माहिती आणि प्रसारण मंत्रालय
कोणत्याही प्राण्याविषयी जनमनात असलेले वलय त्याचा सिनेमाच्या पडद्यावरचा अवधी ठरवते : मिफच्या मास्टरक्लासमध्ये सुप्रसिद्ध वन्यजीव चित्रपट निर्माते आणि सिनेमॅटोग्राफर अल्फोन्स रॉय यांचे प्रतिपादन
प्राणी, निसर्ग आणि त्यांची शांतता यांना चित्रिकरणापेक्षा अधिक प्राधान्य हवे : अल्फोन्स रॉय
“आदिवासींच्या ज्ञानसाठ्यातून जंगलाची कला शिकणे आणि त्यातून प्रेरणा घेणे महत्त्वाचे”
Posted On:
18 JUN 2024 4:57PM by PIB Mumbai
मुंबई, 18 जून 2024
सुप्रसिद्ध वन्यजीव चित्रपट निर्माते आणि सिनेमॅटोग्राफर अल्फोन्स रॉय यांनी म्हटले आहे की, कोणत्याही प्राण्याविषयी जनमनात असलेले वलय बहुतेकदा त्या प्राण्याचे चित्रीकरण होण्याची तसेच त्याच्या पडद्यावरील दर्शनाचा कालावधीची शक्यता ठरवत असते . 18 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात “वन्यजीवनाचा शोध : भारतीय वन्यजीवन माहितीपट आणि संवर्धन प्रयत्न” या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या मास्टरक्लासमध्ये ते बोलत होते. भारतीय वन्यजीवन आणि त्याच्या संवर्धनासाठीचे उपक्रम यांच्याशी संबंधित माहितीपटांच्या निर्मितीसाठीच्या जटील प्रक्रियेबाबत या सत्रात विचारमंथन करण्यात आले.
अल्फोन्स रॉय पुढे म्हणाले की, दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमांचे निर्माते पक्षी अथवा इतर लहान प्रजातींपेक्षा वाघ, सिंह अथवा निळा देवमासा यांच्याशी संबंधित कार्यक्रमांमध्ये अधिक रुची घेतात. “वन्यजीवनावर आधारित चित्रपटांच्या बाबतीत त्या त्या प्राण्याविषयीच्या आकर्षणावर अवलंबून असलेली एक विशिष्ट श्रेणी व्यवस्था अस्तित्वात आहे,” ते पुढे म्हणाले.
या क्षेत्रात ध्यासाला सर्वाधिक महत्त्व आहे हे लक्षात ठेवावे असा सल्ला त्यांनी उदयोन्मुख वन्यजीव चित्रपट निर्मात्यांना दिला. “जगात अशी कोणतीही जागा नाही ज्या ठिकाणी तुम्ही वन्यजीव चित्रपट निर्मिती संपूर्णपणे शिकू शकाल. यासाठी वन्य जीवनाबद्दल पराकोटीची आवड असणे गरजेचे आहे, आणि अत्यंत समृध्द जैवविविधता असलेला भारत हा देश यासाठी अत्यंत योग्य जागा आहे,” ते म्हणाले.
(सुप्रसिद्ध वन्यजीव चित्रपट निर्माते आणि सिनेमॅटोग्राफर अल्फोन्स रॉय 18 व्या मिफमध्ये मास्टरक्लास घेत असताना)
यावेळी बोलताना त्यांनी नैतिक चित्रपट निर्मितीच्या महत्त्वावर अधिक भर दिला. या क्षेत्रात चित्रिकरणापेक्षा, तुमचा विषय आणि निसर्ग यांना नेहमीच अधिक प्राधान्य दिले गेले पाहिजे ही बाबत त्यांनी ठळकपणे मांडली. “आपण तिथे आहोत याची प्राण्यांना जाणीव होता कामा नये असे सांगून विचलित न झालेल्या प्राण्यांची आपल्याला दृश्ये मिळवायची आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले. वन्यजीवविषयक अहोरात्र सुरु असणाऱ्या वाहिन्यांच्या या युगात, कोणत्याही परिस्थितीत वन्यजीवनाला त्रास होऊ नये या दंडकाची पिछेहाट होते आहे अशी टीका त्यांनी यावेळी केली.
