पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

तमिळनाडूत चेन्नई इथे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन समारंभातले पंतप्रधानांचे संबोधन

Posted On: 19 JAN 2024 8:29PM by PIB Mumbai

वणक्कम चेन्नई 

तामिळनाडूचे राज्यपाल आर एन रवी जी, मुख्यमंत्री एम के स्टॅलिन जी,केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी अनुराग ठाकूर, एल मुरुगन, निशिथ प्रामाणिक, तामिळनाडू सरकारचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन आणि भारताच्या विविध भागातून इथे आलेल्या माझ्या युवा मित्रांनो,

13 व्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धामध्ये मी सर्वांचे स्वागत करतो.भारतीय क्रीडा विश्वासाठी 2024 ची  सुरवात  करण्याचा हा उत्तम मार्ग आहे.इथे जमलेले  माझे युवा मित्र युवा भारत,नव भारताचे प्रतिनिधित्व करतात. यांची ऊर्जा आणि उत्साह क्रीडा विश्वात आपल्या देशाला नव्या शिखरावर नेत आहे.देशभरातून चेन्नईला आलेल्या सर्व खेळाडूंना आणि क्रीडा प्रेमींना माझ्या शुभेच्छा.आपण सर्वजण एकत्रितपणे  खऱ्या अर्थाने एक भारत श्रेष्ठ भारत चे दर्शन घडवत आहात.तामिळनाडूचे स्नेह पूर्ण लोक,लालित्यपूर्ण तमिळ भाषा,संस्कृती आणि खाद्य संस्कृती यामुळे आपणा सर्वांना आपुलकीचा प्रत्यय येईल.त्यांचे आदरातिथ्य आपणा सर्वांची मने जिंकेल याचा मला विश्वास आहे. खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा आपल्यातल्या कौशल्याचे दर्शन घडवण्याची संधी नक्कीच देईल.त्याचबरोबर आपल्याला आयुष्य भर साथ देणारी नवी मैत्रीही जोडण्यासाठी मदत करेल. 

मित्रांनो,

आज इथे दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या अनेक प्रकल्पांचेही उद्घाटन आणि भूमिपूजन झाले आहे.1975 मध्ये प्रसारण सुरू करणारे चेन्नई दूरदर्शन केंद्र आजपासून नवा प्रवास  सुरु करत आहे.आज इथे डीडी  तमिळ वाहिनीही

नव्या स्वरूपात सुरू करण्यात आली आहे.8 राज्यांमध्ये 12 नवे  एफ एम ट्रान्समीटर  सुरू झाल्याने सुमारे दीड कोटी लोकांना लाभ होणार आहे.आज 26 नव्या एफ एम ट्रान्समीटर प्रकल्पांचे भूमिपूजनही करण्यात आले.तमिळनाडू मधल्या लोकांचे, देशातल्या जनतेचे यासाठी मी अभिनंदन करतो.

मित्रांनो,

भारताच्या क्रीडा क्षेत्राच्या विकासात तमिळनाडूचे  मोठे योगदान राहिले आहे. चॅम्पियन्स घडवणारी ही धरती आहे. टेनिस जगतात नावलौकिक मिळवणाऱ्या अमृतराज बंधूचा जन्म इथे झाला.ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक प्राप्त करून देणाऱ्या हॉकी संघाचे कर्णधार भास्करन याच भूमीने दिले. बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद,प्रज्ञानंद आणि पॅरालिम्पिक  चॅम्पियन मरीयप्पन हे याच भूमीने दिले.असे अनेक खेळाडू ही भूमी घडवत आहे,हे खेळाडू प्रत्येक क्रीडा प्रकारात नैपुण्य दाखवत आहेत.आपणा सर्वाना तमिळनाडूच्या या भूमीवरून आणखी प्रेरणा मिळेल असा मला विश्वास आहे.   

मित्रांनो,

क्रीडाक्षेत्रातल्या सर्वोत्कृष्ट देशांमध्ये भारताचे नाव असावे अशी आपणा सर्वांचीच इच्छा आहे. यासाठी देशात सातत्याने क्रीडा स्पर्धा होणे, खेळाडूंचा अनुभव समृद्ध होणे आणि  समाजाच्या तळापासूनच्या खेळाडूंची निवड होऊन ते मोठ-मोठ्या स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी येणे  आवश्यक आहे.  याच दिशेने खेलो इंडिया अभियान भूमिका बजावत आहे.2018 पासून आतापर्यंत 12 खेलो इंडिया क्रीडा स्पर्धांचे आयोजन झाले आहे. खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा, खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा, खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा आणि खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धा आपल्याला क्रीडा नैपुण्य दाखवण्याची संधीही देत आहेत आणि नवे प्रतिभावान खेळाडूही पुढे आणत आहेत.आता पुन्हा एकदा खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांचा प्रारंभ होत आहे.चेन्नई,त्रिची,मदुराई आणि कोईमतूर ही  तमिळनाडूची चार शानदार शहरे चॅम्पियन्सचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत.

