पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

दिल्लीतील लाल किल्ला येथे पराक्रम दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधानांनी केले संबोधित


प्रजासत्ताक दिनाचे चित्ररथ आणि सांस्कृतिक प्रदर्शनांसह देशाची समृद्ध विविधता दर्शवणाऱ्या ' भारत पर्व' चा केला प्रारंभ

"पराक्रम दिनानिमित्त, आम्ही नेताजींच्या आदर्शांची पूर्तता करण्यासाठी आणि त्यांच्या स्वप्नांमधील भारत निर्माण करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो"

“देशाच्या सक्षम अमृत पिढीसाठी नेताजी सुभाषचंद्र बोस हे एक महान आदर्श आहेत”

“नेताजींचे जीवन केवळ परिश्रमाचीच नाही तर शौर्याची देखील पराकाष्ठा आहे”

नेताजींनी लोकशाहीची जननी म्हणून भारताचा दावा जगासमोर समर्थपणे मांडला.”

“तरुणांना गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त करण्याचे काम नेताजींनी केले”

"आज भारतातील तरुण ज्याप्रकारे त्यांच्या संस्कृतीचा, त्यांच्या मूल्यांचा, त्यांच्या भारतीयत्वाचा अभिमान बाळगत आहेत ते अभूतपूर्व आहे"

"केवळ आपली युवा आणि महिला शक्तीच देशाच्या राजकारणाला घराणेशाही आणि भ्रष्टाचारापासून मुक्त करू शकते"

"भारताला आर्थिकदृष्ट्या समृद्ध, सांस्कृतिकदृष्ट्या बलशाली आणि धोरणात्मकदृष्ट्या सक्षम बनवणे हे आमचे ध्येय आहे"

“अमृत काळातला प्रत्येक क्षण आपण राष्ट्रहितासाठी उपयोगात आणला पाहिजे”

Posted On: 23 JAN 2024 10:24PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 जानेवारी 2024 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील लाल किल्ल्यावर पराक्रम दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात सहभाग घेतला. तसेच प्रजासत्ताक दिनाचे चित्ररथ आणि सांस्कृतिक प्रदर्शनांसह देशाची समृद्ध विविधता प्रदर्शित करणाऱ्या 'भारत पर्व'चा देखील आरंभ पंतप्रधानांनी केला. नेताजींची छायाचित्रे, चित्रे, पुस्तके आणि शिल्पांचा समावेश असलेल्या राष्ट्रीय अभिलेखागाराच्या तंत्रज्ञानाच्या नेतृत्वाखालील परस्परसंवादी  प्रदर्शनाची पाहणी केली. आणि राष्ट्रीय नाट्यशाळेने सादर केलेल्या नेताजींच्या जीवनावरील प्रोजेक्शन मॅपिंगसह समक्रमित नाटकाचे ते साक्षीदारही झाले. त्यांनी आझाद हिंद सेनेतील एकमेव माजी सैनिक लेफ्टनंट आर माधवन यांचा सत्कारही त्यांनी  केला. स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या थोर व्यक्तींच्या योगदानाचा यथोचित सन्मान करण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसार, 2021 पासून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीदिनी पराक्रम दिवस साजरा केला जातो.

या कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधानांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या पराक्रम दिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. आझाद हिंद फौजेच्या शौर्याचा आणि पराक्रमाचा साक्षीदार असलेला लाल किल्ला पुन्हा एकदा नव्या ऊर्जेने भरला आहे, असे ते म्हणाले. स्वातंत्र्याच्या अमृतकाळाच्या सुरुवातीच्या कालखंडाचा संकल्पसिद्धीचा उत्सव म्हणून उल्लेख करून,संपूर्ण जगाने भारतात सांस्कृतिक चेतना जागृत झाल्याचे पाहिले त्या कालच्या घटनेची आठवण करून देताना पंतप्रधानांनी हा क्षण अभूतपूर्व असल्याचे सांगितले. "प्राणप्रतिष्ठेची ऊर्जा आणि विश्वास संपूर्ण मानवतेला आणि जगाला जाणवला", असे आज नेताजी सुभाष यांची जयंती साजरी होत असताना पंतप्रधान म्हणाले. पराक्रम दिवसाच्या घोषणेपासून, 23 तारखेपासून ते 30 जानेवारीला महात्मा गांधींच्या पुण्यतिथीपर्यंत प्रजासत्ताक दिनाचा सोहळा साजरा केला जातो आणि आता 22 जानेवारीचा शुभ दिवसही लोकशाहीच्या या उत्सवाचा एक भाग बनला आहे, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. “जानेवारीचे शेवटचे काही दिवस भारताची श्रद्धा, सांस्कृतिक चेतना, लोकशाही आणि देशभक्तीसाठी प्रेरणादायी आहेत”, असे पंतप्रधानांनी शुभेच्छा देताना सांगितले.

