पंतप्रधान कार्यालय

नवी दिल्लीत आयोजित भारत टेक्स 2024 मध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 26 FEB 2024 4:01PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 फेब्रुवारी 2024

 

मंत्रिमंडळातील माझे सहकारी, पियूष गोयल जी, दर्शना जरदोश जी, विविध देशांचे राजदूत, वरिष्ठ राजनैतिक अधिकारी, केंद्र आणि राज्य सरकारचे अधिकारी, फॅशन आणि वस्त्रोद्योग  जगताशी संबंधित सर्व मित्र, तरुण उद्योजक, विद्यार्थी, आपले  विणकर आणि आपल्या  कारागीर मित्रांनो महोदया आणि महोदय! भारत मंडपम येथे आयोजित भारत टेक्समध्ये  तुम्हा सर्वांचे स्वागत ! आजचा हा  कार्यक्रम  खूप विशेष  आहे. विशेष यासाठी आहे : कारण भारतातील दोन सर्वात मोठ्या प्रदर्शन केंद्रांमध्ये म्हणजेच भारत मंडपम आणि यशोभूमीमध्ये हा कार्यक्रम  एकाच वेळी होत  आहे. आज 3 हजाराहून अधिक प्रदर्शक... 100 देशांतील सुमारे 3 हजार खरेदीदार... 40 हजारांहून अधिक व्यापारी अभ्यागत... एकाचवेळी या कार्यक्रमाशी जोडले गेले आहेत. हा कार्यक्रम वस्त्रोद्योग  कार्यक्षेत्रामधील  सर्व भागधारकांना आणि संपूर्ण मूल्य साखळीतील लोकांना  एकत्र येण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करत आहे.

मित्रांनो,

आजचा कार्यक्रम म्हणजे केवळ वस्त्रोद्योग प्रदर्शन नाही . या कार्यक्रमाच्या  एका धाग्याशी अनेक गोष्टी जोडल्या गेल्या आहेत. भारत टेक्सचा हा धागा  भारताच्या वैभवशाली इतिहासाला आजच्या प्रतिभेशी जोडत आहे. भारत टेक्सचा हा धागा  परंपरेसह तंत्रज्ञानाची गुंफण करत  आहे. भारत टेक्सचा हा धागा  शैली, शाश्वतता , व्याप्ती  आणि कौशल्य यांना एकत्र विणणारा धागा आहे. ज्याप्रमाणे एक यंत्रमाग अनेक धागे एकमेकांमध्ये गुंफतो , त्याचप्रमाणे हा कार्यक्रमही भारताच्या  आणि संपूर्ण जगाच्या धाग्यांना एकमेकांत विणत आहे.  आणि मी समोर पहातो आहे  की, हे स्थळ  भारताच्या वैविध्यपूर्ण विचारांचे आणि   एका धाग्यात गुंफलेल्या सांस्कृतिक ऐक्याचे देखील स्थळ बनले आहे.  काश्मीरची कानी शाल, उत्तर प्रदेशची चिकनकारी, जरदोजी, बनारसी सिल्क, गुजरातचे   पटोला आणि कच्छचे  भरतकाम, तमिळनाडूची कांजीवरम, ओदीशाची संबळपुरी, महाराष्ट्राची पैठणी, अशा अनेक परंपरा  अद्वितीय आहेत.भारताचा संपूर्ण वस्त्र  प्रवास दाखवणारे प्रदर्शन मी नुकतेच पाहिले आहे. भारताच्या वस्त्रोद्योग क्षेत्राचा इतिहास किती वैभवशाली  आहे आणि त्याचे  सामर्थ्य  किती मोठे  आहे हे या प्रदर्शनातून दिसून येते आहे .

मित्रांनो,

आज इथे,वस्त्रोद्योग मूल्य साखळीच्या  विविध विभागांशी संबंधित भागधारक आहेत. तुम्ही भारतातील वस्त्रोद्योग क्षेत्र देखील जाणता आणि आपल्या  आकांक्षा आणि आव्हानांशी देखील परिचित आहात. येथे आपले विणकर मित्र आणि कारागीर मित्र मोठ्या संख्येने आहेत, जे तळागाळातील या मूल्य साखळीशी संबंधित आहेत. अनेक मित्रांना  या क्षेत्राचा  अनेक पिढ्यांचा अनुभव आहे. तुम्हाला माहीत आहे की, येत्या 25 वर्षांत भारताने विकसित राष्ट्र बनण्याचा संकल्प केला आहे . विकसित भारताचे चार प्रमुख स्तंभ आहेत - गरीब, तरुण, शेतकरी आणि महिला.आणि भारताचे वस्त्रोद्योग क्षेत्र या चौघांशी म्हणजे गरीब, तरुण, शेतकरी आणि महिलांशी जोडलेले आहे. त्यामुळे भारत टेक्ससारख्या कार्यक्रमाचे महत्त्व खूप पटीने वाढते.