मित्रांनो,

खेळाडू असोत किंवा प्रेक्षक, चेन्नईचा नितांतसुन्दर समुद्रकिनारा आपल्याला नक्कीच आकर्षित करेल याचा मला विश्वास आहे. मदुराईच्या अद्वितीय मंदिरांची आभा आपण अनुभवाल.त्रिची इथले मंदिर,तिथली कला आणि कारागिरी  आपले मन मोहून घेईल आणि कोईमतूरचे मेहनती उद्योजक आपले मनःपूर्वक स्वागत करतील.तमिळनाडूच्या या सर्व शहरांमधे आपल्याला अविस्मरणीय अशी अनुभूती प्राप्त होईल.

मित्रांनो,

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांमध्ये 36 राज्यांचे क्रीडापटू आपल्या क्रीडा कौशल्याचे दर्शन घडवतील.5 हजाराहून जास्त युवा खेळाडू जोमाने  आणि अपार उत्साहाने मैदानात उतरतील तेव्हा इथल्या वातावरणात प्रचंड जोश असेल. तिरंदाजी, अ‍ॅथलेटीक्स आणि बॅडमिंटन  यासारख्या खेळांच्या आनंददायी स्पर्धांची आम्हाला प्रतीक्षा आहे.खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत प्रथमच समाविष्ट झालेल्या स्क्वॅशमधल्या  जोशाची आम्हाला प्रतीक्षा आहे. तामिळनाडूची अभिमानास्पद  प्राचीन  परंपरा असलेल्या सिलम्बमची आम्हाला प्रतीक्षा आहे जो क्रीडा जगताला नवी उंची प्राप्त करून देईल. विविध राज्यांचे, वेगवेगळ्या  क्रीडा प्रकारातले खेळाडू एक संकल्प, एक कटिबद्धता आणि ऐक्यभावनेने एकजूट होऊन खेळतील. खेळाप्रती आपला ध्यास,आत्मविश्वास,संकटांवर मात करण्याची वृत्ती आणि कौशल्याचे दर्शन घडवण्याची जिद्द  अवघा देश  पाहील.

मित्रांनो,

तामिळनाडू ही थोर संत तिरुवल्लुवर जी यांची भूमी आहे. संत तिरुवल्लुवर यांनी आपल्या रचनांमधून युवकांना नवी दिशा दिली,त्यांना पुढे जाण्यासाठी प्रेरित केले. खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांच्या लोगो वरही थोर तिरुवल्लुवर यांची छबी आहे. संत तिरुवल्लुवर यांनी लिहिले आहे, अरुमई उदैथथेंद्रु असावामई वेनडुम, पेरुमै मुयारची थारुम म्हणजेच प्रतिकूल परिस्थितीतही आपण डगमगता कामा नये,संकटांपासून आपण पळ काढता कामा नये.आपल्या निश्चयावर ठाम राहून लक्ष्य प्राप्ती केली पाहिजे. खेळाडूसाठी ही मोठी प्रेरणा आहे.या वेळी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांची शुभंकर म्हणून वीरा मंगई वेलु नाचियार यांना स्थान देण्यात आले आहे. वास्तव जीवनातल्या व्यक्तीची शुभंकर म्हणून निवड होणे ही अभूतपूर्व बाब आहे. वीरा मंगई वेलु नाचियार या नारी शक्तीचे प्रतिक आहेत.आज सरकारच्या अनेक निर्णयांमधून त्यांचे व्यक्तित्व प्रतिबिंबित होते. त्यांच्यापासून प्रेरणा घेत महिला क्रीडापटूंच्या सक्षमीकरणासाठी सरकार सातत्याने काम करत आहे.खेलो इंडिया अभियानाअंतर्गत 20 क्रीडाप्रकारात महिला लीगचे आयोजन करण्यात आले.यामध्ये 50 हजाराहून अधिक महिलांनी भाग घेतला. ‘दस का दम’ यासारख्या उपक्रमांनीही 1 लाखाहून जास्त महिला क्रीडापटूंना आपले   क्रीडा नैपुण्य दाखवण्याची संधी प्राप्त करून दिली.

