पंतप्रधान कार्यालय
वाराणसी येथे संत गुरु रविदास यांच्या 647 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी केले संबोधित
संत रविदास यांच्या नव्या पुतळ्याचे अनावरण
संत रविदास जन्मस्थळ परिसरात विकासकामांचे लोकार्पण आणि पायाभरणी
संत रविदास संग्रहालय आणि उद्यानाच्या सुशोभीकरणाच्या कामाची पायाभरणी
"जेव्हा देशाला गरज असते तेव्हा एखादा संत, ऋषी किंवा महान व्यक्तिमत्व भारतात जन्माला येते हा भारताचा इतिहास आहे"
"संत रविदासजी हे भक्ती चळवळीचे महान संत होते, त्यांनी दुर्बल आणि विभाजित भारताला नवी ऊर्जा दिली"
"संत रविदासजींनी समाजाला स्वातंत्र्याचे महत्त्व सांगितले आणि सामाजिक दरी भरून काढण्याचे कार्य केले"
"रविदासजी सर्वांचे आहेत आणि सर्वजण रविदासजींचे आहेत"
‘सबका साथ सबका विकास’ हा मंत्र अनुसरत सरकार संत रविदासजींची शिकवण आणि आदर्श पुढे नेत आहे
"आपण जातीभेदाची नकारात्मक मानसिकता दूर करून संत रविदासजींच्या सकारात्मक शिकवणीचे पालन केले पाहिजे"
Posted On:
23 FEB 2024 4:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 23 फेब्रुवारी 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी येथे संत गुरु रविदास यांच्या 647 व्या जयंतीनिमित्त संबोधित केले.काशी हिंदू विद्यापीठा नजीकच्या सीर गोवर्धनपूर येथील संत गुरू रविदास जन्मस्थळी मंदिरात, रविदास उद्याना शेजारील संत रविदासांच्या नव्याने स्थापित केलेल्या पुतळ्याचे पंतप्रधानांनी अनावरण केले.संत रविदास जन्मस्थळी सुमारे 32 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे लोकार्पण तसेच सुमारे 62 कोटी रुपये खर्चाच्या संत रविदास वस्तुसंग्रहालयाची आणि उद्यानाच्या सुशोभीकरणाच्या कामाची पायाभरणीही त्यांनी केली.
उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी संत रविदासजींच्या 647 व्या जयंतीनिमित्त जन्मस्थळी सगळ्यांचे स्वागत केले.रविदास यांच्या जयंतीनिमित्त देशभरातील भाविकांचा सहभाग लक्षात घेऊन,पंतप्रधानांनी विशेषत: पंजाबमधून काशीला येणाऱ्यांच्या भावनेचे कौतुक केले आणि काशी एक मिनी पंजाब सारखी दिसू लागली आहे , असे पंतप्रधान म्हणाले. संत रविदासजींच्या जन्मस्थळाला पुन्हा भेट देऊन त्यांचे आदर्श आणि संकल्प पुढे नेण्याची संधी मिळाल्याबद्दल पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली.
काशीचे प्रतिनिधी म्हणून संत रविदासजींच्या अनुयायांची सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. पंतप्रधानांनी यावेळी बोलताना संत रविदासजींच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी राबवत असलेल्या योजनांचा संदर्भ दिला, यात मंदिर परिसराचा विकास, पोहोच मार्ग बांधणी , पूजेसाठी व्यवस्था, प्रसाद आदींचा समावेश आहे. संत रविदासांच्या नव्या पुतळ्याबद्दल आणि संत रविदास संग्रहालयाच्या पायाभरणीबद्दलही पंतप्रधानांनी माहिती दिली.
आज थोर संत आणि समाजसुधारक गाडगे बाबा यांची जयंती आहे असे नमूद करत त्यांनी वंचित आणि गरीबांच्या उन्नतीसाठी केलेल्या योगदानावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला आहे. बाबासाहेब आंबेडकर हे गाडगे बाबांच्या कार्याचे प्रशंसक होते आणि गाडगे बाबांवरही बाबासाहेबांचा प्रभाव होता, अशी माहितीही पंतप्रधान मोदींनी दिली. गाडगे बाबांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना विनम्र अभिवादन केले.
संत रविदासांच्या शिकवणीने आपल्याला नेहमीच मार्गदर्शन केले आहे, असे पंतप्रधान म्हणाले आणि या पदावरून संत रविदासांच्या आदर्शांची सेवा करण्याच्या संधीबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.मध्य प्रदेशात संत रविदास स्मारकाची नुकतीच पायाभरणी केल्याचाही त्यांनी उल्लेख केला.