मित्रांनो,

विकसित भारताच्या उभारणीत वस्त्रोद्योग क्षेत्राचे योगदान आणखी वाढवण्यासाठी आम्ही खूप विस्तृत कार्यक्षेत्रात काम करत आहोत. आम्ही परंपरा, तंत्रज्ञान, प्रतिभा आणि प्रशिक्षण यावर लक्ष केंद्रित करत आहोत. आजच्या फॅशनच्या मागणीनुसार आपल्या पारंपरिक शैली कशाप्रकारे अद्ययावत करायच्या आणि डिझाईन्सला नावीन्य कशाप्रकारे देता येईल यावर भर दिला जात आहे. आम्ही वस्त्रोद्योग मूल्य साखळीचे  सर्व घटक पाच  एफच्या सूत्राने जोडत आहोत.आणि मला वाटते  जोपर्यंत तुमचा कार्यक्रम चालू आहे तोपर्यंत असे पन्नास लोक असतील जे तुम्हाला पाच एफ बद्दल वारंवार सांगत राहतील. म्हणूनच तुम्हाला ते मनापासून समजेल आणि तिथे प्रदर्शनालाही गेलात तर पुन्हा पुन्हा पाच एफ समोर येतील.  शेतकरी ते सूत बनविणे ते कारखाना  ते फॅशन ते परदेश निर्यात म्हणजेच फार्म, फायबर, फॅब्रिक, फॅशन आणि फॉरेन या पाच एफ तत्वाच्या  प्रवासाचे एक प्रकारे संपूर्ण दृश्य आपल्यासमोर आहे.फाइव्ह एफ हे तत्त्व लक्षात घेऊन आम्ही शेतकरी, विणकर, एमएसएमई, निर्यातदार यांना प्रोत्साहन देत आहोत. एमएसएमईला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही अनेक महत्त्वाची पावले उचलली आहेत. आम्ही गुंतवणूक आणि उलाढालीच्या दृष्टीने एमएसएमईच्या व्याख्येतही सुधारणा केली आहे.  त्यामुळे उद्योगांची व्याप्ती   आणि आकारमान वाढले तरी त्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळू शकेल.कारागीर आणि बाजार यांच्यातीलपेठ  अंतर आम्ही कमी केले आहे. देशात थेट विक्री, प्रदर्शने आणि ऑनलाइन मंचासारख्या  सुविधा वाढवण्यात आल्या आहेत.

मित्रांनो,

येत्या काळात देशातील विविध राज्यांमध्ये 7 पीएम   मित्र पार्क उभारले जात आहेत. ही योजना तुमच्यासारख्या मित्रांसाठी किती मोठ्या संधी घेऊन येणार आहे याची तुम्ही कल्पना करू शकता. मूल्य साखळी  संबंधित संपूर्ण व्यवस्था   एकाच ठिकाणी तयार करण्याचा प्रयत्न आहे, जिथे तुम्हाला प्लग आणि प्ले सुविधांसह आधुनिक, एकात्मिक आणि जागतिक दर्जाची पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. यामुळे केवळ   परिचालनाची व्याप्ती  सुधारणार नाही, तर लॉजिस्टिकचा खर्च देखील कमी होईल

मित्रांनो,

तुम्हाला माहिती आहे की, वस्त्रोद्योग आणि परिधान क्षेत्र देशात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देते. यामध्ये शेतापासून एमएसएमई आणि निर्यातीपर्यंत अनेक रोजगार निर्माण होतात.या संपूर्ण क्षेत्रात ग्रामीण अर्थव्यवस्थेशी निगडित लोक आणि महिलांचाही मोठा सहभाग आहे.  

प्रत्येक 10  पोशाख बनवणाऱ्यांपैकी  7 महिला आहेत आणि हातमागावर काम करणारे  त्याहून अधिक आहेत.वस्त्रोद्योग व्यतिरिक्त खादीने आपल्या भारतातील महिलांना नवीन बळ दिले आहे.  मी असे म्हणू शकतो की, गेल्या 10 वर्षात आपण जे काही प्रयत्न केले त्याने खादी हे विकास आणि रोजगार या दोन्हीचे साधन बनले आहे.म्हणजेच खादीमुळे गावांमध्ये लाखो रोजगार निर्माण होत आहेत. गेल्या 10 वर्षात सरकारने   गरिबांच्या कल्याणासाठी ज्या  योजना राबवल्या आहेत ... देशात गेल्या 10 वर्षात ज्या  पायाभूत सुविधां  विकास झाला आहे यामुले  आपल्या वस्त्रोद्योग क्षेत्राला खूप फायदा झाला आहे.

