अर्थ मंत्रालय

भारतीय सीमाशुल्क विभागाच्या नावाखाली सुरु असलेल्या फसवणुकीविरुद्ध सीबीआयसीने सुरू केली मोहीम


फसवणूक करणाऱ्यांची कार्यपद्धती ओळखण्याचे,आपल्या माहितीचे संरक्षण करण्याचे,फोन करणाऱ्याच्या पूर्वानुभवाची/पूर्वेतिहासाची पडताळणी करण्याचे आणि सावध राहून अशा कृत्यांची तक्रार करण्याचे सीबीआयसीचे जनतेला आवाहन

Posted On: 16 JUN 2024 2:52PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 जून 2024


भारतीय सीमाशुल्क अधिकारी म्हणून बतावणी करत घोटाळेबाजांनी देशभरातील जनतेची त्यांच्या कष्टाने कमावलेल्या पैशाची फसवणूक केल्याच्या विविध घटना, वृत्तप्रसारणाची संकेतस्थळे(न्यूज पोर्टल्स)/समाजमाध्यमांद्वारे उघडकीला आल्या आहेत.  ही फसवणूक प्रामुख्याने फोन कॉल किंवा एसएमएस सारख्या डिजिटल माध्यमांचा वापर करून केली जाते आणि तात्काळ दंडात्मक कारवाईची 'कथित'भीती घालत पैसे उकळण्यावर लक्ष केंद्रित केले जाते.

जनजागृतीद्वारे या फसवणुकीचा प्रतिकार करण्यासाठी, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ (सीबीआयसी ) एक बहुपदरी जागरूकता मोहीम राबवत आहे ज्यामध्ये पुढील बाबी समाविष्ट आहे:

  • वर्तमानपत्रातील जाहिराती
  • नागरिकांना एसएमएस/ईमेल
  • समाजमाध्यम मोहिमा

या विषयावर जागरूकता पसरवण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि व्यापारी संस्थांच्या समन्वयाने देशभरात सीबीआयसीच्या यंत्रणेद्वारे जनजागृती मोहीम राबवली जाते.

अशा घोटाळ्यांना बळी पडण्यापासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी सीबीआयसी  जनतेला खालील मार्गदर्शक सूचनावजा उपाययोजना करण्याचा सल्ला देते:

नीट विचार करा: भारतीय सीमाशुल्क अधिकारी खाजगी खात्यांमध्ये शुल्क भरण्यासाठी फोन, एसएमएस किंवा ई-मेलद्वारे सामान्य लोकांशी कधीही संपर्क साधत नाहीत.  जर तुम्हाला फसवणूकीचा संशय आला किंवा काही गडबड वाटली, तर आलेला दूरध्वनी कॉल बंद करा आणि संदेशांना कधीही प्रतिसाद देऊ नका.

संरक्षण: वैयक्तिक माहिती (संकेतशब्द, सीव्हीव्ही , आधार क्रमांक इ.) कधीही कुठेही उघड करु नका किंवा कुणाला पाठवू नका किंवा अज्ञात व्यक्ती किंवा संस्थांना त्यांची ओळख आणि वैधता पटल्याशिवाय पैसे पाठवू नका.

शहानिशा करा: भारतीय सीमाशुल्क विभागाकडून होणाऱ्या सर्व संवादांमध्ये दस्तऐवज ओळख क्रमांक (डीआयएन) असतो‌.सीबीआयसीच्या  संकेतस्थळावर त्याची वैधता तपासता येते. https://esanchar.cbic.gov.in/DIN/DINSearch  

नोंद: अशा प्रकरणांची तात्काळ www.cybercrime.gov.in किंवा हेल्पलाइन क्रमांक 1930 वर तक्रार करा.

फसवणूक करणाऱ्यांद्वारे वापरल्या जाणाऱ्या काही सामान्य पद्धती अशा आहेत:

बनावट कॉल/एसएमएस: फसवणूक करणारे कुरिअर अधिकारी/कर्मचारी म्हणून कॉल, मजकूर युक्त संदेश किंवा ईमेलद्वारे संपर्क करतात आणि सीमाशुल्क विभागाने (कस्टम्सने) पॅकेज किंवा पार्सल ठेवलेले आहे आणि ते जारी करण्यापूर्वी सीमाशुल्क किंवा कर भरणे आवश्यक आहे, असा दावा करतात.

दबावतंत्र: सीमाशुल्क/पोलिस/सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करणारे घोटाळेबाज परदेशातून  प्राप्त झालेल्या आणि सीमा शुल्क विभागाच्या मंजुरीची  (कस्टम क्लिअरन्सची) आवश्यकता असलेल्या कथित पॅकेजेस/भेटवस्तूंसाठी सीमाशुल्क (कस्टम ड्युटी) / माल सोडवण्याचे (क्लिअरन्स फी) शुल्कं भरण्याची मागणी करतात. लुबाडण्यासाठी लक्ष्य केलेल्या व्यक्तींना आपला माल सोडवण्यासाठी पैसे भरायला सांगितले जाते.

पैशाची मागणी: लक्ष्यित व्यक्तींना कळवले जाते की त्यांचे सामान, बेकायदेशीर माल (अंमली पदार्थ/परकीय चलन/बनावट पारपत्र (पासपोर्ट)/निषिद्ध वस्तू) असल्यामुळे किंवा सीमाशुल्क नियमांचे उल्लंघन केल्यामुळे, कस्टम्सने जप्त केले आहे.  फसवणूक करणारे कायदेशीर कारवाई किंवा दंडाची भीती घालत,  समस्येचे निराकरण करण्यासाठी पैसे देण्याची मागणी करतात.

 

 

S.Kane/A.Save/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 



(Release ID: 2025673) Visitor Counter : 82