पंतप्रधान कार्यालय

जम्मू आणि काश्मीरमध्ये श्रीनगर येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 21 JUN 2024 1:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 जून 2024

 

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मला योग आणि साधनेची भूमी असलेल्या काश्मीरला भेट देण्याचे सौभाग्य लाभले आहे. काश्मीर आणि श्रीनगरमधले हे वातावरण, ही ऊर्जा आणि अनुभूती, योगसाधनेतून जी शक्ती आपल्याला मिळते, ती श्रीनगरमध्ये जाणवते आहे. योग दिनानिमित्त मी आज काश्मीरच्या या भूमीवरून देशातील सर्व लोकांना आणि जगाच्या कानाकोपऱ्यातील योगसाधना करणाऱ्या सर्वांना योग दिनानिमित्त शुभेच्छा देतो.

मित्रहो,

आंतरराष्ट्रीय योग दिनाचा 10 वर्षांचा ऐतिहासिक प्रवास पूर्ण झाला आहे. 2014 साली संयुक्त राष्ट्रांसमोर मी आंतरराष्ट्रीय योग दिनाचा प्रस्ताव ठेवला होता. भारताच्या या प्रस्तावाला 177 देशांनी पाठिंबा दिला होता आणि हा एक विक्रम होता. तेव्हापासून योग दिन सातत्याने नवनवीन विक्रमांची नोंद करत आहे. 2015 साली दिल्लीत कर्तव्य पथावर 35 हजार लोकांनी एकत्र योगासने केली होती. तो सुद्धा एक जागतिक विक्रम होता. गेल्या वर्षी मला अमेरिकेमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात योग दिनाच्या आयोजनाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती. या आयोजनात 130 पेक्षा जास्त देशांमधले लोक सहभागी झाले होते. योगविद्येचा हा प्रवास अखंड सुरू आहे. भारतात आयुष विभागाने योग अभ्यासकांसाठी योग प्रमाणन मंडळ तयार केले आहे. आज देशातील 100 पेक्षा जास्त मोठ्या संस्थांना या मंडळाकडून मान्यता मिळाली आहे, याचा मला मनापासून आनंद वाटतो. परदेशातील 10 मोठ्या संस्थांना सुद्धा भारताच्या या मंडळाकडून मान्यता मिळाली आहे.

मित्रहो,

आज जगभरात योगसाधना करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे, योगविद्येबद्दलचे आकर्षणही वाढते आहे. सर्वसामान्यांनाही योगविद्येची उपयुक्तता पटू लागली आहे. मी जगातल्या, जागतिक स्तरावरच्या सर्व नेत्यांना भेटत असतो. जिथे मी जातो, तिथे माझ्याशी योग विद्येबद्दल संवाद साधणारा कोणी भेटत नाही, असे सहसा होत नाही. जगातील सर्व ज्येष्ठ नेते, जेव्हा जेव्हा त्यांना संधी मिळते, तेव्हा माझ्यासोबत योगविद्येबाबत हमखास चर्चा करतात आणि मोठ्या कुतूहलाने प्रश्न सुद्धा विचारतात. जगातील अनेक देशांमध्ये योगसाधना हा दैनंदिन जीवनाचा एक भाग होतो आहे. मला आठवते, मी 2015 साली तुर्कमेनिस्तानमध्ये योग केंद्राचे उद्घाटन केले होते. तिथे आज योगविद्या अतिशय लोकप्रिय झाली आहे. तुर्कमेनिस्तानच्या स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्येसुद्धा योगविद्या उपचार पद्धतीचा समावेश करण्यात आला आहे. सौदी अरेबियाने तर आपल्या शिक्षण व्यवस्थेत योगविद्येचा समावेश केला आहे. मंगोलियामध्ये सुद्धा मंगोलियन योग फाउंडेशन अंतर्गत अनेक योग शाळा चालवल्या जात आहेत. युरोपीय देशांमध्येही योगसाधनेचे प्रमाण झपाट्याने वाढते आहे. जर्मनीमध्ये आजघडीला सुमारे 15 दशलक्ष लोक योगसाधक झाले आहेत. तुम्हाला आठवत असेल की यावर्षी भारतात फ्रान्समधील 101 वर्षीय महिला योग शिक्षिकेला पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या कधीच भारतात आल्या नव्हत्या, पण त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य योगविद्येच्या प्रचारासाठी समर्पित केले आहे. आज जगातील मोठमोठ्या संस्था आणि विद्यापीठांमध्ये योगविद्येवर संशोधन होते आहे, शोधनिबंध प्रकाशित होत आहेत.