मित्रांनो,

आज भारत जगातील कापूस, ताग आणि रेशीम उत्पादक देशांपैकी एक बनला आहे. लाखो शेतकरी या कामात कार्यरत  आहेत. आज सरकार लाखो कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आधार देत आहे, त्यांच्याकडून लाखो क्विंटल कापूस खरेदी करत आहे. सरकारने सुरू केलेली कस्तुरी कॉटन ही भारताची स्वतःची ओळख निर्माण करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरणार आहे. आज आम्ही ताग उत्पादक  शेतकरी आणि ताग कामगारांसाठीही कार्यरत आहोत.

रेशीम क्षेत्रासाठीही आम्ही सातत्याने नवनवीन उपक्रम राबवत आहोत. 4A दर्जाच्या रेशीम उत्पादनात स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.परंपरेसोबतच आम्ही अशा क्षेत्रांनाही प्रोत्साहन देत आहोत ज्यात भारताला अजून खूप काही साध्य करायचे आहे. जसे आपण तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत आहोत.तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्राची   क्षमता किती अधिक आहे हे तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे आपली  क्षमता वाढवण्यासाठी आम्ही राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग अभियान सुरू केले आहे. तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्रात स्टार्टअपला भरपूर वाव आहे. त्यासाठी मार्गदर्शक तत्त्वेही तयार करण्यात आली आहेत.

मित्रांनो,

आजच्या जगात, जिथे एका बाजूला तंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरण आहे, तर दुसऱ्या बाजूला वेगळेपण आणि अस्सलपणाची  मागणी आहे. आणि दोघांना एकत्र राहण्यासाठी पुरेसे अवकाशही आहे. हाताने केलेल्या  डिझाईन किंवा वस्त्राचा  विचार केला तर अनेकदा आपल्या कलाकारांनी बनवलेली एखादी गोष्ट इतरांपेक्षा वेगळी दिसते.

आजच्या काळात साऱ्या जगभरातील लोक एकमेकांहून वेगळे दिसू इच्छितात, अशावेळी अशा कलेची मागणी अजूनच वाढते. म्हणूनच आज भारतात आपण वाढीव प्रमाणासोबत या क्षेत्रातील कौशल्यावर देखील अधिक भर देत आहोत. देशात राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेच्या म्हणजेच एनआयएफटीच्या 19 शाखा स्थापन झाल्या आहेत. या शाखांच्या परिसरातील विणकर आणि कारागिरांना देखील या संस्थांशी जोडण्यात येत आहे.त्यांना या क्षेत्रातील नवे कल, नवे तंत्रज्ञान यांची माहिती मिळावी म्हणून त्यांच्यासाठी वेळोवेळी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. कौशल्य विकास आणि क्षमता निर्मिती यासाठी आम्ही ‘समर्थ योजना’ राबवीत आहोत. याअंतर्गत अडीच लाखांहून अधिक व्यक्तींना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यापैकी बहुतांश महिला आहेत. आणि त्यांच्यातील पावणेदोन लाखांहून अधिक मित्रांना विविध उद्योगांमध्ये रोजगार देखील मिळाला आहे.

मित्रांनो,

गेल्या दशकात आम्ही आणखी एक नवा दृष्टीकोन स्वीकारला आहे, हा पैलू आहे व्होकल फॉर लोकल चा. संपूर्ण देशात आज व्होकल फॉर लोकल आणि लोकल टू ग्लोबल ची लोकचळवळ सुरु झाली आहे.तुम्हाला हे तर चांगलेच माहित आहे की छोटे छोटे विणकर, छोटे कारागीर, लघु आणि कुटिरोद्योग यांच्याकडे राष्ट्रीय पातळीवर जाहिरात करण्यासाठी, विपणनासाठी फारशी तरतूद केलेली नसते आणि ती असूही शकत नाही. म्हणून अशांच्या उत्पादनांचा प्रचार तुम्ही करा किंवा करू नका, मी मात्र करत आहे. ज्यांची गॅरंटी कोणीच घेत नाही त्यांची गॅरंटी मोदी घेतात. आमच्या या मित्रांसाठी देखील सरकार देशभरात प्रदर्शनाशी संबधित यंत्रणा उभारत आहे.

