भारतीय निवडणूक आयोग

मतदानाचा निम्मा कालावधी उलटताना विविध वृत्तांत आणि दृश्यांमधून मतदारांमधील प्रचंड उत्साह प्रतीत

Posted On: 19 APR 2024 8:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 एप्रिल 2024

 

भारताच्या विशाल आणि व्यापक क्षेत्रात, मतदान केंद्रांवरील चैतन्यमय आणि उत्सवपूर्ण वातावरणापुढे उन्हाळ्यातील सूर्यही फिका पडलेला वाटत होता, कारण जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत आज मतदान होत होते. उधमपूर, जम्मू-काश्मीर सारख्या काही भागात पावसापुढे  लोक हतबल न होता मतदानासाठी लांब रांगेत उभे होते. अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या ईशान्येकडील राज्यांमधील 102 लोकसभा मतदारसंघ आणि 92 विधानसभा मतदारसंघांसाठी आज एकाच वेळी मतदान झाले. दुपारी 1 पर्यंत अनेक राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये भरीव मतदानाची नोंद झाली आहे. राज्यनिहाय मतदानाची आकडेवारी परिशिष्ट-I मध्ये दिली आहे.

पहिल्या टप्प्यातील सर्व 21 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान सुरळीत आणि शांततेत सुरू होते. आज सकाळी 7 वाजता 102 लोकसभा मतदारसंघात एकाच वेळी मतदान सुरू झाल्यामुळे मतदानाच्या संधीची वाट पाहणाऱ्या मतदारांचे लांबलचक रांगेत उभे असलेले दृश्य सर्व मतदान केंद्रांवर दिसले.

लोकशाहीच्या उत्सवी वातावरणात, उत्साही तरुणांपासून ते सुज्ञ ज्येष्ठ, पती-पत्नी, आदिवासी, दिव्यांग आणि नवविवाहित जोडप्यांपर्यंत सर्व वयोगटातील मतदार सामील होत होते.

मतदान मोठ्या प्रमाणात शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. मतदान केंद्रावर जाताना, मतदारांनी रंगीबेरंगी पारंपरिक आणि आधुनिक कपडे परिधान केलेले आढळले जे भारतीय संस्कृतीचे चैतन्यशील प्रतीक आणि उत्सवाची भावना प्रतिबिंबित करत होते.

मतदानाला आनंददायी आणि संस्मरणीय अनुभवात रूपांतरित करण्यावर आयोगाने विशेष भर दिला आहे. वृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींसह प्रत्येक मतदार सहजतेने मतदान करू शकतील याची खात्री करण्यासाठी पाणी, निवारा, स्वच्छतागृहे, रॅम्प, स्वयंसेवक, व्हीलचेअर आणि वीज यासारख्या किमान सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भागातही शांततेत मतदान होत असल्याचे वृत्त आहे.

(या टप्प्यावर मतदानाचे अंदाजे आकडे आहेत आणि ते अद्ययावत होतील  याची कृपया नोंद घ्यावी.)

 

* * *

S.Kane/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2018306) Visitor Counter : 70