पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पीएम-सूरज पोर्टलच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 13 MAR 2024 10:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 मार्च 2024

 

नमस्‍कार,

सामाजिक न्याय मंत्री वीरेंद्र कुमारजी, देशाच्या कानाकोपऱ्यातून या कार्यक्रमाशी जोडले गेलेले विविध सरकारी योजनांचे लाभार्थी, स्वच्छता कर्मचारी बंधू भगिनी, इतर मान्यवर, सभ्य स्त्री-पुरुषहो, देशातील 470 जिल्ह्यांतून जवळजवळ 3 लाख लोक आज या कार्यक्रमाशी थेट जोडले गेले आहेत. मी सर्वांचे अभिनंदन करतो.

मित्रांनो,

आज दलित, मागासलेले आणि वंचित समाजाच्या कल्याणाच्या संदर्भात देश आज आणखी एका मोठ्या संधीचा साक्षीदार होतो आहे. जेव्हा वंचितांमध्ये प्राधान्याची जाणीव असेल तर कसे कार्य होते ते या कार्यक्रमाच्या आयोजनातून दिसून येते आहे. आज वंचित वर्गातील एक लाख लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये 720 कोटी रुपये थेट हस्तांतरित करण्यात आले आहेत. हे लाभार्थी 500 हून अधिक जिल्ह्यांतील आहेत.

आधीच्या सरकारांमध्ये कोणी असा विचारच करू शकत नसेल की इकडे एक बटण दाबले आणि तिकडे गरिबांच्या बँक खात्यांमध्ये पैसे पोहोचले. मात्र हे मोदींचे सरकार आहे. गरिबांच्या हक्काचे पैसे थेट त्यांच्या खात्यामध्ये पोहोचतात! मी आत्ताच सूरज पोर्टल देखील सुरु केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून वंचित समाजाच्या लोकांना आता थेट आर्थिक मदत देता येऊ शकते. म्हणजेच, भारत सरकारच्या इतर योजनांप्रमाणेच वेगवेगळ्या योजनांचे पैसे देखील थेट तुमच्या खात्यांमध्ये पोहोचतील. त्यामधे न कोणी मध्यस्थ, ना कट, ना कमिशन आणि ना कोणाच्या शिफारसीसाठी फेऱ्या मारण्याची गरज!

अत्यंत कठीण परिस्थितीत काम करणाऱ्या, गटारे आणि सेप्टिक टाकी साफ करणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांना पीपीई किट्स आणि आयुष्मान हेल्थ कार्डे दिली जात आहेत. या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आता 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळण्याची सुनिश्चिती झाली आहे.या कल्याणकारी योजना म्हणजे आमचे सरकार 10 वर्षांपासून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय तसेच वंचित समाजासाठी जी मोहीम चालवत आहे त्याच मोहिमेचा विस्तार आहे. या योजनांबद्दल मी तुम्हा सर्वांचे आणि देशातील सर्व लाभार्थ्यांचे अभिनंदन करतो.

मित्रांनो,

काही वेळापूर्वी मला काही लाभार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी देखील मिळाली. सरकारच्या योजना कशा प्रकारे दलित, वंचित आणि मागासलेल्या समाजापर्यंत पोहोचत आहेत, या योजनांमुळे त्यांच्या जीवनात कशा प्रकारे बदल घडून येत आहे, ते पाहून, त्या सकारात्मक बदलामुळे मनाला देखील समाधान वाटते आणि व्यक्तिगत पातळीवर मी भावूक देखील होतो. मी तुम्हा सर्वांपेक्षा वेगळा नाही, तुम्हां सर्वांतच मी माझे कुटुंब पाहतो. म्हणूनच जेव्हा विरोधी पक्षातील लोक मला दूषणे देतात, जेव्हा ते लोक म्हणतात की मोदींना कुटुंबच नाहीये तेव्हा सर्वप्रथम मला तुमचीच आठवण येते. ज्याच्या जवळ तुमच्यासारखे बंधू-भगिनी आहेत त्याला कोणी कुटुंब नसलेला कसे म्हणू शकते.माझ्यापाशी तर तुम्हां सर्वांच्या रुपात कोट्यवधी दलित, वंचित आणि देशवासीयांचे कुटुंब आहे. तुम्ही जेव्हा म्हणता की, ‘मी आहे मोदींचा परिवार’ तेव्हा मी स्वतःला अत्यंत भाग्यवान समजतो.  