मित्रांनो,

आज अनेकांना प्रश्न पडतो की ,अचानक असे काय झाले की, 2014  नंतर आपल्या खेळाडूंची कामगिरी इतकी चांगली कशी काय झाली?  टोक्यो ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केल्याचे तुम्ही पाहिले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा आणि आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धांमध्येही भारताने इतिहास रचला. विद्यापीठ क्रीडा स्पर्धांमध्ये देखील भारताने पदकांचा नवा विक्रम केला. हे काही अचानक घडलेले नाही.  याआधीही देशातील खेळाडूंच्या मेहनतीत आणि  उत्साहात  कमी नव्हती.  पण गेल्या 10 वर्षात  नवा आत्मविश्वास मिळाला आहे आणि प्रत्येक पावलावर सरकारचा पाठिंबा मिळाला आहे. पूर्वीच्या खेळांमध्ये ज्या प्रकारचे काही खेळ खेळले जायचे तेही आम्ही बंद केले आहेत.  गेल्या 10 वर्षात सरकारने सुधारणा केल्या, खेळाडूंनी कामगिरी केली आणि संपूर्ण क्रीडा व्यवस्थेचा कायापालट झाला. आज खेलो इंडिया मोहिमेद्वारे देशातील हजारो खेळाडूंना दरमहा 50 हजार रुपयांहून अधिक मदत दिली जात आहे.  2014 मध्ये, आम्ही टॉप्स म्हणजेच टार्गेट ऑलिम्पिक पोडियम योजना सुरू केली.

याद्वारे, आम्ही अव्वल खेळाडूंचे प्रशिक्षण, आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी आणि मोठ्या क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांचा सहभाग सुनिश्चित केला आहे.  आता आमची नजर या वर्षीच्या पॅरिस आणि 2028 मधील लॉस एंजेलिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांवर आहे.  यासाठी टॉप्स अंतर्गत खेळाडूंना सर्वतोपरी मदत केली जात आहे.

मित्रांनो

आज आपण तरुणाई खेळाकडे येण्याची वाट पाहत नाही, तरूणाईकडे खेळ घेऊन चाललो आहोत!

मित्रांनो,

खेलो इंडिया सारखी मोहीम ग्रामीण- गरीब, आदिवासी आणि निम्न मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुणांची स्वप्ने साकारत आहे.  आज जेव्हा आपण लोकल फॉर व्होकल म्हणतो तेव्हा त्यात क्रीडा प्रतिभा देखील समाविष्ट आहे.  आज आपण स्थानिक स्तरावर खेळाडूंसाठी उत्कृष्ट सुविधा आणि चांगल्या स्पर्धांचे आयोजन करत आहोत.

त्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळत आहेत. गेल्या 10 वर्षात, आम्ही भारतात प्रथमच अशा अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन केले आहे.  तुम्ही कल्पना करू शकता, देशाला इतकी मोठी किनारपट्टी लाभली  आहे, इतके समुद्रकिनारे आहेत. पण आता पहिल्यांदाच दीवमध्ये समुद्र किनारी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं .  या खेळांमध्ये मल्लखांबसारख्या पारंपरिक भारतीय खेळांसह 8 खेळांचा समावेश होता.यामध्ये देशभरातील 1600 खेळाडूंनी भाग घेतला.  यासह भारतात समुद्रकिनारी खेळ आणि क्रीडा पर्यटनाचा नवा अध्याय सुरू झाला आहे.  आपल्या किनारी शहरांना याचा मोठा फायदा होणार आहे.

मित्रांनो,

आपल्या युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय संधी मिळावी आणि भारत जागतिक क्रीडा व्यवस्थेचे  एक महत्त्वाचे केंद्र बनले पाहिजे हा आमचा संकल्प आहे. त्यामुळे 2029 मध्ये युवा ऑलिम्पिक आणि 2036 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा भारतात आयोजित करण्यासाठी आम्ही परिश्रमपूर्वक प्रयत्न करत आहोत. खेळ हा केवळ मैदानापुरता मर्यादित नाही हे आपणा सर्वांना माहीत आहे.  खरे तर खेळ ही एक मोठी अर्थव्यवस्था आहे. तरुणांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.  येत्या 5 वर्षात भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याची हमी मी दिली आहे.  या हमीमध्ये क्रीडा अर्थव्यवस्थेचा वाटा वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे.  त्यामुळे गेली 10 वर्षे आम्ही खेळाशी संबंधित इतर क्षेत्रांचाही विकास करत आहोत.

