पंतप्रधान कार्यालय

गुजरातमध्ये राजकोट इथे 48,100 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या   अनेक विकास प्रकल्पांचे  पंतप्रधानांनी केले राष्ट्रार्पण आणि पायाभरणी 


राजकोट, भटिंडा, रायबरेली, कल्याणी आणि मंगलगिरी ही  पाच एम्स राष्ट्राला समर्पित

23 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये 11,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 200 हून अधिक आरोग्य सेवा पायाभूत सुविधा प्रकल्पांची केली पायाभरणी आणि राष्ट्राला समर्पित

पुण्यातल्या ‘निसर्ग ग्राम’ या राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेचे केले  उद्घाटन

कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या सुमारे 2280 कोटी रुपयांच्या 21 प्रकल्पांचे उद्घाटन आणि राष्ट्रार्पण  

विविध नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांची केली पायाभरणी

9000 कोटी रुपयांच्या नवीन मुंद्रा-पानिपत पाइपलाइन प्रकल्पाची केली पायाभरणी

"आम्ही प्रमुख विकास कार्यक्रमांचे उद्घाटन  दिल्लीबाहेरही करत  असून  महत्त्वाचे राष्ट्रीय कार्यक्रम दिल्लीबाहेर आयोजित करण्याचा रिवाज वाढत आहे"

“नवभारत आपली कामे वेगाने पूर्ण करत आहे”

"मी पाहतोय की पिढ्या बदलल्या तरी मोदींबद्दलची आपुलकी कोणत्याही वयोमर्यादेच्या पलीकडे आहे"

"पाण्याखाली गेलेल्या द्वारकेच्या दर्शनाने, विकास आणि वारसा या माझ्या संकल्पाला नवे बळ मिळाले

Posted On: 25 FEB 2024 6:40PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील राजकोट इथे, 48,100 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी केली आणि काही राष्ट्राला समर्पित केले.  या प्रकल्पांमध्ये आरोग्य, रस्ते, रेल्वे, ऊर्जा, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, तसेच पर्यटन यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश आहे.

या संपूर्ण कार्यक्रमाला संबोधित करताना, पंतप्रधानांनी या कार्यक्रमात दूरदृष्य प्रणाली द्वारे, उपस्थित राज्यांचे माननीय राज्यपाल आणि  मुख्यमंत्री, संसद सदस्य आणि विधानसभांचे सदस्य तसेच केंद्रीय मंत्री यांच्या उपस्थितीबद्दल  त्यांचे आभार मानले. एकेकाळी सर्व प्रमुख विकास कार्यक्रम एकट्या नवी दिल्लीत पार पडत असत त्या काळाचा उल्लेख करत पंतप्रधानांनीसध्याच्या सरकारने हा रिवाज बदलून  भारत सरकारला देशाच्या कानाकोपऱ्यात नेले, या बाबीवर प्रकाश टाकला.  राजकोटमधील आजचा हा कार्यक्रम, या विश्वासाचा पुरावा आहे”, असे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, नवीन परंपरा पुढे नेत, प्रकल्पांचे राष्ट्रांर्पण आणि पायाभरणी समारंभ आता देशातील अनेक ठिकाणी होत आहेत. जम्मूमधील एका कार्यक्रमातून झालेल्या  IIT भिलाई, IIT तिरुपती, IIIT कुर्नूल, IIM बोधगया, IIM जम्मू, IIM विशाखापट्टणम आणि IIS कानपूर या शैक्षणिक संस्थांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाची आठवण करून देत पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज एम्स राजकोट, एम्स रायबरेलीएम्स मंगलागिरी, एम्स भटिंडा आणि एम्स कल्याणी यांचे उद्घाटन असेच होत आहे.  " विशेषत: जेव्हा आपण या 5 एम्स कडे पाहतो तेव्हा विकसनशील भारतामध्ये वेगाने कामे पूर्ण केली जात आहेत हे लक्षात येते," असे  मोदी पुढे म्हणाले.

राजकोटशी असलेल्या आपल्या दीर्घ संबंधांची, पंतप्रधानांनी आठवण करून दिली आणि सांगितले की, 22 वर्षांपूर्वी ते इथून आमदार म्हणून निवडून आले होते.  22 वर्षांपूर्वी 25 फेब्रुवारी रोजी त्यांनी आमदार म्हणून शपथ घेतली होती.  राजकोटच्या लोकांच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केल्याचे ते म्हणाले.  "मी पाहतोय की पिढ्या बदलल्या तरी मोदींबद्दलची आपुलकी कोणत्याही वयोमर्यादेच्या पलीकडे आहे" असे पंतप्रधान कृतज्ञतेने म्हणाले.