कार्यक्रमाच्या आयोजनात सहभागी असलेल्या सर्वांचे पंतप्रधानांनी कौतुक केले. तत्पूर्वी आज पंतप्रधानांनी राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित तरुणांशी संवाद साधला. “जेव्हाही मी भारतातील तरुण पिढीला भेटतो, तेव्हा विकसित भारताच्या स्वप्नातील माझा आत्मविश्वास आणखी दृढ होतो. देशाच्या या ‘अमृत’ पिढीसाठी नेताजी सुभाषचंद्र बोस हे एक मोठे आदर्श आहेत” असे पंतप्रधानांनी नमूद केले. 

आज उदघाटन केलेल्या ‘भारत पर्व’चाही उल्लेख करून पंतप्रधानांनी पुढील 9 दिवसांत होणार्‍या कार्यक्रमांची आणि प्रदर्शनांची माहिती दिली. “भारत पर्व हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आदर्शांचे प्रतिबिंब आहे. ‘वोकल फॉर लोकल’चा अर्थात स्थानिक वस्तूंचा अवलंब करण्याचे, पर्यटनाला चालना देण्याचे, विविधतेचा आदर करण्याचे आणि ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ला नवी उंची देण्याचे हे ‘पर्व’ असल्याचे त्यांनी उद्धृत केले. 

त्याच लाल किल्ल्यावर आयएनएच्या 75 वर्षांच्या निमित्तानं तिरंगा फडकवल्याचं स्मरण करून पंतप्रधान मोदी म्हणाले की, “नेताजींचे जीवन हे कठोर परिश्रम आणि शौर्याची पराकाष्ठा होती”. नेताजींच्या बलिदानाचे स्मरण करून पंतप्रधान म्हणाले की, त्यांनी केवळ ब्रिटीशांचाच विरोध केला नाही तर भारतीय सभ्यतेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या लोकांना सडेतोड उत्तरही दिले. नेताजींनी भारताची प्रतिमा ही लोकशाहीची जननी म्हणून जगासमोर आणली असेही मोदींनी सांगितले.

गुलामगिरीच्या मानसिकतेविरुद्धच्या नेताजींच्या लढ्याचा संदर्भ देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, नेताजींना आजच्या भारतातील तरुण पिढीमधील नव्या उर्मीचा आणि अभिनिवेशाचा सार्थ अभिमान वाटला असता. ही नवी जाणीव विकसित भारत घडवण्याची ऊर्जा बनली आहे. आजचा तरुण पंचप्रणचा स्वीकार करत गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडत आहे, असे मत त्यांनी मांडले. “नेताजींचे जीवन आणि त्यांचे योगदान हे भारतातील तरुणांसाठी प्रेरणादायी आहे” यावर भर देताना, ही प्रेरणा नेहमीच पुढे नेली जाईल अशी आशा पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली. याच विश्वासाने पंतप्रधानांनी गेल्या 10 वर्षातील सरकारच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला आणि प्रत्येक नागरिकाला नेताजींच्या कर्तव्याप्रति समर्पणाची जाणीव राहावी यासाठी  कर्तव्यपथावर त्यांच्या पुतळ्याची स्थापना करून त्यांना योग्य सन्मान दिल्याचा उल्लेख केला. आझाद हिंद फौजेने प्रथम तिरंगा फडकावलेल्या अंदमान आणि निकोबार बेटांचे नवे नामकरण, नेताजींना समर्पित स्मारकाचा विकास, लाल किल्ल्यावर नेताजी आणि आझाद हिंद फौजेसाठी समर्पित संग्रहालय आणि नेताजींच्या नावाने प्रथमच राष्ट्रीय आपत्ती निवारण पुरस्काराची घोषणा याचाही उल्लेख त्यांनी केला. "स्वतंत्र भारतातील इतर कोणत्याही सरकारपेक्षा सध्याच्या सरकारने आझाद हिंद फौजेला समर्पित काम केले आहे आणि मी हे आमच्यासाठी आशीर्वाद मानतो", असेही मोदी म्हणाले.

