राष्ट्रपती कार्यालय
जंगलांचे महत्त्व विसरण्याची चूक मानवी समाज करत आहे : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
डेहराडून येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय वन अकादमीमधील भारतीय वन सेवेतील अधिकारी प्रशिक्षणार्थींच्या दीक्षांत समारंभाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित
Posted On:
24 APR 2024 5:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 एप्रिल 2024
मानवी समाज जंगलांचे महत्त्व विसरून जाण्याची चूक करत आहे.जंगले ही जीवनदाता आहेत.वास्तविक पहाता जंगलांनी पृथ्वीवरील जैवप्रणाली संवर्धन केले आहे,असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले आहे. आज (दिनांक 24 एप्रिल 2024) रोजी डेहराडून येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय वन अकादमीमधील भारतीय वनसेवेच्या (2022 ची तुकडी) अधिकारी प्रशिक्षणार्थींना दीक्षांत समारंभात राष्ट्रपती संबोधित करत होत्या.
संसाधनांच्या बेसुमार शोषणामुळे मानव जातीला अशा टप्प्यावर आणले आहे; जिथून विकासाच्या मानकांचे पुनर्मूल्यांकन करावे लागेल. पृथ्वीवरील संसाधनांचे आपण मालक नसून विश्वस्त आहोत हे समजून घेण्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला. आपले प्राधान्य पर्यावरण केंद्रीत ठेवून त्या सोबत ते मानवकेंद्री असायला पाहिजे.
वन आणि वन्यजीवांचे संवर्धन आणि संरक्षण करून मानवी जीवनाला संकटातून वाचवले जाऊ शकते, असे राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण जलद गतीने हे नुकसान भरून काढू शकतो.
आदिवासी समाजाने शतकानुशतके जमा केलेल्या ज्ञानाचे महत्त्व समजून घेणे आणि त्याचा पर्यावरण सुधारण्यासाठी वापर करणे अत्यंत आवश्यक आहे, असे त्यापुढे राष्ट्रपती म्हणाल्या. त्यांची सामूहिक सुज्ञता आपल्याला पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत, नैतिकदृष्ट्या इष्ट आणि सामाजिकदृष्ट्या न्याय्य मार्गावर पुढे जाण्यास मदत करू शकते, असे त्यांनी नमूद केले.आदिवासी समाजाच्या संतुलित जीवनशैलीच्या आदर्शांतून शिकून आपल्याला अनेक अपसमज दूर करावे लागतील तसेच,आपल्याला न्याय्यभावनेने हवामान बदलांसाठी सज्ज रहायचे आहे,हे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
भारतीय वनसेवेतील अधिकारी औपनिवेशिक मानसिकता आणि पूर्वीच्या राजेशाही प्रकारच्या वनसेवेच्या दृष्टिकोनापासून पूर्णपणे मुक्त झाले आहेत, असा विश्वास राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केला. IFS अधिकाऱ्यांना भारतातील नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन आणि संरक्षण करण्याबरोबरच पारंपारिक ज्ञानाचा मानवतेच्या हितासाठी वापर करावा लागेल, असे त्यांनी नमूद केले.त्यांना आधुनिकता आणि परंपरा यांचा समन्वय साधून वनसंपत्तीचे रक्षण करावे लागेल आणि ज्यांचे जीवन जंगलांवर आधारित आहे त्यांचे हित जपूनच पुढे जावे लागेल, असे सांगितले. असे केल्याने,ते खरोखरच सर्वसमावेशक आणि पर्यावरणासाठी अनुकूल असे योगदान देऊ शकतील, असे राष्ट्रपती म्हणाल्या.
राष्ट्रपतींचे संपूर्ण भाषण हिंदीतून वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
N.Chitale/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2018733)
Visitor Counter : 120