आज देशात खेळाशी संबंधित व्यावसायिक तयार करण्यासाठी कौशल्य विकासावर भर दिला जात आहे.  दुसरीकडे, आम्ही क्रीडा उपकरणे निर्मिती आणि सेवांशी संबंधित एक व्यवस्था विकसित करत आहोत. आम्ही देशातील क्रीडा विज्ञान, नवोन्मेष, उत्पादन, क्रीडा प्रशिक्षण, क्रीडा मानसशास्त्र, क्रीडा पोषण या विषयांशी संबंधित व्यावसायिकांना व्यासपीठ देत आहोत. 

गेल्या काही वर्षांत देशाला पहिले राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ मिळाले.  खेलो इंडिया मोहिमेमुळे आज देशात 300 हून अधिक प्रतिष्ठित अकादमी तयार झाल्या आहेत. एक हजार खेलो इंडिया केंद्रे आणि 30 हून अधिक उत्कृष्टता केंद्रे जोडलेली आहेत.  देशाच्या नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात आम्ही क्रीडा हा मुख्य अभ्यासक्रमाचा भाग बनवला आहे.  त्यामुळे खेळाला करिअर म्हणून निवडण्याची जाणीव लहानपणापासूनच निर्माण होत आहे.

मित्रांनो,

येत्या काही वर्षांत भारताचा क्रीडा उद्योग सुमारे एक लाख कोटी रुपयांचा होईल असा अंदाज आहे. आपल्या तरुण मित्रांना याचा थेट फायदा होईल.  गेल्या काही वर्षांत देशात खेळांविषयी जी जागरूकता आली आहे, त्यामुळे प्रसारण, क्रीडासाहित्य, क्रीडा पर्यटन आणि क्रीडा पोशाख यांसारख्या व्यवसायांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. क्रीडासाहित्य उत्पादनामध्येही भारताला आत्मनिर्भर बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे.  आज आपण 300 प्रकारच्या क्रीडा उपकरणांची निर्मिती करत आहोत.  देशाच्या विविध भागात याच्याशी संबंधित उत्पादन समूह तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

मित्रांनो,

खेलो इंडिया मोहिमेंतर्गत देशभरात उभारल्या जाणाऱ्या क्रीडा पायाभूत सुविधाही रोजगाराचे मोठे माध्यम बनत आहेत. आज विविध खेळांशी संबंधित लिगही वेगाने वाढत आहेत.  यामुळे शेकडो नवीन रोजगारही निर्माण होत आहेत.  म्हणजे आज शाळा-महाविद्यालयात शिकणारे आपले तरुण, ज्यांना क्रीडा क्षेत्रात आपली कारकीर्द घडवायचे आहे, त्यांचे भविष्य चांगले घडवणे, ही देखील मोदींची हमी आहे.

मित्रांनो,

आज केवळ खेळच नाही तर भारत प्रत्येक क्षेत्रात भारताचा डंका आहे.  जुने विक्रम मोडीत काढण्यासाठी, नवे निर्माण करण्यासाठी, नवे विक्रम रचण्यासाठी नव्या  भारताने वाटचाल सुरू केली आहे.   मला आपल्या तरुणांच्या सामर्थ्यावर, त्यांच्या जिंकण्याच्या इच्छाशक्तीवर विश्वास आहे.  मला तुमची जिद्द आणि मानसिक ताकदीवर विश्वास आहे.  आजच्या भारताकडे मोठी उद्दिष्टे ठेवण्याची आणि ती साध्य करण्याची क्षमता आहे.  एवढा मोठा विक्रम नाही की आपण तो मोडू शकत नाही. या वर्षी  आपण नवा विक्रम तयार करू, स्वतःसाठी आणि जगासाठी नवीन रेषा काढू.  तुम्हाला पुढे जायचे आहे, कारण भारत तुमच्यासोबत पुढे जाईल.  सहभागी व्हा, स्वतःला जिंका आणि देशाला विजयी करा.  पुन्हा एकदा सर्व खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा.

धन्यवाद।

मी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2023 चे उदघाटन झाल्याचे घोषित करतो.

***

NM/NilimaC/SonalC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1998076) Visitor Counter : 114