युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

केवळ महिला खेळाडूंसाठी दोन राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रांची केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांची घोषणा

Posted On: 08 MAR 2024 8:10PM by PIB Mumbai

 

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून केवळ महिला खेळाडूंसाठी दोन राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रे स्थापन करण्याची घोषणा आज केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री अनुराग सिंह  ठाकूर यांनी केली. आशियाई क्रीडा स्पर्धा आणि ऑलिम्पिक सारख्या जागतिक क्रीडा स्पर्धांमध्ये ज्या क्रीडा प्रकारांमध्ये भारतीय महिला खेळाडूंना पदक मिळण्याची संधी आहे अशा 23 प्राधान्याने खेळल्या जाणाऱ्या क्रीडा प्रकारांवर ही केंद्रे विशेष लक्ष देतील.

राज्य स्तरावर प्रशिक्षकांची कमतरता आणि पायाभूत सुविधांची टंचाई यावर बंगळूरू इथे बोलताना ते  म्हणाले, “खेळ हा राज्यांचा विषय आहे, परंतु तरीही केंद्र सरकार देशातील क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी सक्रिय प्रयत्न करत आहे. पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षकांवर मोठा खर्च करावा लागतो. आम्ही राज्य सरकारांशी समन्वय साधला आहे. राज्य सरकारांनी त्यांच्या राज्यातील तीन प्रमुख खेळ निश्चित करावेत. आम्ही त्या खेळांसाठी त्यांना माहिती देऊ आणि कोणत्या राज्याने हॉकी, बॉक्सिंग आणि ऍथलेटिक्स इत्यादी खेळासाठी प्रोत्साहन द्यावे यासाठी मार्गदर्शन करू. 

आम्ही याआधीच राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रांशी एकत्रित समन्वयाला सुरुवात केली आहे आणि राष्ट्रीय क्रीडा महासंघांच्या सहकार्याने चांगले प्रशिक्षक तयार करण्यावर अधिक भर दिला जाणार आहे,” असे ठाकूर म्हणाले.

भारतीय क्रीडा प्राधिकरणाने देशभरात 23 राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रे स्थापन केली आहेत. अत्याधुनिक क्रीडा पायाभूत सुविधा, क्रीडा विज्ञान बॅकअप, प्रशिक्षित पोषणतज्ञांनी ठरवून दिलेला वैयक्तिक आहार आणि होतकरू खेळाडूंच्या विशेष प्रशिक्षणासाठी सर्वोत्तम प्रशिक्षकांची देखरेख, पात्र सहायक कर्मचारी आणि उत्तम कार्यक्षमता असलेले संचालक ही या केंद्रांची वैशिष्ट्ये आहेत.

***

N.Chitale/P.Jambhekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2012902) Visitor Counter : 73