पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 फेब्रुवारी रोजी सुमारे 41,000 कोटी रुपये खर्चाच्या 2000 हून अधिक रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण करणार


पंतप्रधान अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत 19,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 553 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास कामाची पायाभरणी करणार

पुनर्विकसित गोमती नगर रेल्वे स्थानकाचे उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार

पंतप्रधान सुमारे 21,520 कोटी रुपये खर्चाच्या देशभरातील 1500 रोड ओव्हर ब्रिज आणि अंडरपासची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण करणार

Posted On: 25 FEB 2024 3:29PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:30 वाजता दूरदृश्य प्रणालीमार्फत सुमारे 41,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 2000 रेल्वे पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण करतील.

रेल्वे स्थानकांवर जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याच्या महत्त्वावर पंतप्रधानांनी अनेकदा भर दिला आहे.  या प्रयत्नातील एक मोठे पाऊल म्हणून, पंतप्रधानांच्या हस्ते अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत 553 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास कामाची पायाभरणी केली जाणार आहे.  27 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेल्या या स्थानकांच्या पुनर्विकासासाठी सुमारे 19,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च केली जाणार आहे. ही स्थानके शहराच्या दोन्ही बाजूंना एकत्रित करणारी सिटी सेंटर्सम्हणून काम करतील. या स्थानकांमध्ये रूफ प्लाझा, सुंदर लँडस्केपिंग, इंटर मॉडेल कनेक्टिव्हिटी, सुधारित आधुनिक दर्शनी भागकिड्स प्ले एरिया, कियॉस्क, उपहारगृह इत्यादी आधुनिक प्रवासी सुविधा असतील. ही रेल्वे स्थानके पर्यावरणपूरक आणि दिव्यांग अनुकूल म्हणून पुनर्विकसित केली जातील. या स्थानक इमारतींची रचना स्थानिक संस्कृती, वारसा आणि स्थापत्यकलेतून प्रेरित असेल.

याशिवाय, पंतप्रधान उत्तर प्रदेशातील गोमती नगर स्थानकाचेही उद्घाटन करतील. एकूण 385 कोटी रुपये खर्चून या रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्यात आला आहे.  भविष्यातील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेत  या स्थानकात आगमन आणि निर्गमनाची वेगवेगळी सुविधा निर्माण करण्यात आली आहे. हे स्थानक शहराच्या दोन्ही बाजूंना जोडते. या मध्यवर्ती वातानुकूलित स्थानकात एअर कॉन्कोर्स, गर्दीमुक्त संचलन, उपहारगृह तसेच तळघरात पार्किंगसाठी पुरेशी जागा अशा आधुनिक प्रवासी सुविधा आहेत.

यासोबतच, पंतप्रधान नरेंद्र मोदी सुमारे 1500 रोड ओव्हर ब्रिज आणि अंडरपासची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण करतील.  हे रोड ओव्हर ब्रिज आणि अंडरपास 24 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरले असून या प्रकल्पांची एकूण किंमत सुमारे 21,520 कोटी रुपयांहून अधिक आहे.  या प्रकल्पांमुळे गर्दी  कमी होईल, सुरक्षा आणि संपर्क सुविधा वाढेल, क्षमता सुधारेल आणि रेल्वे प्रवासाची कार्यक्षमता वाढेल.

***

N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2008852) Visitor Counter : 125