मित्रांनो, 

आम्ही 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचा संकल्प केला आहे, उद्दिष्ट निश्चित केले आहे. जो वर्ग गेली अनेक दशके वंचित राहिला त्याच्या विकासाशिवाय भारत देश विकसित होऊ शकत नाही. काँग्रेसच्या सरकारांनी देशाच्या विकासामध्ये वंचित वर्गाला असलेले महत्त्व कधी समजूनच घेतले नव्हते, त्यांना त्याची पर्वाच नव्हती. या लोकांना काँग्रेसने नेहमीच सोयीसुविधांपासून वंचित ठेवले. देशातील कोट्यवधी लोकांना त्यांच्या नशिबाच्या हवाल्यावर सोडून दिले. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की देशात वातावरण असे निर्माण झाले की या लोकांना वाटायचे की या योजना, त्यांचे लाभ, हे जीवन तर इतर लोकांसाठी आहे. आम्हाला तर असेच अडचणी सहन करत जीवन जगायचे आहे. अशीच मानसिकता तयार झाली आणि त्यामुळे तत्कालीन सरकारांच्या विरोधात कोणतीही तक्रारच कोणी केली नाही. मी ती मानसिक भिंतच उध्वस्त केली. आज जर सुस्थितीतील नागरिकांकडे गॅसची शेगडी असेल तर वंचित माणसाच्या घरात देखील गॅसची शेगडी असेल. आर्थिक पातळीवर चांगल्या-चांगल्या कुटुंबांची बँकांमध्ये खाती असतील तर गरीब, दलित, मागासलेले आणि आदिवासी अशा सर्वांचे देखील बँकेत खाते असेल.  

मित्रांनो,

या वर्गांतील कित्येक पिढ्यांनी त्यांचे जीवन मुलभूत सोयी मिळवण्यातच खर्च केले. 2014 मध्ये सत्तेवर आलेल्या आमच्या सरकारने सबका साथ, सबका विकास या संकल्पनेसह काम सुरु केले. ज्या लोकांनी सरकारकडून काही मिळेल अशी आशाच सोडून दिली होती त्यांच्यापर्यंत सरकार पोहोचले आणि देशाच्या विकासात त्यांना सहभागी करून घेतले.

तुम्ही आठवण करून बघा, पूर्वी रेशनच्या दुकानातून अन्नधान्य मिळताना किती त्रास होत असे. आणि हा त्रास कोणाला होत होता, ते कोण होते ज्यांना सर्वात जास्त अडचणी येत असत? हा त्रास सहन करणारे आपले दलित वर्गातील बंधू- भगिनी होते, किंवा आपले मागासलेल्या समुदायातील बंधू भगिनी होते, इतर मागासवर्गीय समाजातील बंधू- भगिनी होते किंवा आदिवासी वर्गातील बंधू- भगिनी होते. आज आम्ही ज्या 80 कोटी गरजूंना मोफत अन्नधान्य देतो, त्याचा सर्वाधिक लाभ जे टंचाईच्या परिस्थितीत जीवन कंठत आहेत, जो वंचित समाज आहे त्यांनाच मिळतो आहे.

आज जेव्हा आम्ही 5 लाख रुपयांपर्यंतच्या खर्चाचे उपचार मोफत करून देण्याची हमी देतो तेव्हा याच बंधू-भगिनींचा जीव मोठ्या संख्येने वाचतो, त्यांना आजारी असताना ही मदत कामी येते. पत्र्याच्या घरांत, झोपड्यांमध्ये आणि उघड्यावर आयुष्य कंठण्याचा नाईलाज झालेले आमचे दलित, आदिवासी मागासलेल्या कुटुंबांची संख्या आज देशात सर्वाधिक आहे कारण भूतकाळात या लोकांची कोणी पर्वाच केली नाही.