वन्यजीवनाशी संबंधित चित्रपट निर्मिती प्रक्रियेतील उत्क्रांतीविषयी चर्चा करताना रॉय यांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभाव मान्य केला. या तंत्रज्ञानामुळे मोबाईल कॅमेऱ्यांमध्ये वन्यजीवनाचे क्षण टिपणे सोपे झाले आहे असे ते म्हणाले. मात्र त्यांनी आजच्या काळात व्यावसायिक वन्यजीव चित्रपट निर्मितीला लागणाऱ्या मोठ्या खर्चाकडे देखील दिशानिर्देश केला.
वाढलेली मानवी लोकसंख्या आणि जमिनीच्या आकारमानाच्या मर्यादांमुळे वारंवार मनुष्य-प्राणी संघर्ष होत आहेत याची दखल घेत भारतातील वन्यजीव संवर्धनाच्या सद्यस्थितीबद्दल रॉय यांनी चिंता व्यक्त केली. "आपण आफ्रिकेच्या वन्यजीव व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून शिकू शकतो , जिथे प्राण्यांचा कळप फार मोठा होऊ नये म्हणून काही प्राण्यांना मारले जाते , मात्र भारतात अशा पद्धती लागू करणे आव्हानात्मक आहे," असे त्यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांना निसर्गात रममाण होण्यासाठी प्रोत्साहित करत रॉय यांनी त्यांना निसर्ग क्लब आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी किंवा मद्रास नॅचरल सायन्स सोसायटी सारख्या संस्थांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यांनी वन्य हस्तकला शिकण्याचे आणि आदिवासींच्या ज्ञानातून प्रेरणा घेण्याच्या महत्त्वावर भर दिला.
वन्यजीव चित्रपट निर्मितीमध्ये काल्पनिक आशयाचा समावेश करण्याबाबतच्या प्रश्नांना उत्तर देताना, रॉय यांनी स्पष्ट केले की ते अधिक वन्यजीवांना सिनेमाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एका पटकथेवर काम करत आहेत. "बड्या कलाकारांवर विसंबून न राहता वन्यजीवांना प्रकाशात आणण्याच्या ओटीटी प्लॅटफॉर्मसह अफाट संधी आहेत," असे ते म्हणाले.
आपल्या वैयक्तिक अनुभवांबाबत बोलताना, रॉय यांनी पहिल्यांदा वाघांचे चित्रीकरण करताना आलेल्या आव्हानांची आठवण सांगितली. "आम्ही झाडांवर चढून फांद्यांवर बसण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर गायरो स्टॅबिलायझरचा वापर केला, मात्र आवाजामुळे वाघ विचलित झाले. अखेरीस, आम्ही बांबूने एक तात्पुरता 14 फूट उंच ट्रायपॉड बांधला," असे ते म्हणाले.
कमी ज्ञात प्रजातींकडे लक्ष वेधण्यासाठी सोशल मीडियाच्या सामर्थ्याकडे लक्ष वेधत त्यांनी समारोप केला. "जर तुमच्याकडे एखाद्या प्रजातीबद्दल मनोरंजक कथा असेल, तर तुम्ही ती तुमच्या मोबाईल फोनद्वारे सांगू शकता आणि त्याकडे लक्ष वेधू शकता." असा सल्ला त्यांनी दिला.
तमिळनाडूच्या चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचे माजी विद्यार्थी असलेल्या अल्फोन्स रॉय यांच्या छायाचित्रण निर्देशक म्हणून उल्लेखनीय कामांमध्ये ‘गौर हरी दास्तान’, ‘लाइफ इज गुड’ आणि ‘उरुमी’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांचा समावेश आहे. रॉयच्या सिनेमॅटिक दृष्टीमुळे त्यांना 'तिबेट द एंड ऑफ टाईम' (1995) साठी प्राइम टाइम एमी पुरस्कार आणि 'टायगर किल' (2008) साठी ह्यूगो टेलिव्हिजन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच आमिर' (2009) चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन देखील मिळाले होते.
* * *
PIB Team MIFF | N.Chitale/Sanjana/Sushma/D.Rane | 31
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2026203)
Visitor Counter : 94