नेताजींना भारतातील आव्हानांची सखोल जाण होती हे विशद करताना लोकशाही समाजाच्या पायावर भारताची राजकीय लोकशाही बळकट करण्याबद्दलच्या त्यांच्या विश्वासाची आठवण पंतप्रधानांनी करून दिली. तथापि, पंतप्रधानांनी स्वातंत्र्यानंतर नेताजींच्या विचारसरणीवर झालेल्या टीकेबाबत खंत व्यक्त केली कारण त्यांनी भारतीय लोकशाहीमध्ये प्रवेश करणार्‍या घराणेशाही आणि पक्षपातीपणाच्या वाईट गोष्टींचा उल्लेख केला ज्यामुळे शेवटी भारताचा विकास मंदावला. समाजातील एक मोठा वर्ग त्यांच्या उन्नतीसाठी असलेल्या संधी आणि मूलभूत गरजांपासून वंचित आहे, याकडे लक्ष वेधून मोदींनी राजकीय, आर्थिक आणि विकास धोरणांवर मूठभर कुटुंबांचा प्रभाव अधोरेखित केला आणि सांगितले की यामुळे देशातील महिला आणि तरुणांना बरेच नुकसान सोसावे लागते. त्यांनी त्यावेळच्या महिला आणि तरुणांना आलेल्या अडचणींचे स्मरण करून  2014 मध्ये विद्यमान सरकार निवडल्यानंतर अंमलात आणलेल्या 'सबका साथ सबका विकास' या भावनेवर जोर दिला. गरीब कुटुंबातील मुला-मुलींसाठी आज उपलब्ध असलेल्या वारेमाप संधींबद्दल विश्वास व्यक्त करत "गेल्या 10 वर्षांचे परिणाम सर्वच अनुभवू शकता" असे मोदींनी ठामपणे सांगितले. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नारी शक्ती वंदन अधिनियम मंजूर झाल्याचे नमूद करून याद्वारे भारतातील महिलांमध्ये त्यांच्या छोट्या छोट्या गरजांबाबत सरकार संवेदनशील असल्याबद्दल निर्माण झालेल्या आत्मविश्वासाकडेही पंतप्रधानांनी लक्ष वेधले. अमृतकाळाने शौर्य दाखविण्याची आणि देशाच्या राजकीय भविष्याला आकार देण्याची संधी स्वतःसोबत आणली आहे याचा त्यांनी पुनरुच्चार केला. “विकसित भारताचे राजकारण बदलण्यात युवा शक्ती आणि नारी शक्ती मोठी भूमिका बजावू शकतात आणि तुमची शक्ती देशाच्या राजकारणाला घराणेशाही आणि भ्रष्टाचारापासून मुक्त करू शकते”, यावर पंतप्रधानांनी भर दिला. 

प्राण प्रतिष्ठेच्या वेळी हा काळ एखाद्याने राम काज म्हणजे रामकार्यापासून राष्ट्र काज म्हणजे राष्ट्रकार्यासाठी समर्पित करण्याचा काळ आहे या आवाहनाची आठवण करून पंतप्रधान मोदी यांनी भारताकडून असलेल्या जागतिक अपेक्षांना अधोरेखित केले. “2047 पर्यंत भारताला एक विकसित राष्ट्र बनवण्याचे आपले उद्दिष्ट आहे. भारताला आर्थिकदृष्ट्या समृद्ध, सांस्कृतिकदृष्ट्या बळकट आणि धोरणात्मकदृष्ट्या सक्षम बनवणे हे आपले उद्दिष्ट आहे. यासाठी येत्या 5 वर्षात आपण जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणे अतिशय महत्त्वाचे आहे. आणि हे लक्ष्य आपल्या आवाक्यापासून फार दूर नाही. गेल्या 10 वर्षात संपूर्ण देशाचे प्रयत्न आणि प्रोत्साहन यामुळे 25 कोटी भारतीय गरिबीमधून बाहेर पडले आहेत. भारत आज अशी लक्ष्ये साध्य करत आहे, ज्यांची यापूर्वी कोणी कल्पना देखील केली नव्हती”, पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.