मोदींनी दहा वर्षांत गरिबांसाठी कोट्यवधी पक्की घरे बांधली आहेत.मोदींनी कोट्यवधी घरांमध्ये शौचालये तयार केली. ज्यांच्या माता भगिनींना शौचासाठी उघड्यावर जावे लागत होते ती कुटुंबे होती तरी कोण? हेच समाज सर्वाधिक त्रास सहन करत असत. आमचे दलित, आदिवासी बांधव, इतर मागासवर्गीय, वंचित कुटुंबे यांच्याच घरातील महिलांना त्रास सहन करावा लागत होता. आज त्यांना इज्जतघर मिळाले आहे, त्यांना त्यांचे सन्मानाचे जगणे मिळाले आहे.

मित्रांनो,

तुम्हाला माहीत आहे की पूर्वी कोणत्या घरांमध्ये गॅसची शेगडी असायची! गॅसची शेगडी कुणाकडे  नसायची,  सगळ्यांना माहीत आहे. मोदींनी उज्ज्वला योजना राबवून मोफत गॅस जोडणी दिली.  मोदींनी आणलेली ही मोफत गॅस जोडणी कुणाला मिळाली? माझ्या सर्व वंचित बंधू भगिनींना ती मिळाली आहे.  आज माझ्या वंचित वर्गातील माता भगिनींनाही लाकडाच्या धुरापासून मुक्ती मिळाली आहे.  आता आम्ही या योजना सर्वांपर्यंत पोहोचवायच्या (सॅच्युरेशन)  लक्ष्यावर काम करत आहोत, अगदी 100%! जर 100 लोक योजनेच्या लाभासाठी पात्र असतील, तर  100 पैकी सर्व 100 लोकांना तो लाभ मिळायला हवा.

देशात भटक्या-विमुक्त समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात आहेत, त्यांच्या कल्याणासाठी अनेक कार्यक्रम राबवले जात आहेत. नमस्ते योजनेच्या माध्यमातून स्वच्छता कर्मचाऱ्यांचे जीवन सुधारत आहे. मैला वाहून नेण्याची अमानुष प्रथा संपवण्यातही आम्ही यशस्वी होत आहोत.  या डंखामुळे त्रस्त झालेल्या लोकांसाठी सन्मानाने जगण्याची व्यवस्थाही आम्ही करत आहोत.  या प्रयत्नां अंतर्गत सुमारे 60 हजार लोकांना आर्थिक मदत देण्यात आली आहे.

मित्रांनो

अनुसूचित जाती-जमाती (एससी-एसटी), इतर मागासवर्गीय (ओबीसी) वंचित घटकांना पुढे आणण्यासाठी आमचे सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.  विविध संस्थांकडून वंचित घटकांना मिळणारी मदत, या 10 वर्षात आम्ही दुप्पट केली आहे.  यावर्षी सरकारने एससी समाजाच्या कल्याणासाठी सुमारे 1 लाख 60 हजार कोटी रुपये दिले आहेत.  मागील सरकारमध्ये लाखो कोटी रुपयांचा गाजावाजा फक्त घोटाळ्यांच्या नावावरच होत असे.  आमचे सरकार दलित आणि वंचितांच्या कल्याणासाठी आणि राष्ट्र उभारणीसाठी  हा पैसा खर्च करत आहे.

एससी-एसटी आणि ओबीसी समाजातील तरुण-तरुणींना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीतही वाढ करण्यात आली आहे.  आमच्या सरकारने वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये ओबीसींसाठी अखिल भारतीय कोट्यात 27 टक्के आरक्षण लागू केले. आम्ही एन ई ई टी परीक्षेतही ओबीसीं साठी मार्ग काढला.  पदव्युत्तर आणि पीएचडी पदवी घेण्यासाठी परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या वंचित समाजातील मुलांना नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिपची (राष्ट्रीय परदेश शिष्यवृत्ती) मदत मिळत आहे.

विज्ञानाशी संबंधित विषयात पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे नेण्यासाठी नॅशनल फेलोशिपची (राष्ट्रीय छात्र वृत्ती) रक्कमही वाढवण्यात आली आहे.  आमच्या प्रयत्नांमुळे राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा मिळाला आहे, याचे आम्हाला समाधान आहे.  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत पंचतीर्थांचा विकास करण्याची संधी मिळाली हे आम्ही आमचे भाग्य समजतो.

