पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी ‘विकसित भारत विकसित छत्तीसगड’ कार्यक्रमाला केले संबोधित
छत्तीसगडमधील 34,400 कोटी रूपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकासकामांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी
हे प्रकल्प रस्ते, रेल्वे, कोळसा, ऊर्जा आणि सौर ऊर्जा अशा महत्त्वाच्या क्षेत्रांच्या मागण्यांची पूर्तता करणार
एनटीपीसी’च्या लारा सुपर थर्मल पॉवर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण आणि दुसऱ्या टप्प्याची पायाभरणी
छत्तीसगडचा विकास आणि लोकांचे कल्याण ही दुहेरी इंजिन सरकारची प्राथमिकता असल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन
गरीब, शेतकरी, युवा आणि नारी शक्ती यांच्या सक्षमीकरणामधून विकसित छत्तीसगडची उभारणी होईल: पंतप्रधान
ग्राहकांचे वीज बिल शून्यावर आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन
मोदींसाठी तुम्हीच त्यांचे कुटुंब आहात आणि तुमची स्वप्ने हेच त्यांचे संकल्प आहेत: पंतप्रधान
पुढील 5 वर्षांत भारत जेव्हा जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक सत्ता बनेल, तेव्हा छत्तीसगडही विकासाची नवी उंची गाठेल: पंतप्रधानांचा विश्वास
भ्रष्टाचार संपतो तेव्हा विकास सुरू होतो आणि रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतात अशी पंतप्रधानांची स्पष्टोक्ती
प्रविष्टि तिथि:
24 FEB 2024 5:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे ‘विकसित भारत - विकसित छत्तीसगड’ या कार्यक्रमाला संबोधित केले. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी 34,400 कोटी रूपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकासकामांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी केली. हे प्रकल्प रस्ते, रेल्वे, कोळसा, ऊर्जा आणि सौर ऊर्जा अशा अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांच्या मागण्यांची पूर्तता करतील.
उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी छत्तीसगडमधील सर्व विधानसभा मतदारसंघांमधील या कार्यक्रमाशी जोडलेल्या लाखो कुटुंबांना शुभेच्छा दिल्या. युवा, महिला, गरीब आणि शेतकरी यांच्या सक्षमीकरणाद्वारे विकसित छत्तीसगडची उभारणी होईल, आणि आधुनिक पायाभूत सुविधा विकसित छत्तीसगडचा पाया मजबूत करतील यावर पंतप्रधानांनी भर दिला. ते म्हणाले की आज ज्या प्रकल्पांचे उद्घाटन किंवा पायाभरणी केली जात आहे ते प्रकल्प छत्तीसगडच्या नागरिकांसाठी नवीन संधी निर्माण करतील.
आजचे एनटीपीसी, अर्थात राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाच्या सुपर थर्मल पॉवर (औष्णिक ऊर्जा) प्रकल्पाचे लोकार्पण आणि 1600 मेगावॅट क्षमतेच्या दुसऱ्या टप्प्याची पायाभरणी, या संदर्भात पंतप्रधान म्हणाले की आता नागरिकांना कमी खर्चात वीज उपलब्ध होईल. छत्तीसगडला सौरऊर्जेचे केंद्र बनवण्याच्या सरकारच्या प्रयत्नांवरही त्यांनी प्रकाश टाकला आणि ते म्हणाले की राजनांदगाव आणि भिलई येथील समर्पित सौर ऊर्जा प्रकल्पांमध्ये आसपासच्या प्रदेशाला रात्रीच्या वेळीही वीजपुरवठा करण्याची क्षमता आहे. “ग्राहकांचे वीज बिल शून्यावर आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे”, असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. आतापर्यंत देशभरातील एक कोटी कुटुंबांना पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेचा लाभ मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. सरकार रूफटॉप सोलर पॅनल (छतावरील सौर ऊर्जा प्रणाली) उभारण्यासाठी लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात थेट आर्थिक मदत करणार असून, याद्वारे 300 युनिट्स मोफत वीज निर्मिती होईल. यापैकी अतिरिक्त वीज सरकार खरेदी करेल, ज्यायोगे नागरिकांना हजारो रुपये अतिरिक्त उत्पन्न मिळेल, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांना नापीक शेतजमिनींवर लहान आकाराचे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी मदत करून अन्नदात्यांचे रुपांतर ऊर्जादात्यांमध्ये करण्यावरही सरकारचा भर असल्याचे ते म्हणाले.