आजच्या कार्यक्रमाला विलंब झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत, पंतप्रधानांनी आजच्याच दिवसारंभी द्वारकामध्ये  त्यांनी केलेल्या सुदर्शन सेतूसह अनेक विकास कामांचे उद्घाटन आणि पायाभरणीच्या उपक्रमांबद्दल श्रोत्यांना सांगितले. पाण्याखाली गेलेली पवित्र नगरी द्वारका इथे प्रार्थना करताना आलेल्या दिव्य अनुभूती बद्दल त्यांनी पुन्हा एकदा उल्लेख केला.  पुरातत्व विषयक आणि धार्मिक ग्रंथ वाचून, आपले द्वारकेबद्दल कुतूहल निर्माण झाले  होते. आज मला ते पवित्र दृष्य स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्याची संधी मिळाली आणि मी त्या पवित्र अवशेषांना स्पर्श करू शकलो.  मी तिथे प्रार्थना केली आणि मोर-पंखअर्पण केले.  त्या भावनेचे वर्णन करणे कठीण आहे,” असे सांगताना  पंतप्रधान म्हणाले, या अनुभवाने भावना उचंबळून आल्या.समुद्राच्या त्या खोल अंतरंगात मी भारताच्या गौरवशाली भूतकाळाबद्दल मोठ्या विस्मयाने विचार करत होतो.  मी बाहेर आलो तेव्हा भगवान कृष्णाचे आशीर्वाद तसेच द्वारकेची प्रेरणा घेऊन बाहेर पडलो,” असे पंतप्रधान म्हणाले.  यामुळे माझ्या विकास आणि वारसा या संकल्पनेला एक नवीन शक्ती आणि ऊर्जा मिळाली.  विकसित भारताच्या माझ्या ध्येयामध्ये दैवी विश्वास आला आहे”, असे ते पुढे म्हणाले.

आजच्या 48,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांना नमूद करत पंतप्रधानांनी गुजरात किनारपट्टीवरून हरियाणातील पानिपत येथील इंडियन ऑईलच्या तेलशुद्धीकरण प्रकल्पापर्यंत कच्च्या तेलाची वाहतूक करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या न्यू मुंद्रा-पानिपत पाईपलाईनचा उल्लेख केला. त्यांनी रस्ते, रेल्वे, वीज, आरोग्य आणि शिक्षण यांच्याशी संबंधित प्रकल्पांचाही उल्लेख केला. आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनानंतर एम्स राजकोट आता राष्ट्राला समर्पित करण्यात आले आहे", पंतप्रधान म्हणाले आणि राजकोट आणि सौराष्ट्र येथील लोकांचे अभिनंदन केले. ज्या ठिकाणी एम्सचे उद्घाटन करण्यात आले आहे तिथल्या नागरिकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

आज केवळ राजकोटसाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी एक ऐतिहासिक प्रसंग आहे”, पंतप्रधान मोदी यांनी विकसित भारतमधील आरोग्य सुविधांच्या अपेक्षित स्तरांचे दर्शन राजकोटमधून घडत असल्याचे अधोरेखित करत सांगितले.  देशाच्या स्वातंत्र्याला 50 वर्षे झाल्यानंतरही देशात केवळ एकच एम्स होते आणि ते देखील दिल्लीत होते, याकडे त्यांनी निर्देश केला. स्वातंत्र्यानंतरच्या सात दशकांमध्ये केवळ सात एम्स तयार करण्यात आली, ज्यांच्यापैकी काही पूर्ण देखील झाली नाहीत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. गेल्या 10 दिवसात  देशाने सात नवीन एम्सची पायाभरणी आणि उद्घाटन होताना पाहिले आहे,” गेल्या 70 वर्षात ज्या प्रकारे काम झाले त्या तुलनेत विद्यमान सरकारने अतिशय वेगाने कामांची पूर्तता केली आणि देशाला विकासाच्या मार्गावर नेले, असे अधोरेखित करत पंतप्रधानांनी सांगितले. त्यांनी 200 पेक्षा जास्त आरोग्यविषयक पायाभूत सुविधा, मल्टीस्पेशालिटी रुग्णालयांची सॅटेलाईट सेंटर्स आणि गंभीर  आजारांच्या उपचारांच्या केंद्रांची पायाभरणी आणि लोकार्पणाचा देखील त्यांनी उल्लेख केला.  मोदी की गॅरंटी म्हणजे आश्वासनांच्या पूर्ततेच्या गॅरंटीची गॅरंटी आहे याचा पुनरुच्चार करत पंतप्रधान म्हणाले की 3 वर्षांपूर्वी राजकोट एम्सची पायाभरणी त्यांनी केली होती आणि आज त्या हमीची पूर्तता झाली. त्याच प्रकारे एका एम्सची हमी पंजाबला देण्यात आली होती आणि त्याची पायाभरणी आणि उद्घाटन देखील पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले. रायबरेली, मंगलगिरी, कल्याणी आणि रेवाडी एम्ससाठी हे चक्र सुरू राहिले आहे. गेल्या 10 वर्षात विविध राज्यात 10 नवीन एम्सना मंजुरी देण्यात आली. जिथे इतरांकडून अपेक्षांचा अंत होतो तिथे मोदींची गॅरंटी सुरू होते,” पंतप्रधान मोदी म्हणाले.