मित्रांनो,

भाजपा सरकार वंचित वर्गातील तरुण-तरुणींच्या रोजगार आणि स्वयंरोजगारालाही प्राधान्य देत आहे.  आमच्या सरकारच्या मुद्रा योजनेअंतर्गत गरिबांना सुमारे 30 लाख कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे.  ही मदत मिळालेले बहुतांश तरुण-तरुणी हे एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातील आहेत.  स्टँडअप इंडिया योजनेने एससी आणि एसटी वर्गांमध्ये उद्योजकतेला चालना दिली आहे.  या वर्गांना  आमच्या व्हेंचर कॅपिटल फंड योजनेचीही मदत मिळाली आहे.  दलितांमधील उद्योजकता लक्षात घेऊन आमच्या सरकारने आंबेडकर सोशल इनोव्हेशन आणि इनक्युबेशन मिशनही (सामाजिक नवोन्मेष आणि उद्भवन उपक्रम) सुरू केले आहे.

मित्रांनो,

आमच्या सरकारच्या गरीब कल्याणकारी योजनांचा सर्वाधिक लाभ दलित, आदिवासी, ओबीसी किंवा आमच्या उपेक्षित आणि वंचित समुदायांना मिळाला आहे.  पण मोदी जेव्हा दलित, वंचित समाजाच्या सेवेसाठी काहीही करतात तेव्हा या इंडी आघाडीच्या लोकांना सर्वात जास्त चीड येते.  दलित, मागासवर्गीय आणि आदिवासींचे जीवन सुसह्य व्हावे असे काँग्रेसवाल्यांना कधीच वाटत नाही.  त्यांना फक्त तुम्हाला तळमळत ठेवायचे असते.

तुम्ही कुठलीही योजना बघा, तुमच्यासाठी शौचालये बांधण्याची यांनी खिल्ली उडवली.  जन धन योजना आणि उज्ज्वला योजनेला त्यांनी विरोध केला.  ज्या राज्यांमध्ये यांची सरकारे आहेत, त्यांनी आजपर्यंत अनेक योजना राबवू दिल्या नाहीत.  सर्व दलित, वंचित मागास समाज आणि त्यांच्यातील युवावर्ग  पुढे आला तर त्यांच्या घराणेशाहीच्या राजकारणाची दुकानदारी बंद होईल, हे त्यांना माहीत आहे.

हे लोक सामाजिक न्यायाचा नारा देऊन समाजाला जाती-जातींमध्ये विभागण्याचे काम करतात, पण खऱ्या सामाजिक न्यायाला विरोध करतात.  तुम्ही त्यांचा मागील इतिहास पहा, याच काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विरोध केला होता.  लोहिया आणि बीपी मंडल यांनाही त्यांनी विरोध केला. या लोकांनी  कर्पूरी ठाकूरजींचाही नेहमी अनादरच केला.  आणि जेव्हा आम्ही त्यांना भारतरत्न सन्मान दिला तेव्हा इंडी आघाडीच्या लोकांनी त्यालाही विरोध केला.  हे लोक स्वतः त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाच भारतरत्न देत असत.  पण, त्यांनी अनेक दशके बाबासाहेबांना भारतरत्न मिळू दिला नाही.  भाजपा समर्थित सरकारने त्यांना हा सन्मान दिला.

दलित समाजातून आलेले रामनाथ कोविंदजी आणि आदिवासी समाजातील भगिनी द्रौपदी मुर्मूजी यांनी राष्ट्रपती व्हावे, असे या लोकांना कधीच वाटले नाही.  त्यांना निवडणुकीत पराभूत करण्यासाठी इंडी आघाडीच्या लोकांनी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. वंचित वर्गातील लोक उच्च पदावर पोहोचावेत यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरूच राहतील.  वंचितांना सन्मान आणि न्याय देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा हा पुरावा आहे.

वंचित वर्गाच्या विकासाची आणि सन्मानाची ही मोहीम येत्या 5 वर्षांत अधिक तीव्र होईल, ही हमी मोदी तुम्हाला देतो.  तुमच्या विकासाने आम्ही विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करू.  पुन्हा एकदा, इतक्या मोठ्या संख्येने अनेक ठिकाणांहून तुम्हा सर्वांचे एकत्र येणे आणि दूरदृष्य प्रणाली द्वारे तुमचे दर्शन घेण्याची संधी मला मिळाली, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे.  मी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो.

खूप खूप आभार!

* * *

S.Tupe/Sanjana/Ashutosh/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2014685) Visitor Counter : 128