मित्रांनो,

ठाम आणि उपयुक्त धोरणे तयार करणाऱ्या या सरकारचा सकारात्मक परिणाम या क्षेत्राच्या वाढीतून स्पष्ट दिसून येतो. 2014 मध्ये भारतातील वस्त्रोद्योगविषयक बाजारपेठेचे मूल्य 7 लाख कोटी रुपयांहूनही कमी होते. आज हे मूल्य 12 लाखांहूनही अधिक झाले आहे. गेल्या 10 वर्षांत भारतात धाग्यांचे उत्पादन, कापडाचे उत्पादन आणि वस्त्र प्रावरणांचे उत्पादन या तिन्हींमध्ये 25 टक्क्याची वाढ झाली आहे. सरकारने या क्षेत्रात गुणवत्ता नियंत्रणावर देखील भर दिला आहे. 2014 नंतर असे सुमारे 380 बीआयएस मापदंड निश्चित करण्यात आले आहेत जे वस्त्रोद्योग क्षेत्राचा दर्जा सुधारण्यासाठी मदत करत आहेत. सरकारच्या अशा प्रयत्नांमुळेच या क्षेत्रात होणाऱ्या परदेशी गुंतवणुकीत देखील सतत वाढ दिसून येत आहे.2014 पूर्वीच्या 10 वर्षांमध्ये जितकी गुंतवणूक या क्षेत्रात झाली होती त्याच्या जवळपास दुप्पट थेट परदेशी गुंतवणूक आमच्या सरकारच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात झाली आहे.

मित्रांनो,

भारताच्या वस्त्रोद्योग क्षेत्राचे सामर्थ्य आपण पाहिले आहे आणि मला या क्षेत्राकडून खूप अपेक्षा आहेत. तुम्ही सर्वजण काय करू शकता हे आम्ही कोविड काळात अनुभवले आहे. जेव्हा देश आणि संपूर्ण जगच पीपीई किट्स आणि मास्क यांच्या मोठ्या टंचाईशी झगडत होते तेव्हा भारतातील वस्त्रोद्योगाने पुढाकार घेतला.सरकार आणि वस्त्रोद्योग क्षेत्र यांनी एकत्र येऊन संपूर्ण पुरवठा साखळी निर्माण केली आणि विक्रमी वेळात केवळ देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात पुरेशा प्रमाणात मास्क आणि किट्सचा पुरवठा केला. आपण भारताला जागतिक निर्यात केंद्र बनवण्याचे आपले लक्ष्य लवकरात लवकर गाठू शकू असा विश्वास मला वाटतो. तुम्हाला जी मदत हवी आहे ती सरकार पूर्णपणे करेल. यावर टाळ्या वाजल्या पाहिजेत. पण मला अजूनही असे वाटते की तुमच्या ज्या संस्था आहेत त्या देखील विस्कळीत स्वरुपात आहेत. त्यांना देखील एका सूत्रात कसे बांधता येईल हे पाहायला हवे. नाहीतर होते काय की एका क्षेत्रातील लोक येतात, स्वतःच्या समस्या सांगून सरकारकडून कर्ज घेऊन जातात. मग दुसऱ्या विभागातील लोक येतात, ते पहिल्याच्या अगदी उलट मागणी करतात, सांगतात, हे नको ते पाहिजे. इतक्या परस्पर विरोधी प्रकारच्या मागण्या तुमच्याकडून येतात, त्यामुळे एकाला मदत करताना दुसऱ्याचे नुकसान होते. जर तुम्ही सर्वजण एकत्रितपणे काही मागण्या घेऊन याल तर या बाबतीत सर्वसमावेशक पद्धतीने गोष्टी हाताळता येतील. आणि मी असे सांगू इच्छितो की तुम्ही या बाबतीत अधिक प्रोत्साहन द्याल.