छत्तीसगडमधील दुहेरी-इंजिन सरकारने दिलेली हमी पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधानांनी प्रशंसा केली. राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दोन वर्षांपासून प्रलंबित असलेला बोनस आधीच मिळाला आहे. तेंदूपत्ता संकलकांच्या वेतनात वाढ करण्याबाबत निवडणुकीच्या वेळी दिलेली हमीही दुहेरी इंजिन सरकारने पूर्ण केली आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली. पीएम आवास आणि हर घर नल से जल या योजनांची वेगवान अंमलबजावणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. विविध परीक्षांमधील गैरप्रकारांची चौकशी सुरू असून मेहतरी वंदन योजनेसाठी पंतप्रधानांनी राज्यातील महिलांचे अभिनंदन केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की छत्तीसगडमध्ये मेहनती शेतकरी, प्रतिभावान युवा आणि नैसर्गिक खजिना आहे, विकसित होण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत, त्या सर्व इथे आहेत. राज्याची प्रगती होत नसल्याबद्दल त्यांनी आधीच्या सरकारांच्या संकुचित दृष्टिकोनाच्या आणि स्वार्थी घराणेशाहीच्या राजकारणावर टीका केली. ते म्हणाले “मोदींसाठी आपण सर्वजण माझे कुटुंब आहात आणि आपली स्वप्ने माझे संकल्प आहेत. आणि म्हणूनच मी आज विकसित भारत आणि विकसित छत्तीसगडबद्दल बोलत आहे.” ते पुढे म्हणाले की “140 कोटी भारतीयांमधल्या प्रत्येक भारतीयाला या सेवकाने आपल्या वचनबद्धतेची आणि कठोर परिश्रमाची हमी दिलेली आहे”. 2014 साली प्रत्येक भारतीयाला जगामध्ये भारताच्या प्रतिमेचा अभिमान वाटेल, अशी हमी आपण दिल्याचा पुनरुचार त्यांनी केला. गोरगरीब नागरिकांच्या पैशांची लूट करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे, असे सांगत हा पैसा गरीबांच्या कल्याणासाठीच्या योजनेसाठी वापरला जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पंतप्रधानांनी गोरगरिबांसाठी मोफत रेशन, मोफत वैद्यकीय उपचार, स्वस्त औषधे, घर, नळाद्वारे पाणी, गॅस जोडणी आणि शौचालये इत्यादी सुविधांचा उल्लेख केला. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून मोदींचे हमी वाहन प्रत्येक गावात फिरताना दिसले.
10 वर्षांपूर्वी मोदींनी दिलेली हमी आठवून पंतप्रधानांनी आपल्या पूर्वजांच्या स्वप्नांमधला आणि आकांक्षांमधला भारत निर्माण करण्याचा उल्लेख केला आणि असा विकसित भारत आज उदयास येत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी डिजिटल इंडिया उपक्रमाचा उल्लेख केला आणि रिअल-टाइम पेमेंट्स, बँकिंग प्रणाली आणि प्राप्त झालेल्या पैशांच्या सूचनांबाबतची उदाहरणे दिली, आणि आज हे सर्व काही वास्तवात पाहायला मिळत आहे असे अधोरेखित केले. यावेळी पंतप्रधानांनी माहिती दिली की सध्याच्या सरकारने थेट लाभ हस्तांतरण योजनेच्या माध्यमातून देशातील लोकांच्या बँक खात्यांमध्ये 34 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम हस्तांतरित केली आहे, मुद्रा योजनेंतर्गत युवा वर्गाला रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी 28 लाख कोटी रुपयांची मदत आणि पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत 2.75 लाख कोटी रुपयांची मदत केली आहे. पारदर्शकतेच्या अभावामुळे मागील सरकारच्या काळात झालेल्या निधी हस्तांतरणातील गळतीकडेही त्यांनी लक्ष वेधले. “जेव्हा भ्रष्टाचार संपतो, तेव्हा विकास सुरू होतो आणि अनेक रोजगाराच्या संधी निर्माण होतात”, असे सांगत पंतप्रधान मोदी यांनी, चांगल्या प्रशासनाचा परिपाक म्हणून मिळणाऱ्या आरोग्य सुविधा, शिक्षणाबाबतच्या पायाभूत सुविधांच्या विकासावर आणि नवीन रस्ते आणि रेल्वे मार्गांच्या बांधकाम कार्यावर प्रकाश टाकला.
अशा कामांमुळे विकसित छत्तीसगड निर्माण होईल आणि येत्या 5 वर्षांत जेव्हा भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येईल, तेव्हा छत्तीसगडही विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचेल, असे पंतप्रधान म्हणाले. विशेषत: प्रथमच मतदान करणाऱ्या नवमतदारांसाठी तसेच शाळा आणि महाविद्यालयात शिकणाऱ्या युवा वर्गासाठी, ही खूप मोठी संधी आहे असे त्यांनी सांगितले तसेच विकसित छत्तीसगड त्यांची सर्व स्वप्ने पूर्ण करेल, असे सांगत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
पार्श्वभूमी
पंतप्रधानांनी छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय औष्णिक उर्जा महामंडळाच्या लारा सुपर थर्मल पॉवर प्रकल्पाचा पहिला टप्पा (2x800 MW) राष्ट्राला समर्पित केला आणि दुसऱ्या टप्प्याची (2x800 MW) पायाभरणी केली. या केंद्राचा पहिला टप्पा सुमारे 15,800 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून बांधला गेला आहे, तर दुसरा टप्पा या परिसरात उपलब्ध असलेल्या जमिनीवर बांधला जाणार आहे. अशा प्रकारे विस्तारासाठी कोणत्याही अतिरिक्त जमिनीची आवश्यकता भासणार नाही आणि त्यासाठी 15,530 कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. अत्यंत कार्यक्षम सुपर क्रिटिकल तंत्रज्ञान (स्टेज-I साठी) आणि अल्ट्रा सुपर क्रिटिकल तंत्रज्ञान (टप्पा-II साठी) ने सुसज्ज हा प्रकल्प विशिष्ट कोळशाचा कमी वापर आणि किमान कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन सुनिश्चित करेल. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 50% वीज छत्तीसगड राज्याला वितरित केली जाईल, त्याचबरोबर हा प्रकल्प गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गोवा, दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली आणि, इतर अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये वीज परिस्थिती सुधारण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.
