नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
अर्थव्यवस्थेत हायड्रोजन आणि इंधन सेल्ससाठी आंतरराष्ट्रीय भागीदारी(आयपीएचई) विषयक 41 व्या सुकाणू समितीच्या बैठकीत हरित हायड्रोजनला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने व्यवसाय प्रारूप, नियम आणि पायाभूत सुविधा या घटकांवर चर्चा
आयपीएचई सुकाणू समितीच्या 42 व्या सुकाणू समितीची बैठक युरोपियन आयोगाद्वारे युरोपियन हायड्रोजन सप्ताहा दरम्यान आयोजित करणार
Posted On:
21 MAR 2024 2:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 21 मार्च 2024
नवी दिल्लीत 18 ते 22 मार्च 2024 या कालावधीत अर्थव्यवस्थेत हायड्रोजन आणि इंधन सेल्ससाठी आंतरराष्ट्रीय भागीदारी(आयपीएचई) विषयक 41 व्या सूकाणू समितीच्या बैठकीचे आयोजन केले असून, या समितीने 20 मार्च रोजी नवी दिल्लीत सुषमा स्वराज भवन येथे आपल्या औपचारिक कामकाजाला सुरुवात केली.
या बैठकीत सहभागी झालेल्या ऑस्ट्रिया, चिली, फ्रान्स, युरोपियन कमिशन, जपान, जर्मनी, नेदरलँड, संयुक्त अरब अमिरात, इंग्लंड,अमेरिका, सिंगापूर आणि दक्षिण कोरिया येथील आयपीएचईच्या प्रतिनिधींनी त्यांच्या फेडरल आणि प्रांतीय सरकारांनी हरित हायड्रोजनच्या दिशेने हाती घेतलेले संशोधन आणि विकास, प्रमुख धोरणात्मक विकास आणि उपक्रम याविषयीची अद्ययावत माहिती दिली. या प्रतिनिधींनी राष्ट्रीय स्वच्छ हायड्रोजन धोरणे, हायड्रोजन उत्पादनाशी संबंधित संशोधन आणि विकास उपक्रम, साठवणूक आणि वाहतूक, मागणीच्या निर्मितीसाठीची स्थिती, पायाभूत सेवा सुविधांचा विकास, मागणी आणि पुरवठ्याची व्याप्ती तसेच मनुष्यबळाला प्रशिक्षित करणे इत्यादी घटकांचा उल्लेख केला.
या बैठकीत वाहतुकीसाठी व्यवसाय प्रारूपे, हायड्रोजनचे उत्पादन आणि साठवणूक, मजबूत हरित अर्थव्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने वित्त, धोरण, नियम आणि शाश्वत व्यावसायिक आणि आर्थिक मॉडेलच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहयोग आणि भागीदारीची शक्यता यांवर विचारमंथन करण्यात आले.
याशिवाय नियामक चौकट, उत्सर्जन कमी करण्यासाठी शोध पद्धत, समर्पित हायड्रोजन पायाभूत सेवा सुविधा आणि बाजारपेठेची निर्मिती, हायड्रोजन बँका आणि आयात निर्यात कॉरिडॉरची निर्मिती या मुद्द्यांवर देखील विचार विनिमय झाला. जनजागृती, व्यवसाय सुलभता आणि उच्च-कार्यक्षमता आणि कमी खर्चिक दृष्टिकोन यांवर देखील चर्चा करण्यात आली.
समितीने 41 व्या सुकाणू समितीचे निर्णय आणि कृतींचा आढावा घेतला. तसेच आयपीएचईच्या सदस्यत्वावर देखील चर्चा झाली. या उपक्रमात आंतरराष्ट्रीय समुदायाचा व्यापक सहभाग असावा या दृष्टीने ग्लोबल साऊथ मधील राष्ट्रांचा सहभाग वाढवण्याची सूचना यावेळी करण्यात आली.
आयपीएचई सुकाणू समितीच्या 42 व्या सुकाणू समितीची बैठक युरोपियन आयोगाद्वारे युरोपियन हायड्रोजन सप्ताहा दरम्यान आयोजित केली जाईल, असे यावेळी ठरवण्यात आले.
समितीच्या अध्यक्षांनी सर्व भागधारकांना अर्थव्यवस्थेच्या सर्व संभाव्य क्षेत्रांमध्ये प्राधान्यक्रमाने हरित हायड्रोजनच्या उपयोजनाला गती देण्यासाठी धाडसी उपायांचा अवलंब करण्याचे आवाहन केले.
हे देखील वाचा:
दुसऱ्या दिवशीच्या औपचारिक कामकाजानंतर आयपीएचईच्या सदस्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले.
N.Meshram/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2015897)
Visitor Counter : 162