दुसरी गोष्ट म्हणजे, जगात जे बदल होत आहेत त्यांच्या बाबतीत आपण अनेक वर्षांपासून आघाडीवर आहोत. संपूर्ण जग आज, समग्र आरोग्य सेवा, समग्र जीवनशैली यांची चर्चा करत आहे, आहाराच्या बाबतीत ते मुलभूत बाबींकडे वळत आहेत, जगण्याच्या दैनंदिन पद्धतींच्या बाबतीत देखील मुलभूत गोष्टींकडे वळत आहेत. आणि म्हणूनच जग आज वस्त्रांच्या बाबतीत देखील मुलभूत घटकांकडे वळत आहे. आजघडीला कोणताही माणूस पन्नास वेळा विचार करतो की मी जे कपडे घालणार आहे त्यावर कोणत्या रसायनाचा रंग लावला आहे, ही बाब त्याला ताण देते. नैसर्गिक रंगांनी रंगवलेले कपडे मला मिळू शकतील का? त्याला वाटते नैसर्गिक रंगांमध्ये तयार केलेला कापूस आणि त्यापासून बनवलेले धागे, कोणत्याही प्रकारे रंगवलेले असे मिळू शकतील का? म्हणजेच जग ही एक वेगळ्या प्रकारची बाजारपेठ आहे, त्यांची मागणी वेगळी आहे. आपण काय करतो आहोत, की भारत स्वतःच एक फार मोठी बाजारपेठ आहे, कपड्यांचा आकार भले लोक लहानमोठे करोत पण बाजार तरीही अवाढव्यच आहे, भले दोन-तीन इंचाचा फरक पडत राहील. आणि म्हणून आपल्या उद्योजकांना देशाबाहेरच्या जगाकडे पाहण्याची इच्छाच होत नाही. त्यांना वाटते, भारतात एवढी मोठी मागणी आहे, मला आणखी कुठे जायची काय गरज, ही जी विचारसरणी आहे ना, त्यातून आजच्या प्रदर्शनानंतर कृपा करून बाहेर पडा.

आफ्रिकेच्या बाजारपेठेत कशा पद्धतीच्या कापडाला मागणी आहे, कोणत्या पद्धतीची रंगसंगती तेथील ग्राहकांना आवडते, त्यांना कोणत्या साईझ लागतात याचा तुमच्यापैकी कोणी कधी अभ्यास केला आहे का?आपण असे करत नाही. तेथून कोणी मागणी नोंदवली, ऑर्डर केली आणि आपण कपडे पाठवून दिले, बास. माझ्या लक्षात आहे, आफ्रिकेचे लोक जे कपडे घालतात त्याची रुंदी त्यांना जरा जास्त लागते. आपल्याकडे कपड्यांची जी रुंदी असते ती आपल्या भारतातील लोकांच्या साईझ नुसार असते. आपल्याकडच्या व्यक्तीचा सदरा जेवढ्या कापडात तयार होईल तेवढ्यात त्यांच्याकडच्या व्यक्तीचा सदरा होऊ शकत नाही. आपल्या सुरेन्द्रनगरच्या एका व्यक्तीने असा प्रयत्न केला होता. तो विणकर होता, हाताने कापड विणत असे, त्याने त्याच्या कापडाची साईझ वाढवली, मोठ्या रुंदीचे कापड विणायला सुरुवात केली. आणि आफ्रिकेच्या लोकांना ज्या पद्धतीची चित्रे, उठावदार रंग आवडतात तसे त्याने त्याच्या कापडावर रंगवून त्यांना पाठवून दिले. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण आफ्रिकेच्या बाजारात त्याचे कापड फारच प्रसिद्ध झाले करण त्याच्या कापडात मध्ये शिलाईची गरजच नव्हती. आफ्रिकेच्या ग्राहकांना  केवळ एका ठिकाणी शिलाई मारून त्यांना पाहिजे तसे कपडे शिवता येत होते. आता थोडा असा अभ्यास केला गेला पाहिजे.