आरोग्यसुविधांमध्ये आणि पायाभूत सुविधांमध्ये गेल्या 10 वर्षात झालेल्या सुधारणांमुळे महामारीचा सामना अतिशय विश्वासार्ह पद्धतीने करता आला, असे पंतप्रधानांनी सांगितले. एम्स, वैद्यकीय महाविद्यालये आणि क्रिटिकल केअर पायाभूत सुविधांच्या अभूतपूर्व विस्ताराचा त्यांनी उल्लेख केला. लहान आजारांसाठी गावांमध्ये 1.5 लाखांपेक्षा जास्त आरोग्य मंदिरे आहेत. पंतप्रधान म्हणाले की आज देशातील वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या 2014 मधील 387 वरून 706 वर, दहा वर्षांपूर्वीच्या एमबीबीएसच्या 50 हजार जागा आता एक लाखांपेक्षा जास्त जागांवर आणि पदव्युत्तर जागा 2014 मधील 30 हजारांवरून 70 हजारांवर पोहोचल्या आहेत. या महाविद्यालयातून संपूर्ण 70 वर्षातील एकूण डॉक्टर्सपेक्षा जास्त डॉक्टर पुढील काही वर्षात बाहेर पडतील, ते म्हणाले. देशात 64 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाची आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा मिशन सुरू आहेत. आजच्या कार्यक्रमात वैद्यकीय महाविद्यालये, क्षयरोग उपचार  रुग्णालये आणि संशोधन केंद्रे, पीजीआय सॅटेलाईट सेंटर, क्रिटिकल केअर ब्लॉक्स आणि डझनभर ईएसआयसी रुग्णालयांच्या प्रकल्पांचा देखील समावेश होता.   

सरकारने रोगप्रतिबंधाबरोबरच त्याला तोंड देण्याच्या क्षमतेलाही प्राधान्य दिले आहे, असे पोषण, योग, आयुष आणि स्वच्छता यावर असलेला भर अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले. त्यांनी पारंपरिक भारतीय औषधे आणि आधुनिक औषधे या दोघांनाही प्रोत्साहन देण्याची वचनबद्धता अधोरेखित केली आणि आज महाराष्ट्र आणि हरयाणात उद्घाटन करण्यात येत असलेल्या योग आणि निसर्गोपचाराशी संबंधित दोन मोठ्या रुग्णालयांची उदाहरणे दिली.  यावेळी त्यांनी गुजरातमध्ये उभारण्यात येत असलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या पारंपरिक औषध प्रणालीशी संबंधित जागतिक केंद्राचे देखील उदाहरण दिले.

गरीब आणि मध्यम वर्गाला चांगल्या प्रकारच्या आरोग्य सुविधा मिळवताना सुद्धा जास्त खर्च करावा लागू नये म्हणून मदत करण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांवर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. आयुष्मान भारत या योजनेने एक लाख कोटी रुपयांची बचत करण्यात आणि 80 टक्के सवलतीच्या दरांनी औषधे उपलब्ध करणाऱ्या जनऔषधी केंद्रांनी 30,000 कोटी रुपयांची बचत करण्यात मदत केली आहे, असे त्यांनी सांगितले. उज्ज्वला योजने अंतर्गत गरिबांच्या 70,000 कोटी रुपयांची बचत झाली आहे तर स्वस्त मोबाईल डेटामुळे नागरिकांची दर महिन्याला 4000 रुपयांची आणि कर संबंधित सुधारणांमुळे करदात्यांची 2.5 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे.