गेल्या 10 वर्षात भारतीय संरक्षण क्षेत्राला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी उचललेल्या पावलांची देखील पंतप्रधानांनी सविस्तर माहिती दिली. शेकडो प्रकारचा दारुगोळा आणि सामग्रीवर बंदी घालून अतिशय उद्यमशील देशी संरक्षण उद्योगाची निर्मिती केली असल्याचा त्यांनी उल्लेख करत, पंतप्रधान म्हणाले, “ एकेकाळी जगातील सर्वात मोठा संरक्षण सामग्री आयातदार असलेला भारत आता जगातील सर्वात मोठ्या संरक्षण सामग्री निर्यातदारांच्या पंक्तीत सहभागी होत आहे.”  

आजचा भारत संपूर्ण जगाला एक विश्व मित्र म्हणून जोडत आहे आणि जागतिक आव्हानांवर तोडगे काढण्यासाठी काम करत आहे, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

एकीकडे जागतिक शांततेसाठी मार्ग काढण्याचा भारत प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे राष्ट्रीय हिताचे रक्षण करण्यासाठी देखील देश सज्ज असल्याचा निर्धार पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधानांनी भारतासाठी आणि जनतेसाठी पुढील 25 वर्षांचे महत्त्व अधोरेखित केले आणि अमृत काळाचा प्रत्येक क्षण देशाच्या हितासाठी समर्पित करण्यावर भर दिला. “आपण परिश्रम केलेच पाहिजेत आणि आपण धाडसी असलो पाहिजे. विकसित भारत उभारण्यासाठी हे अतिशय महत्त्वाचे आहे. पराक्रम दिवस आपल्याला दरवर्षी या संकल्पाची आठवण करून देईल,” पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सांगता केली.

केंद्रीय सांस्कृतिक कार्य आणि पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी, केंद्रीय सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि मीनाक्षी लेखी आणि संरक्षण आणि पर्यटन राज्यमंत्री अजय भट्ट आणि नेताजी सुभाषचंद्र बोस आयएनए ट्रस्टचे अध्यक्ष ब्रिगेडियर(निवृत्त) आर. एस. चिकारा यावेळी उपस्थित होते. 

 

पार्श्वभूमी

स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतलेल्या स्फूर्तिदायी आणि तेजस्वी व्यक्तींच्या योगदानाचा उचित सन्मान करण्यच्या पंतप्रधानांच्या दृष्टिकोनाला अनुसरून, 2021 पासून नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती देशात 'पराक्रम दिवस' म्हणून साजरी केली जाते. ऐतिहासिकतेचे प्रतिबिंब आणि बहुरंगी सांस्कृतिक अभिव्यक्ती यांची सुसूत्र गुंफण दाखवणाऱ्या यावर्षीच्या लाल किल्ल्यावरील कार्यक्रमाद्वारे हा दिवस पैलूदार पद्धतीने साजरा होणार आहे. नेता जी सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेना यांचा अर्थगर्भ वारसा दाखवून देणाऱ्या उपक्रमांची यामध्ये रेलचेल असेल. नेताजींचा आणि आझाद हिंद सेनेचा प्रवास कालक्रमानुसार उलगडून दाखवणारी दुर्मिळ छायाचित्रे आणि कागदपत्रे मांडणाऱ्या प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रेक्षकांना त्या इतिहासात रममाण होता येईल. 31 जानेवारी 2024 पर्यंत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून पराक्रम दिवस साजरा होत राहील.

कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी, 23 ते 31 जानेवारी या काळासाठी आयोजित 'भारत पर्वाचा' प्रारंभ केला. प्रजासत्ताक दिनाच्या चित्ररथांमधून तसेच सांस्कृतिक प्रदर्शनांमधून दिसणारी देशाची समृद्ध विविधता यातून प्रदर्शित केली जाणार आहे. याद्वारे 26 मंत्रालये आणि विभागांचे परिश्रम दिसून येणार असून, नागरिक-केंद्री कार्यक्रम, व्होकल फॉर लोकल (स्थानिक उत्पादनांसाठी मौखिक प्रसिद्धी), पर्यटकांसाठी विविध आकर्षणे, यांसह अन्य बाबींवर प्रकाश टाकला जाणार आहे. रामलीला मैदानावर तसेच लाल किल्ल्यासमोरील माधव दास उद्यानात हे कार्यक्रम आयोजित होणार आहेत. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

* * *

R.Aghor/Sonal C/Vasanti/Shailesh/Jai/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1998980) Visitor Counter : 110