मित्रहो,

मागच्या दहा वर्षांमध्ये योगविद्येचा विस्तार झाल्यामुळे योगविद्येशी संबंधित संकल्पनाही बदलल्या आहेत. योगविद्या आता मर्यादित परिघातून बाहेर येत आहे. आज जग योगविद्येवर आधारित एक नवीन अर्थव्यवस्था विकसित होताना पाहते आहे. भारतात ऋषिकेश, काशीपासून केरळपर्यंत योगविद्या पर्यटनाचा नवा प्रकार रूळताना दिसतो आहे. जगभरातून पर्यटक भारतात येत आहेत कारण त्यांना भारतात अस्सल योगविद्या शिकायची आहे. आज योगसाधनागृहे आकार घेत आहेत. योगसाधना रिसॉर्ट उभारले जात आहेत. विमानतळ आणि हॉटेल्समध्ये योगसाधनेसाठी समर्पित सुविधा निर्माण केल्या जात आहेत. बाजारात योगसाधनेसाठी उपयुक्त डिझायनर कपडे, पोशाख, उपकरणे येत आहेत. लोक आता आपल्या तंदुरूस्तीसाठी वैयक्तिक योगविद्या प्रशिक्षकांची नियुक्ती करत आहेत. कर्मचाऱ्यांना निरोगी ठेवण्याचा उपक्रम म्हणून कंपन्या योगविद्या आणि माइंडफुलनेस सारखे कार्यक्रम सुद्धा राबवत आहेत. या सर्व घडामोडींमुळे युवा वर्गासाठी नवीन संधी, युवा वर्गासाठी रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत.

मित्रहो,

'योगसाधना स्वत:साठी आणि समाजासाठी' ही या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना आहे. जागतिक हित जपणारा सक्षम घटक म्हणून जग योगसाधनेकडे पाहत आहे. योगसाधना आपल्याला भूतकाळातील ओझे झुगारून देत वर्तमानात जगण्यास मदत करते. ही साधना आपल्याला स्वतःशी आणि आपल्या सर्वात गहिऱ्या भावनांशी जोडते. ही साधना मन, शरीर आणि आत्मा यांचे एकत्व साधते. आपले कल्याण आपल्या सभोवतालच्या जगाच्या कल्याणाशी निगडीत आहे, हे समजण्यास योगसाधना आपल्याला मदत करते. जेव्हा आपण मनातून शांत असू, तेव्हाच आपला सकारात्मक प्रभाव जगावर होऊ शकेल.

योगसाधना ही केवळ शैली नाही तर शास्त्र आहे. माहिती विस्फोटाच्या आजच्या या युगात सर्वत्र माहिती स्रोतांचा महापूर आलेला आहे. अशा परिस्थितीत एखाद्या विशिष्ट विषयावर लक्ष केंद्रित करणे, हे मानवी मेंदूसाठी एक मोठे आव्हान ठरते आहे. योगसाधना यावर सुद्धा उपाय सुचवते. एकाग्रता ही मानवी मनाची सर्वात मोठी ताकद आहे, हे आपल्याला माहीत आहे. आपली ही क्षमता योग आणि ध्यानाद्वारे देखील वृद्धिंगत होते. त्यामुळेच आज सैन्यापासून खेळापर्यंत सर्वच क्षेत्रांमध्ये योगसाधनेचा समावेश केला जात आहे. अंतराळ कार्यक्रमात प्रशिक्षण घेतलेल्या अंतराळवीरांना योगसाधना आणि ध्यानधारणेचे प्रशिक्षणही दिले जाते. यामुळे उत्पादकता वाढते आणि तग धरण्याची क्षमता देखील वाढते. आजकाल अनेक तुरुंगातील कैद्यांकडूनही योगासने करून घेतली जात आहेत, जेणेकरून ते आपले मन सकारात्मक विचारांवर केंद्रित करू शकतील. म्हणजेच योगसाधना समाजात सकारात्मक बदलासाठी नवीन मार्ग तयार करत आहे.

मित्रहो,

योगसाधनेची ही प्रेरणा आपल्या सकारात्मक प्रयत्नांना उर्जा देत राहील, असा विश्वास मला वाटतो.

मित्रहो,

आज पावसामुळे जरा उशीर झाला, पण कालपासून मी संपूर्ण जम्मू आणि काश्मीरमध्ये, श्रीनगरमध्ये योगासनांप्रति आकर्षण अनुभवतो आहे.  ज्या उत्साहाने लोक योगासने करण्यास उत्सुक आहेत, ते पाहता जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनाला नवे बळ देण्याची ही चांगली संधी असल्याचे दिसते आहे. आजच्या या कार्यक्रमानंतर मी योगसाधनेशी संबंधित लोकांची निश्चितच भेट घेईन. पावसामुळे आज या भागात आपल्याला हा कार्यक्रम करावा लागतो आहे. पण जम्मू-काश्मीरमध्ये 50-60 हजार लोक योगसाधनेच्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत, ही मोठी गोष्ट आहे, असे मला वाटते, आणि म्हणूनच मी जम्मू काश्मीरच्या लोकांचे खूप खूप अभिनंदन करतो. त्याचबरोबर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जगभरातील योगप्रेमींना माझ्या खूप खूप शुभेच्छा.

अनेकानेक आभार!

 

* * *

S.Kane/M.Pange/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2027364) Visitor Counter : 28