पंतप्रधानांनी पीएम सूर्यघर योजना या वीज देयक शून्यावर आणणाऱ्या आणि कुटुंबांसाठी उत्पन्नाची निर्मिती करणाऱ्या योजनेची सविस्तर माहिती दिली. लाभार्थ्यांना 300 युनिट वीज मोफत मिळेल आणि उर्वरित वीजेची खरेदी सरकारकडून केली जाईल. त्यांनी महाकाय पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जा प्रकल्पांचाही उल्लेख केला, ज्यांच्यासारखे दोन प्रकल्प कच्छमध्ये उभारण्यात येत असून त्यांची पायाभरणी आज करण्यात आली.

राजकोट शहर हे कामगारांचे शहर असल्याचे नमूद करत पंतप्रधानांनी 13,000 कोटी रुपयांची विश्वकर्मा योजना लाखो विश्वकर्मांना लाभ देत असल्याचे सांगितले. एकट्या गुजरातमध्येच 20,000 विश्वकर्मांना यापूर्वीच प्रशिक्षित करण्यात आले आहे आणि प्रत्येक विश्वकर्म्याला 15,000 रुपयांची मदत मिळाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. रस्त्यावरील फेरीवाल्यांना पीएम स्वनिधी योजने अंतर्गत 10,000 कोटी रुपयांची मदत दिली जात असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. गुजरातमधील फेरीवाल्यांना 800 कोटी रुपयांची मदत मिळाली आहे. एकट्या राजकोटमध्येच 30,000 पेक्षा जास्त कर्जे वितरित झाली आहेत, ते म्हणाले.

जेव्हा भारतातील नागरिकांचे सशक्तीकरण होईल तेव्हा विकसित भारत मिशन अधिक मजबूत होईल, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.  "जेव्हा मोदी भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक महासत्ता बनवण्याची गॅरंटी देतात, तेव्हा सर्वांसाठी आरोग्य आणि सर्वांसाठी समृद्धी हेच ध्येय आहे", असे सांगत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ मनसुख मांडविया आणि खासदार सी आर पाटील आदी उपस्थित होते.

पार्श्वभूमी

देशातील तृतीयक आरोग्य सेवा बळकट करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पंतप्रधानांनी राजकोट (गुजरात), भटिंडा (पंजाब), रायबरेली (उत्तर प्रदेश), कल्याणी (पश्चिम बंगाल) आणि मंगलगिरी (आंध्र प्रदेश) येथील पाच अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) राष्ट्राला समर्पित केल्या.

पंतप्रधानांनी 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 11,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 200 हून अधिक आरोग्य सेवा पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी केली तसेच राष्ट्राला समर्पित केल्या.

पंतप्रधानांनी पुद्दुचेरी मधील कराईकल येथील JIPMER चे वैद्यकीय महाविद्यालय आणि पंजाबमधील संगरूर येथील पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अँड एज्युकेशनल रिसर्च (PGIMER) संस्थेच्या 300 खाटांचे केंद्र राष्ट्राला समर्पित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुद्दुचेरी मधील यानाम येथे JIPMER च्या 90 खाटांच्या मल्टी स्पेशालिटी कन्सल्टिंग युनिटचे उद्घाटन केले तसेच चेन्नईतील नॅशनल सेंटर फॉर एजिंग; बिहारमधील पूर्णिया येथील नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्यासह भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेची (ICMR)  2 फील्ड युनिट्स - पैकी एक केरळमधील अलप्पुझा येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था  केरळ युनिट तर दुसरे तमिळनाडूमधील तिरुवल्लूर येथील राष्ट्रीय क्षयरोग संशोधन संस्था  (NIRT): नवीन संमिश्र क्षयरोग संशोधन सुविधा यांचेही उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. पंजाबमधील फिरोजपूर येथे PGIMER च्या 100 खाटांच्या केंद्रासह दिल्लीतील आरएमएल रुग्णालयातील वैद्यकीय महाविद्यालयाची नवीन इमारतइंफाळ येथील आरआयएमएस मधील क्रिटिकल केअर ब्लॉकझारखंडमधील कोडरमा आणि दुमका येथील नर्सिंग महाविद्यालय आणि इत्यादी,विविध आरोग्य प्रकल्पांची पंतप्रधानांनी पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आली.