मी आत्ता एक प्रदर्शन पहात होतो. मी म्हटले, संपूर्ण जगात, संपूर्ण युरोपात जिप्सी समाज विखुरलेला आहे. जिप्सी लोक ज्या पद्धतीचे कपडे वापरतात ते जर तुम्ही बारकाईने पाहिलेत तर आपल्याकडे नैसर्गिक पद्धतीने डोंगराळ भागात राहणारे लोक वापरतात तसे किंवा आपल्या राजस्थानमध्ये तसेच गुजरातच्या सीमा भागांमध्ये जसे कपडे लोक घालतात त्याच्याशी मिळतेजुळते असे ते कपडे असतात. त्यांची रंगांची निवड देखील साधारण तशीच आहे. तुमच्यापैकी कोणी प्रयत्नपूर्वक जिप्सी समुदायाच्या मागणीनुसार कपडे तयार करून जगातील एवढ्या मोठ्या बाजारपेठेत पाय रोवण्याचा विचार केला आहे का? मी तर कोणत्याही मानधनाशिवाय हा सल्ला देत आहे. जगाला या गोष्टींची गरज आहे याचा विचार आपण करायला हवा. आपल्याकडे मी बघितले आहे की या संपूर्ण प्रदर्शनात रसायनांचा उद्योग करणारे नाहीत. मला सांगा कोणतेही कापड रसायनांच्या क्षेत्रातील लोकांच्या मदतीशिवाय बाजारात येऊ शकते का? पण तुमच्या पुरवठा साखळीमध्ये रसायनांचा व्यापारी नाहीच आहे. तो असता तर बरे झाले असते. त्यांच्यातही निकोप स्पर्धा झाली असती की बाबा नैसर्गिक रंग यापैकी कोण पुरवू शकतो, भाज्यांपासून तयार केलेले रंग कोण पुरवतो. आणि आपण जगाला त्याची बाजारपेठ देऊया. आपल्या खादीच्या कापडात जग जिंकण्याचे सामर्थ्य आहे. आपण मात्र खादीला स्वातंत्र्य चळवळ किंवा राजकीय नेत्यांचे निवडणुकीदरम्यान घालण्याचे कपडे इथपर्यंतच मर्यादित केले. माझ्या लक्षात आहे 2003 मध्ये मी एक फार मोठा पराक्रम केला होता. मी पराक्रम यासाठी म्हणतो कारण की ज्या लोकांमध्ये मी वावरलो आहे आणि ज्या मंचावर मी हा प्रयोग केला आहे त्याला पराक्रमच म्हणावे लागेल.

2003 मध्ये पोरबंदर मध्ये 2 ऑक्टोबरला मी फॅशन शो  आयोजित केला होता. आता आपल्या देशात आज सुद्धा कुठे पण फॅशन शो करा चार-सहा लोक झेंडा घेऊन विरोध करण्यासाठी येतात. 2003 मध्ये तर काय परिस्थिती असेल  याची तुम्हाला कल्पना करू शकता आणि मी गुजरात मध्ये एनआयडीची जी मुलं होती त्यांना थोडे समजावले. मी म्हटले, मला 2 ऑक्टोबरला ही जी खादी आहे ना जी नेत्यांचा पोशाख बनली आहे मला त्यातून बाहेर पडायचे आहे. 

या सामान्य जनतेच्या पोशाखामध्ये मला बदल करायचा आहे. थोडे कष्ट घेतले आणि मी गांधी आणि विनोबाजी यांच्याबरोबर काम करणाऱ्या साऱ्या गांधीवादी लोकांना एकत्र बोलावले. मी म्हटले बसा, इथे पहा. आणि''वैष्‍णव जन को तेणे रे कहिए'' हे गीत त्यावेळी वाजवले जात असे आणि त्यावर फॅशन शो चालत असे.आणि सारी तरुण मुलं जेव्हा आधुनिक खादीचे कपडे परिधान करून आले तेव्हा मला भावजी जे विनोबा जी यांचे एक सहकारी होते भावजी, ते आता हयात नाहीत. ते माझ्याबरोबर बसले आणि म्हणाले आम्ही तर कधीच खादीच्या या पैलूवर कधी विचारच केला नव्हता. आणि हाच आहे तो खरा मार्ग आणि आपण पहा नवीन नवीन प्रयोगांचा काय परिणाम होतो ते, खादी आज कुठल्या कुठे पोहोचलेली आहे. हो अजून ती आत्तापर्यंत तरी ती जागतिक बनलेली नाही आहे, आता तर आपल्या देशात तिची गाडी  धावू लागली आहे. अशा खूप गोष्टी आहेत मित्रांनो यावर आपल्याला विचार केला पाहिजे. 

दुसरं म्हणजे, भारतासारख्या देशांमध्ये जो वस्त्रोद्योगाच्या इतिहासामध्ये जगामध्ये ज्याचा पाया खूपच मजबूत आहे. ढाकाच्या मलमलीची आपण नेहमी चर्चा करत असायचो. एका अंगठी मधून संपूर्ण कपडा बाहेर पडू शकेल इतके तलम वस्त्र होते असे इथे सांगितले जायचे. आता आपण काय अशा कथाच ऐकत राहणार आहात की वस्त्रोद्योग तंत्रज्ञानाशी संबंधित मशीन वरती निर्माण होणारी उत्पादने, त्यासाठी चे काही संशोधन, आपले आयआयटी चे विद्यार्थी, आपले इंजीनियरिंगचे विद्यार्थी, एवढेच नाही तर काही अनुभवी लोक या क्षेत्रात खूप काही करत आहेत. 

