्या मणिरंग  पर्वतावर यशस्वी चढाई केली.

गृहमंत्र्यांनी छायाचित्रे आणि आपत्ती व्यवस्थापन उपकरणे प्रदर्शनालाही भेट दिली. या प्रदर्शनात एनडीआरएफच्या जवानांनी बचाव मोहिमेदरम्यान वापरलेली अत्याधुनिक उपकरणे आणि तंत्रज्ञान मांडण्यात आले  आहे. भारत आणि तुर्कीमधील  विविध आपत्ती प्रतिसाद घटनांमध्ये सहभागी असलेल्या बचाव पथकाच्या प्रमुखांनी  यावेळी माहिती दिली.  पुराच्या पाण्यातून मार्ग काढत केलेले बचावकार्य , भूस्खलन, कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखालील   शोध आणि बचावकार्य, केमिकल बायोलॉजिकल रेडिओलॉजिकल न्यूक्लियर रिस्पॉन्स मेकॅनिझम (सीबीआरएन), पर्वत बचाव मोहीम, बोअरवेल बचाव मोहीम , चक्रीवादळ यांसारख्या विविध मोहिमांमध्ये एनडीआरएफने केलेल्या प्रशंसनीय कार्याची  केंद्रीय गृहमंत्र्यांनी आवर्जून माहिती घेतली. उपकरणांच्या उत्तम वापरासाठी त्यांत सुधारणा करण्यासाठी एनडीआरएफने हाती घेतलेले विविध उपक्रम त्यांना दाखवण्यात आले. यावेळी केंद्रीय गृहसचिव आणि एनडीआरएफचे महासंचालक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

21,625 फूट उंच मणिरंग  पर्वतावर यशस्वी चढाई केल्याबद्दल  अमित शहा यांनी एनडीआरएफच्या  जवानांचे कौतुक केले. एवढ्या उंचीवर जाण्यासाठी अदम्य साहस दाखवण्याचा निर्णय घेणाऱ्या आपल्या जवानांच्या अशा कठीण मोहिमा, व्यक्ति आणि दल या दोन्हींची कार्यक्षमता वाढवतात असे ते म्हणाले. अशा कठीण मोहिमांमुळे लक्ष्य साध्य करण्याची, विजय प्राप्त करण्याची आणि अकल्पनीय संकटांवर  मात करत लक्ष्य गाठण्याची सवय लागते असे गृहमंत्री म्हणाले. विजयाची सवयच व्यक्तीला  आणि दलाला  महान बनवते आणि व्यक्तीला जीवनात योग्य मार्गावर वाटचाल करण्याचा, विजयी होण्याचाआणि आत्मविश्वास वाढवण्याचा सर्वात मोठा प्रेरणा स्त्रोत असते, असे ते म्हणाले.

या मोहिमेत काही जवानांना आज यश मिळाले असले तरीही खऱ्या अर्थाने हे यश संपूर्ण राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे आहे, असे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले.  या जवानांनी केवळ मणिरंग पर्वताचे शिखर काबीज केले नाही तर संपूर्ण दलाचे मनोबल वाढवण्याचे काम केले आहे, असेही ते म्हणाले.  गिर्यारोहण हे केवळ कौशल्य नसून जगण्याची कला आहे, आणि या कलेवर प्रभुत्व मिळवणे हे संपूर्ण आयुष्याचे शिक्षण मिळवण्यासारखे आहे, असे अमित शहा म्हणाले.  केंद्रीय गृहमंत्र्यांनी ऑपरेशन विजयमध्ये यश मिळविलेल्या 35 जवानांचे आणि एनडीआरएफचे महासंचालक यांचे या कामगिरीबद्दल अभिनंदन केले.  या जवानांनी 21,600 फुटांपेक्षा जास्त उंचीवर तिरंगा फडकवणे, हे संपूर्ण दलासाठी मोठे यश असल्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले.  यशाचे शिखर गाठायचे असेल, तर आयुष्यभर सातत्याने ध्येयाचा पाठलाग केला, तरच यश मिळते, असे ते म्हणाले.

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या कर्मचाऱ्यांसाठी जोखीम आणि मेहनत भत्त्याची मागणी दीर्घ काळ प्रलंबित होती, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने काल ही मागणी मान्य केली आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिली.  आता एन डी आर एफ च्या 16,000 कर्मचाऱ्यांना 40% दराने जोखीम आणि मेहनत भत्ता मिळेल, असे त्यांनी सांगितले. आता केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) चा एक चमू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये सर्व मैदानी आणि इनडोअर खेळांमध्ये सहभागी होईल, असा निर्णय मोदी सरकारने घेतल्याची माहिती शहा यांनी दिली.  यासाठी संपूर्ण आराखडा तयार करण्यात आला असून लवकरच भारत सरकार त्याच्या अंमलबजावणीचे प्रारूप तयार करेल, असे ते म्हणाले.  सरकारला केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये खेळ संस्कृतीचा अंतर्भाव करून ती रूजवायची आहे, असेही ते म्हणाले.

***

M.Pange/S.Kane/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2029520) Visitor Counter : 42