पंतप्रधान कार्यालय

‘विकसित भारत विकसित गुजरात’ कार्यक्रमात पंतप्रधानांचे मार्गदर्शन


प्रधानमंत्री आवास योजना आणि इतर गृहनिर्माण योजनांतर्गत गुजरातमध्ये बांधण्यात आलेल्या 1.3 लाखांपेक्षा जास्त घरांचे केले उद्घाटन आणि भूमीपूजन

“ इतक्या मोठ्या प्रमाणात तुमचे आशीर्वाद आमचा संकल्प अधिक दृढ करतात”

“ आजचा काळ हा इतिहास घडवण्याचा काळ आहे”

“ प्रत्येकाच्या डोक्यावर पक्क्या घराचे छप्पर असावे हे सुनिश्चित करण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे”

“ येत्या 25 वर्षात भारत एक विकसित देश बनावा अशी प्रत्येक नागरिकाची इच्छा आहे. त्यासाठी प्रत्येक जण शक्य होईल तितके योगदान देत आहे”

“ घरांची उभारणी वेगाने करण्यासाठी आमच्या गृहनिर्माण योजनांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येत आहे”

“ आम्ही विकसित भारत चे- युवा, महिला, शेतकरी आणि गरीब या चार स्तंभाचे सक्षमीकरण करण्यासाठी वचनबद्ध आहोत”

“ ज्यांच्याकडे कोणतीच गॅरेंटी नव्हती त्यांच्यासाठी मोदी हेच गॅरेंटी बनले आहेत”

“ प्रत्येक गरीब कल्याण योजनेचे सर्वात मोठे लाभार्थी दलित, ओबीसी आणि आदिवासी कुटुंबे आहेत”

Posted On: 10 FEB 2024 2:45PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विकसित भारत  विकसित गुजरातया कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी प्रधानमंत्री आवास योजना(PMAY)  आणि इतर गृहनिर्माण योजनांतर्गत गुजरातमध्ये बांधण्यात आलेल्या 1.3 लाखांपेक्षा जास्त घरांचे उद्घाटन आणि भूमीपूजन केले. यावेळी त्यांनी आवास योजनेच्या काही लाभार्थ्यांसोबत संवाद देखील साधला.

उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी गुजरातच्या विकासाच्या प्रवासात गुजरातच्या प्रत्येक भागातील जनता जोडली गेल्याबद्दल आनंद व्यक्त केला. व्हायब्रंट गुजरात या 20 वर्षे पूर्ण करणाऱ्या कार्यक्रमात त्यांनी अलीकडेच घेतलेल्या सहभागाची यावेळी आठवण करून दिली. व्हायब्रंट गुजरातसारखा एक भव्य गुंतवणूक कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांनी गुजरातची प्रशंसा केली.

गरीबाला मिळणारी घराची मालकी ही त्याच्या उज्ज्वल भविष्याची हमी असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. प्रत्येक गरिबासाठी नवी घरे बांधण्याच्या सरकारच्या प्रयत्नांवर पंतप्रधानांनी भर दिला आणि आज 1.25 लाख घरांचे भूमीपूजन झाले असल्याचा उल्लेख केला.  आज ज्यांना नवी घरे मिळाली त्या सर्व कुटुंबांचे त्यांनी अभिनंदन केले आणि त्यांच्या उज्जवल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या. मोदी म्हणाले, “ ज्यावेळी इतक्या मोठ्या प्रमाणात काम होते तेव्हा त्याला देश म्हणतो, “ मोदी की गॅरंटीयाचा अर्थ आहे गॅरंटीची पूर्तता.

'पंतप्रधानांनी आजच्या कार्यक्रमाच्या आयोजनाची प्रशंसा केली, ज्यामध्ये राज्यातील 180  हून अधिक ठिकाणी मोठ्या संख्येने लोक जमले होते. एवढ्या मोठ्या संख्येने तुमचे आशीर्वाद आमच्या संकल्पाला आणखी बळ देत आहेत. प्रदेशातील पाणीटंचाईची आठवण सांगताना पंतप्रधानांनी प्रत्येक थेंबामागे अधिक पीक आणि ठिबक सिंचन यांसारख्या उपक्रमांचा उल्लेख केला , ज्यामुळे बनासकांठा, मेहसाणा, अंबाजी आणि पाटण येथील शेतीला मदत झाली आहे. अंबाजीतील विकासात्मक प्रयत्नांमुळे यात्रेकरूंच्या संख्येत मोठी वाढ होईल. ब्रिटीश काळापासून प्रलंबित असलेल्या अहमदाबाद ते अबू रोड या ब्रॉडगेज मार्गामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतील असे ते म्हणाले.

आपल्या वडनगर गावाविषयी बोलताना, पंतप्रधानांनी अलिकडेच सापडलेल्या  केलेल्या 3,000 वर्षे जुन्या प्राचीन कलाकृतींचा उल्लेख केला, ज्या पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक तिथे भेट देत आहेत. त्यांनी हटकेश्वर, अंबाजी, पाटण आणि तरंगाजी या ठिकाणांचा उल्लेख केला आणि म्हणाले की उत्तर गुजरात हळूहळू स्टॅच्यू ऑफ युनिटीप्रमाणेच पर्यटन केंद्र बनत आहे.

नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात मोदींची ग्यारंटीवाली गाडी देशातील लाखो खेड्यांमध्ये पोहचली आणि विकसित भारत संकल्प यात्रा  यशस्वी केली याचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की,या यात्रेशी गुजरातमधील कोट्यवधी लोक जोडले गेले आहेत. देशातील 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले आणि योजनांचा लाभ, निधीचे योग्य व्यवस्थापन आणि गरिबीवर मात करण्यासाठी योजनांनुसार आपल्या जीवनाला आकार दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. पंतप्रधानांनी विश्वास व्यक्त करत लाभार्थ्यांना पुढे येऊन या उपक्रमाला पाठिंबा देण्याचे आणि गरिबीचे उच्चाटन करण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला लाभार्थींशी साधलेल्या संवादाचा त्यांनी उल्लेख केला आणि नवीन घरांमुळे लाभार्थ्यांचा आत्मविश्वास उंचावल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.

"आजची वेळ इतिहास घडवण्याची वेळ आहे " असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी या काळाची तुलना स्वदेशी चळवळ, भारत छोडो आंदोलन आणि दांडी यात्रेच्या काळाशी केली जेव्हा स्वातंत्र्य हे प्रत्येक नागरिकाचे ध्येय होते. विकसित भारताची निर्मिती हा राष्ट्रासाठी असाच संकल्प बनला आहे असे ते म्हणाले. राज्याच्या प्रगतीतून राष्ट्रीय विकासही  गुजरातची विचारसरणी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आजचा कार्यक्रम विकसित भारतासाठी विकसित गुजरातचा एक भाग आहे असे ते म्हणाले.

गुजरातने पंतप्रधान आवास योजनेमध्ये केलेल्या प्रगतीचा पंतप्रधानांनी उल्लेख केला, आणि या योजनेंतर्गत राज्याच्या शहरी भागात 9 लाखांहून अधिक घरे बांधण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पीएम आवास - ग्रामीण योजनेंतर्गत ग्रामीण भागात 5 लाखांहून अधिक घरे बांधण्यात आली आहेत. दर्जेदार आणि जलद बांधकामासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.त्यांनी दीपगृह प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेल्या 1100 घरांचा उल्लेख केला.

2014 पूर्वीच्या काळाच्या तुलनेत गरिबांसाठी घरे बांधण्याचे काम आता वेगाने होत असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधान मोदी यांनी केला. पूर्वीच्या काळात गरिबांच्या घरांच्या बांधकामासाठी तुटपुंजा निधी आणि कमिशन, इत्यादींच्या स्वरूपात निधीमध्ये होत असलेल्या गळतीकडे लक्ष वेधून पंतप्रधान म्हणाले की, गरिबांच्या घरांसाठी आता 2.25 लाखांपेक्षा जास्त रक्कम हस्तांतरित केली जात आहे आणि मध्यस्थांना दूर करून, थेट त्यांच्या बँक खात्यात निधी हस्तांतरित केला जात आहे. शौचालये बांधणे, घरोघरी नळाद्वारे पाणी पुरवठा, वीज आणि गॅस जोडणी यासह कुटुंबांच्या गरजेनुसार घरे बांधण्याचे स्वातंत्र्य, या मुद्द्यांचाही त्यांनी उल्लेख केला. "या सुविधांमुळे गरिबांना पैशाची बचत करण्यासाठी सहाय्य झाले आहे", ते म्हणाले. आता महिलांच्या नावावर घरांची नोंदणी करून त्यांना घरमालक बनवले जात आहे, यावरही पंतप्रधान मोदी यांनी भर दिला.

युवा, किसान, महिला आणि गरीब हे विकसित भारताचे चार आधार स्तंभ आहेत, याचा पुनरुच्चार करून पंतप्रधान म्हणाले की, त्यांचे सक्षमीकरण ही सरकारची सर्वोच्च वचनबद्धता आहे. गरीबांमध्ये प्रत्येक समाजाचा समावेश होतोयावर त्यांनी भर दिला. कोणत्याही भेदभावाशिवाय योजनांचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचत आहे. ज्यांना कोणतीही गॅरंटी नाही, त्यांना मोदींनी गॅरंटी दिली आहे, असे ते म्हणाले. त्यांनी मुद्रा योजनेचाही उल्लेख केला जिथे प्रत्येक समुदायातील उद्योजकांना तारणमुक्त कर्ज मिळू शकते. त्याचप्रमाणे विश्वकर्मा आणि रस्त्यावरील विक्रेत्यांना आर्थिक उत्पन्नाचे साधन आणि कौशल्य प्रदान करण्यात आले. गरिबांसाठी असलेला प्रत्येक कल्याणकारी योजनेचे सर्वात मोठे लाभार्थी दलित, ओबीसी आणि आदिवासी कुटुंबे आहेत. मोदींच्या गॅरंटीचा सर्वात जास्त लाभ कोणाला मिळाला असेल, तर तो या कुटुंबांना”, ते म्हणाले.

मोदींनी लखपती दीदी बनवण्याची गॅरंटी दिली आहे”, असे सांगून ते म्हणाले की, देशात आधीच 1 कोटी लखपती दीदी आहेत ज्यात मोठ्या संख्येने गुजरातमधील महिला आहेत. येत्या काही वर्षात 3 कोटी लखपती दीदी निर्माण करण्याच्या सरकारच्या प्रयत्नाचा पुनरुच्चार त्यांनी केला आणि ते म्हणाले की, ही गोष्ट गरीब कुटुंबांना मोठ्या प्रमाणात सक्षम करेल. यंदाच्या अर्थसंकल्पात आशा आणि अंगणवाडी सेविकांचा आयुष्मान योजनेमध्ये समावेश केल्याचे त्यांनी सांगितले.

गरीब आणि मध्यमवर्गीयांचे खर्च कमी करण्यावर सरकारचा भर असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. मोफत धान्य , रुग्णालयांमध्ये स्वस्त उपचार सुविधा, कमी किमतीची औषधे, स्वस्त मोबाईल फोन बिल, उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस सिलिंडर आणि विजेचे बिल कमी करणारे एलईडी बल्ब यांचा त्यांनी उल्लेख केला. पंतप्रधान  मोदींनी 1 कोटी घरांसाठी रूफटॉप सोलर योजनेचा देखील उल्लेख केला ज्यामुळे वीज बिल सुद्धा  कमी होईल आणि निर्माण होणाऱ्या अतिरिक्त विजेपासून उत्पन्न पण मिळेल. या योजनेंतर्गत प्रत्येकाला सुमारे 300 युनिट वीज मोफत मिळणार असून त्यांच्याकडून शासन दरवर्षी हजारो रुपयांची वीज खरेदी करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मोढेरामध्ये बांधलेल्या सोलार व्हिलेजबद्दल बोलताना  पंतप्रधान मोदी म्हणाले की, अशी क्रांती आता संपूर्ण देशात पाहायला मिळेल. नापीक जमिनीवर सौरपंप आणि छोटे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना मदत केल्याचाही त्यांनी उल्लेख केला. गुजरातमध्ये शेतकऱ्यांना दिवसाही सिंचनासाठी वीज मिळावी यासाठी सौरऊर्जेद्वारे शेतकऱ्यांना स्वतंत्र फीडर देण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

गुजरात हे व्यापारी राज्य म्हणून ओळखले गेले आहे आणि त्याच्या विकासाची यात्रा औद्योगिक विकासाला नवी चालना देत असल्याचे अधोरेखित करून पंतप्रधान म्हणाले की, गुजरात हे औद्योगिक शक्तीस्थान असल्याने  गुजरातमधील तरुणांना अभूतपूर्व संधी आहे. आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधान म्हणाले की, गुजरातचे तरुण आज राज्याला प्रत्येक क्षेत्रात नवीन उंचीवर नेत आहेत आणि त्यांनी सर्वांना प्रत्येक पावलावर दुहेरी इंजिन सरकारकडून पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.

पार्श्वभूमी

हा कार्यक्रम गुजरातमधील सर्व जिल्ह्यांमध्ये आणि 180 हून अधिक ठिकाणी आयोजित केला जात आहे, मुख्य कार्यक्रम बनासकांठा जिल्हा येथे आयोजित करण्यात आला आहे. या राज्यव्यापी कार्यक्रमात गृहनिर्माण योजनांसह विविध शासकीय योजनांचे हजारो लाभार्थी सहभागी झाले होते. गुजरातचे मुख्यमंत्री, गुजरात सरकारचे इतर मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक पातळीवरील प्रतिनिधी या कार्यक्रमात सामील झाले होते.

***

N.Chitale/S.Patil/S.Kane/R.Agashe/G.Deoda/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2004815) Visitor Counter : 85