आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

देशभरात जागतिक सिकलसेल आजार जागरूकता दिन साजरा


राष्ट्रीय सिकलसेल ॲनिमिया जनजागृती दिनाअंतर्गत देशभरात 17 राज्ये आणि 343 जिल्ह्यांमध्ये 44,751 कार्यक्रमांचे आयोजन

Posted On: 20 JUN 2024 5:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 जून 2024
 

देशभरात 19 जून रोजी जागतिक सिकलसेल आजार (एससीडी) जागरूकता दिनानिमित्त,या आजाराबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि सिकलसेल रोगाचा प्रसार थांबवण्यासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

गेल्या वर्षी राष्ट्रीय सिकलसेल ॲनिमिया निर्मूलन मोहीम (एनएससीएईएम) सुरू झाल्यापासून, आजमितीस एकूण 3,39,77,877 तपासणी अहवाल पोर्टलवर अपलोड केले गेले आहेत आणि राज्यांनी एकूण 1,12,01,612 सिकलसेल स्थिती ओळखपत्रे वितरित केली आहेत.

सिकलसेल दिनानिमित्त, एनएससीएईएम अंतर्गत देशभरात  जास्त भार असलेल्या 17 राज्यांमध्ये आणि 343 जिल्ह्यांमध्ये 44,751 कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांदरम्यान हाती घेण्यात आलेल्या उपक्रमांचा एक भाग म्हणून, 6,15,806 व्यक्तींची सिकलसेल रोगासाठी तपासणी करण्यात आली आणि तपासणी केलेल्या लाभार्थ्यांना 2,59,193 सिकलसेल ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले.

सिकलसेल आजाराचे निर्मूलन करण्याच्या केंद्र सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करताना, “जागरूकता निर्माण करणे, सार्वत्रिक तपासणी, लवकर निदान आणि योग्य काळजी यासारख्या पैलूंवर सरकार काम करत आहे” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निदर्शनास आणले. सरकार या क्षेत्रात तंत्रज्ञानाचाही उपयोग करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

सरकार सिकलसेल रोगाचा सामना करण्यासाठी "होप थ्रू प्रोग्रेस: ॲडव्हान्सिंग ग्लोबल सिकलसेल केअर आणि ट्रीटमेंट" या मंत्राने काम करत असल्याचा पुनरुच्चार केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी केला. "आजाराच्या लवकर निदानास प्रोत्साहन देणे, उपचारांच्या उपलब्धतेची खातरजमा करणे आणि प्रभावित झालेल्यांच्या काळजीची गुणवत्ता वाढवणे यावर सरकारचे प्रयत्न लक्ष केंद्रित करतात" असे त्यांनी अधोरेखित केले.

काल सुरू झालेले जागृती उपक्रम पुढील 15 दिवस (19 जून ते 3 जुलै) 17 निवडक एससीडी राज्यांमधील 343 जिल्ह्यांतील सर्व सुविधा केंद्रांवर सुरू राहतील. पुढील 15 दिवसांसाठी 10,00,000 व्यक्तींची तपासणी करून तपासणी केलेल्या व्यक्तींना 3,00,000 सिकलसेल स्थिती ओळखपत्रांचे वितरण करण्याचे उद्दिष्ट आहे.

जिल्हास्तरीय कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त रुग्णांचे समुपदेशन करणे आणि जनजागृती उपक्रम राबवणे यांचा समावेश असेल. यासोबतच दर्जेदार उपचार आणि पाठपुरावा करून व्यवस्थापनासाठी जोरदार प्रयत्न केले जातील.

आदिवासी व्यवहार मंत्रालयाला (एमओटीए) त्याच्या विविध जागरुकता-निर्मिती उपक्रमांमध्ये पाठिंबा देणे हे या कार्यक्रमांचे मुख्य उद्दिष्ट आहे.

 


S.Patil/V.Joshi/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 



(Release ID: 2027119) Visitor Counter : 26