पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान 18 आणि 19 जून रोजी उत्तर प्रदेश आणि बिहारला भेट देणार


उत्तर प्रदेशातील किसान सन्मान संमेलनाला पंतप्रधान लावणार हजेरी

20,000 कोटींहून अधिक रकमेचा पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता पंतप्रधान करणार जारी

बचत गटांतील 30,000 हून अधिक महिलांना पंतप्रधान कृषी सखी म्हणून देणार प्रमाणपत्रे

बिहारमधील नालंदा विद्यापीठाच्या नवीन इमारत परिसराचे पंतप्रधान करणार उद्घाटन

Posted On: 17 JUN 2024 2:11PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 जून 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 आणि 19 जून 2024 रोजी उत्तर प्रदेश आणि बिहारला भेट देणार आहेत.

18 जून रोजी, संध्याकाळी 5 वाजता, पंतप्रधान उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे पीएम किसान सन्मान संमेलनात सहभागी होतील. संध्याकाळी 7 वाजता पंतप्रधान दशाश्वमेध घाटावर गंगा आरतीचे साक्षीदार होतील.  रात्री 8 वाजता ते काशी विश्वनाथ मंदिरात पूजा आणि दर्शनही करतील.

19 जून रोजी सकाळी 9.45 वाजता पंतप्रधान नालंदाच्या अवशेषांना भेट देतील.  सकाळी 10.30 वाजता, पंतप्रधान बिहारमधील राजगीर इथल्या नालंदा विद्यापीठाच्या इमारत परिसराचे उद्घाटन करतील. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधित करणार आहेत.

पंतप्रधानांचे उत्तर प्रदेशातील कार्यक्रम

तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी कल्याणाप्रती सरकारची वचनबद्धता दर्शविणाऱ्या पीएम किसान निधीच्या 17 वा हप्ता वाटप अधिकृत करणाऱ्या  फाइलवर सर्वप्रथम स्वाक्षरी केली.  या वचनबद्धतेचे पुढचे पाऊल म्हणून पंतप्रधान, थेट लाभ हस्तांतरणाद्वारे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) अंतर्गत सुमारे 9.26 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांना 20,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा 17 वा हप्ता जारी करणार आहेत.  आतापर्यंत पी एम किसान योजनेअंतर्गत 11 कोटींहून अधिक पात्र शेतकरी कुटुंबांना 3.04 लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेचा लाभ मिळाला आहे. 

या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान बचत गटांमधील (SHG) 30,000 हून अधिक महिलांना कृषी सखी म्हणून प्रमाणपत्रे देखील प्रदान करणार आहेत.

कृषी सखी अभिसरण कार्यक्रमाचा (KSCP) मुख्य उद्देश ग्रामीण महिलांचे कृषी सखी म्हणून सक्षमीकरण करून ग्रामीण भारताचा कायापालट करणे हा आहे. यासाठी कृषी सखींना पॅरा-विस्तार कामगार म्हणून प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे.  हे प्रमाणपत्र अभ्यासक्रम “लखपती दीदी” उपक्रमाच्या उद्दिष्टांशी सुसंगत आहे.

पंतप्रधानांचे बिहारमधील कार्यक्रम

बिहारमधील राजगीर येथे नालंदा विद्यापीठाच्या नवीन इमारत परिसराचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

भारत आणि पूर्व आशिया शिखर परिषद (EAS) देशांमधील संयुक्त सहकार्य म्हणून या विद्यापीठाची संकल्पना करण्यात आली आहे.  उद्घाटन सोहळ्याला 17 देशांच्या उपक्रम प्रमुखांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या प्रांगणात दोन शैक्षणिक ब्लॉक असून यातील 40 वर्गखोल्यांची एकूण आसन क्षमता सुमारे 1900 इतकी आहे. यामध्ये प्रत्येकी 300 आसन क्षमता असलेले दोन सभागृह आहेत.  येथे सुमारे 550 विद्यार्थी क्षमता असलेले विद्यार्थी वसतिगृह आहे.  या प्रांगणात, सुमारे 2000 लोकांना सामावून घेणारे ॲम्फी थिएटर, आंतरराष्ट्रीय केंद्र,  फॅकल्टी क्लब आणि क्रीडा संकुल यासह इतर विविध सुविधा उपलब्ध आहेत.

हा परिसर  ‘शून्य कार्बन उत्सर्जन’ करणारा  हरित परिसर  आहे. सौर ऊर्जा संयंत्र, घरगुती आणि पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण संयंत्र, सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी पाण्याचा पुनर्वापर करणारे संयंत्र, 100 एकर जलसाठा आणि इतर अनेक पर्यावरणपूरक सुविधांसह स्वयं-शाश्वत आहे.

या विद्यापीठाचे  इतिहासाशी गहिरा संबंध आहे.  सुमारे 1600 वर्षांपूर्वी स्थापन झालेले मूळ नालंदा विद्यापीठ जगातील पहिल्या निवासी विद्यापीठांपैकी एक मानले जाते.  2016 मध्ये, नालंदाच्या अवशेषांना संयुक्त राष्ट्र वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे.

 

* * *

JPS/S.Mukhedkar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2025879) Visitor Counter : 41