संरक्षण मंत्रालय
भारतीय तटरक्षक दलाच्या कारवाईत पाकिस्तानी नावेवरून जप्त करण्यात आले 600 कोटी रुपये किमतीचे 86 किलो अमली पदार्थ, नावेवरील 14 जणांना अटक
Posted On:
28 APR 2024 9:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 एप्रिल 2024
भारतीय तटरक्षक दलाने दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि अमली पदार्थ नियंत्रण संस्थेच्या (एनसीबी) सहयोगाने 28 एप्रिल 2024 रोजी नियोजनपूर्वक आखलेल्या कारवाईत एका पाकिस्तानी नावेवरून 600 कोटी रुपये किमतीचे 86 किलो अमली पदार्थ जप्त केले आणि नावेवरून 14 जणांना ताब्यात घेतले.
शोध यंत्रणेला चुकवून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या संशयित बोटीचा, भारतीय तटरक्षक दलाच्या राजरतन या सुसज्ज जहाजावरील एटीएस आणि एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी छडा लावला. राजरतन जहाजाने, जहाजांचा ताफा आणि विमानाच्या मदतीने, अमली पदार्थांनी भरलेल्या या जहाजाला निसटण्याची कोणतीही संधी मिळू दिली नाही. जहाजावरील विशेष पथकाने संशयित बोटीचा ताबा घेतला. त्यानंतर कसून तपासणी केल्यावर नावेत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ असल्याचे आढळून आले. पुढील तपास आणि कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.
भारतीय तटरक्षक दल आणि दहशतवादविरोधी पथकाने एकत्र येऊन गेल्या तीन वर्षांत अशा प्रकारच्या अकरा यशस्वी मोहिमा राबवल्या असून, यामधून राष्ट्रीय उद्दिष्टांप्रति त्यांच्यामध्ये असलेला समन्वय दिसून येत आहे.
S.Kakade/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2019061)
Visitor Counter : 85