पंतप्रधानांनी साउथ ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या तीन प्रमुख फर्स्ट माईल कनेक्टिव्हिटी (एफएमसी) प्रकल्पांचे उद्घाटन केले. 600 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी खर्च करून हे प्रकल्प उभारण्यात आले आहेत. हे प्रकल्प जलद, पर्यावरणस्नेही आणि कार्यक्षम यांत्रिक पद्धतीने कोळसा बाहेर काढण्यासाठी मदत करतील. या प्रकल्पांमध्ये साउथ ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या दिपका एरिया आणि छालमधील दिपका ओसीपी कोल हँडलिंग प्लांट तसेच साउथ ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या रायगड भागातील बरुड ओसीपी कोल हँडलिंग प्लांटचा समावेश आहे. फर्स्ट माईल कनेक्टिव्हिटी प्रकल्प खाणीच्या मुखापासून कोळसा हाताळणी प्लांटपर्यंत सिलो, बंकर आणि कन्व्हेयर बेल्टद्वारे जलद लोडिंग प्रणालीमार्फत कोळशाची यांत्रिक हालचाल सुनिश्चित करतात. रस्तेमार्गाने होणाऱ्या कोळसा वाहतुकीचे प्रमाण कमी करून, हे प्रकल्प वाहतूक कोंडी, रस्ते अपघात आणि कोळसा खाणींच्या आसपासच्या पर्यावरणावर आणि आरोग्यावर होणारे प्रतिकूल परिणाम कमी करून कोळसा खाणींच्या आसपास राहणाऱ्या लोकांचे जीवनमान सुलभ करण्यात मदत करतील. खाणींच्या मुखापासून रेल्वे साइडिंगपर्यंत कोळसा घेऊन जाणाऱ्या ट्रकमुळे डिझेलचा वापर कमी करून वाहतूक खर्चातही बचत होत आहे.
या परिसरात नवीकरणीय ऊर्जेच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी, सुमारे 900 कोटी रुपये खर्चून राजनांदगाव येथे बांधलेल्या सौर पीव्ही प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधानांनी केले. प्रकल्प दरवर्षी अंदाजे 243.53 दशलक्ष युनिट ऊर्जा निर्माण करेल आणि 25 वर्षांमध्ये सुमारे 4.87 दशलक्ष टन कार्बन डायॉक्साईड वायूचे उत्सर्जन कमी करेल, जे त्याच कालावधीत सुमारे 8.86 दशलक्ष झाडांनी उत्सर्जित केलेल्या कार्बनइतके असेल.
या प्रदेशातील रेल्वेसंबंधी पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण करण्यासाठी सुमारे 300 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी खर्चून उभारण्यात आलेला बिलासपूर - उसलापूर उड्डाणपूल पंतप्रधानांनी राष्ट्राला समर्पित केला. यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी कमी होईल आणि बिलासपूर येथून कटनीकडे जाणारी कोळसा वाहतूक थांबेल. पंतप्रधानांनी भिलाई येथे 50 मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्पही राष्ट्राला समर्पित केला. या प्रकल्पामुळे धावत्या गाड्यांमध्ये सौरऊर्जेचा वापर करण्यास मदत होईल.
पंतप्रधानांनी राष्ट्रीय महामार्ग क्र. 49 चा 55.65 किमी लांबीचा पक्क्या सुधारणांसह दुरूस्त केलेला दुहेरी मार्गाचा भाग राष्ट्राला समर्पित केला. या प्रकल्पामुळे बिलासपूर आणि रायगड या दोन महत्त्वाच्या शहरांमधील संपर्क सुविधा सुधारण्यास मदत होणार आहे. पंतप्रधानांनी राष्ट्रीय महामार्ग क्र. 130 चा 52.40 किमी लांबीचा पक्क्या सुधारणांसह दुरूस्त केलेला दुहेरी मार्गाचा भागही राष्ट्राला समर्पित केला. या प्रकल्पामुळे अंबिकापूर शहराचा रायपूर आणि कोरबा शहराशी संपर्क सुधारण्यास मदत होईल आणि या क्षेत्राच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल.
* * *
M.Pange/Rajshree/Shraddha/Vikas/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2008615)
आगंतुक पटल : 173
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam