अर्थ मंत्रालय

भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरीडॉर हा भारत आणि इतरांसाठीही धोरणात्मक आणि आर्थिकदृष्ट्या परिवर्तन घडवणारा


2014-23 या काळात थेट परकीय गुंतवणूकीचा ओघ 596 अब्ज डॉलर्स; 2005-14 या काळाच्या तुलनेत हा दुप्पट ओघ

‘आधी भारताचा विकास’ ही भावना ठेवत द्विपक्षीय गुंतवणूक करारांवर वाटाघाटी

Posted On: 01 FEB 2024 3:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 1 फेब्रुवारी 2024

नुकताच जाहीर झालेला  भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरीडॉर हा भारत आणि इतरांसाठीही धोरणात्मक आणि आर्थिकदृष्ट्या परिवर्तन घडवणारा असल्याचे केंद्रीय अर्थ  मंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. 2024-25 साठी संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या, ‘हा कॉरीडॉर, येत्या शेकडो वर्षांसाठी जागतिक व्यापाराचा पाया ठरेल आणि या  कॉरीडॉरचा  भारतीय भूमीवर प्रारंभ झाला होता याचे इतिहासात स्मरण राहील’ या उद्गारांचा पुनरुच्चार केला.

जागतिक परिदृश्य अधोरेखित करत युद्ध आणि संघर्ष यामुळे  भू- राजकीय दृष्ट्या जागतिक घडामोडी अधिक जटील आणि आव्हानात्मक होत चालल्याचे सीतारामन म्हणाल्या. मूळ देशात उद्योगांचे पुनर्स्थापन,मित्र देशात उत्पादन,पुरवठा साखळीत अडथळा आणि खंड, महत्वाची खनिजे आणि तंत्रज्ञानासाठी स्पर्धा यामुळे जागतिकीकरणाची नव्याने व्याख्या होत असल्याचे त्यांनी नमूद  केले. कोविड-19 महामारी नंतर नवी जागतिक रचना निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.  

जगात अतिशय कठीण परिस्थिती असताना भारताने जी-20 अध्यक्षपद भूषवले.उच्च चलनवाढ,चढे व्याज दर,मंदावलेली वाढ,मोठ्या प्रमाणात सार्वजनिक कर्ज,अल्प व्यापार वृद्धी,हवामान बदल यासारख्या आव्हानांतून जागतिक अर्थव्यवस्था मार्गक्रमण करत होती  हे  त्यांनी अधोरेखित केले.महामारीने जगासमोर अन्न, खते,इंधन आणि वित्त विषयक संकट उभे केले मात्र भारताने यशस्वीरित्या आपला मार्ग काढल्याचे सीतारामन म्हणाल्या. देशाने पुढील मार्ग दाखवला आणि या जागतिक समस्यांच्या निराकरणासाठी मतैक्य निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले.

गुंतवणुकीला प्रोत्साहन  

2014-23 या काळात थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ 596 अब्ज डॉलर्स इतका राहिल्याचे सांगून हे परकीय गुंतवणुकीचे सुवर्णयुग असल्याचे त्यांनी सांगितले. ही गुंतवणूक, 2005-14 या काळातल्या परकीय गुंतवणुकीच्या तुलनेत दुप्पट असल्याचे त्यांनी ठळक केले. ‘आधी भारताचा विकास’ या  भावनेने,सातत्यपूर्ण विदेशी गुंतवणुकीला चालना देण्यासाठी आपल्या परदेशी भागीदारांसमवेत द्विपक्षीय गुंतवणूक करारांवर वाटाघाटी करत असल्याचेही त्यांनी 2024-25 साठी अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना सांगितले.
 
M.Iyengar/N.Chitale/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2001357) Visitor Counter : 83