आपल्यासमोर हिरे व्यापाराचे उदाहरण आहे. हिरे व्यापार क्षेत्रातल्या लोकांनी आपल्या ज्या यंत्रासंबंधी गरजा होत्या त्याबाबतीत या सर्व वस्तू त्यांनी इथे निर्माण केलेल्या आहेत. आणि हिरे उद्योगाचे काम कटिंग आणि पॉलिशिंग अर्थात कापणे आणि पैलू पाडण्याचे काम भारतामध्ये निर्माण झालेल्या याच मशीन या कामी वापरल्या जात आहेत. अशाच प्रकारे वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये आपल्याला मिशन मोडवर काम करता येणार नाही का? आणखी एक आपली संघटना थोडी स्पर्धात्मक केली पाहिजे. कोणती जी नवीन यंत्रे, जी कमी वीज उपयोगात आणतात, जास्तीत जास्त उत्पादन निर्मिती करतात, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनवणारे यंत्र घेऊन येईल त्याला खूप मोठे बक्षीस दिले जाईल असे काही आपण लोक करू शकणार नाही का? 

पूर्णपणे नवनवीन पद्धतीने विचार करा मित्रांनो. आज आपण विचार केला पाहिजे की, जगामध्ये आपल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी आपण त्यांच्या आवडीनिवडीबाबत सर्वेक्षण केले पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, त्याबाबत अहवाल तयार केला पाहिजे की, आफ्रिकन देशामध्ये अशा अशा प्रकारच्या वस्त्रोद्योगाची गरज आहे. 

युरोपामधील देशांना या प्रकारच्या वस्त्रोद्योगाची गरज आहे. जे लोक आरोग्या संबंधित जागरूक आहेत. त्यांना कशा प्रकारच्या वस्त्राची गरज आहे? मग आपण तशी वस्त्र का बनवू नयेत? जगामध्ये वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना रुग्णालयामध्ये, ऑपरेशन थिएटरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ज्या प्रकारचे  वस्त्र परिधान करावे लागतात. खूप मोठ्या प्रमाणात, अशी वस्त्र लागतात जी एक वेळेला उपयोगात आल्यानंतर फेकून दिले जातात. आणि अशा वस्त्रांचा बाजार खूप मोठा आहे. आपण कधी जगात लागणारे आपले ब्रँड निर्माण केले आहे. भारतामध्ये निर्माण झालेली वस्तू म्हणजे एवढी खात्रीलायक आहे की आपण रुग्णालयामध्ये केवढेही मोठे ऑपरेशन करायची असो, हे वस्त्र घालून जा.... रुग्णाला कसल्याच प्रकारचा त्रास होणार नाही. आपण अशा प्रकारचा बँड नाही का बनवू शकत? याचा अर्थ थोडा जागतिक स्तरावरचा विचार केला पाहिजे मित्रांनो. भारतातले हे एवढे मोठे क्षेत्र आहे आणि भारतातल्या कोट्यावधी लोकांचा रोजगार याच्याशी जोडला गेलेला आहे. आपण कृपा करून जगामधून आलेल्या फॅशनला  आत्मसात करू नये. आपण जगाच्या फॅशनचे नेतृत्व केले पाहिजे आणि आपण फॅशनच्या जगतातले जुने जाणते लोक आहोत. नवीन लोक नाही आहोत. आपण कधी कोणार्कच्या सूर्य मंदिरात गेला असाल तर जे शिल्प आहेत, मूर्ती आहेत, त्या शिल्पांनी जी वस्त्रं परिधान केलेले आहेत, आजच्या या आधुनिक युगामध्ये जे खूपच आधुनिक कपडे वाटतात ते वस्त्र शेकडो वर्षाआधी या दगडांवरती कोरले गेलेले आहेत.आज ज्याप्रकारे आपल्या भगिनी पर्स घेऊन चालत असतात ना असे वाटते की खूपच मोठ्या फॅशनेबल आहेत. शेकडो वर्षांपूर्वी कोणार्कच्या त्या दगडांच्या शिल्पकृतीमध्ये आपल्याला ते दिसून येईल. आपल्या इथे वेगवेगळ्या भागांमधून ची पगडी का निर्माण झालेली असेल? मित्रांनो, आपल्या इथे कोणतीच महिला वस्त्र परिधान करताना आपल्या पायांचा एक सेंटिमीटर सुद्धा भाग कोणाला दिसू नये यासाठी दक्ष असत. त्याच देशामध्ये काही लोकांचा कारभार अशाप्रकारे होता की त्यांना सहा आठ इंच आखूड कपडे घालणे आवश्यक होते तर  तशा लोकांसाठी तशी पद्धती चालत असायची. आपल्या देशामध्ये जे पशुपालनाचे काम करत होते त्यांचे कपडे आपण पहावेत, याचा अर्थ भारतामध्ये  व्यवसायानुसार, व्यवसाय अनुकूल कपडे घातले जात असत. त्याच्यावरती शेकडो वर्षांपूर्वीपासून काम झालेले आहे. जर कोणी वाळवंटात असेल तर त्यांची पादत्राणे कशी असतील हे पाहायचे असेल तर शेकडो वर्षांपूर्वीचे डिझाईन वेगवेगळे प्रकार आज पण या देशात उपलब्ध आहेत. परंतु आपण आपल्या एवढ्या मोठ्या कार्यक्षेत्रावर ज्या बारकाईने विचार करायला हवा त्या बारकाईने आपण विचारात करत नाही आहोत. 

आणि मित्रांनो, 

हे काम सरकारला कशाही प्रकारे करायला लावू नये नाहीतर गुळाचे शेण करण्यात आम्ही लोक खूपच तज्ञ आहोत. मी सरकार या गोष्टीला लोकांच्या जीवनातून कायमचे काढून टाकावे या मताचा आहे, विशेष करून मध्यम वर्गातल्या कुटुंबांच्या जीवनामध्ये सरकारने हस्तक्षेप करावा हे मला  मान्य नाही. प्रत्येक दिवशी प्रत्येक पावलावरती सरकार, काय आवश्यकता आहे? आपण अशा समाजाची रचना केली पाहिजे जिथे सरकारचा हस्तक्षेप कमीत कमी असायला हवा. हो, हे खरे आहे गरिबांना याची गरज आहे, त्यावेळी सरकारला त्यांच्या पाठीशी उभे राहावे लागेल. त्यांना शिकायचे आहे तेव्हा त्यांना शिकवले पाहिजे. जेव्हा त्यांना रुग्णालयाची आवश्यकता आहे ते त्याला मिळाले पाहिजे, याव्यतिरिक्त जी सरकारची आडकाठी करणाऱ्या सवयी आहेत ना मी त्या सवयींच्या विरोधात मागच्या दहा वर्षापासून लढा देत आहे आणि येणाऱ्या पाच वर्षांमध्ये तर मी या सवयी कायमच्या मोडीत काढणार आहे. मी निवडणुकांची चर्चा करत नाही आहे भावांनो. हे माझे म्हणण्याचे तात्पर्य आहे की, आपल्या लोकांसाठी हो सरकार हे एका कॅटलिस्ट एजंट च्या रूपामध्ये आहे. आपले जे स्वप्न आहेत त्यांना पूर्ण करण्यामध्ये जे अडथळे आहेत ते दूर करण्याचे काम सरकारचे आहे. त्यासाठीच तर आम्ही बसलो आहोत. आम्ही ती कामे करू. परंतु मी आपल्याला आमंत्रण देतो आहे की, खूप मोठ्या हिमतीने आपण यावे एक नवीन दृष्टिकोन घेऊन बरोबरीने यावे. संपूर्ण जगावर लक्ष ठेवून यावे. हिंदुस्तान मध्ये आपले उत्पादन विक्री होत नाही आहे, याआधी 100 कोटींची विक्री होत असे, या वेळेला 200 कोटींची विक्री झाली, या अशा पद्धतीच्या चक्रामध्ये आपण अडकू नये. याआधी किती निर्यात होत होती आणि आत्ता या घडीला किती निर्यात होत आहे. याआधी 100 देशांमध्ये जात होता, आत्ता 150 देशांमध्ये कशाप्रकारे जात आहे. याआधी जगामध्ये जगातल्या 200 शहरांमध्ये जात होता, आता जगातल्या 500  शहरांमध्ये कसा काय जात आहे, याआधी जगाच्या अशा प्रकारच्या बाजारांमध्ये जात होता, आता जगाच्या सहा नव्या बाजारांमध्ये कसा प्रवेश करायचा याबाबतीत आपण विचार केला पाहिजे. आणि जेव्हा आपण लोक जे निर्यात करणार आहात तेव्हा हिंदुस्थान मधील लोक वस्त्राविना राहतील असे होणार नाही. याबाबतीत काळजी करू नये, इतक्या लोकांना ज्या प्रकारचे वस्त्र हवे आहेत त्या प्रकारचे वस्त्र त्यांना मिळणार आहेत, चला पुन्हा भेटूया, खूप खूप आभार. धन्यवाद! 

 

* * *

JPS/S.Patil/Sonal C/Sanjana/Vikas/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2011211) Visitor Counter : 59