या व्यतिरिक्त, राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि पंतप्रधान-आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियान (PM-ABHIM) अंतर्गत, पंतप्रधानांनी 115 प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्र समर्पण केले. यामध्ये पंतप्रधान-आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियान (PM-ABHIM) अंतर्गत 78 प्रकल्पांचा समावेश आहे (क्रिटिकल केअर ब्लॉक्सचे 50 युनिट्स, एकात्मिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळांचे 15 युनिट्स, विभाग स्तरावर सार्वजनिक आरोग्य केंद्रांचे 13 युनिट्स); याशिवाय राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सामुदायिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य सेवा केंद्र, प्रारुप रुग्णालय, संक्रमण वसतीगृह इत्यादी विविध प्रकल्पांची 30 युनिट्स यांचीही पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्र समर्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

पंतप्रधानांच्या हस्ते पुण्यातील निसर्ग ग्रामया राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेचे उद्घाटनही करण्यात आले. या संस्थेमध्ये निसर्गोपचार वैद्यकीय महाविद्यालय आणि बहु-विद्याशाखीय संशोधन आणि विस्तार केंद्रासह 250 खाटांचे रुग्णालय उभारण्यात आले आहे. याशिवाय हरियाणातील झज्जर येथे केंद्रीय योग आणि निसर्गोपचार संशोधन संस्थेचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले. या संस्थेत सर्वोच्च स्तरावरील योग आणि निसर्गोपचार संशोधन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी कर्मचारी राज्य विमा प्राधिकरणाच्या (ESIC)  सुमारे 2280 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या  21 प्रकल्पांचे उद्घाटन केले आणि राष्ट्राला समर्पित केले. राष्ट्राला समर्पित केलेल्या प्रकल्पांमध्ये पाटणा (बिहार) आणि अलवर (राजस्थान) येथील 2 वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालये यांचा समावेश आहे; सोबतच कोरबा (छत्तीसगड), उदयपूर (राजस्थान), आदित्यपूर (झारखंड), फुलवारी शरीफ (बिहार), तिरुपूर (तामिळनाडू), काकीनाडा (आंध्र प्रदेश) आणि रायगड आणि भिलाई (छत्तीसगड) येथील 8 रुग्णालये; तर राजस्थानमधील नीमराना, अबू रोड आणि भिलवाडा येथी 3 छोटी रुग्णालये यांचाही समावेश आहे. राजस्थानमधील अलवर, बेहरोर आणि सीतापुरा तर सेलाकी (उत्तराखंड), गोरखपूर (उत्तर प्रदेश), केरळमधील कोराट्टी आणि नवैकुलम आणि पिडिभीमावरम (आंध्र प्रदेश) या 8 ठिकाणी कर्मचारी राज्य विमा प्राधिकरणाच्या रुग्णालयाचे उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले.

या भागात नवीकरणीय ऊर्जेच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी पंतप्रधानांनी 300 मेगावॅटच्या भुज-II सौर ऊर्जा प्रकल्पासह ग्रिड कनेक्टेड 600 मेगावॅट सोलर पीव्ही पॉवर प्रकल्प; खवडा सौरऊर्जा प्रकल्प;  200 मेगावॅट दयापूर-II पवन ऊर्जा प्रकल्प यासारख्या विविध नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांची पायाभरणी केली.

पंतप्रधानांनी सुमारे 9000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या नवीन मुंद्रा - पानिपत पाइपलाइन प्रकल्पाची पायाभरणीही केली.   8.4 MMTPA च्या स्थापित क्षमतेसह 1194 किमी लांबीची मुंद्रा - पानिपत पाईपलाईन गुजरात किनारपट्टीवरील मुंद्रा येथून हरियाणातील पानिपत येथील इंडियन ऑइलच्या रिफायनरीपर्यंत कच्च्या तेलाची वाहतूक करण्यासाठी कार्यान्वित करण्यात आली.

या भागातील रस्ते आणि रेल्वे पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करण्यासाठी पंतप्रधानांनी सुरेंद्रनगर - राजकोट रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण राष्ट्राला समर्पित केले. तसेच जुन्या राष्ट्रीय महामार्ग -8E चे भावनगर - तळाजा (पॅकेज-I) चौपदरीकरण; राष्ट्रीय महामार्ग -751 चा पिपली-भावनगर (पॅकेज-I) टप्पा त्यांनी राष्ट्राला समर्पित केला. पंतप्रधानांनी राष्ट्रीय महामार्ग -27 च्या समखियाली ते सांतालपूर या भागाच्या सहा पदरी मार्गाची पायाभरणी देखील केली.

***

N.Chitale/A.Save/S.Patil/S.Mukhedkar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2008947) Visitor Counter : 66