“जेव्हा जेव्हा गरज भासली तेव्हा संत, ऋषी किंवा महान व्यक्तिमत्वाच्या रूपात रक्षणकर्ता उदयाला येतो हा भारताचा इतिहास आहे”,असे सांगत संत रविदास जी भक्ती चळवळीचा एक भाग होते त्यांनी विभाजित आणि खंडित झालेल्या भारताला पुन्हा चैतन्य दिले, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. रविदासजींनी समाजातील स्वातंत्र्याला अर्थ दिला आणि सामाजिक दरी भरून काढण्याचे कार्य केले, असे ते म्हणाले. अस्पृश्यता, वर्गवाद आणि भेदभावाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला.“संत रविदासांना विचारधारा आणि धर्माच्या सीमांमध्ये मर्यादित ठेवता येत नाही”, "रविदासजी सर्वांचे आहेत आणि सर्वजण रविदासजींचे आहेत.", असे पंतप्रधान म्हणाले. जगतगुरु रामानंद यांचे शिष्य म्हणून वैष्णव समाजही संत रविदासजींना आपले गुरू मानतो आणि शीख समाज त्यांच्याकडे अत्यंत आदराने पाहतो, असे त्यांनी सांगितले. गंगेवर श्रद्धा असणारे आणि वाराणसीचे असलेले लोक संत रविदासजींकडून प्रेरणा घेतात, असे पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले. विद्यमान सरकार ‘सबका साथ सबका विकास’ या मंत्राला अनुसरून संत रविदासजींची शिकवण आणि आदर्श पुढे नेत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
संत रविदास यांच्या समानता आणि सर्वांना एका सूत्रात बांधण्याच्या शिकवणीबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की वंचित आणि मागास समुदायाला प्राधान्य दिल्यानेच समानता रुजते. विकासाच्या यात्रेत काहीसे मागे पडलेल्यांसाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती पंतप्रधानांनी दिली.देशातील ऐंशी कोटी नागरिकांना मोफत शिधा देणे ही जगातील सर्वात मोठी कल्याणकारी योजना आहे, अशा प्रकारची आणि एवढी मोठी व्याप्ती असलेली योजना जगातील कोणत्याही देशामध्ये नाही, असे ते म्हणाले. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत बांधण्यात आलेल्या शौचालयांमुळे दलित, मागासवर्गीय, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, महिला आणि अनेकांना लाभ झाला, असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे जल जीवन अभियानाच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात 11 कोटी कुटुंबाना नळाद्वारे पाणी मिळाले असून आयुष्मान कार्डामुळे कोट्यवधी गरिबांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे, असे ते म्हणाले. जन धन खात्यांच्या माध्यमातून अनेकजण आर्थिक समावेशनाचे भाग झाले. तर थेट लाभ हस्तांतरणामुळे देखील मोठे लाभ झाले, त्यापैकीच एक किसान सम्मान निधीचे हस्तांतरण असून त्यामुळे कित्येक दलित शेतकऱ्यांना फायदा झाल्याचे त्यांनी सांगितले. याच प्रमाणे पीक विमा योजनेचाही अनेकांना फायदा झाला आहे. 2014 पासून शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या दलित तरुणांची संख्या दुप्पट झाली असून दलित कुटुंबांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपयांची मदत मिळाली आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.
दलित,वंचित आणि गरिबांचे पुनरुत्थान करण्याचा सरकारचा हेतू स्पष्ट असून आज जगात भारताच्या प्रगतीचे ते मुख्य कारण आहे. संतांच्या विचारांनी प्रत्येक युगात आपले मार्गदर्शन केले आहे आणि वेळोवेळी आपल्याला सावध केले आहे, असे ते म्हणाले. रविदासजींचा उल्लेख करून,पंतप्रधानांनी सांगितले की बहुतेक लोक जात आणि पंथाच्या भेदात अडकतात आणि जातीवादाचा हा रोग मानवतेला हानी पोहोचवतो. जातीच्या नावावर कोणी चिथावणी दिली तर त्यामुळे मानवतेचीही हानी होते.
दलितांच्या कल्याणाच्या विरोधातील शक्तीबाबत पंतप्रधानांनी यावेळी सावध केले. असे लोक जातीच्या कल्याणाच्या नावाखाली घराणेशाहीचे राजकारण करतात, असेही ते म्हणाले. घराणेशाहीमध्ये अडकलेल्या अशा राजकारणामुळेच ते दलित आणि आदिवासींच्या प्रगतीचे कौतुक करू शकत नाहीत. आपल्याला जातिवादाची नकारात्मक मानसिकता दूर करून रविदास जी यांची सकारात्मक शिकवण आत्मसात केली पाहिजे, असे पंतप्रधान म्हणाले.
रविदासजी यांच्या अभंगाचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की एखादी व्यक्ती शंभर वर्षे जगली तरी त्यांनी आयुष्यभर काम करत राहिले पाहिजे कारण कर्म हा धर्म आहे आणि काम निःस्वार्थपणे केले पाहिजे. रविदास जी यांची ही शिकवण आज संपूर्ण देशासाठी उपयोगी आहे. भारत सध्या स्वातंत्र्याच्या अमृत काळात मार्गक्रमण करत असून याच काळात विकसित भारताचा भक्कम पाया घातला जात आहे, असे सांगून येत्या 5 वर्षात विकसित भारताचा पाया अधिक मजबूत करण्यावर त्यांनी भर दिला. गरीब आणि वंचितांना सरकारी योजनांचा लाभ देण्याच्या कार्याची व्याप्ती वाढवणे हे 140 कोटी देशवासीयांच्या सहभागानेच शक्य होऊ शकेल, असे त्यांनी अधोरेखित केले. फूट पाडणाऱ्या विचारांपासून आपल्याला दूर राहून देशाची एकात्मता बळकट करायची आहे”, असे सांगून संत रविदासजींच्या कृपेने नागरिकांची स्वप्ने साकार होतील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि संत गुरु रविदास जन्मस्थान टेम्पल ट्रस्टचे अध्यक्ष संत निरंजन दास उपस्थित होते.
N.Chitale/S.Chavan/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2008385)
Visitor Counter : 142
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam