शिक्षण मंत्रालय
शिक्षण मंत्रालयाचे देशव्यापी तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था अभियान
Posted On:
24 JUN 2024 6:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 जून 2024
तंबाखूचा वापर हे भारतातील मृत्यू आणि रोगांना प्रतिबंध करता येण्याजोग्या मुख्य कारणांपैकी एक असून त्यामुळे दरवर्षी देशात जवळपास 13 लाख 50 हजार मृत्यू होतात. भारत हा तंबाखूचा जगातील दुसऱ्या क्रमाकांचा सर्वात मोठा उपभोक्ता आणि उत्पादक आहे. जागतिक युवा तंबाखू सर्वेक्षण 2019 अनुसार, देशभरात 13 ते 15 वर्षे वयोगटातील 8.5 टक्के शालेय विद्यार्थी विविध प्रकारे तंबाखूचे सेवन करतात.
विविध प्रकारच्या तंबाखू उत्पादनांची शाळांच्या परिसरातील सहज उपलब्धता हे उपरोल्लेखित परिस्थितीमागील मुख्य कारणांपैकी एक मानले जाते.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचा भाग म्हणून भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने अल्पवयीन व युवा वर्गातील लोकसंख्येला तंबाखूचे सेवन करण्यापासून परावृत्त करण्यासाठी तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था मार्गदर्शक सूचनावली जारी केली आहे.
शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षऱता विभागाने तंबाखूमुक्त शिक्षण संस्था अभियानाच्या अंमलबजावणीबाबत पुस्तिका जागतिक तंबाखूविरोधी दिवस 31 मे 2024 रोजी प्रसिद्ध केली. देशभरातली शैक्षणिक संस्थांनी या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करून तंबाखूमुक्त परिसर (#Tobacco Free Area) बनावे, असे यामागे उद्दीष्ट आहे.
तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था अभियानाच्या प्रसाराला चालना देत सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करावी याकरता शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या सचिवांनी सविस्तर मार्गदर्शनपर सूचना जारी केली आहे. त्यामध्ये विद्यार्थी व युवांना तंबाखूसेवनापासून परावृत्त करण्यासाठी शाळा व आजूबाजूच्या परिसरात राबवण्याजोगे विविध उपक्रम सुचवले आहेत.
- शैक्षणिक संस्थेच्या आवारात नियुक्त व्यक्तीच्या माहितीसह ‘तंबाखूमुक्त क्षेत्र’ चिन्ह प्रदर्शित करणे.
- नियुक्त केलेल्या व्यक्तीच्या माहितीसह शैक्षणिक संस्थेच्या प्रवेशद्वारावर आणि सीमाभिंतीवर "तंबाखूमुक्त शिक्षण संस्था" चिन्ह प्रदर्शित करणे.
- शैक्षणिक संस्थेच्या आवारात सिगारेट किंवा बिडीचे बुडखे तसेच टाकून दिलेले गुटखा आणि तंबाखूचे पाऊच, थुंकण्याचे डाग यांसारखे तंबाखूच्या वापराचे कोणतेही पुरावे नसावेत.
- शैक्षणिक संस्थांच्या आवारात तंबाखूमुळे होणाऱ्या हानीबाबतची भित्तिचित्रे आणि इतर जागरूकता सामग्री प्रदर्शित केली जावी
- शैक्षणिक संस्थांमध्ये दर 6 महिन्यांनी किमान एक तंबाखू विरोधी उपक्रम आयोजित करणे.
- 'टोबॅको मॉनिटर ' चे नामांकन तसेच त्यांची नावे, पदनाम आणि संपर्क क्रमांक फलकावर नमूद करणे आवश्यक आहे.
- शैक्षणिक संस्थांच्या आचारसंहितेत "तंबाखू विरोधी मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश करणे.
- शैक्षणिक संस्थेच्या सीमाभिंत किंवा कुंपणाच्या बाह्य मर्यादेपासून 100 यार्ड क्षेत्र चिन्हांकित करणे.
- शैक्षणिक संस्थेच्या 100 यार्डच्या आतील दुकानात कोणत्याही प्रकारची तंबाखू उत्पादने विकता येणार नाहीत.
- तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था (ToFEI) च्या अंमलबजावणी नियमावलीच्या परिशिष्ट-III नुसार तंबाखूच्या वापराविरुद्ध प्रतिज्ञा घेणे.
याशिवाय, पथनाट्य, व्हिडीओ फिल्म्स, स्वयंसेवी संस्थांद्वारे चर्चा, तज्ञ व्यक्ती इत्यादींद्वारे व्यसनमुक्तीबद्दल जागरूकता संदेश पसरवण्यासाठी नागरी समाजाच्या भूमिकेवरही त्यांनी भर दिला. त्यानुसार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना तंबाखू प्रतिबंध आणि सेवनाबाबत जागरूकता पसरवण्यासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यरत विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि कर्मचारी यांच्यासह सर्व हितधारकांना सहभागी करुन घेण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठका, राष्ट्रीय समाज सेवा आणि विद्यांजली- तज्ञ व्यक्तींना जोडण्यासाठी शालेय स्वयंसेवक उपक्रम, या क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्थासारख्या माध्यमांचा उपयोग करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
ToFEI नियमावलीची लिंक: https://dsel.education.gov.in/sites/default/files/guidelines/im_tofel.pdf
* * *
S.Kane/Reshma/Shraddha/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2028343)