भारतीय निवडणूक आयोग

निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीच्या 250 हून अधिक निरीक्षकांसमवेत निवडणूक आयोगाने घेतली दूरदृश्य बैठक; सुरळीत, मुक्त आणि न्याय्य वातावरणात मतदान सुनिश्चित करण्याचे दिले निर्देश


दुसऱ्या टप्प्यात, देशातील 12 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतील 88 संसदीय मतदारसंघांमध्ये 26 एप्रिल 2024 रोजी मतदान

मतदान केंद्रांवर सर्व सोयी, विशेषतः उन्हाचा सामना करण्यासाठीच्या सोयी असतील याची खात्री करून घेण्याचे दिले निर्देश

Posted On: 18 APR 2024 9:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 एप्रिल 2024

देशातील 12 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतील 88 संसदीय मतदारसंघांमध्ये  येत्या 26 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार असून त्यासाठी 89 सामान्य निरीक्षक, पोलीस दलातील 53 निरीक्षक आणि 109 व्यय निरीक्षक नेमण्यात आले आहेत. हे सर्वजण उमेदवारी अर्ज दाखल होण्याच्या  अंतिम तारखेपूर्वी म्हणजेच 3 एप्रिल 2024 पूर्वी आपापल्या मतदारसंघांमध्ये रुजू झाले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर सर्व प्रकारच्या सोयी, विशेषतः उन्हाचा सामना करण्यासाठीच्या सोयी असतील, दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या आसपास संबंधित मतदारांना कोणतीही प्रलोभने दिली जाणार नाहीत तसेच सुरक्षा दलांचा अधिकाधिक वापर करून कायदा आणि सुव्यवस्थेवर कडक नजर ठेवली जाईल याची काटेकोरपणे खात्री करून घेण्याचे निर्देश, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार तसेच ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू या निवडणूक आयुक्तांनी सर्व निरीक्षकांना दिले.

इतर अनेक बाबींसह खालील बाबींची सुनिश्चिती करण्याचे निर्देश केंद्रीय निरीक्षकांना देण्यात आले आहेत:

  1. सर्व मतदारसंघांतील मतदानाची सज्जता आधीच तपासून घेणे तसेच उमेदवार आणि राजकीय पक्ष यांसारख्या सर्व भागधारकांना समान संधी दिली जाईल याची दक्षता घेणे.
  2. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान  नेमून दिलेल्या संसदीय मतदारसंघात प्रत्यक्ष उपस्थित आणि उपलब्ध असणे.
  3. निरीक्षकांचा मोबाईल क्रमांक/दूरध्वनी क्रमांक/ईमेल/राहण्याचे ठिकाण इत्यादी माहिती विस्तृत प्रमाणात प्रसिद्ध करून उमेदवार तसेच राजकीय पक्षांमध्ये त्याचा प्रसार करणे जेणेकरून हे निरीक्षक त्या विविक्षित क्रमांकांवर/पत्त्यावर सामान्य जनता/उमेदवार आणि राजकीय पक्षांसाठी दैनंदिन पातळीवर उपलब्ध असतील.
  4. या निरीक्षकांच्या उपस्थितीत सुरक्षा दलांच्या नेमणुकीचे यादृच्छिकीकरण.
  5. केंद्रीय दले/राज्य पोलीस दल यांचा विवेकी पद्धतीने वापर केला जात असून तटस्थता राखली जात आहे आणि या दलांची नेमणूक कोणत्याही राजकीय पक्षाला /उमेदवाराच्या बाजूने  ठरत नाही याची काळजी घेणे.
  6. ईव्हीएम/व्हीव्हीपॅट तसेच मतदान केंद्रावरील कर्मचारी यांचे निरीक्षकांच्या उपस्थितीत यादृच्छिकीकरण
  7. घरातून मतदान करणारे 85 हून अधिक वयाचे नागरिक आणि दिव्यांगजन यांच्यासाठी सुरळीत प्रक्रिया सुनिश्चित करणे तसेच निवडणूक कर्तव्यावरील आणि अत्यावश्यक कर्तव्यावरील कर्मचारी तसेच देश सेवा बजावणारे सैनिक यांच्यासाठी टपालाने मतदान करण्याची योग्य व्यवस्था करणे
  8. राजकीय पक्ष तसेच निवडणूक लढवणाऱ्या  उमेदवारांना मतदार याद्या पुरवणे.
  9. जिल्हा प्रशासनाने असुरक्षित ठिकाणांचे  मॅपिंग योग्यरित्या केले आहे आणि त्यानुसार  वाहतूक आणि दळणवळण योजना तयार करण्यात आली आहे.
  10. सूक्ष्म निरीक्षकांची तैनाती. 
  11. ईव्हीएम/व्हीव्हीपीएटी सर्व उमेदवारांसमोर सुरू करणे.
  • XII. ईव्हीएम स्ट्राँग रूममधील मजबूत सुरक्षा व्यवस्थेचे निरीक्षण करणे आणि सर्व उमेदवारांचे अधिकृत मतदान प्रतिनिधी उपस्थित आहेत याची खातरजमा करणे.
  1. सर्व तक्रार निवारण यंत्रणा कार्यरत असल्याची सुनिश्चिती.
  2. वेळच्यावेळी सुधारात्मक पावले उचलण्यासाठी अधिकृत अधिकाऱ्याच्या संपूर्ण प्रभाराखाली जिल्ह्यांमध्ये एकात्मिक नियंत्रण कक्षाची स्थापना.
  3. मतदानाच्या दिवसाच्या अगोदर  सर्व मतदारांना मतदार माहितीच्या स्लिपचे  100% वाटप.
  4. निवडणूक कर्मचाऱ्यांकडून सी-व्हिजिल, व्होटर हेल्पलाइन ॲप, सक्षम ॲप, एनकोर, सुविधा ॲप इत्यादी सर्व आयटी ॲप्लिकेशन्सचा वापर आणि त्यांना या ॲप्सचा वापर करण्यासाठी योग्य प्रशिक्षण.
  5. मतमोजणी कर्मचारी, सूक्ष्म निरीक्षक इत्यादींसह सर्व मतदान कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुव्यवस्थितपणे आयोजन.
  6. मतदारसंघातील मतदान केंद्रांना भेटी देऊन आणि सर्व मतदान केंद्रांवर खात्रीशीर किमान सुविधा उपलब्ध असल्याची सुनिश्चिती.
  7. दिव्यांग, शारीरिकदृष्ट्या विकलांग, महिला, वृद्ध आणि कुष्ठरोगग्रस्त मतदारांसाठी सर्व मतदान केंद्रांवर मतदारांच्या सुविधेसाठी मतदार सहायता कक्षाची उभारणी.
  8. पेयजल सुविधा, रांगेत उभे असणाऱ्या मतदारांना उन्हापासून बचावासाठी मंडप किंवा शामियाने, मतदानादरम्यान मतदान केंद्राबाहेर बसण्याची योग्य सोय याबाबतची सुनिश्चिती.
  9. भरारी पथके, सांख्यिकी देखरेख पथके, व्हिडीओ निरीक्षक पथके, सीमा तपासणी चौक्या, नाके यांचे काम चोवीस तास सुरु असून रोख रक्कम, दारू, मोफत दिली जाणारी प्रलोभने , ड्रग्ज/अमली पदार्थ यांची कोणत्याही प्रकारची वाहतूक आणि वितरण होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
  10. राजकीय जाहिरातीचे  पूर्व-प्रमाणीकरण आणि पेड न्यूज या संदर्भात  माध्यम प्रमाणन आणि देखरेख समित्यांद्वारे योग्य कार्य
  11. खोटी वृत्ते /चुकीची माहिती यावर वेळीच आळा घालून सकारात्मक वातावरणाला  चालना देण्यासाठी योग्य  माहिती दिली जात आहे.

S.Kakade/S.Chitnis/B.Sontakke/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2018209) Visitor Counter : 95